agriculture news in marathi agrowon special article on flood situation in Maharashtra and climate change | Agrowon

अतिवृष्टीस फक्त हवामान बदलच जबाबदार नाही

डॉ. रंजन केळकर
शनिवार, 31 जुलै 2021

कमी खर्चाच्या शेडनेटसाठीचा अनुदानाचा निर्णय राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला हवा. त्याची प्रभावी अंमलबजावणी देखील व्हायला हवी.

यंदाचा नैर्ऋत्य मॉन्सून सरासरी तारखांच्या तुलनेत महाराष्ट्रावर काही दिवस लवकर आला. दक्षिण महाराष्ट्रात मॉन्सून ८ जूनला दाखल झाला आणि त्यानंतरच्या दोनच दिवसांत त्याने राज्याच्या बाकीच्या भागात प्रवेश केला. शेतकऱ्यांसाठी हा एक शुभसंकेत होता. पेरण्यांसाठी परिस्थिती अनुकूल दिसली. पण झाले हे, की मॉन्सूनचा जोर लगेच ओसरला आणि त्याची पुढची प्रगती खोळंबली. उत्तर भारतात मॉन्सूनचे आगमन उशिराने झाले आणि राजधानी दिल्ली तसेच पश्चिम राजस्थानवर तो १३ जुलै रोजी पोहोचला. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मॉन्सूनच्या प्रवाहाचे पुनरुज्जीवन झाले. देशाच्या अनेक राज्यांत आणि विशेषकरून महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडू लागला आणि तो जुलैच्या अखेरपर्यंत पडत राहिला. 

मॉन्सूनच्या पर्जन्यमानाचा हिशोब १ जूनपासून ठेवला जातो. १ जूनपासून २८ जुलै २०२१ पर्यंतचे देशभराचे पर्जन्यमान सामान्यापेक्षा केवळ २ टक्के कमी म्हणजे जवळ जवळ सामान्यच होते. पण हा सरासरी आकडा आहे. देशाच्या पूर्व आणि पूर्वोत्तर भागात पाऊस सामान्याहून १८ टक्के कमी झाला, तर दक्षिण प्रायद्वीपात तो सामान्यापेक्षा २२ टक्के अधिक झाला. केरळ, सौराष्ट्र-कच्छ, गुजरात, पूर्व राजस्थान, ओडिशा, आणि सर्व पूर्वोत्तर राज्यात पावसाची त्रुटी राहिली. त्याउलट १ जूनपासून २८ जुलैपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस सामान्याहून अधिक झाला. उपविभागांचे आकडे असे आहेत ः कोंकण-गोवा +४३ टक्के, मध्य महाराष्ट्र +३० टक्के, मराठवाडा +४३ टक्के, आणि विदर्भ +५ टक्के. फक्त नंदुरबार व धुळे जिल्हे याला अपवाद आहेत. महाराष्ट्रातील बहुतेक धरणे काठोकाठ भरली असून अनेक धरणांतून पाणी सोडावे लागले आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपर्यंत चांगला पाऊस पडत राहण्याची संभावना वर्तवली गेली आहे.

पावसाची टक्केवारी परिस्थितीचे संपूर्ण चित्र उभे करू शकत नाही. कारण त्यावरून प्रत्यक्षात पाऊस किती पडला हे कळत नाही. मॉन्सूनच्या पूर्वार्धात कोंकणात सामान्यापेक्षा +४३ टक्के पाऊस पडला आणि मराठवाड्यातही सामान्यापेक्षा +४३ टक्के पाऊस पडला. म्हणून दोन्ही उपविभागांत तेवढाच पाऊस पडला असे मुळीच नाही. कोकण-गोवा उपविभागाचे सामान्य पर्जन्यमान १६५५ मि.मी. आहे. तेथे २३६१ मि.मी. पाऊस पडला. पण मराठवाड्याचे सामान्य पर्जन्यमान फक्त २९७ मि.मी. आहे. तेथे ४२३ मि.मी. एवढाच पाऊस पडला. म्हणून दोन वेगवेगळ्या प्रदेशांच्या पावसाच्या टक्केवारीची तुलना करताना हा फरक लक्षात घेतला पाहिजे. 

अतिवृष्टी
जुलै महिन्यातील मधल्या दोन आठवड्यांचा काळ महाराष्ट्रासाठी अत्यंत तीव्र अशा अतिवृष्टीचा काळ ठरला. लोक ज्या पावसाची आतुरतेने वाट पाहत होते तो सुरू झाला तेव्हा बळिराजा सुखावला, दुबार पेरणीचे संकट टळले, अशा प्रकारच्या बातम्या वृत्तपत्रात येऊ लागल्या. पण नंतर जेव्हा मॉन्सूनने रुद्र स्वरूप धारण केले तेव्हा पावसाचा धुमाकूळ, मुंबईत काळरात्र, चिपळूण पाण्याखाली, गावागावांत पाणी शिरले, अश्रूंची संततधार, दुःखाचा डोंगर, अशा हेडलाइन्स मोठ्या  
अक्षरात वृत्तपत्रांत झळकू लागल्या. अनेक नद्यांना पूर आला, ठिकठिकाणी भूस्खलन झाले, रस्ते वाहून गेले, इमारती कोसळल्या, शेकडो लोक बेघर झाले, मृतांची संख्या दररोज वाढ गेली. ही अतिवृष्टी खरोखरच ‘न भूतो न भविष्यति’ होती का? अतिवृष्टीच्या अशा भीषण घटना भविष्यात पुन्हा पुन्हा होणार का? त्यामागची कारणे काय आहेत? त्यावर काय उपाय करता येतील? अशा प्रकारचे अनेक प्रश्‍न उपस्थित केले गेले आहेत आणि त्यांवर चर्चा सुरू आहे. वस्तुस्थिती ही आहे की, कोकणपट्टीत आणि सह्याद्रीच्या पर्वत शिखरांवर मॉन्सूनच्या महिन्यांत नेहमीच प्रचंड पाऊस पडतो. येथे भूतकाळात झालेल्या २४ तासांतील पावसाच्या काही विक्रमी नोंदी अशा आहेत ः

रोहे           १८ जून            १८८६ ६३० मि.मी. 
माथेरान    २४ जुलै           १९२१ ६५७ मि.मी. 
चिपळूण      ४ जून           १८८२ ५३३ मि.मी. 
खंडाळा      १९ जुलै            १९५८ ५१६ मि.मी. 
महाबळेश्‍वर ३० जुलै          १८९६ ४५९ मि.मी.

या ऐतिहासिक नोंदींवरून हे सहज लक्षात येईल, की यंदाची अतिवृष्टी मोठी असली तरी अभूतपूर्व नव्हती. अतिवृष्टीच्या तारखा पाहिल्या तर हेही दिसेल, की १९व्या शतकापासून अतिवृष्टीच्या घटना घडत आल्या आहेत. म्हणून अतिवृष्टीसारख्या घटनांसाठी केवळ हवामान बदलाला सर्वस्वी दोषी ठरवणे बरोबर नाही. 

हवामानाबरोबर दुसरे अनेक बदल झालेले आहेत जे विचारात घेणे आवश्यक आहे आणि त्यांवर उपाय करणे गरजेचे आहे. अतिवृष्टीचे शहरी पुरात रूपांतर होऊ न देणे हे फार महत्त्वाचे आहे. अलीकडच्या काळात शहरातील आणि गावातील रहिवाशांची संख्या वाढत गेलेली आहे. गावांचे शहरीकरण होत आहे. शहरांचे काँक्रीटच्या जंगलात रूपांतर होत आहे. थोड्या वेळेपुरता मोठा पाऊस पडला पण पाण्याचा निचरा झाला नाही, तर गावे आणि शहरे पाण्यात बुडणारच. 

महाबळेश्‍वरात पाऊस पडला तर त्यात काही नवलाई नाही. महाबळेश्‍वरला तर महाराष्ट्राची चेरापुंजी म्हटले जाते. मला आठवते, की पूर्वीच्या काळी, महाबळेश्‍वरमध्ये पावसाळ्यात कोणी राहत नसत. १ जूनच्या आधी सर्व घरे, इमारती सुरक्षितपणे बंद करून लोक चार महिन्यांसाठी खाली राहायला यायचे. आता तेथील मॉन्सून पाहायला पर्यटक गर्दी करतात. रस्ते वाहनांनी भरलेले असतात. जीवन नित्याप्रमाणे सुरू ठेवायचे प्रयत्न होतात. त्याचे परिणाम दिसणारच.

भूस्खलन
जुलै महिन्यात भूस्खलनाच्या बऱ्याच घटना घडल्या. भूस्खलनामागे अतिवृष्टी प्रमुख कारण असले तरी ते एकमेव कारण नाही. पुष्कळ जागी पाण्याचा निचरा व्हायला पुरेसा वाव नसतो आणि त्या जागा नैसर्गिकपणे भूस्खलनाला प्रवण असतात. अनिर्बंधित वृक्षतोड, डोंगराच्या उतारावर बेकायदेशीर उत्खनन ही भूस्खलनामागची दुसरी कारणे आहेत. भौगोलिक परिस्थितीचा पुरेसा विचार न करता डोंगराच्या उतारावर बांधकाम केले जाते किंवा रस्ते बनवलेले जातात. अशा अनेक मानवी उपक्रमांमुळे डोंगरांचे उतारी भाग हळूहळू अस्थिर बनत जातात आणि तेथे भूस्खलन 
होते. 

पावसाविषयीच्या प्रत्येक घटनेचा आधी अंदाज देणे शक्य होतेच असे नाही. सह्याद्रीच्या एका शिखरावर एक मोठा आणि उंच ढग अमक्या दिवशी इतक्या वेळी अवतरेल आणि तो इतके मि.मी. पाऊस देईल ह्याचे भाकीत कोणीही आठ दिवस आधी करू शकत नाही. अतिवृष्टीसाठी पोषक अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता केवळ वर्तवता येते. पावसाची एकंदर परिस्थिती आपण समजून घेतली पाहिजे आणि त्यानुसार खबरदारीचे उपाय योजले पाहिजेत. त्याबरोबर काही दूरगामी उपाययोजनाही राबवल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून पावसाच्या घटनांचे दुर्घटनांत रूपांतर व्हायचे टळेल.

डॉ. रंजन केळकर  ९८५०१८३४७५

(लेखक ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ आहेत.) 


इतर संपादकीय
भारतातील मोटार गाड्यांसाठी इथेनॉल...पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचा कार्यक्रम...
सोयाबीन विक्री करा जरा जपूनचमागील दोन महिन्यांपासून सोयाबीन हे पीक देशभर...
खरे थकबाकीदार ‘सरकार’च  वीजबिलाची थकबाकी ७९ हजार कोटींच्या घरात पोहोचली...
देवगड ‘राम्बुतान’हापूस आंब्याच्या प्रदेशात चक्क परदेशी फळ ‘...
‘कृषी’चे धडे घेऊनच करावी लागेल शेतीदेशात तथा महाराष्ट्रात आजही सुमारे ६० ते ६५...
हतबलतेचा अंत नका पाहूसोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर...
दूध आणि ऊस उत्पादकांच्या लुटीचे रहस्यसाखर उद्योग व दुग्ध व्यवसायामध्ये कमालीचे...
शर्यतीतील बैलांवरील ताणतणाव नियोजनबैलगाडा शर्यतीसाठी अत्यंत पद्धतशीरपणे ...
रीतसर नफ्याचा घोटाळाशेती हा असा व्यवसाय आहे, की ज्यामध्ये शेतकरी...
व्रतस्थ कर्मयोगीप्रसिद्ध ऊसतज्ज्ञ डॉ. ज्ञानदेव गंगाराम हापसे...
शुभस्य शीघ्रम्शालेय अभ्यासक्रमात कृषीचा समावेश करण्याच्या...
वाढत्या नैसर्गिक आपत्ती गांभीर्याने...पर्यावरणाच्या कडेलोटाच्या कुंठितावस्थेचं ...
शुद्ध खाद्यतेलासाठी हेतूही हवा शुद्धपामची लागवड आणि तेलनिर्मिती वाढविण्यास केंद्र...
कात टाकून कामाला लागानागपूर येथील `केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन...
घातक पायंडाजनुकीय बदल केलेल्या (जीएम) सोयापेंड आयातीला...
ऊस रसापासून थेट इथेनॉल निर्मितीचे हवे...जागतिक पातळीवर उसाच्या थेट रसापासून ३२ टक्के व...
‘गोल्डनबीन’ची झळाळी टिकवून ठेवा मागील दशकभरापासून राज्यात सोयाबीन (गोल्डनबीन)...
दिलासादायक दरवाढ खरे तर यंदाच्या साखर हंगामात साखरेच्या किमान...
अन्नप्रक्रिया योजना ठरताहेत मृगजळ भारतात उत्पादित शेतीमालापैकी ४० टक्के माल सडून...
शेतकऱ्यांच्या जिवांशी खेळ थांबवा सुमारे चार वर्षांपूर्वी २०१७ च्या खरीप हंगामात...