प्रतिकारशक्ती वाढवायची, तर फळे आणि भाजीपाला खा!

जग सध्या कोरोना महामारीला तोंड देत आहे. या महामारीवर अजून कुठलेही परिणामकारक औषध वैद्यकशास्त्राला मिळाले नाही. कोरोनासाठी सध्यातरी मानवाची प्रतिकारशक्ती वाढविणे हाच एकमेव प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय ठरतो. मानवाची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी दैनंदिन आहारामध्ये फळे व भाजीपाल्याचा अधिक प्रमाणात अंतर्भाव करणे गरजेचे आहे.
agrowon editorial article
agrowon editorial article

संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक अन्न व कृषी संघटनेचे (एफएओ) महासंचालक क्यू डोग्यू यांनी १५ डिसेंबर २०२० रोजी येणारे २०२१ हे वर्ष आंतरराष्ट्रीय फळे व भाजीपाला वर्ष म्हणून संपूर्ण जगभर साजरे करण्याची घोषणा केली आहे. जगाला नवोन्मेष आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्‍वत व आरोग्यवर्धक फळे व भाजीपाल्याच्या उत्पादनात वाढ करून त्याची होणारी नासाडी कमी करा, टाकाऊ मालसुद्धा सुयोग्य प्रक्रियेद्वारे उपयोगात आणण्यासाठी प्रयत्न करा, असेही त्या वेळी स्पष्ट केले आहे.

एफएओने हे वर्ष साजरे करीत असताना काही ठळक उद्दिष्टे ठेवली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने फळे व भाजीपाल्याबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करणे, आरोग्यवर्धक व संरक्षित अन्नाचा वापर वाढविणे, लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांच्या जीवनशैलीनुसार विविध फळे व भाजीपाल्याचा चौरस उपयोग वाढविणे, त्याचबरोबर यासंबंधी विशेष धोरणात्मक निर्णय घेणे, नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा कार्यक्षम वापर करून जागतिक स्तरावर होणाऱ्या फळे व भाजीपाल्याची नासाडी कमी करणे जी की सध्या गरीब देशांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यातही टाकाऊ मालाचे मूल्यवर्धन करणे इत्यादी बाबी हे आंतरराष्ट्रीय वर्ष साजरे करताना विचारात घेणे अपेक्षित आहे. २०२१ हे आंतरराष्ट्रीय फळे व भाजीपाला वर्ष म्हणून साजरे करण्याचे मुख्य कारण म्हणजे जग सध्या कोरोना महामारीला तोंड देत आहे. या महामारीवर अजून कुठलेही परिणामकारक औषध वैद्यकशास्त्राला मिळाले नाही.

कोरोनासाठी सध्यातरी मानवाची प्रतिकारशक्ती वाढविणे हाच एकमेव प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय ठरतो. मानवाची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी दैनंदिन आहारामध्ये फळे व भाजीपाल्याचा अधिक प्रमाणात अंतर्भाव करणे गरजेचे आहे. फळे व भाजीपाल्याचे मानवी आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. फळे व भाजीपाल्यामध्ये प्रामुख्याने विविध खनिजे, तंतुमय पदार्थ, अँटिऑक्सिडेंट, फिनोलिक तसेच अनेक औषधी गुणधर्म असणारे रासायनिक घटक असतात. जे तृणधान्य, कडधान्य, तेलबिया अशा अन्नपदार्थांमध्ये अभावानेच आढळून येतात. त्यामुळे फळे व भाजीपाल्यास संरक्षक अन्न म्हणूनही संबोधले जाते.

उत्तम आरोग्यासाठी प्रत्येकाने दैनंदिन आहारामध्ये २८० ग्रॅम निरनिराळ्या भाज्या व १०० ते १२० ग्रॅम फळांचा समावेश करावा, अशी अन्नपोषण शास्त्रज्ञांची शिफारस आहे. परंतु आपल्याकडे कमी व अनिश्‍चित उत्पादन, गरिबांना न परवडणारे दर आणि फळे व भाजीपाल्याचे आहारातील महत्त्वाबाबतचे अज्ञान यामुळे फक्त ४० ते ६० ग्रॅम फळे व भाजीचा आहारात समावेश केला जातो. आपण शिफारशीप्रमाणे फळांचा दैनंदिन आहारात वापर केला तर आपणास गरज असलेल्या पैकी ९० टक्के ‘क’ जीवनसत्त्व, ५० टक्के ‘अ’ जीवनसत्त्व, ३५ टक्के ‘ब’ जीवनसत्त्व आणि २५ टक्के लोह फक्त फळांद्वारेच मिळू शकतात. हवेमध्ये असलेले निरनिराळे तंतुमय पदार्थ, पेक्टीन, लिग्निन यांसारख्या महत्त्वाच्या घटकांमुळे एकूण आहारास पूर्णता प्राप्त होते, बद्धकोष्ठता सुद्धा टाळता येते. त्याचप्रमाणे मांस, अंडी, तूप यांसारख्या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात होणाऱ्या अनावश्यक सेंद्रिय आम्लांचे उदासीकरण केले जाते. हळद व भाजीपाल्यामधील अंशतः असलेल्या स्निग्ध पदार्थांमुळे हृदयाचे विकार तसेच बीटा कॅरोटीनमुळे कर्करोगास काही प्रमाणात प्रतिबंध केला जातो.

त्याचबरोबर फळे व भाजीपाल्यातील पेक्टीन, डिंक सदृश घटकांमुळे अन्नपचनाचे कार्य नियमित केल्या जाते. अन्ननलिकेतील निर्जंतुकीकरण, विषारी घटकांचे उदासीकरण, जखमा लवकर भरून येणे आणि रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होणे असे अनेक प्रकारचे फायदे फळे व भाजीपाल्याच्या सेवनाने मिळतात. फळे व भाजीपाल्यातील स्वादयुक्त घटकांमुळे मानसिक समाधान मिळते. खाल्लेल्या अन्नघटकांचा योग्य वापर व विनियोग होतो. फळे व भाजीपाल्यातील फिनोलिक घटकामुळे त्यांना विशिष्ट तुरट चव प्राप्त होते तसेच त्यांची वार्धक्य टाळण्यास चांगली मदत होते. म्हणूनच प्रत्येकाने दैनंदिन आहारात शिफारस केल्याप्रमाणे ताज्या फळे व भाज्यांचा तसेच त्यापासून केलेल्या प्रक्रिया पदार्थांचा समावेश करणे आवश्यक ठरते.

फळे व भाज्यांचे मानवी आहारातील महत्त्व लक्षात घेता मुख्यतः ‘क’ जीवनसत्त्वे व खनिजे (झिंक) मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेली फळे व भाज्या यांचे सेवन नियमितपणे केल्यास प्रत्येकाची प्रतिकारशक्ती वाढून आपण कोरोनासारख्या जागतिक महामारीला आळा घालण्यात यशस्वी होऊ शकतो, यात शंका नाही. त्यामुळे आपल्या दैनंदिन आहारात जीवनसत्त्वे व खनिजे भरपूर असलेल्या फळे व भाज्यांचा उदाहरणार्थ आवळा, पेरू, शेवगा, लिंबूवर्गीय फळे (संत्रा मोसंबी लिंबू) अननस, आंबा, द्राक्ष, बोर, अंजीर तसेच भाजीपाल्यामध्ये भोपळा, कारली, वांगे, कोबी, हिरवी मिरची, गाजर, घेवडा, टरबूज, खरबूज, भेंडी, पालक, टोमॅटो, मेथी, गवार आदी भाज्यांचा प्रामुख्याने समावेश करणे अगत्याचे ठरते.

भारत देश फळे आणि भाजीपाल्याच्या उत्पादनात जगात द्वितीय स्थानावर आहे. स्वातंत्र्योत्तर काळात आपण १२ ते १५ दशलक्ष टनांवरून भाजीपाला उत्पादनात सध्या ३०० दशलक्ष टनपेक्षाही पुढे जाण्यात यशस्वी ठरलो आहे. त्याचे श्रेय प्रामुख्याने विज्ञान व तंत्रज्ञान तसेच शेतकरी आणि आपली शासकीय धोरणे यांना जाते. आपले उत्पादन इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढून सुद्धा आपल्या लोकसंख्येला जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीत प्रमाणाच्या २५ टक्के सुद्धा फळे व भाज्यांची उपलब्धता होत नाही. त्यातही आपला देश उष्ण कटिबंधात मोडत असल्याने आणि फळे व भाजीपाला मुळातच हंगामी स्वरूपाचा असून नाशवंत असल्याने त्याचे काढणीपासून ग्राहकांना मिळेपर्यंत ३० ते ४० टक्के नुकसान होते, म्हणजे साधारण १०५ दशलक्ष टन फळे व भाजीपाल्याचे पुरवठासाखळी दरम्यान नुकसान होते. याचे अंदाजे मूल्य एक लाख कोटी पेक्षाही जास्त आहे. हे नुकसान नुसते महसुली नसून इतक्या मोठ्या प्रमाणात फळे व भाजीपाल्याचे उत्पादन   करण्यासाठी वापरल्या गेलेल्या नैसर्गिक संसाधनाचे सुद्धा नुकसान होते.

त्याचबरोबर या उत्पादन प्रक्रियेत हरितगृह वायूच्या उत्सर्जनामुळे पर्यावरणाचा सुद्धा ऱ्हास होतो. त्यामुळे विज्ञान व तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शीत साखळी व्यवस्थापन, काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आपण निदान दृश्य स्वरूपातील हे (५० टक्के) नुकसान कमी करू शकतो. त्यामुळे उत्पादित केलेला माल हा सेवनासाठी, प्रक्रियेसाठी, निर्यातीसाठी उपलब्ध होऊ शकेल. जेणेकरून मानवी आहारात त्याचे प्रमाण वाढवून प्रतिकार शक्ती वाढवून अन्न सुरक्षितता व पर्यायाने आरोग्य सुरक्षिततेत वाढ होऊ शकते.

डॉ. भगवानराव कापसे  ९४२२२९३४१९ (लेखक फळबाग तज्ज्ञ तसेच  गट शेतीचे प्रणेते आहेत.) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com