पाऊस वाढतोय, झटका घोंगडी!

पाऊस पडल्यावर किंवा सिंचनाचे पाणी दिल्यावर मुळ्यांच्या सान्निध्यात असलेले जास्तीचे पाणी चोवीस तासांच्या आत निघून जायला हवे. काही माथ्यावरच्या व उतारावरच्या जमिनीवर हे आपोआप घडते. इतर ठिकाणी निचऱ्याचे उपचार करावे लागतात.
agrowon editorial article
agrowon editorial article

जमिनीत ५० टक्के हवा आणि ५० टक्के ओलावा असलेल्या स्थितीला ‘वाफसा स्थिती’ म्हणतात. चांगल्या पीकवाढीसाठी जमीन नेहमी वाफसा स्थितीत असावी लागते. जमिनीवर योग्य उपचार केलेले नसतील तर अतिवृष्टीनंतर पाणी साचून राहते, तसेच दोन पावसांत मोठा खंड पडल्यास जमीन नको तेवढी कोरडी होऊन पिकाला ताण बसतो. जमिनीवर पाणी साचले किंवा दीर्घकाळ संपृक्त अवस्था राहिली तर पिकाच्या केशमुळ्यांची दमकोंडी होते. ‘जीत’ समाधी घेणाऱ्या माणसासारखी मुळे गुदमरून मरतात. अन्नपाणी शोषणाऱ्या मुळ्या मेल्या की पाण्याला आग लागावी तसे उभे पीक वाळून जाते. पाऊस पडल्यावर किंवा सिंचनाचे पाणी दिल्यावर मुळ्यांच्या सान्निध्यात असलेले जास्तीचे पाणी चोवीस तासांच्या आत निघून जावे, ही शेतकऱ्यांच्या लक्षात न येणारी फार महत्त्वाची बाब आहे. काही माथ्यावरच्या व उतारावरच्या जमिनीवर हे आपोआप घडते. इतर ठिकाणी निचऱ्याचे उपचार करावे लागतात त्याला ‘ड्रेनेज’ किंवा ‘जलनिस्सारण’ म्हणतात. एखादी जमीन संपृक्त पातळीपर्यंत भिजल्यावर चोवीस तासांनंतर तिच्यात जो ओलावा राहतो त्याला त्या जमिनीची ‘पाणीधारण क्षमता’ म्हणतात. या पाणी धारण क्षमतेच्या मर्यादेत साचलेल्या पाण्याचा कोणत्याही पद्धतीने निचरा होत नाही. हे महत्वाचे तत्व शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावे. फक्त जास्तीच्या पाण्याचा निचरा होतो. त्यामुळे दोन सिंचनाच्या पाळ्यात काही दिवसांचे अंतर ठेवले तरी पीक चांगले वाढते. ज्या जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जास्त असते तिची पाणीधारण क्षमता जास्त असते. 

निचरा पद्धती  जमिनीचा निचरा करण्याच्या काही अगदी सोप्या आणि अल्पखर्ची तर काही थोड्या खर्चाच्या पण दीर्घायुषी अशा अनेक पद्धती आहेत. त्या सर्वांना माहीत आहेत पण ‘कृतीविना वाचाळता’ ही आपली जुनी परंपरा आहे! वरंबा पद्धत (बेडिंग) : जमिनीच्या सपाटीकरणानंतर उताराच्या दिशेने योग्य लांबीचे वरंबे काढून त्यावर अनेक पिकांची लागवड करणे शक्‍य आहे. फळबागांवर अतिवृष्टीचा लगेच परिणाम दिसत नाही, पण दलदलीच्या काळात रोगांचा शिरकाव झाल्यास गंभीर परिणाम होतात. म्हणून खरिपात सर्वच पिके बेडवर घेतल्यास फायद्याचे ठरते. वरंबा जमिनीपासून उंच असतो. पडणारा पाऊस वरंब्यावरून दोन्ही बाजूंना सरीत ओघळतो आणि पाणी सुरक्षितपणे शेताबाहेर जाते. मुळे पाण्याच्या दलदलीपासून सुरक्षित राहतात. अलीकडे हळद, आले, केळीत या पद्धतीचा वापर वाढला आहे. समतल सारे (कंटूर स्ट्रीप) : कमी अंतरावरच्या पिकांसाठी ही पद्धत उपयुक्त आहे. साऱ्याचे वरंबे मजबूत केल्यास मोठे पाऊस हाताळणे शक्य आहे.  उघडे चर : पृष्ठभागावरचे पाणी लवकर शेताबाहेर काढण्यासाठी बांधालगत उघडे चर खोदले जातात. त्यांना हलका उतार दिल्यामुळे पाणी संथ गतीने वाहते. बांध व चरांची कामे महाराष्ट्रात बरीच झाली, पण पुढे शेतकऱ्यांनी त्यांची डागडुजी निगा व काळजी न घेतल्यामुळे ते अल्पजीवी ठरले.  भूमिगत निचरा पद्धती : जमिनीवरचे चर मशागतीत अडचण करतात म्हणून भूमिगत पद्धती प्रचारात आल्या. या पद्धतीत वापरल्या जाणाऱ्या वस्तू त्यांची कार्यपद्धती आणि कार्यक्षमता यावरून अनेक प्रकार पडतात. आपण फक्त आधुनिक पद्धतीचा विचार करू. सध्या जगात प्रचलित असलेल्या भूमिगत निचरा पद्धतीत जमिनीत एक ते दीड मीटर खोल चर खोदला जातो. चराच्या तळाला एकसारखा उतार दिला जातो. बांगडी पाइपसारखा दिसणारा पृष्ठभागावर खाचा आणि खाचेत छिद्रे असलेला निचरा पाइप (कोरूगेटेड, परफोरेटेड, ड्रेन पाइप) त्यावर रॉकवुल किंवा तत्सम फिल्टर मटेरियल गुंडाळून अंथरतात. हे पाइप सलग लांब रोलमध्ये येतात. त्यांचा आतला भाग सपाट व गुळगुळीत असतो. या पाइपवर १२ ते १५ सेंटिमीटर जाडीचा बारीक खडीचा थर देऊन चारी बुजवतात. असे अनेक लॅटरल पाइप, मेन पाइपला जोडतात. जमिनीतली पाणी पातळी (वॉटर टेबल) पाइपपर्यंत वाढते तेव्हा खडी व रॉकवुलच्या वेष्टणातून गाळून पाणी पाइपमध्ये शिरते व उताराने शेताबाहेर वाहत जाते. ही रचना एकदा उभारली की वर्षानुवर्षे बिनबोभाट चालू राहते. पाइपच्या वर जमिनीतली पाणीपातळी वाढत नाही. मोठ्या आणि संततधार पावसामुळे ती वाढलीच तर पावसानंतर दहा वीस तासांत खाली जाते. झाडांची मुळे आणि त्यातल्या त्यात कार्यक्षम केशमुळे एक ते दीड मीटर खोलीच्या आतच असतात म्हणजे पिकांची मुळे सदोदित पाण्याच्या वर राहतात. जमीन कोरडी राहते व पावसाळ्यात सुद्धा आंतरमशागत करता येते. जमिनीचे कायिक व रासायनिक गुणधर्म सुधारतात. रोग आणि कीड नियंत्रणात राहतात. मालाचा दर्जा सुधारतो. उत्पादनात भरघोस वाढ होते. 

विहिरीद्वारे निचरा (व्हर्टिकल ड्रेनेज) : माझ्या परभणीच्या शेतात चार हेक्टर केशर आंब्याची बाग आहे. बागेत नऊ मीटर व्यास व १८ मीटर खोल विहीर आहे. १५ सेंटिमीटर व्यासाचा तीस मीटर खोल बोअर आहे. पावसाळ्यात पाणी धरणारी चिबड जमीन आहे. मोठे पाऊस किंवा झडीत आम्ही बोरवेल व विहिरीवरचे पंप चालवून पाणी ओढ्यात काढून देतो. पावसानंतर दोन दिवसांत पूर्ण बागेत वाफसा होते. एकच पंप चालवला तर वाफसा यायला चार दिवस लागतात. वीज वितरण कंपनीच्या ‘आदर्श’ कारभारामुळे बऱ्याच वेळा महिना महिना वीजपुरवठा बंद असतो. तेव्हा झाडे पिवळी पडतात आणि काही झाडांच्या फांद्या डायबॅक रोगाने वाळतात. म्हणून पाणीपातळी किमान चार मीटर पृष्ठभागाखाली राहील अशी स्वयंचलित यंत्रणा विहीर व बोअरवर उभारत आहोत. जमिनीची पाणी वहन क्षमता आणि २४ तासांत शेताबाहेर काढावे लागणारे पाणी (घनमीटर)) यावरून विहिरीचा व्यास, दोन विहिरींतील अंतर आणि पाइपचा आकार ठरवता येतो. इतर भूमिगत पद्धतींपेक्षा ही पद्धत खूप स्वस्त पडेल. (आम्ही तौलनिक अभ्यास करत आहोत) ही रचना स्वयंचलित असून इतर कोणत्याही पद्धतीपेक्षा दीर्घकाळ टिकणारी आहे.

अतिवृष्टीवर मात करून पिके सुरक्षित ठेवण्याच्या अशा अनेक युक्त्या ज्ञात आहेत. पण स्वतः काहीच न करता आपले सर्व प्रश्‍न सरकारने सोडवावेत अशी परावलंबनाची भावना दृढ झाली आहे. सरकार कोणतेही असो, दबाव आल्यावर गोड बोलून तोंडाला पाने कशी पुसायची यात राज्यकर्ते वाकबगार असतात! 

बापू अडकिने ९८२३२०६५२६  (लेखक महाराष्ट्र सिंचन सहयोगचे उपाध्यक्ष आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com