...अन्यथा जलप्रलय अटळ आहे

आपण हे लक्षात ठेवले पाहिजे, की नदी ही देवता आहे, तिचा नैसर्गिक देव्हारा नेहमी प्रशस्त व स्वच्छ असावा, त्याला घनदाट वृक्षांचे तोरण असावे, प्रत्येकाने मनापासून तिची सन्मानाने पूजा बांधावी. मात्र, हव्यासी विकासाच्या पणत्यांनी तिची आरती करू नये.
संपादकीय.
संपादकीय.

नदीचे व माझे नाते अगदी लहानपणापासूनचे. माझ्या आजोळगावी एक छान नदी गावाबाहेरून वाहत होती. तीरावरील गावांना ती वाहत्या प्रवाहामधून आणि झऱ्यांमधूनही पिण्याचे पाणी देत असे. या गोष्टीला पाच दशके झाली आहेत. आता त्या गावात नदी नाही. प्रत्येक गाव हेच सांगत आहे, ‘ती होती पण आता नाही.’ चार महिन्यांच्या पावसाळ्यात नदीला तीन ते चार वेळा पूर येत असे. आम्ही शाळकरी मुले तिच्या काठावर बसून तो पूर पहात असू, भीती अशी कधी वाटलीच नाही. नदीपासून जेमतेम शंभर मीटरवर वसलेले माझे आजोळ; पण प्रचंड पुरामध्येसुद्धा नदीचे पाणी गावात कधी आले नाही, मग आज असे का होत आहे? सांगली, पंढरपूर, पुणे, कोल्हापूर, अवघे कोकण नद्यांच्या पाण्याखाली गेले आहे. शेकडो गावे आणि फळबागा पाण्यात आहेत. हे असे कसे घडले? याचे उत्तर आमच्याकडे आहे. पूर्वी मृग आणि आषाढाचा पाऊस नदीत मुरत होता. कारण तिच्या पात्रात शुभ्र वाळूची श्रीमंती होती. श्रावणात रिमझिम पाऊस सुरू होत असे. जमीन, नदीचा तळभाग पाण्याने संपृक्त झाला की नदीला पूर येत असे. जेव्हा नदी आणि तिच्या परिसरात थेंबभर पाणीसुद्धा जमिनीत जिरण्याची शक्यता नसते, तेव्हा नदी वाहण्यास सुरवात करते. त्यात पावसाची संततधार सुरू असेल तर नदीपात्राचे पाणी दोन्ही तीरांच्या बाहेर येऊ लागते आणि पूरसदृश परिस्थिती तयार होते. थोडक्यात, नदी जेव्हा तिचे पात्र ओलांडून बाहेर येते तेव्हा तिला पूर आला असे म्हणतात.

पूर्वी नद्यांना येणारे पूर हे नैसर्गिक होते, आता मात्र ते मानवनिर्मित झाले आहेत. नद्यांच्या प्रवाहावर मनुष्याचे हे नियंत्रण भविष्यामधील येणाऱ्या फार मोठ्या संकटाची चाहूल आहे. महाराष्ट्राचा आजचा जलमय भाग हा मुळा, मुठा, कृष्णा, पंचगंगा, कोयना, मिठी, जगबुडी अशा कितीतरी नद्यांनी केलेल्या विजयी आक्रमणामुळे झाला आहे. पूर्वी नदीचा पूर हा तिच्या पात्रापुरताच मर्यादित असे; पण आता तसे नाही, पावसाचे पाणी मुरण्यास आणि वाहून जाण्यास कुठेही जागा न उरल्यामुळे जेथे जागा मिळेल, तेथे पुराचे पाणी सैरावैरा धावू लागते. नदीच्या पुराची ही नवीन व्याख्याच आहे.

नद्यांचे उगम पर्वत, डोंगर, दऱ्‍या, घळीमध्ये होऊन पूर्वी ती पृष्ठभागावर येईपर्यंत दिसणे केवळ अशक्य होते. उगमाचा हा भाग गर्द वनराईने आच्छादलेला असे. सुरवातीला पडणारा पाऊस प्रथम डोंगर पीत असतो, त्याची तहान भागल्यानंतर तो नदीला तिच्या पात्रामधून मुक्तपणे वाहण्याची परवानगी देतो. खनिजासाठी पोखरलेले डोंगर, मानवनिर्मित तीव्र झालेले उतार नद्यांना डोंगरावरून वेगाने खाली घेऊन येतात. सोबत मातीही येते. एक थेंबही पाणी पिता न आल्यामुळे डोंगर कायम तहानलेलेच राहतात. पहिल्याच धोधो पावसात नद्यांना येणाऱ्‍या या पुरांचे हे एक मुख्य कारण आहे. अमेरिकेमधील टेक्सास प्रांतात असलेल्या नदीसंवर्धन आणि संरक्षण या संस्थेला भेट देण्याची संधी मला मिळाली. त्या वेळी कितीतरी नियमावली समजली, समजून घेता आली. त्यातील तीन नियम तर आजही मला आठवतात. नदीचा उगम नेहमी सुरक्षित ठेवा, वृक्ष आणि नदी यांचे भावाबहिणीचे नाते आहे, त्याला तडा जाऊ देऊ नका; आणि लक्षात ठेवा, जेवढे नदीपात्र तेवढीच जागा तिच्या दोन्हीही तीरांवर सुरक्षित ठेवा, कारण ती तिच्या हक्काची आणि विस्ताराची जागा आहे. पात्रामधील वाळूचा कधीही उपसा करू नका. आज पाहिलेले नद्यांचे पूर आपणास सांगतात, की यातील एकाही नैसर्गिक नियमाचे आम्ही पालन केलेले नाही.

आज नद्यांचे उगम आम्ही सहज बघू शकतो. कारण बेफाम वृक्षतोड करून तिथे जाण्यासाठी आम्ही रस्ते तयार केले आहेत. राखी पौर्णिमा, भाऊबीज आम्ही उत्सवात साजरी करतो; मात्र नदी आणि वृक्षांची ताटातूट करूनच. नदीचा राग शांत करण्याचे सामर्थ्य फक्त तिच्या काठावरच्या वृक्षश्रीमंतीमध्येच आहे, हे आम्ही विसरलो आहोत. पावसाचे पाणी भूगर्भात जिरविण्यासाठी नदीमधील वाळू अतिशय महत्त्वाचे कार्य करते, आम्ही हीच वाळू उपसून तिच्या मदतीने टोलेजंग इमारती उभ्या केल्या. मग नदीने इमारतीला आपल्या कवेत घेऊन तुम्हाला गच्चीवर पाठवले तर चुकले काय? तिची वाळू जर तिच्याच जवळ, पात्रात राहिली असती, तर ती पात्र सोडून बाहेर आलीच नसती. आम्ही नदीचे पात्र बळकावून त्यामध्येच घरे बांधली, जाहिरात रंगवून नदीकाठच्या गृह संकुलांची लालूच दाखवली, पात्रात व्यवसाय उभे केले, रस्ते बांधले, मग आलेल्या पुराचे पाणी कुठे जाणार? वाळूउपसा, अनधिकृत बांधकामे, नदीकाठचे सिमेंटीकरण, भराव घालून पात्र बदलणे यामुळे ही निसर्गदेवता वरुणराजाच्या आशीर्वादाने सैरभैर झाली आणि तिचा गावांना, शहरांना वेढा बसतोय. मुंबईजवळचे बदलापूर शहर आणि उल्हास नदी, पुण्याची मुळा, मुठा, कोल्हापूरची पंचगंगा, नाशिकची गोदावरी, चिपळूणची जगबुडी आपणास भविष्याची जाणीव करून देत आहेत.

१८ ऑगस्ट २०१८ ला केरळमधील सहा नद्यांनी घातलेला गोंधळ, ती भयंकर पूर परिस्थिती आणि तिची कारणे आज आम्ही किती सहजपणे विसरून गेलो आहोत. नद्यांचे पूर आणि ओसंडून वाहणारी धरणे दु:ख आणि आनंदाश्रूंचे मिश्रण आहे. पूर आलेल्या या नद्यांनी शहरामधील केवढा कचरा, कितीतरी माती धरणांमध्ये नेली याचे आम्हाला काहीच सोयर-सुतक नाही. या पुराने धरणे भरल्याचा आनंद आहे; पण हीच धरणे मे महिन्याच्या प्रखर उन्हाळ्यात आपली तहान खरंच भागवतील का? धो धो वाहणाऱ्या या सर्व नद्या आपणास अशाच संथ का होईना; पण उन्हाळ्यात वाहताना दिसतील का? आपण हे लक्षात ठेवले पाहिजे, की नदी ही देवता आहे, तिचा नैसर्गिक देव्हारा नेहमी प्रशस्त व स्वच्छ असावा, त्याला घनदाट वृक्षांचे तोरण असावे, प्रत्येकाने मनापासून तिची सन्मानाने पूजा बांधावी. मात्र हव्यासी विकासाच्या पणत्यांनी तिची आरती करू नये. एवढी शाश्वत पूजा केली तरच ही देवता तुमच्यावर प्रसन्न राहील, अन्यथा जलप्रलय अटळ आहे.

डॉ. नागेश टेकाळे

(लेखक शेतीप्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com