agriculture news in marathi agrowon special article on flood of water and mud great challenge in Maharashtra | Agrowon

आव्हान पाण्याच्या अन् चिखलाच्या पुराचे

डॉ. नागेश टेकाळे
बुधवार, 4 ऑगस्ट 2021

महापुरामध्ये चिपळूण शहरात तीन ते चार फूट मातीचा चिखल झाला. हा सर्व ‘मड फ्लो’ नदीच्या गाळातून तेथे आला आहे. ही सर्व सह्याद्रीची सुपीक माती आता समुद्राकडे जाणार अन् आम्ही कोकणचा कॅलिफोर्निया करायला निघालो आहोत.

कोकणात २२ जुलै २०२१ या दिवशी ६३० मि.मी. एवढा मुसळधार पाऊस पडला आणि या आधीचे देशामधील एकाच दिवशी पडलेल्या पावसाचे सर्व विक्रम मोडले गेले. याच पावसाने अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या मनुष्य आणि वित्तहानी झाली, का? आणि कशामुळे? या प्रत्येकाच्याच ओठावरचा प्रश्‍न! आम्ही गेली अनेक वर्षे म्हणत आहोत, की आमच्या कोकणचा कॅलिफोर्निया होणार’’ पण हे शक्य नाही, कारण ही पश्‍चिम घाटाची शापित भूमी आहे. ज्या भूभागावर पर्वत, डोंगर, दऱ्या, घळी आणि नद्यांचा सन्मान होत नसतो, तेथे नेहमीच काळरात्री या प्रलयाच्या साक्षीदार असतात. गेली काही वर्षे कोकण आणि त्यास जोडून पश्‍चिम महाराष्ट्रामधील पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर मुसळधार पावसात याचाच अनुभव घेत आहेत. रामाची भूमी नाशिकसुद्धा आता मागे नाही.

३० जुलै, २०१४ च्या माळीण दुर्घटनेमधून आम्ही काय शिकलो? एक गाव नकाशामधून मिटले गेले एवढेच! २५ जुलै २००५ मध्ये महाड तालुक्यामधील पाच गावे डोंगरकडे कोसळून उद्‍ध्वस्त झाली. १९४ लोक ठार झाले, शोक व्यक्त केला गेला आणि काही दिवसांमध्येच त्याचा इतिहास झाला. कोकणमधील अतिवृष्टी आणि कडे कोसळण्याच्या बऱ्याच घटना या जुलै मध्येच जास्त घडतात. भारत सरकारने २००८ मध्ये सर्व घटक राज्यांना त्यांचा स्वत:चा पुढील तीस वर्षांचा वातावरण बदलाचा अभ्यास करून त्यावर त्यांच्या स्वत:च्या उपाययोजना काय असतील याचा सविस्तर अहवाल देण्यास सांगितले होते. अनेक राज्यांनी यास प्रतिसाद दिला, यातील एक माहिती फार महत्त्वाची आहे ती म्हणजे, यापुढे देशामध्ये जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होणार असून, जुलै महिन्यात ते जास्त वाढणार आहे. आज याचाच तंतोतंत अनुभव आपणास येत आहे. 

महाराष्ट्रामधील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, नाशिक, कोल्हापूर आणि ठाणे हे दरड प्रवण क्षेत्रात मोडतात. मुसळधार पावसाचा या जिल्ह्यांना जास्त धोका आहे तो दरडी कोसळण्याचा! कोकण भागातील पश्‍चिम घाटात जांभा दगड मुबलक सापडतो. हा सच्छिद्र खडक आहे. डोंगरमाथ्यावरील हा खडक कडक उन्हामध्ये उघडा असेल, तर नंतर मॉन्सूनमध्ये पावसाच्या वेगवान टपोऱ्या थेंबांनी त्याची तेवढ्याच वेगात झीज होते आणि त्याचा परिणाम लाल माती निर्मितीवर होतो. पावसात ही माती अतिशय चिबड आणि वजनदार होते, तिच्यामधील पाणीसाठा वाढतो आणि ती स्वत:च्याच ओझ्याने घसरून खाली येऊ लागते, याला ‘मड फ्लो’ असे म्हणतात. माळीणची घटना ‘फड फ्लो’मुळे झाली होती. उतारावरील झाडे या ‘मड फ्लो’ला अडवू शकत नाहीत कारण येथे पृष्ठभागाकडील गुरुत्वाकर्षण जास्त असते म्हणून झाडांसह ‘मड फ्लो’ खाली येऊन सपाट जागेवर स्थिरावतो. डोंगर उतारावर पक्के बांधकाम असले तरी ‘मड फ्लो’बरोबर ते सुद्धा खाली येते आणि तेथील खालची माती या आपत्तीमध्ये जास्त भर टाकते. आज चिपळूण शहरात तीन ते चार फूट मातीचा चिखल झाला आहे. हा सर्व ‘मड फ्लो’ नदीच्या गाळातून तेथे आला आहे. ही सर्व सह्याद्रीची सुपीक माती आता समुद्राकडे जाणार आणि आम्ही कोकणचा कॅलिफोर्निया करणार! ‘मड फ्लो’ भविष्यात थांबवावयाचा असेल, तर पश्‍चिम घाटामधील सर्व डोंगर, टेकड्या पूर्णपणे हरित होणे गरजेचे आहे, डोंगरावरचे आक्रमण, तेथे रस्ते बांधणी, पक्के घरे बांधणे थांबावयास हवी. तेथे मोठ्या प्रमाणावर देशी वृक्ष आणि त्यापेक्षाही मातीला घट्ट धरून ठेवणारे गवत हवे. उन्हाळ्यात गवताला आग लागता कामा नये, याचीही काळजी घेणे गरजेचे आहे.

दरडी कोसळणे आणि त्याखाली मनुष्य प्राणहानी होणे हे पश्‍चिम घाटात नित्याचेच झाले आहे. या कोसळलेल्या दरडीमध्ये जांभा खडकाचे भागच जास्त आहेत. या खडकात भेगा, फटी मोठ्या प्रमाणावर असतात. मुसळधार पावसाने या भेगा रुंदवतात, आत पाणी साठत जाते आणि आकस्मितपणे खडक दुभंगतो आणि स्वत:च्या ओझ्याने इतरांनाही खाली घेऊन येतो. उन्हाळ्यामध्ये गावपातळीवर दरडींची पाहणी, त्यांच्यामधील रुंद झालेल्या भेगा, सांधी, फटी याची पाहणी करून जिल्हा प्रशासनामार्फत त्यावर त्वरित कार्यवाही होणे गरजेचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून दरड कोसळणे थांबवता येऊ शकते याची अनेक उदाहरणे आपणास मुंबई-पुणे महामार्ग आणि कोकण रेल्वेवर पाहावयास मिळतात. दरड कोसळणे थांबवण्यासाठी पश्‍चिम घाटामध्ये सध्या सुरू असलेले डोंगर सपाटीकरण थांबणे गरजेचे आहे. दरडीच्या वरचा भाग सपाट करण्यात आला असेल तर डोंगराच्या उतारावरून येणारे पाणी तेथे थांबते आणि सच्छिद्र खडकात ते वेगाने भरू लागते, त्यात चिबड निर्मितीची भर पडते आणि असह्य झालेले ते ओझे, तो कडा, मोठ-मोठे खडक आणि प्रचंड माती घेऊन खाली येतो. दरड कोसळणे ही जरी नैसर्गिक प्रक्रिया असली, तरी माणसाच्या विकासरूपी राक्षसाने तिला जास्त गती दिली आहे. पश्‍चिम घाट सुरक्षित ठेवण्यासाठी, त्याचबरोबर ‘मड फ्लो’ आणि दरडी कोसळणे थांबवण्यासाठी गाव पातळीवर ग्रामस्थांनी, शेतकऱ्यांनी जागृत होणे गरजेचे आहे. पश्‍चिम घाटामधील नद्यांचे उगमापासूनचे प्रवाह नैसर्गिक ठेवणे, नदी पात्रामधील वाळू उपसा बंद करणे, नदी पात्रात गाळ येऊ न देणे. 

पश्‍चिम घाटाच्या संरक्षित भागात सपाटीकरण थांबवून रासायनिक शेती न करणे, विदेशी वृक्षाची हकालपट्टी करून फक्त स्थानिक वृक्ष मोठ्या प्रमाणावर लावणे, डोंगर माथे, उतारावर मातीला धरून ठेवणारे गवतांचे पट्टे तयार करणे, आगीपासून त्यांचे संरक्षण करणे, डोंगरांची नियमित पाहणी करून सांधी, भेगा, फटी शोधून त्याची शासनास कल्पना देणे आणि तरीही संभाव्य धोका ओळखून जुलै महिन्यात तरी तात्पुरते स्थलांतर करणे केव्हाही योग्य. शेवटी ‘रात्र वैऱ्याची आहे’ एवढी जाणीव झाली तरी पुरेसे 
आहे.

डॉ. नागेश टेकाळे ९८६९६१२५३१
(लेखक शेती-पाणी-पर्यावरणाचे अभ्यासक आहेत.)


इतर संपादकीय
भारतातील मोटार गाड्यांसाठी इथेनॉल...पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचा कार्यक्रम...
सोयाबीन विक्री करा जरा जपूनचमागील दोन महिन्यांपासून सोयाबीन हे पीक देशभर...
खरे थकबाकीदार ‘सरकार’च  वीजबिलाची थकबाकी ७९ हजार कोटींच्या घरात पोहोचली...
देवगड ‘राम्बुतान’हापूस आंब्याच्या प्रदेशात चक्क परदेशी फळ ‘...
‘कृषी’चे धडे घेऊनच करावी लागेल शेतीदेशात तथा महाराष्ट्रात आजही सुमारे ६० ते ६५...
हतबलतेचा अंत नका पाहूसोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर...
दूध आणि ऊस उत्पादकांच्या लुटीचे रहस्यसाखर उद्योग व दुग्ध व्यवसायामध्ये कमालीचे...
शर्यतीतील बैलांवरील ताणतणाव नियोजनबैलगाडा शर्यतीसाठी अत्यंत पद्धतशीरपणे ...
रीतसर नफ्याचा घोटाळाशेती हा असा व्यवसाय आहे, की ज्यामध्ये शेतकरी...
व्रतस्थ कर्मयोगीप्रसिद्ध ऊसतज्ज्ञ डॉ. ज्ञानदेव गंगाराम हापसे...
शुभस्य शीघ्रम्शालेय अभ्यासक्रमात कृषीचा समावेश करण्याच्या...
वाढत्या नैसर्गिक आपत्ती गांभीर्याने...पर्यावरणाच्या कडेलोटाच्या कुंठितावस्थेचं ...
शुद्ध खाद्यतेलासाठी हेतूही हवा शुद्धपामची लागवड आणि तेलनिर्मिती वाढविण्यास केंद्र...
कात टाकून कामाला लागानागपूर येथील `केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन...
घातक पायंडाजनुकीय बदल केलेल्या (जीएम) सोयापेंड आयातीला...
ऊस रसापासून थेट इथेनॉल निर्मितीचे हवे...जागतिक पातळीवर उसाच्या थेट रसापासून ३२ टक्के व...
‘गोल्डनबीन’ची झळाळी टिकवून ठेवा मागील दशकभरापासून राज्यात सोयाबीन (गोल्डनबीन)...
दिलासादायक दरवाढ खरे तर यंदाच्या साखर हंगामात साखरेच्या किमान...
अन्नप्रक्रिया योजना ठरताहेत मृगजळ भारतात उत्पादित शेतीमालापैकी ४० टक्के माल सडून...
शेतकऱ्यांच्या जिवांशी खेळ थांबवा सुमारे चार वर्षांपूर्वी २०१७ च्या खरीप हंगामात...