agriculture news in marathi agrowon special article on efficient fertilizer management | Agrowon

कार्यक्षम खत व्यवस्थापनेतून साधूया कृषिसमृद्धी

अशोक साकळे
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

खत रासायनिक 
असो की सेंद्रिय; ते पिकांचे जेवण आहे. आज शेतकरी बांधवांत एक गैरसमज पसरवला जात आहे की रासायनिक खतांमुळे जमिनी खराब होत आहेत. जमीन खराब होण्याचे प्रमाण बागायती क्षेत्रातच आहे. त्यांचे कारण खत नसून वारेमाप पाणीवापर आहे.

हरितक्रांतीच्या यशात अधिक उत्पादनक्षम गहू बियाणे 
 व रासायनिक खतांनी फार भूमिका राहिली आहे. शासनाने युद्धपातळीवर बीजगुणन करून गहू बियाणे उपलब्ध करून दिले. परंतु देशात रासायनिक खतांची उपलब्धता, त्याचे महत्त्व व वापर अत्यंत कमी होता. शेतकऱ्यांना कृषितंत्रज्ञान, प्रशिक्षण व मार्गदर्शन देणारी यंत्रणा अजून तयार होत होती. यासाठी ३ नोव्हेंबर १९६७ मध्ये सहकारी तत्त्वावर खत उत्पादन, विक्री व शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी केंद्र सरकार व सहकारी संस्थांनी मिळून इफ्को या सहकारी खत उत्पादक संस्थेची स्थापना केली. गाव स्तरावरील विविध कार्यकारी सहकारी संस्था, तालुका शेतकरी सहकारी संघ, जिल्हा सहकारी बँका हे इफ्कोचे सभासद झाले आणि सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना माफक दरात, चांगल्या गुणवत्तेची गावात रासायनिक खते उपलब्ध झाली. 

खत हे पिकाचे अन्न आहे. खतांच्या अनेक प्रकारांपैकी रासायनिक खते हा प्रकार कारखान्यात रासायनिक अभिक्रियेद्वारा निर्माण केली जातात. ही खते उच्च कार्यक्षमतेची, पिकाला जास्त अन्नघटक, संपृक्त मात्रेत देणारी, हाताळण्यास आणि वापरण्यास सोपी आहेत. त्यासाठी कच्चा माल म्हणजे हवा (नत्र), नैसर्गिक वायू (हायड्रोजन), रॉक फॉस्फेट दगड (स्फुरद) व पालाशयुक्त खनिज (पालाश) याचा वापर करून युरियापासून ते १०:२६:२६, १२:३२:१६, १८:४६:०० आदी अनेक ग्रेड ची निर्मिती होते. एक अन्नघटक पिकाला उपलब्ध करणाऱ्‍या खताला सरळ खते म्हणतात. उदा. युरिया (४६ टक्के नत्र). दोन किंवा त्यापेक्षा अधिक अन्नघटक उपलब्ध करणाऱ्या खताला संयुक्त खते म्हणतात. उदा. १०:२६:२६, १२:३२:१६, १८:४६:०. आता रासायनिक खतांची दुसरी पिढी आली असून, त्यात फवारणी व ठिबकमधून देण्यासाठी १०० टक्के विद्राव्य खते उदा १२:६१:००, ०:५२:३४, १७:४४:००, १८:१८:१८ आदी, तर पिकांची सूक्ष्म अन्नघटकाची कमतरता दूर करण्यासाठी सूक्ष्म अन्नघटक खते उदा. झिंक सल्फेट, मॅग्नेशिअम सल्फेट, बोरॉन आदी अनेक ग्रेड बाजारात उपलब्ध आहेत. मातीत कोट्यवधी फायदेशीर जिवाणू आहेत. ते पिकाला मुळाद्वारे अन्नग्रहण करण्यास अत्यंत महत्त्वाचे आहेत. अशा उपयुक्त जिवाणूंचे कल्चर करून एका मिलिमध्ये १० कोटी जिवाणू असतील असे जैविक खते देखील उपलब्ध झालीत. यामध्ये हवेतील नत्र पिकाच्या मुळात स्थिर करणारी रायझोबियम, मातीत पडून राहिलेला स्फुरद पिकाला उपलब्ध करण्यासाठी पीएसबी, पालाश विरघळणारे जिवाणू केएमबी आदी अनेक स्वस्त; पण फायदेशीर जिवंत जिवाणू खते मातीचे आरोग्य राखण्यास अत्यावश्यक आहे. ही खते बीजप्रक्रिया, मुळाभोवती आळवणी, रोपांचे मूळ बुडवणे अथवा ठिबकद्वारे देता येतात. 

आज शेतकरी बांधवांत एक गैरसमज पसरवला जात आहे, की रासायनिक खतांमुळे जमिनी खराब होत आहेत. मुळात जमीन रासायनिक खतांमुळे खराब होत नसून, त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर, शिफारशीपेक्षा जास्त वापर व भरमसाट पाणी दिल्याने जमिनी खारवट होत आहेत. हे समजून घेतले पाहिजे. खत रासायनिक असो की सेंद्रिय; ते पिकांचे जेवण आहे. त्यातून पिकांना वाढीसाठी आवश्यक १४ प्रकारचे अन्नघटक मिळतात. तीन घटक पाणी आणि हवेतून मिळतात. सेंद्रिय शेती हा भ्रम असून, आजच्या बीटी कापूस किंवा इतर हायब्रीड पिकाच्या अन्नाची गरज भागवूच शकत नाही. १०० किलो सेंद्रिय खतांमध्ये १-२ किलो नत्र, २-३ किलो स्फुरद तर १-२ किलो पालाशपेक्षा जास्त अन्नघटक नसतात. मात्र १०० किलो १०:२६:२६ या संयुक्त दाणेदार खतामधून पिकाला १० किलो नत्र, २६ किलो स्फुरद, २६ किलो पालाश दिले जाते. हा फरक समजून घेतला पाहिजे. 

जमीन खराब होण्याचे प्रमाण बागायती क्षेत्रातच आहे. त्याचे कारण खत नसून वारेमाप पाणीवापर आहे. जमीन खराब होणे म्हणजे काय? तर मातीचा सामू ४.५ पेक्षा कमी किंवा ८.५ पेक्षा जास्त होणे, क्षाराचे प्रमाण वाढणे व जमीन पांढरट व कडक होणे. जास्त पाणी दिल्याने पाण्याच्या बाष्पीभवनानंतर पाण्यातील क्षार मातीत वाढतात. ते मातीचे रंध्र (मानवी भाषेत नाक) बंद करतात. जास्त पाणी दिल्याने मातीतील हवा निघून जाते. माती कडक होते. त्यामुळे मातीत जगणाऱ्‍या जिवाणू, गांडूळ आणि इतर सजीवांना श्वासोच्छ्वास घेताच येत नाही. अशा मातीत गांडूळ व जिवाणूंची संख्या अतोनात घटते. पालापाचोळा सडत नाही. सेंद्रिय कर्ब नाहीसे होते. पिकाला खतांमधून अन्न घेता येत नाही; कारण मुळाचा विकासच होत नाही आणि कितीही महागडे खते टाकली तरी ते पिकाला मिळत नाही. उलट खतांद्वारे पिकाला दिलेली नत्र, स्फुरद, पालाश पाण्यावाटे खोल जमिनीत झिरपतात. नदी-नाल्यांना जाऊन मिळतात आणि पाण्याचे प्रदूषण करतात. मातीचे आरोग्य व्यवस्थापनेत मातीची आरोग्यपत्रिका काढणे सर्वांत महत्त्वाचे आहे. शेतकरी बांधवांनी दर तीन वर्षाला मातीची तपासणी जरूर केली पाहिजे. मातीचा सामू, उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, सेंद्रिय कर्ब तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचे निदान करून आरोग्यपत्रिकेत पीक लागवडीची आणि खतांची शिफारस देखील केली जाते. माती आणि पाणी परीक्षण हा पिकाच्या अन्नघटक व्यवस्थापनेचा पाया आहे. यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्याचा डोळसपणे वापर होणे गरजेचे आहे. 

इफ्को सतत नव तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यास तत्पर असते. स्थापनेच्या ५२ वर्षांच्या स्वर्णिम क्षणी नॅनोखते इफ्कोने विकसित करून कृषी क्षेत्रात नव्या क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली आहे. एक नॅनोमीटर म्हणजे एका मीटरचा एक अरब वा भाग. सोप्या भाषेत आपल्या केसाच्या जाडीच्या ८० हजार वा भाग म्हणजे एक नॅनो कण. अशा कणांचे द्रावण स्वरूपातील ही खते अत्यंत परिणामकारक असून, फार कमी मात्रेत, कमी खर्चात ३० टक्के उत्पादन वाढवू शकतात. याची प्रायोगिक चाचणी सुरू असून, लवकरच शेतकऱ्‍यांना उपलब्ध होईल. वाढत्या लोकसंख्येचा दबाव, घटती जमीन, निसर्गाचा लहरीपणा यातून नव्या आव्हानांना तोंड देत अचूक शेती हेच आपले भविष्य आहे. त्यासाठी नॅनो तंत्रज्ञान किमयागार सिद्ध होईल, असा मला सार्थ विश्वास आहे. 

अशोक साकळे  : ७७९८०९१२८८ 
(लेखक इफ्कोचे सहायक व्यवस्थापक आहेत.)



इतर संपादकीय
रेशीम संजीवनीरेशीम उद्योगाचा विस्तार व विकास करण्याच्या...
ऑनलाइन बॅंकिंग करताय, सावधान!आधुनिक युगात विज्ञानामुळे नवनवीन शोधांमुळे मानव...
शेतकरीहितालाच हवे सर्वोच्च प्राधान्यसहकार क्षेत्रात पूर्वीपासूनच काँग्रेस,...
सोशल मीडिया आणि बॅंकिंग जगात आज कोट्यवधी लोक संवाद करणे आणि माहिती...
मटण दरवाढीचा लाभ पशुपालकांना कधी?शेळीपालनाबरोबरच मेंढीपालनातही समस्यांचा ऊहापोह...
जैवविविधतेची नोंदणी गांभीर्याने घ्याराज्यातील खेड्यापाड्यांसह शहरांमध्ये असलेल्या...
चार आने की मुर्गी...केंद्र सरकारने मागील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर...
मटणाचे वाढते दर अन् शेळी-मेंढीपालन मागणी, पुरवठा आणि किंमत या बाबींच्या...
चिंता पुरे; हवी थेट कृती ग्रामीण कुटुंबाचे उत्पन्न वाढल्याशिवाय देशाचा...
बदल ठरावेत लाभदायकयवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील हजारो...
हवामान बदल हेच सर्वांत मोठे आव्हानआ ज जगभरात हवामान बदल आणि त्याचे होणारे परिणाम हा...
पशुधन विकासाची वसाहत वाटपशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाची...
रस्ते की मृत्यूचे सापळेआपला देश संपूर्ण विश्वात रस्ते अपघातात अव्वल आहे...
‘अटल योजने’द्वारे शाश्‍वत करूया भूजलजल म्हणजेच पाणी अर्थात अमृत. जलाचे वर्गीकरण आपण...
वेध भविष्यातील शेतीचाआपल्या देशात आणि राज्यात सुद्धा आजही बहुतांश...
शेतकऱ्यांच्या व्यापक हिताचे कार्य कधी?शेती उत्पादनाची वाढ व्हावयाची असेल, वाढत्या...
निर्यातवृद्धीचा रोडमॅपभारतात प्रदेशनिहाय माती, हवामान बदलते. अनेक...
दुबई वारी फलदायी ठरावी संत्रा हे जगभरातून मागणी असलेले फळपीक आहे....
उद्योगाप्रमाणे हव्यात शेतीला सवलतीशेती हा एक उद्योग आहे, याची जाणीव करून देण्याची...
गोड बोलण्यासारखी स्थिती नाही!गेल्या सहा वर्षांत भारतात एक नवी ‘भक्त-परंपरा’...