agriculture news in marathi agrowon special article on flood situation in Europe | Agrowon

युरोपच्या अग्निअस्त्रावर निसर्गाचं पर्जन्यास्त्र

डॉ. सतीलाल पाटील
शुक्रवार, 23 जुलै 2021

आपल्याकडे उत्तराखंडमध्ये आलेल्या पुरात ७२ जण दगावले होते. आपल्या लोकसंख्येची घनता युरोपपेक्षा जास्त आहे. तरी युरोपमधील पुरात २०० बळी गेले आहेत. यावरून युरोपच्या पुराची तीव्रता आपल्या लक्षात येईल.

गेल्या काही दिवसांत युरोपमधील पुराच्या बातम्या आपण ऐकतोय. जवळपास २०० लोकांचे बळी गेले आहेत. अचानक आलेल्या पूरसंकटामुळे युरोपियन देशात हाहाकार माजलाय. जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया, बेल्जियम, इटली, लक्सम्बर्ग, नेदरलँड, स्वित्झर्लंड, युके या देशांना पुराचा फटका बसलाय. पण जर्मनीत सर्वांत जास्त जीवितहानी झाली आहे. दोनशेपैकी १६० बळी एकट्या जर्मनीत गेलेत. आपल्याकडे, अधिक मासात न चुकता येणाऱ्या जावयासारखं, पूरसंकट कुठं ना कुठं हजेरी लावतं. पण आपल्यासारखी पूरसंकटांची सवय युरोपला नाही. त्यांच्याकडे यापूर्वी १९८५ मध्ये ‘व्हाल डी साटा’ धरण फुटल्याने आलेल्या पुरात २६८ लोक मेले होते. १९८५ नंतर जन्मलेल्यांनी असा महापूर पहिल्यांदाच पाहिलाय. आता प्रश्‍न हा आहे, की एवढ्या मोठ्या प्रमाणात हे पूरसंकट कसं आलं. १४-१५ जुलैला अचानक १००-१५० मिमी पाऊस कोसळला. एवढा पाऊस या देशात २-३ महिन्यांत पडत नाही, तो दोन दिवसांत पडला. लहानसहान नद्या-नाले फुगले आणि गाव-शहरांत पाणी घुसलं. मोठ्या शहरात, प्रमुख नद्यांसाठी पूरनियंत्रक यंत्रणा भक्कम होत्या. पण लहानसहान नद्या-नाले ज्या गावातून आणि छोट्या शहरातून जायचे, ते मात्र जलमय झाले. दुष्काळात तेरावा महिना म्हणजे, तेथील पुराचा इशारा देणारी ‘फ्लड अलर्ट सिस्टीम’ने दगा दिला. पण हे झालं रोगाचं लक्षण. या रोगाचं मूळ आहे हवामान बदलात! हवामान बदलामुळे पृथ्वीचं तापमान वाढतंय. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास धरतीला ताप आलाय. तिच्या घामामुळे वाढलेल्या बाष्पीभवनाने जास्तीची पाण्याची वाफ ढगात पोहोचतेय. अचानक अतिवृष्टीचा धोका वाढलाय. हा ताप उतरवण्यासाठी हव्या असणाऱ्या थंड पाण्याच्या जंगलांच्या पट्ट्या आपण ओरबाडून काढतोय. तिच्या स्वास्थासाठी हवी असलेली शुद्ध हवा औद्योगिक प्रगतीच्या धुराड्यांनी हिरावून घेतलीय. 

भारत, चीनसारखे देश जास्त प्रदूषण करतात. आम्ही सर्वांत कमी प्रदूषण करतो, हरितवायूंचं आमचं उत्सर्जन सर्वांत कमी आहे, असा डांगोरा पाश्चिमात्य देश पिटतात. पण या पापाचे वाटेकरी आपण स्वतः आहोत, हे सत्य मात्र झाकून ठेवतात. वसाहतवादाच्या काळात युरोपियन देशांनी, आपल्या मंडलिक देशातील लोकांचं आणि पर्यावरणाचं शोषण केलं. मंडलिक देशातून कच्चा माल आपल्या देशातील कारखान्यांना पुरवला. त्या देशातील रोजगार बंद पाडून, कामगारांचा रोजगार हिरावून, आपल्या देशातील कामगारांना रोजगार दिला. पुढे उद्योगातून होणाऱ्या प्रदूषणाची जाणीव झाली. मग ज्या प्रॉडक्टच्या उत्पादनात जास्त प्रदूषण होते, त्यांचं उत्पादनं आपल्या देशात करायचंच नाही. कशाला हवेत ते धुराडे आपल्या देशात? त्यापेक्षा असे प्रॉडक्ट, इतर गरीब देशांना उत्पादन करायला सांगून, आयात करायचे. आपलं हवापाणी स्वच्छ ठेवून इतर देश प्रदूषित करायचे. 

दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने अणुबॉम्ब वापरला आणि मोठमोठ्या देशांनी या अणुस्पर्धेत उडी मारली. अमेरिका, रशिया, फ्रान्स, यूके, यांनी शेकडो चाचण्या घेतल्या. चीन, भारत, पाकिस्तान या यादीत नंतर जोडले गेले. बहुतांश देशांनी आपल्याच भूमीवर अणुचाचण्या केल्या. पण अणुचाचणी म्हणजे किरणोत्सर्ग आणि पर्यायाने प्रदूषण. युरोपियन देशांनी मात्र नामी शक्कल लढवली. आपल्या देशात अणुचाचण्या करण्यापेक्षा हे घाण काम त्यांनी इतर देशात पार पडायचं ठरवलं. सुरुवातीला आपण फ्रान्सचं उदाहरण घेऊया. फ्रान्सने एकूण २१० अणुस्फोट केले. पण त्यातील एकही चाचणी आपल्या भूमीवर केली नाही. या चाचण्या त्यांच्या मंडलिक देशात, हजारो किलोमीटर दूर केल्या. सुरुवातीच्या चाचण्या त्यांनी सहारा वाळवंटातील अल्जेरियात केल्या. अल्जेरिया युद्ध सुरू असताना त्यांनी चान्स मारून घेतला. त्यानंतर १९३ चाचण्या ‘फ्रेंच पॉलिनेशिया’मध्ये केल्या. ‘फ्रेंच पॉलिनेशिया’ ही फ्रान्सची ‘ओव्हरसीज टेरेटरी’ म्हणजे परदेशी प्रदेश. फ्रान्सने या बेटांवर कब्जा केला होता. नंतर जरासं स्वातंत्र्य देत, स्थानिक लोकांना स्वतःचं सरकार चालवायची मुभा दिली. मात्र परराष्ट्र धोरण, संरक्षण आणि लष्करी तळ वगैरेंसारख्या किरकोळ गोष्टी स्वतःकडे ठेवल्या. फ्रान्सच्या मते ‘फ्रेंच पॉलिनेशिया’चे लोक फ्रेंच नागरिकच आहेत. पण फ्रान्सचं हे नागरिकप्रेम, मगरीचे अश्रू ठरले. फ्रान्सला जेव्हा अणुबॉम्बच्या चाचण्या घायचा होत्या, तेव्हा ते फ्रेंच पॉलिनेशियात गेले आणि तिथं तब्ब्ल १९३ वेळा या विनाशकारी हत्यारांची चाचणी घेतली. त्यामुळे दक्षिण प्रशांत महासागराचा मोठा भाग किरणोत्सर्गाने प्रदूषित झाला. समुद्री जिवांचं मोठं नुकसान झालं. फ्रेंच पॉलिनेशियाची लोकसंख्या पावणेतीन लाख आहे. एकूण लोकसंख्येपैकी ४० टक्क्यांपेक्षाही जास्त लोकं किरणोत्सर्गाने बाधित झाले होते. कित्तेक जण कँसरसारख्या दुर्धर आजाराने मेले. शेजारच्या न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये आंदोलने झाली, त्यांनी फ्रान्सला जाब विचारल्यावर, काही लोकांची तब्बेत खराब झालीय, पण हा अणुकार्यक्रम आमच्यासाठी महत्त्वाचा आहे असं त्यांनी उत्तर दिलं. शेवटी जास्त विरोध व्हायला लागल्यावर १९९४ मध्ये फ्रान्सने या चाचण्या बंद केल्या. या गुन्ह्यासाठी फ्रान्सने भरपाई द्यावी आणि माफी मागावी अशी मागणी होतेय.

ब्रिटनने तरी काय वेगळं केलं. हे पापकर्म त्यांनीही दुसऱ्यांच्या भूमीवरच केलं. त्यांनी १९५२ ते १९५७च्या दरम्यान, पश्‍चिम ऑस्ट्रेलियातील मारालिंगा, इमू फिल्ड, आणि मोंन्टे बेलो बेटांवर १२ अणुस्फोट केले. त्यानंतर १९५७ ते ५८ मध्ये मध्य प्रशांत महासागरातील ख्रिसमस आणि माल्डेन बेटांवर अजून ९ चाचण्या केल्या. त्यातील काही तर हिरोशिमा नागासाकीत टाकल्या गेलेल्या बॉम्बपेक्षाही मोठ्या होत्या. त्यानंतरच्या २४ चाचण्या अमेरिकेबरोबर संयुक्तरीत्या अमेरिकेतील ‘नेवाडा’ इथं केल्या. एवढ्या सक्षम देशांनी आपल्या देशात या अणुचाचण्या का नाही केल्या? कारण एकच होतं, आपला देश साफ ठेवायचा. पण आपण करत असलेली प्रत्येक गोष्ट, बुमरँगप्रमाणे आपल्याकडे परत येते, हे त्यांच्या गावीही नव्हते. देशांना सीमा आहेत. लोकांना देशाच्या सीमेत बांधून ठेवता येतं. पण पर्यावरणाला, हवापाण्याला सीमा नाही. एका देशातील प्रदूषणाचा फटका हजारो किलोमीटर लांबच्या देशाला बसतो. दुसऱ्याचं घर जळतंय, त्याचं मला काय? माझं घर तर लांब आहे! असं म्हणतं निवांत बिडी पिणाऱ्याला, हे माहीत हवं, की आज ना उद्या ही आग आपल्या घरापर्यंत पोहोचणार आहे. इतर कोणत्या नात्याने आपण जोडलेले असू किंवा नसूही, पण पृथ्वीतलावरील सगळे जीव मात्र, हवा आणि पाण्याच्या धाग्याने एकमेकांशी बांधले गेलेत. म्हणूनच सत्तेच्या लालसेने निसर्गावर अग्निअस्त्र सोडणाऱ्यांवर, निसर्गाने पर्जन्यास्त्र डागलं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 

डॉ. सतीलाल पाटील  ९९२२४५९७८४
(लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. लि. कंपनीचे डायरेक्टर आणि ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.)


इतर संपादकीय
भारतातील मोटार गाड्यांसाठी इथेनॉल...पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचा कार्यक्रम...
सोयाबीन विक्री करा जरा जपूनचमागील दोन महिन्यांपासून सोयाबीन हे पीक देशभर...
खरे थकबाकीदार ‘सरकार’च  वीजबिलाची थकबाकी ७९ हजार कोटींच्या घरात पोहोचली...
देवगड ‘राम्बुतान’हापूस आंब्याच्या प्रदेशात चक्क परदेशी फळ ‘...
‘कृषी’चे धडे घेऊनच करावी लागेल शेतीदेशात तथा महाराष्ट्रात आजही सुमारे ६० ते ६५...
हतबलतेचा अंत नका पाहूसोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर...
दूध आणि ऊस उत्पादकांच्या लुटीचे रहस्यसाखर उद्योग व दुग्ध व्यवसायामध्ये कमालीचे...
शर्यतीतील बैलांवरील ताणतणाव नियोजनबैलगाडा शर्यतीसाठी अत्यंत पद्धतशीरपणे ...
रीतसर नफ्याचा घोटाळाशेती हा असा व्यवसाय आहे, की ज्यामध्ये शेतकरी...
व्रतस्थ कर्मयोगीप्रसिद्ध ऊसतज्ज्ञ डॉ. ज्ञानदेव गंगाराम हापसे...
शुभस्य शीघ्रम्शालेय अभ्यासक्रमात कृषीचा समावेश करण्याच्या...
वाढत्या नैसर्गिक आपत्ती गांभीर्याने...पर्यावरणाच्या कडेलोटाच्या कुंठितावस्थेचं ...
शुद्ध खाद्यतेलासाठी हेतूही हवा शुद्धपामची लागवड आणि तेलनिर्मिती वाढविण्यास केंद्र...
कात टाकून कामाला लागानागपूर येथील `केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन...
घातक पायंडाजनुकीय बदल केलेल्या (जीएम) सोयापेंड आयातीला...
ऊस रसापासून थेट इथेनॉल निर्मितीचे हवे...जागतिक पातळीवर उसाच्या थेट रसापासून ३२ टक्के व...
‘गोल्डनबीन’ची झळाळी टिकवून ठेवा मागील दशकभरापासून राज्यात सोयाबीन (गोल्डनबीन)...
दिलासादायक दरवाढ खरे तर यंदाच्या साखर हंगामात साखरेच्या किमान...
अन्नप्रक्रिया योजना ठरताहेत मृगजळ भारतात उत्पादित शेतीमालापैकी ४० टक्के माल सडून...
शेतकऱ्यांच्या जिवांशी खेळ थांबवा सुमारे चार वर्षांपूर्वी २०१७ च्या खरीप हंगामात...