agriculture news in marathi agrowon special article on Ganpatrao Deshmukh a leader from Sangola tahsil of Maharashtra | Page 2 ||| Agrowon

असा आदर्शवादी नेता पुन्हा होणे नाही

राजा कांदळकर
शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021

गणपतराव देशमुख आपल्यातून निघून गेले तेव्हा सर्वांनी त्यांच्या राजकीय मॉडेलची वाहवा केली. त्यांचं राजकीय व्यक्तिमत्त्व सर्वांना आवडत देखील होतं. पण त्यांचा स्वीकार मात्र कुणाला करावासा वाटत नाही, असे का?   
 

गणपतराव देशमुख ३० जुलै २०२१ ला आपल्यातून निघून गेले. १० ऑगस्ट १९२६ ला ते जन्मले होते. जवळपास ९५ वर्षे ते समृद्ध जगले. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका हा त्यांचा विधानसभेचा मतदारसंघ होता. त्या मतदारसंघातून ते ११ वेळा विधानसभेत निवडून गेले. हा भारतात मोठा विक्रम होता. तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या तोडीची गणपतरावांची संसदीय कारकीर्द होती. ३ ऑगस्ट १९४७ मध्ये शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली होती. तेव्हापासून मृत्यूपर्यंत ते या पक्षातच राहिले. ताठ कणा ठेवून अहोरात्र लोकांसाठी त्यांनी काम केलं. गणपतरावांचा पोशाख साधा होता. गणपतरावांनी साधेपणाचं व्रत आयुष्यभर पाळलं. गणपतरावांची तरुणपणातली जडणघडण एका भारावलेल्या वातावरणात झाली. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा गणपतराव तरुण विद्यार्थी होते. पंढरपुरात हायस्कूलला होते. देशात महात्मा गांधी, पंडित नेहरू यांचा बोलबाला होता. नवा भारत घडविण्यासाठी सर्व विचारधारांचे प्रतिनिधी कामाला लागले होते. काँग्रेस, समाजवादी, कम्युनिस्ट, उजवे, आंबेडकरवादी हे सर्वच आदर्शवादी राजकारणाचे समर्थक होते. कार्यकर्ता कसा असावा, नेता कसा असावा याचे पायंडे पडले होते. अशा आदर्श वातावरणात गणपतराव नवा समतावादी भारत घडविण्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या मार्क्सवादी विचारधारणेने झपाटले. काँग्रेस पक्षाशी मतभेद झालेले शंकरराव मोटे, केशवराव जेधे या नेत्यांनी मार्क्सवादीची तात्त्विक बैठक असलेला शेतकरी कामगार पक्ष स्थापन केला. त्या पक्षात गणपतराव देशमुखांनी विद्यार्थी दशेत प्रवेश केला. 

पंढरपुरात समाजवादी नेते बापू काळदाते हे गणपतरावांचे वर्गमित्र होते. गणपतराव पुढे पुण्यात एस. पी. कॉलेजला पदवीधर झाले. पुण्यातच आयएलएस लॉ कॉलेजला कायद्याची पदवी त्यांनी मिळवली. पुण्यातल्या शिक्षणात एस. पी. कॉलेजला शरद पवार यांचे मोठे बंधू अप्पासाहेब पवार हे गणपतरावांचे वर्गमित्र होते. शेतकरी कामगार पक्षात (शेकाप) भाई एन. डी. पाटील हे गणपतरावांचे समकालीन नेते राहिले होते. स्वातंत्र्य मिळालं. आता सर्व जाती जमाती धर्माच्या गरिबांना सन्मानाने जगात येईल असा भारत घडवायचा, त्या आदर्श ध्येयासाठी अहिंसक मार्गाने संघर्ष करायचा असं उद्दिष्ट शेकापनं ठरवलं. शेतकरी कामगार पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून गणपतराव शेवटच्या श्वासापर्यंत जगले. गणपतराव एसटीने प्रवास करत. मुंबईत आमदार निवासात घरून आणलेली भाकरी भाजी खात. हॉटेलात जेवत नसत. ज्वारीची भाकरी आणि भाजी हे त्यांचं आवडतं जेवण होतं. आमदार निवासात आमदारांना वर्तमानपत्र दिली जातात. गणपतराव त्या वर्तमानपत्रांची रद्दी जीव लावून साठवून ठेवत आणि ती विकून त्याचे पैसे राज्य सरकारकडे जमा करत. गणपतराव दोनदा राज्य मंत्रिमंडळात मंत्री होते. मंत्रिपद गेलं की ते सरकारी गाडी जिथं असेल तिथं सोडून देत. ड्रायव्हरला सांगत, ‘मी घरी जातो. तू गाडी मुंबईला घेऊन जा.’ सरकारी बंगला  तत्काळ खाली करत. ते पत्नीला घर खर्चाला दर महिन्याला पाचशे रुपये देत. त्यावर त्यांचं कुटुंब चाले. 

सकाळी सात वाजता त्यांची दिनचर्या सुरू होई. लोक भेटायला येत. सरकारी योजना लोकांपर्यंत जाव्यात यावर त्यांचा कटाक्ष असे. लोकांच्या जशा मागण्या असत, तशी तातडीने काम करवून घेत. गावदौऱ्यात एकदा त्यांच्याबरोबर गेलो होतो. प्रत्येक गावात तरुण ते वयोवृद्ध, महिलांपासून तर शाळेतील मुलांपर्यंत सर्व जण बैठकांत सहभागी होत. गणपतराव बैठकांत मोजकं बोलत. फटाफट निर्णय घेत. पिण्याचं पाणी, शाळांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य असे. ते तालुक्यात केवळ आमदार, लोकप्रतिनिधी नव्हते, तर पालक होते.

गणपतराव धनगर समाजात जन्मले. सांगोल्यात धनगर-मराठा समाजाची मतदारांमध्ये बहुसंख्या आहे. या दोन्ही समाजांना गणपतरावांनी बरोबरीने वागवलं. तालुक्याच्या सत्तेत बरोबरीची हिस्सेदारी बहाल केली. शिवाय इतर ओबीसी, दलित, अल्पसंख्याक यांना सत्तेत योग्य तो वाटा दिला. सर्व जाती शेकापक्षात येतील. त्या त्या जातीतले गुणवान, कर्तबगार कार्यकर्ते पुढे येतील असं त्यांचं धोरण होतं. या धोरणामुळे सांगोल्यात जातिवाद कधी बोकाळला नाही. सांगोल्यात गुन्हेगारीचं प्रमाण अल्प आहे. राजकारणात गुन्हेगारांना त्यांनी प्रतिष्ठा देण्याचं सतत नाकारलं. त्याचे परिणाम आजही सकारात्मक दिसतात. 

सांगोला हा महाराष्ट्रातील सर्वाधिक दुष्काळ असलेला तालुका. या तालुक्यात डाळिंब, बोरं या फळबागांना गणपतरावांनी जाणीवपूर्वक चालना दिली. शेळी, मेंढी, कोंबड्या पालनासाठी पूरक योजना राबवल्या. गाईपालन, दुग्ध व्यवसायाला चालना दिली. त्यातून सांगोल्याचं अर्थकारण दुष्काळ आणि पाणीटंचाई असूनही बदललं. सामान्य शेतकऱ्यांच्या घरात पैसा आला.निवडणुकीचं राजकारण आदर्श कसं असू शकतं याचं दर्शन सांगोल्यात प्रत्येक निवडणुकीत होत असे. राजकारणात गुन्हेगार, पैसा, दारू, गुंड, जातिवाद यांचा प्रभाव वाढत होता. तेव्हा त्या अपप्रवृत्तींना गणपतरावांनी स्वतःच्या चांगुलपणाने थोपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. गणपतरावांची निवडणूक राज्यात सर्वांत कमी पैशात लढवली जाई. अपप्रवृत्ती नाहीच्या बरोबर असत. गावोगाव त्यांनी आदर्श राजकारण, निवडणुका याविषयी आपल्या आचरणातून खूप मोठं प्रबोधन केलं होतं. तरीही काळ बदलतोय याची त्यांना कल्पना होती. गणपतराव गेले तेव्हा सर्वांनी त्यांच्या राजकीय मॉडेलची वाहवा केली. त्यांचं राजकीय व्यक्तिमत्त्व सर्वांना आवडत होतं. पण गणपतराव आपल्या समाजाला पेलवले का, हा प्रश्‍न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे.

दुष्काळ, पाणी, शेती, फळबागा, रोजगार हमी योजना, महागाई, शिक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्‍न या विषयांवर गणपतरावांनी विविध योजना, आदर्श धोरणं आखण्यासाठी राज्य सरकारला भाग पाडलं. त्याचा राज्याच्या जडणघडणीत मोठा प्रभाव पडलेला दिसतो. राजकारण बदलतंय हे त्यांना कळलं होतं. भ्रष्टाचार, पैशाची शिरजोरी, कंत्राटदार लॉबीचं वर्चस्व, भांडवलदारांचा वरचष्मा हे त्यांनी बघितलं. त्याविषयी विचारलं तर ते म्हणत, ‘हा काळाचा महिमा आहे.’ त्यांचा पक्षही बदलला. ते त्यांना पटत नव्हतं. पण अपप्रवृत्तीला स्वतःच्या परिघात त्यांनी येऊ दिलं नाही. अंधारातल्या दिव्यासारखे ते शेवटपर्यंत तेवत राहिले.

 

राजा कांदळकर
 ९९८७१२१३००

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.) 


इतर संपादकीय
रीतसर नफ्याचा घोटाळाशेती हा असा व्यवसाय आहे, की ज्यामध्ये शेतकरी...
व्रतस्थ कर्मयोगीप्रसिद्ध ऊसतज्ज्ञ डॉ. ज्ञानदेव गंगाराम हापसे...
शुभस्य शीघ्रम्शालेय अभ्यासक्रमात कृषीचा समावेश करण्याच्या...
वाढत्या नैसर्गिक आपत्ती गांभीर्याने...पर्यावरणाच्या कडेलोटाच्या कुंठितावस्थेचं ...
शुद्ध खाद्यतेलासाठी हेतूही हवा शुद्धपामची लागवड आणि तेलनिर्मिती वाढविण्यास केंद्र...
कात टाकून कामाला लागानागपूर येथील `केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन...
घातक पायंडाजनुकीय बदल केलेल्या (जीएम) सोयापेंड आयातीला...
ऊस रसापासून थेट इथेनॉल निर्मितीचे हवे...जागतिक पातळीवर उसाच्या थेट रसापासून ३२ टक्के व...
‘गोल्डनबीन’ची झळाळी टिकवून ठेवा मागील दशकभरापासून राज्यात सोयाबीन (गोल्डनबीन)...
दिलासादायक दरवाढ खरे तर यंदाच्या साखर हंगामात साखरेच्या किमान...
अन्नप्रक्रिया योजना ठरताहेत मृगजळ भारतात उत्पादित शेतीमालापैकी ४० टक्के माल सडून...
शेतकऱ्यांच्या जिवांशी खेळ थांबवा सुमारे चार वर्षांपूर्वी २०१७ च्या खरीप हंगामात...
इथेनॉलयुक्त भारतातूनच साधेल इंधन...भारत हा ब्राझीलनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ऊस...
डीबीटी’ लाभदायकच!  कृषी विभागांतर्गतच्या विविध योजनांचा एक हजार...
साखर दराला झळाळी; दोन वर्षांतील...कोल्हापूर : साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारात...
दिलासादायक दरवाढखरे तर यंदाच्या साखर हंगामात साखरेच्या किमान...
शर्यतीच्या बैलांची निवड आणि संगोपनशर्यतीच्या बैलांची खरेदी साधारण नोव्हेंबर ते...
बैलगाडा शर्यत ः ग्रामीण अर्थकारणाचे साधनबैलगाडी शर्यतीचा इतिहास तसा फार जुना आहे....
‘सिट्रस इस्टेट’ला गतिमान करा विदर्भातील संत्रा या फळपिकाची उत्पादकता वाढवून...
जीवदान अन् दाणादाणहीयावर्षी जूनमध्ये ऐन पेरणीच्या हंगामातील पावसाचा...