बंदीपूरची आग आणि आपली सामूहिक अनास्था

कर्नाटकातील बंदीपूर येथे लागलेल्या आगीत १० हजार एकर जंगल जळून खाक झाले. जंगलाच्या बाजूच्या गावात महिनाभरापूर्वी दिसलेल्या वाघाला दूर पळवण्यासाठी लावलेली छोटी आग जंगलात पसरत गेली आणि तिने भयानक रूप धारण केले, अशी चर्चा आहे. मानवी हस्तक्षेप आणि वन्यजीवांचा जंगलाबाहेरचा वाढता वावर ही सध्याची गंभीर समस्या आहे; पण त्यावर केले जाणारे उपाय अपरिपक्व आणि तात्पुरत्या स्वरूपाचे असतात.
संपादकीय
संपादकीय

आं तरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड लोकसंख्या असणारा विविधतेने नटलेला भारत देश आज कुठल्याही व्यवस्थेला एक ‘मोठी बाजारपेठ’ म्हणून आकर्षित करतो. आपली शासकीय व्यवस्था, आपली लोकसंख्या हीच खरी ताकद एवढे ठरवून आणि तेवढ्याच पटीत उद्योग, रोजगार आणि संधी निर्माण करून आनंदात जगणे शक्य आहे. पण सत्तेत असलेले राजकारणी आणि एकूण व्यवस्था गायी, मंदिरे, बंदी, पाणी अडवून जिरवा, नौटंकी वगैरे वगैरे बिनकामाच्या गोष्टींचा गलबला करत सत्तेचा तख्त संभाळायची खेळी खेळत असतात. त्यात माध्यमे अजून भर घालत असतात. टीव्ही असो वा मुख्य प्रवाहातील दैनिके कळत-नकळत या चित्राचा भाग बनतात. हा आपला सामूहिक सामाजिक पराभव आहे. शिकलेली साक्षर जनता या दुष्टचक्राचा सहज अविभाज्य भाग बनते. त्यातून खरे, मूळ प्रश्न बाजूला सांदीकोपऱ्यात ढकलून दिले जातात. 

कर्नाटकातील बंदीपूर जंगलाला २२ फेब्रुवारीच्या रात्री आग लागली. तब्बल चार दिवस जंगल जळत होतं. त्याची बातमी गेले कित्येक दिवस मुख्य प्रवाहातील माध्यमांत नाही. आग शमवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न झाले; परंतु वाढत्या तापमानामुळे आग वाढत राहिली. अखेर हवाई दलाची मदत घेतल्यानंतर आग आटोक्यात आली. तोपर्यंत तब्बल १० हजार एकर जंगल, त्यातील कितीतरी अधिवास आणि भवतालच्या परिसंस्थेची राख झाली. जंगल, प्राणी, पक्षी त्यांचे अधिवास हे कधीही, कशाने तुरंत न भरून येणारी मौल्यवान संपत्ती आहे. पण आज आपल्या लेखी या संपत्तीला काडीचंही स्थान नाही, ही भयानक बाब आहे. 

बंदीपूर हा पश्चिम घाटाचा जैव विविधतेने नटलेला एक महत्त्वाचा भाग आहे. शिवाय तिथे संरक्षित व्याघ्र प्रकल्प आहे. त्यात वाघ, हत्ती तसेच अनेक नामशेष होत चाललेल्या वनस्पती, प्राण्यांच्या प्रजाती आहेत. तो संपन्न पट्टा अचानक पेटतो आणि त्याचा आक्रोश प्रसारमाध्यमे युद्ध, निवडणुका यांच्या ज्वरात दाबून टाकतात. ४२ व्या घटना दुरुस्तीनंतर वनांची संपूर्ण जबाबदारी राज्याकडून केंद्राकडे सोपवण्यात आली आहे. पण सरकार, राजकीय पक्ष आणि नागरिक या तिन्ही आघाड्यांवर कमालीची उदासीनता आहे.

फ्रान्समध्ये सायकलवर भ्रमंती करताना मी लॉरेन्स आणि एरिक या जोडप्याकडे पोचलो. तेव्हा ते दोघे मला आसपासचा डोंगराळ भाग दाखवायला घेऊन गेले. ससे, लाल हरणं आणि इतर प्राणी आजूबाजूला कसे नांदतात व इथले नागरिक त्यांची कशी काळजी घेतात याविषयीचा अभिमान त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होता. ते भारतात आले होते तेव्हा भला मोठा हत्ती आणि सुंदर वाघ पाहून त्यांची दहा वर्षांची लेकरं किती खूश झाली होती, याच भाववर्णन ऐकून मला खरं तर भरून आलं. हे एवढं सगळं माझ्या भारत देशात आहे आणि त्याची काळजी मूठभर लोक सोडली, तर कुणालाच नाही म्हणून वाईटही वाटले.  बंदीपूर आगीच्या प्रकरणात जवळच्या गावातील दोघांना हल्लीच अटक झाली, चौकशी सुरू आहे, असे स्थानिक वर्तमानपत्रांतून कळाले. जंगलाच्या बाजूच्या गावात महिन्याभरापूर्वी दिसलेल्या वाघाला दूर पळवण्यासाठी लावलेली छोटी आग जंगलात पसरत गेली आणि तिने भयानक रूप धारण केले, अशी चर्चा आहे. पण या आगीत कुठल्याही प्राण्याचे नुकसान झालेले नाही असा वन विभागाचा अहवाल आहे. मानवी हस्तक्षेप आणि वन्यजीवांचा जंगलाबाहेरचा वाढता वावर ही सध्याची गंभीर समस्या आहे. पण त्यावर केले जाणारे उपाय अपरिपक्व आणि तात्पुरत्या स्वरूपाचे असतात.  

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात आकुर्डे येथे २०१७ साली गव्याने केलेल्या हल्ल्यात एक शेतकरी मरण पावला. गव्याचे लाइव्ह कव्हरेज करण्यासाठी एक स्थानिक पत्रकार त्या क्षेत्रात गेले असता जमावाच्या हुल्लडबाजीने गवा बिथरून सैरावैरा धावत जे दिसल ते उडवत होता. त्यात त्या पत्रकाराचा मृत्यू झाला. "वरती पठारावर लावायचा म्हणून कोण तरी मस्तीत वणवा लावतोय. चांगला चारा आणि त्याचं बी जळून जातंय. मग गवं खाली येत्यात. परत पुढच्या टायमाला पहिलं चांगलं तांबड खाण्याच्या जागीच गवत कमी उगतंय. दुसरंच रानटी गवत जास्त उगतंय. मग जनावर तेला तोंड सुधा लावीत न्हायीत. चांगल व्हळ बगुन त्यास्नी वर्षभर पुरेल एवढ पाणी साठवता येतंय. पण कोण मनावर घेतंय ?" ही स्थानिक शेतकऱ्यांची भावना विचार करायला लागवणारी होती. वन्यजीव मानवी वस्तीत आलेच तर वन विभागाला कळवा, त्यांना काहीही करू नका, असे वन विभागाने सांगणे आणि पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी वन्यजीव पळवून लावण्यासाठी स्वत:च उपाय करणे, हे आपापल्या जागी बरोबर असले तरी हे होऊच नये म्हणून प्रतिबंधक उपाय का केले जात नाहीत, यात खरी गोम आहे. 

पुणे जिल्ह्यात जुन्नर भागातही बिबट्यांचा असाच थैमान आहे. भर उसात त्यांचा अधिवास आणि रवण निघणे असे प्रकार सामान्य आहेत. डिसेंबर महिन्यात गडचिरोली भागात वाघाच्या सामाज्र्यात फिरस्तीवर होतो. संरक्षित जंगल भाग वगळता वन विभागाच्या जंगलात कावळ्यांची जागोजागी विखुरलेली पिसे आणि हिरव्यागार गर्द वनामध्ये सुनसान / सन्नाटा हे चित्र स्मशानाचा अनुभव देत होते. मॉरिशियसचा डोडो नावांचा पक्षी जगातून नामषेश झाला, तसा कावळाही इकडे जवळ जवळ गायबच आहे. 

तर जंगल, तिथली परिसंस्था, पर्यावरण यांचे आम्हाला काय देणे घेणे असे सूर शहरी भागातून येणे हे नवल नाही. त्यांच्यासाठी, माध्यमांसाठी आणि व्यवस्थेसाठी अचानक कमी जास्त होणारे तापमान, मानवजातीला झटक्यात येणारे ताप, कमी-जास्त होणारा पाऊस हे भायानक परिणाम आहेत, हे वेगळे सांगायला नको. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर एक सुजाण नागरिक म्हणून व्यक्त व्हायला लागलात, आवाज उठवायला लागलात. न्याय मागायला लागलात तरच हे चित्र बदलेल. 

 अभिजित कुपटे  : ९९२३००५४८५ (लेखक अभियंता, सायकलपटू व ट्रेकर आहेत.)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com