अतिवृष्टीच्या धोक्यातून मुक्ती!

उताराला आडवे योग्य आकाराचे बांध घालून त्यांच्या लगत चर काढले, तर नद्यांसमीपच्या जमिनी सोडून इतर सर्व जमिनीतली पिके अतिवृष्टीपासून वाचवता येतात.
agrowon editorial article
agrowon editorial article

गेल्या दोन-तीन वर्षांपासून अतिवृष्टीमुळे खरिपाच्या पिकांचे नुकसान होत आहे. पिके वाढीच्या उमेदीत असताना किंवा काढायच्या अवस्थेत असताना सप्टेंबरच्या सुरुवातीपासून पावसाला जोर चढतो तो ऑक्टोबर संपला तरी ओसरत नाही. वातावरणात असे बदल नेहमीच होत असतात. त्यामुळे आपल्याला पीक पद्धतीत बदल करून निसर्गाशी जुळवून घेणे क्रमप्राप्त होते. ४० वर्षांपूर्वी आम्ही खरिपात भुईमूग घ्यायचो. वातावरण बदलामुळे त्यावर टिक्का रोगाचा प्रादुर्भाव वाढला आणि खरीप भुईमूग हळूहळू पडद्या मागे गेला. हे अनेक पिकांच्या बाबतीत घडले. सतर्क समाज फार नुकसान व्हायच्या आत योग्य पर्याय शोधून त्वरेने बदल करतो. आळशी समाज देवाला, दैवाला दोष देत वर्षानुवर्षे बोटे मोडत बसतो. सोयाबीनच्या शेतात गुडघाभर पाणी साचले, काढायला आलेल्या शेंगांना मोड फुटले, कापलेले पीक वाहून गेले, शेतकरी उद्‍ध्वस्त झाले, नुकसानीचे पंचनामे होत नाहीत, जेवढे नुकसान होते त्याच्या पासंगाएवढीही सरकारी मदत मिळत नाही, मंत्र्यांची अतिवृष्टी-पूरग्रस्त भागात पर्यटने, तिजोरीत दमडी नसताना छप्परफाड आ‍श्‍वासने, शेतकरी संघटनांची धरणे, आंदोलने, विरोधी पक्षांची प्रक्षोभक भाषणे, गाढवांचा गोंधळ लाथांचा सुकाळ! त्यात संकटावर मात कशी करायची, यावर कोणीच विचार करत नाही. हे एका अत्यंत मागासलेल्या समाजाचे लक्षण आहे.

प्रतिकूल परिस्थिती अनुकूल बनवून जीवन सुखी कसे करायचे यासाठी प्रगत राष्ट्रे सदोदित प्रयत्नशील असतात. उदाहरणार्थ, हॉलंडचा २५ टक्के भूभाग एक ते सात मीटर समुद्रसपाटीच्या खाली आहे. नद्यांना पूर आले किंवा समुद्राला भरती आली की हा संपूर्ण सखल भाग पाण्याखाली बुडायचा. अथांग समुद्राच्या महाकाय लाटांना क्षुल्लक माणूस कसा काय थोपवणार? डच शास्त्रज्ञ यावर कैक शतके विचार करत राहिले. समुद्रावरून जोरात वाहणारे वारे त्यांनी पाहिले आणि पाणी उपसण्यासाठी पवनचक्क्या उभारल्या. वाऱ्याच्या जोरावर फिरणाऱ्या हजारो पवनचक्क्या ही जगात हॉलंडची वेगळी ओळख झाली. पण एवढ्यावरच ते थांबले नाहीत. जमिनीवर समुद्र आक्रमणच करणार नाही यासाठी ते प्रयोग करत राहिले. पाणी रोखण्यासाठी मजबूत बांध घालण्यात त्यांना शेवटी यश आले. मग टप्प्याटप्प्याने बांध वाढवत बुडणारी हजारो हेक्टर जमीन त्यांनी लागवडीखाली आणली. जगातल्या अनेक देशांत प्रतिकूलतेवर मात करणाऱ्या अशा असंख्य यशोगाथा ज्ञात आहेत.

अतिवृष्टीमुळे होणारे ७० ते ८० टक्के नुकसान पाच ते दहा टक्क्यांपर्यंत खाली आणता येईल का? आहे का असे तंत्रज्ञान आपल्याकडे? तंत्रज्ञान आहे आणि ते वापरण्यासाठी पूर्ण देशभरात फार मोठी यंत्रणा पण पोसली जाते. मग घोडे कुठे पेंड खाते? वर्मावर बोट ठेवायचे सोडून इतरत्र गुदगुल्या करायच्या आपल्या वाईट खोडीमुळे त्या तंत्रज्ञानाला आपण पारखे झालो आहोत. आपल्याकडे अमृत आणि विषाचे घडे आहेत. आपण फक्त विषाला चटावलेले आहोत. महाराष्ट्रात जमिनीच्या बांधबंदिस्तीची कामे गेल्या एक शतकापासून चालू आहेत. त्यांना जलसंधारण, भूविकास, पाणलोट क्षेत्र विकास, पाणी आडवा पाणी जिरवा, तर कधी जलयुक्त शिवार अशी वेगवेगळी नावे असतात. नवीन नाव कितीही काव्यात्मक वाटले, तरी कामांचा निकृष्ट दर्जा सर्वदा सारखाच असतो. संत जनाबाईनं रात्रभर ओव्या गाऊन दळण दळलं अन् सगळं पीठ कुत्र्यानं खाऊन टाकलं, अशा भ्रष्ट व्यवहारामुळे ही प्रचंड खर्चाची आणि शेतकऱ्यांच्या जीवन मरणाशी निगडित असलेली योजना प्रभावशून्य ठरली. निसर्गात तयार झालेल्या उघडखाबड जमिनीवर कोणतेही संस्कार न करता, आहे त्याच स्थितीत आपण ती पिढ्यान् पिढ्या वापरत आहोत. राहायला घरे नव्हती, ल्यायला कापडं नव्हती, विस्तवाचा शोध नव्हता, माणसाला भाषासुद्धा अवगत नव्हती, त्या वेळचा माणूस सुखी होता की आजचा सुखी आहे? मानवाने जंगली अवस्था सोडून नव संस्कृतीचा स्वीकार केला म्हणून त्याच्या जीवनाचा स्तर उंचावला. जमिनीचे तसे झाले का? नाही! पन्नास हजार वर्षांपूर्वी जमीन ज्या अवस्थेत होती तशीच आज आहे. लोकसंख्या वाढली तसे तिचे आपण फक्त तुकडे केले. परिणामस्वरूप देशातल्या ७० टक्क्यांपेक्षा अधिक जमिनींची झीज होऊन त्या अनुत्पादक झाल्या. अनुत्पादक जमिनी हे आपल्या कमी उत्पादन पातळीचे प्रमुख कारण आहे. खडकाची माती व्हायला काही शतके लागतात; पण मातीचे संरक्षण नाही केले तर चार-दोन पावसांत ती नदी नाल्याद्वारे समुद्रात जाते. हा भयंकर विध्वंस अजून भारतीयांना समजला नाही हे मोठे दुर्दैव आहे!           जमिनीचे आरोग्य कायम सुदृढ ठेवण्यासाठी आता शेतकऱ्यांनाच पुढे यावे लागेल. व्यवस्थित नियोजन करून दरवर्षी काही कामे टप्प्याटप्प्याने केल्यास आर्थिकदृष्ट्या फार डोईजड नाही. जमीन विकासात सर्वांत महत्त्वाचे पायाभूत काम जमिनीचे सपाटीकरण आहे. आता लेजरबीम तंत्रज्ञान वापरून कमी वेळेत कमी खर्चात शंभर टक्के अचूक सपाटीकरण होते. सपाटीकरणात जमिनीला एकाच दिशेला सारखा उतार दिला जातो. बऱ्याच वेळा उतार दिलेल्या शेताची लांबी खूप जास्त असते. टेकडीवरून खाली पळणारा माणूस एवढ्या वेगाने पळायला लागतो, की त्याचे स्वतःवरचे नियंत्रण सुटते आणि तो आडभाड पडूनच थांबतो. त्या तत्त्वानुसार जमिनीवरून उताराच्या दिशेने वाहणाऱ्या पाण्याची गती एवढी वाढते की ते जमीन खोदून शेतातली माती सहज नदीत नेते. खरे तर पाणी हा मेणाहून मऊ पदार्थ आहे. पण पृथ्वीला भोक पाडायची त्यात ताकद आहे! म्हणून पाणलोट क्षेत्र विकास करणारे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या भाषेत सांगतात, ‘‘पळणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला रांगायला लावा, आणि  रांगणाऱ्या पाण्याला थांबवून जिरायला लावा.’’ ‘पाणी आडवा पाणी जिरवा!’ या चार शब्दांत संपूर्ण जगातल्या जलसंधारण शास्त्राचे सार आहे. पाणी थोपवणे फार अवघड नाही. हे शास्त्र विकसित व्हायच्या अगोदरपासून आपले दादा परदादा शेतात ताली घालायचे. आता यंत्रांच्या सहाय्याने हे काम करणे कितीतरी सोपे झाले आहे. उताराला आडवे योग्य आकाराचे बांध घालून त्यांच्या लगत चर काढले तर नद्यांसमीपच्या जमिनी सोडून इतर सर्व जमिनीतली पिके अतिवृष्टीपासून वाचवता येतात. अतिवृष्टिग्रस्तांना सरकार एका वर्षात जेवढी मदत वाटते तेवढ्याच खर्चात राज्यातल्या सर्व जमिनींची सुधारणा होईल आणि या कामाचा पुढे पंधरा-वीस वर्षे उपयोग होत राहील. 

बापू अडकिने  ९८२३२०६५२६  (लेखक महाराष्ट्र सिंचन सहयोगचे उपाध्यक्ष आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com