agriculture news in marathi, agrowon special article on el-nino | Agrowon

एल-निनो समजून घेऊ या
डॉ. रंजन केळकर  
सोमवार, 11 मार्च 2019

विषुववृत्तीय भागात सौम्य एल-निनो स्थिती निर्माण झाल्याचे अमेरिकेतील राष्ट्रीय सागरी आणि वातावरणीय व्यवस्थापन संस्थेने स्पष्ट केले आहे. एल-निनोचं नाव निघालं, की आता दुष्काळ पडणार, अशी भीती लोकांच्या मनात येते. म्हणून ह्यात तथ्य काय आहे, हे जाणून घेणं आता गरजेचं झालं आहे.  
 

एल-निनो आणि ला-निना हे मुळात स्पॅनिश भाषेतले शब्द आहेत, पण काही वर्षांपासून ते मराठीत जसेच्या तसे वापरले जात आहेत. त्यांचा नेमका अर्थ ठाऊक नसला तरी त्यांचा आपल्या माॅन्सूनशी काही तरी संबंध आहे, हे मात्र आता पुष्कळांना माहीत झाले आहे. म्हणून एल-निनोचं नाव निघालं, की आता दुष्काळ पडणार, अशी भीती लोकांच्या मनात येते आणि ला-निनामुळं चांगला पाऊस पडेल अशी आशा वाटते. म्हणून ह्यात तथ्य काय आहे हे जाणून घेणं आता गरजेचं झालं आहे. 
एल-निनोचं शब्दशः मराठी भाषांतर ‘बाळ येशू’ असं आहे. हे नाव पडायचं कारण हे, की एल-निनो ख्रिसमसच्या सुमारास उद्भवतो. ला-निनाचा अर्थ ‘सुकन्या’ असा आहे. पण ती केवळ नावं नाहीत, त्या घटनाही नाहीत, त्या आलटून पालटून सुरू राहणाऱ्या दीर्घ अवधीच्या प्रक्रिया आहेत. सोप्या भाषेत बोलायचं झालं तर दक्षिण अमेरिकेत पेरू देश आहे. त्याच्या किनाऱ्याच्या पश्चिमेकडे जो प्रशांत महासागर आहे त्याचं तापमान सरासरीपेक्षा वाढतं. ही तापमान वाढ हळूहळू प्रशांत महासागराच्या बऱ्याच मोठ्या भागावर पसरते. जेंव्हा समुद्राचं तापमान सरासरीपेक्षा अर्ध्या अंशानं वाढतं तेव्हा सौम्य एल-निनो निर्माण झाल्याचं जाहीर केलं जातं. तापमान वाढ दोन अंशाहून जास्त झाली तर त्याला अतितीव्र एल-निनो म्हणतात. मध्यंतरीच्या एल-निनोला मध्यम किंवा तीव्र गणलं जातं. एल-निनो प्रबळ होतो तो वर्षाअखेरीस, किंवा ख्रिसमसच्या सुमारास, ज्यावरून त्याला हे नाव पडलं आहे. पण त्याच्या बऱ्याच आधी म्हणजे मे-जून महिन्यात त्याचे वेध लागतात. त्याच सुमारास भारतावर मॉन्सून येतो. म्हणून एल-निनोचा प्रभाव मॉन्सूनवर पडू शकतो. ला-निनाच्या बाबतीत उलट घडतं. पेरू देशाजवळच्या प्रशांत महासागरावरचं तापमान सरासरीपेक्षा कमी होतं आणि हळूहळू प्रशांत महासागराचा मोठा भाग थंड होत जातो. तापमान जेंव्हा सरासरीपेक्षा अर्ध्या अंशानं कमी होतं तेव्हा सौम्य ला-निना उद्भवल्याचं म्हटलं जातं.

एल-निनो आणि ला-निना ह्या दोन्ही प्रक्रिया दर वर्षी नाही पण साधारणपणे दोन ते चार वर्षांत एकदा आलटून पालटून उद्भवतात. अनेक वर्षी प्रशांत महासागराचं तापमान सरासरीएवढंच राहतं. मग एल-निनो किंवा ला-निना दोन्ही नसतात. ह्याउलट, नैर्ऋत्य मॉन्सून हा कधी न चुकता दरवर्षी भारतावर येतोच येतो. म्हणून मॉन्सूनचा आणि एल-निनो अथवा ला-निना ह्यांचा सरळ आणि घनिष्ठ संबंध लावता येत नाही. एल-निनो असो किंवा नसो, मॉन्सून त्याच्या वेळेनुसार येणार हे नक्की!

भारतीय मॉन्सूनच्या प्रक्रियेत उत्तर गोलार्धातील संपूर्ण युरेशिया खंड आणि दक्षिण गोलार्धातील हिंद महासागर ह्यांचा सहभाग असतो. म्हणून ह्या विस्तीर्ण प्रदेशाच्या वातावरणात आणि समुद्रात जे काही घडतं त्याचा भारतीय मॉन्सूनवर प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही. हिंद महासागराचं तापमान सर्वत्र सारखं नसतं. त्याच्या पूर्व आणि पश्चिम भागातील तापमानात जी तफावत असते तिचा मॉन्सूनवर परिणाम होतो. तिबेटच्या उंच पठारावरील हवामानाचा भारतीय हवामानावर परिणाम होतो. हिवाळ्यात हिमालय पर्वतीय क्षेत्रात जी हिमवृष्टी होते तिचाही मॉन्सूनच्या पावसावर प्रभाव पडतो. मध्य व उत्तर भारतावरील उन्हाळी तापमानाचाही मॉन्सूनच्या पर्जन्यमानाशी संबंध आहे. तरीही हल्लीच्या काळी हवामानशास्त्रज्ञ ह्या सर्व सहसंबंधांकडे दुर्लक्ष करून फक्त एल-निनोविषयीच बोलत असल्याचे आपण पाहत आहोत. त्यामुळे सामान्य माणसाचा असा गैरसमज होत चालला आहे, की बलशाली भारतीय मॉन्सून जणू एल-निनोच्या हातची कठपुतळी आहे, किंवा एल-निनो हा आपल्या मॉन्सूनचा एकमेव सूत्रधार आहे. वास्तविक परिस्थिती तशी नाही. 

हल्ली आपण दुसरी एक गोष्ट पाहत आहोत, की आगामी मॉन्सूनच्या पावसाचं पूर्वानुमान लवकरात लवकर देण्याची जणू स्पर्धा सुरू झाली आहे. हवामान खात्याचा अधिकृत दीर्घावधी अंदाज घोषित व्हायच्या आधीच निराळे अंदाज द्यायचे प्रयत्न आता होऊ लागले आहेत. ह्यामुळे शेतकरी संभ्रमात पडले तर त्यात काही नवल नाही. पण त्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, केवळ एल-निनो ह्या एकाच घटकावर आधारलेले मॉन्सूनचे अंदाज खरे ठरतीलच अशी काही शाश्वती नाही. एल-निनो हा ख्रिसमसच्या सुमारास म्हणजे डिसेंबर महिन्यात खऱ्या अर्थाने प्रबळ होतो. तोपर्यंत नैर्ऋत्य मॉन्सून परत गेलेला असतो. जून ते सप्टेंबर महिन्यांत जेंव्हा मॉन्सून भारतावर सक्रिय असतो तेव्हा एल-निनो कसा राहील ह्याचा आधी अंदाज बांधावा लागतो आणि मग त्यानुसार मॉन्सूनच्या पर्जन्यमानाचं पूर्वानुमान देता येतं. फेब्रुवारी-मार्च महिन्यांत एल-निनोविषयी रचलेले अंदाज फारसे विश्वासार्ह नसतात असा गतकाळातील अनुभव आहे. हे उघड आहे, की जर एल-निनोचे मूलभूत अंदाज बरोबर ठरले नाहीत, तर त्यापासून मॉन्सूनच्या पावसाविषयी काढलेले निष्कर्षही बरोबर येणार नाहीत. 

मॉन्सूनचं पर्जन्यमान कसं असेल हे चार महिने आधी जरी सांगून झालं तरी दरम्यानच्या वातावरणीय आणि सागरी हालचाली कोणतं स्वरूप धारण करतील, ह्याची कोणी हमी देऊ शकत नाही. परिणामी उगीच घाई करून दिलेले अंदाज नंतर सुधारावे लागतात. मागच्या वर्षी म्हणजे २०१८च्या मॉन्सूनविषयी दिलेले अनेक अंदाज असेच वेळोवेळी बदलले गेले होते. हवामानात जे काही घडतं ते सर्व काही एल-निनोमुळे होतं असं मुळीच नाही. नुकत्याच संपलेल्या हिवाळ्यात तापमानाचे कितीतरी चढउतार आपण अनुभवले. त्यामागं अनेक कारणं होती, प्रामुख्यानं उत्तरेकडून महाराष्ट्रापर्यंत येणारे थंड वारे. असे वारे वाहू लागले की तापमान उतरतं, नाही तर तापमान वाढतं. एल-निनोमुळं यंदाचा हिवाळा उष्ण राहील असा एक अंदाज दिला गेला होता. त्यानुसार प्रत्यक्षात मात्र घडलं 
नाही. मॉन्सूनचे निरनिराळे दीर्घावधी पूर्वानुमान विचारात घेताना शेतकऱ्यांनी हे लक्षात घेणं आवश्यक आहे, की ते चुकण्याची शक्यता किती सांगितली गेली आहे. मागील काही वर्षांत त्या प्रणालीचे अंदाज किती बरोबर आले होते, हेही त्यांनी पडताळून पाहावं. त्याशिवाय ते अंदाज केवळ एल-निनोवर आधारित आहेत, किंवा त्यात इतर घटकांचीही जोड दिली गेली आहे हेही त्यांनी बघावं. फेब्रुवारी-मार्चमध्ये केलेली मॉन्सूनची भाकिते शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक वापरावीत.                    

डॉ. रंजन केळकर  - ९८५०१८३४७५
(लेखक ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ आहेत.) 

इतर संपादकीय
चिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...
‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...
साखरेचं वाढतं दुखणंतीन दिवसीय साखर परिषदेची सांगता नुकतीच पुण्यात...
धरणफुटीला जबाबदार ‘खेकडे’ पकडातिवरे धरणफुटीच्या निमित्ताने जलविकासाचे स्वरूप व...
संकटातील संत्राअ  त्याधुनिक तंत्रज्ञानातून उत्पादनवाढ आणि...
विरोधकांना सूर गवसेनाकाँग्रेस पक्षाची ‘निर्णायकी’ अवस्था अद्याप...
हमीभाव की कमी भावदेशभरातील शेतकरी पेरणीच्या कामांमध्ये मग्न असताना...
‘अर्थ’हीन संकल्पआर्थिक पाहणी अहवालातून देशाच्या अर्थव्यवस्थेचे...
अडचणीतील साखर उद्योगाचा भविष्यवेधराज्य सहकारी बॅंकेने ‘साखर परिषद २०-२०’चे आयोजन...
सोन्याची सुरी उरी हाणून घेऊ नकाखड्ड्यावरून उडी मारताना पाऊल नक्की खड्ड्याच्या...
कोरडी धरणे जोडून पाणीबाणी हटणार?महाराष्ट्र सरकारच्या जनकळवळ्याबद्दल कौतुक करायला...
ढिसाळ व्यवस्थेचे बळीरा ज्यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या...
‘गोड’तेलाचे कटू सत्यरोजच्या जेवणात खाद्य (गोड) तेलाचा जास्त उपयोग...
बदल स्वागतार्ह; पण...राज्यात कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाचा घोळ मागील...
काळी दुनिया उजेडात आणापि कांची उत्पादकता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न...
संकल्पासाठी तारेवरची कसरतपुढील पाच वर्षांत देशाची अर्थव्यवस्था पाच...
मॉन्सून आला; पण पुढे काय?ख रीप हंगामासाठी कोणते पीक निवडायचे आणि त्याची...
‘लष्करी अळी’चा विळखामेरिकन लष्करी अळी (फॉल आर्मी वर्म) या किडीला...
आधार हवा शाश्वतच‘‘मोसंबीची दीडशे झाडं होती. दुष्काळात पदरमोड करून...
डोंगर हिरवे अन् नद्या असाव्या वाहत्यादेशात प्रतिवर्षी येणारा मॉन्सून महासागरावरून...