agriculture news in marathi agrowon special article on foreign trees dangerous to biodiversity | Agrowon

विदेशी वृक्षाने जैवविविधता धोक्यात

डॉ. मधुकर बाचूळकर  
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

गेल्या ४०-५० वर्षांपूर्वी सांगोला, पंढरपूर, सोलापूर, आणि मराठवाडा विभागात वनविभागाने मोकळ्या पडीक जमिनीवर विदेशी शमी (वेडी बाभूळ) वृक्षांची लागवड केली. हे वृक्ष अत्यंत जोमाने वाढले. या विदेशी वृक्षांनी, नैसर्गिकपणे वाढलेल्या आपल्या बाभळीच्या झाडांनाही नष्ट करून टाकले. 
 

आपल्या देशात तसेच राज्यात महामार्गांच्या बाजूने आणि शहरांत व गावात रस्त्यांच्या कडेने दोहो बाजूंस प्रामुख्याने वड, पिंपळ, उंबर, पिंपर्णी, कडुनिंब, करंज, शिरीष, बाभूळ, हिंगणबेट, कवठ, चिंच, महारूख, वावळ, पळस, मोहा, हळदु, ऐन, अर्जून, काटेसावर, आंबा, बेहडा यांसारखे देशी वृक्ष मोठ्या प्रमाणात दिसून येत असत. अगदी क्वचित गुलमोहोर, रेन ट्री, काशीद, यांसारखे विदेशी वृक्ष आढळून येत असत. पण गेल्या १५-२० वर्षांपासून सर्वत्र रस्ते विकास प्रकल्प राबविण्यास सुरुवात झाली आणि रस्त्यांच्या व महामार्गाच्या कडेस असणारे हे सर्व वृक्ष तोडण्यात आले आणि रस्ते भकास बनले आहेत. 

देशभरात सर्वत्रच रस्ते विकासासाठी आणि रेल्वे मार्गांसाठी लाखो देशी वृक्ष नष्ट केले जात आहेत. ही गंभीर बाब आहे. आपल्या विकासासाठी, वाहतुकीसाठी रस्ते रुंदीकरण करणे, नवीन रस्ते, महामार्ग तयार करणे आवश्‍यक आहे, हे मान्य आहे. पण रस्ते विकासानंतर, रस्त्यांच्या बाजूने केल्या जाणाऱ्या वृक्ष लागवडीच्या वेळी देशी वृक्षांची लागवड होणे आवश्‍यक होते. पण तसे झाले नाही. रस्ते विकासानंतर केलेल्या वृक्ष लागवडीमध्ये आज सर्वत्र प्रामुख्याने नेहमीच्या विदेशी वृक्षांबरोबरच बॉटलब्रश, सिंगापूर चेरी, टाबूबिया, निलमोहोर, मदागास्कर बदाम या इतर विदेशी वृक्षांचीच मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. रस्ते दुभाजकांमध्येही टेकोमा, पिवळी कन्हेर, पावडर पफ, स्कारलेट कॉर्डिया यांसारख्या विदेशी झाडाझुडपांचीच प्रामुख्याने लागण करण्यात आली आहे. पूर्वी रस्त्यांच्या, महामार्गांच्या दोन्ही बाजूंस हमखास आढळणारे वड, पिंपळ, उंबर, चिंच, कडुनिंब, करंज यांसारखे देशी वृक्ष मात्र आज रस्ते विकास प्रकल्पामुळे नामशेष होत आहेत. 

गेल्या अनेक दशकांपासून आपल्या राज्यातील वनविभागाने सामाजिक वनीकरण प्रकल्प राबवून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. गावांभोवताली असणाऱ्या मोकळ्या जागेत, गायरानांवर, डोंगर उतारांवर, पडीक जमिनींवर तसेच राखीव वनक्षेत्रात आणि अभयारण्यात असणाऱ्या ओसाड जमिनींवरही मोठी वृक्ष लागवड केलेली दिसून येते. यामुळे आज गावां-शहरांभोवतालीचा सर्व परिसर विदेशी वृक्षांनीच व्यापलेला आहे. वनीकरणांसाठी लागवड केल्या जाणाऱ्या सर्व विदेशी वृक्षांच्या रोपांची निर्मिती प्रामुख्याने वनविभागाच्या रोपवाटिकांमध्ये केली जाते. वनांचे संरक्षण करणे, स्थानिक जैवविविधतेचे, वन्यजीवांचे संरक्षण-संवर्धन करणे, ही सर्व प्रमुख कामे वनविभागाची आहेत. पण आपल्या राज्यातील वनविभागाने मात्र मोठ्या प्रमाणात विदेशी वृक्षांचीच रोपे तयार करून फक्त त्यांचीच लागवड करण्यात धन्यता मानली आहे. आजही आपल्या वनविभागाकडून लक्ष्मीतरू, कोनोकार्पस, महोगनी, विदेशी बदाम, ऑस्ट्रेलियन महोगनी, मदागास्कर बदाम यांसारख्या विदेशी वृक्षांची रोपे तयार करून त्यांची लागवड करण्याचे प्रकल्प सुरूच ठेवले आहेत, ही खेदाची बाब आहे. 

जैवविविधतेने समृद्ध आपल्या पश्‍चिम घाट परिसरात वृक्षांच्या ६५० प्रजाती असून, यांपैकी ३५२ प्रजाती प्रदेशानिष्ठ आहेत. म्हणजेच जगाच्या पाठीवर ते वृक्ष फक्त भारतातील पश्‍चिम घाटात असणाऱ्या वनक्षेत्रातच आढळतात. इतकी संपन्न वृक्षसंपदा आपल्याकडे आहे. काही अल्प अपवाद वगळता यातील बहुतांश वृक्षांची आपण बागेत, रस्त्यांच्या कडेने किंवा वनीकरण प्रकल्पांत लागवड करू शकलो नाही. इतकेच नव्हे तर या वृक्षांची कृत्रिम पद्धतीने लागवड करण्याचे तंत्रज्ञानही आपण विकसित करू शकलो नाही. यामुळेच विदेशी वृक्षांची इतकी गुलामगिरी कशासाठी, हा प्रश्‍न निर्माण होतो. आपल्या राज्यात वृक्षांच्या ७५३ प्रजाती असून, यापैकी ४६० प्रजाती देशी वृक्षांच्या, तर उर्वरित २९२ प्रजाती विदेशी वृक्षांच्या आहेत. आपल्या देशातील व राज्यातील वनक्षेत्रात देशी वृक्षांची विविधता जास्त असली तरी, लागवड करण्यात आलेल्या वृक्षांमध्ये विदेशी वृक्षांचीच संख्या तुलनेने जास्त आहे. शासकीय रोपवाटिकांप्रमाणेच खासगी रोपवाटिकांमध्येही विदेशी वृक्ष रोपांचीच उपलब्धता मोठ्या प्रमाणात असते. रोपवाटिकांमध्ये देशी व जंगली वृक्षांची रोपे अगदी अपवादाने क्वचितच मिळतात. यामुळे शासकीय योजनेप्रमाणेच खासगी आणि सेवाभावी संस्था स्तरावरही विदेशी वृक्षांचीच लागवड प्रामुख्याने केली जाते. या सर्व कारणांमुळे विदेशी वृक्षसंपदा वाढीस लागली आहे, तर आपली देशी वृक्षसंपदा धोक्‍यात आली आहे. भविष्यकाळात हे चित्र आपणांस बदलणे अत्यावश्‍यक आहे. 

निलगिरी, ऑस्ट्रेलियन बाभूळ यांसारखे विदेशी वृक्ष आपल्याकडील वातावरणात अगदी जोमाने वाढतात पण जवळपास असणाऱ्या इतर देशी वृक्षांना ते वाढू देत नाहीत. यामुळे तेथील नैसर्गिक अधिवास नष्ट होतो. 
विदेशी वृक्षांच्या खाली आपल्या देशी रोप व झुडूपवर्गीय वनस्पतींही वाढू शकत नाहीत. यामुळे स्थानिक परिसंस्थेवर परिणाम होऊन, आपली जैवविविधता नष्ट होऊ लागली आहे. गेल्या ४०-५० वर्षांपूर्वी सांगोला, पंढरपूर, सोलापूर, आणि मराठवाडा विभागात वनविभागाने पडीक जमिनीवर विदेशी शमी (वेडी बाभूळ) वृक्षांची लागवड केली. हे वृक्ष जोमाने वाढले आणि वेगाने सर्वत्र पसरले. या विदेशी वृक्षांनी, नैसर्गिकपणे वाढलेल्या आपल्या बाभळीच्या झाडांनाही नष्ट करून टाकले. आज या परिसरात सर्वत्र फक्त विदेशी शमीचीच झाडे दिसतात. या वृक्षांना आता नियंत्रित करणेही अशक्‍यप्राय बनले आहे. बहुतांश विदेशी वृक्षांची मुळे जमिनीत अगदी खोलवर शिरतात आणि सर्वत्र वेगाने पसरतात आणि मोठ्या प्रमाणात पाणी शोषून घेतात. याचा परिणाम जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाली असून, भविष्यकाळात आपणांस पाणीटंचाईसारख्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. 

देशी वृक्षांची पाने गळून जमिनीवर पडल्यानंतर ती लगेच कुजून त्यांचे नैसर्गिक खतात रूपांतर होते. यामुळे जमिनीची सुपीकता व पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढण्यास मदत होते. पण बहुतांश विदेशी वृक्षांची पाने गळून खाली पडल्यानंतर, ती लवकर कुजत नाहीत. यामुळे नैसर्गिकपणे जमिनीची सुपीकता वाढण्याची प्रक्रिया लांबणीवर पडते. काही विदेशी वृक्षांमुळे जमिनीचा नैसर्गिक सामू बदलतो. त्यामुळे त्यांच्या सभोवताली असणाऱ्या परिसंस्थेवर विपरीत परिणाम होतो.  आपले पक्षी विदेशी वृक्षांवर आसरा घेत नाहीत. झाडाझुडपांचा पाला खाणारी आपली पाळीव व जंगली जनावरे विदेशी वृक्षांचा पाला खात नाहीत. पशू-पक्ष्यांच्या नैसर्गिक अन्न साखळीवर विदेशी वृक्षांचा आघात होतो आणि त्यांची नैसर्गिक अन्नसाखळी तुटते 
आहे.

डॉ. मधुकर बाचूळकर  
 ९७३०३९९६६८

(लेखक पर्यावरण व वनस्पती तज्ज्ञ आहेत.)


इतर संपादकीय
जैवइंधन निर्मिती-वापरासाठी  हवेत...देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग वाढविण्यासाठी इंधन...
जैव उत्तेजक समिती हवी व्यापक शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जैव उत्तेजकांना (...
बाबासाहेबांच्या सत्याग्रहाचे शास्त्रडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला प्रत्येक लढा...
‘गोल्डनबीन’ला झळाळीविदर्भातील अकोला, वाशीमसह मराठवाड्यातील लातूर...
सहकार्य अन् समन्वयातून सुरू ठेवा बाजार...कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात या विषाणूचा...
कांद्याचा रास्त भाव काय?केंद्र शासनाने नवीन कृषी कायदे लागू केले...
श्रीलंकेचा आदर्श आपण कधी घेणार?श्रीलंका सरकारने पाम तेलाच्या आयातीवर बंदी घातली...
महाराष्ट्रातील मधुक्रांतीची दिशामार्च महिन्यामध्ये ‘मन की बात’मध्ये...
बाजारपेठेचा सन्मान करूयागोरगरिबांना स्वस्तात धान्य उपलब्ध करून...
सालगडी पाहिजेत!काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक जाहिरात फिरत...
आर्थिक प्रश्नचिन्हे कायमचआर्थिक वर्ष २०२१-२२ सुरू झाले आहे. २०२०-२१ हे...
हंगाम गोड, पण साखर कडूचखरे तर २०२०-२१ च्या गळीत हंगामापुढे अनेक आव्हाने...
पुन्हा कोरोना, पुन्हा लॉकडाउनकोरोना संकटाशी दोन हात करण्यासाठी महाराष्ट्रासह...
अस्तित्व टिकविण्यासाठीचा जागतिक संघर्षभारतातच नाही तर इतर अनेक देशांतही शेतकरी आपल्या...
आता पाया करा मजबूतराज्य-राष्ट्राचा कारभार असो की एखाद्या संस्थेचा,...
तंत्र शून्य मशागतीचे, अनंत फायद्याचेसन २०१० च्या दशकातील शेती व्यवसायात जमिनीतील...
दूरचे महासागर आणि आपले हवामानभारतीय शेती मोठ्या प्रमाणात हवामानावर अवलंबून आहे...
कारभारवाडीचा आदर्शलहानमोठ्या धरण लाभक्षेत्रातील तसेच नदी काठच्या...
मूळ प्रश्‍नाला सोईस्कर बगल !जागतिक भूक निर्देशांकातील आकडेवारीनुसार १०७...
संकट अस्मानी आणि सुलतानीहीयावर्षाच्या खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही...