निसर्ग देवतांचा आदर करायला हवा

हिमकडे, हिमनद्या आणि हिम सरोवरे हे हिमालयाचे खरे धवल सौंदर्य. पण वातावरण बदलामुळे या सौंदर्याला आज दृष्ट लागत आहे. हजारो वर्षांपासून सुप्त अवस्थेत असलेल्या हिमनद्या आता वितळू लागल्या आहेत.
agrowon editorial article
agrowon editorial article

डेहराडूनपासून २९५ किलोमीटर अंतरावर असलेल्या जोशीमठ या बद्रीनाथ तीर्थयात्रेच्या महामार्गावर चमोलीच्या आतील भागामध्ये वसलेल्या ‘रेणी’ गावाजवळ प्रचंड मोठा हिमकडा कोसळला. त्यामुळे परिसरात असलेल्या गंगानदीच्या धौली गंगा, ऋषी गंगा आणि अलकनंदा या उपनद्यांना अचानकच प्रचंड मोठा पूर आला आणि रविवारच्या (७ फेब्रुवारी) सकाळच्या प्रसन्न वातावरणात स्थानिक जनतेत भयाचे वातावरण पसरले. जलविद्युत प्रकल्पाच्या हानीबरोबरच तेथे काम करत असलेले कितीतरी मजूर आज बेपत्ता आहेत. रेणी गावामधील नदीकाठची शेती तर वाहून गेली. पण गरीब शेतकऱ्‍यांचा निवारासुद्धा हरवला आहे. प्रसारमाध्यमांतून ही घटना, त्याचे झालेले चित्रीकरण पाहत असताना मला डिसेंबर १९९८ मधील श्रीनगर, गढवाल येथील विद्यापीठाला दिलेली भेट आठवली. ‘भारतामधील सरोवरे’ या वरची ती परिषद होती. या परिषदेत हिमालयामधील सरोवरावर विविध प्रकारचे सादरीकरण झाले. या निमित्ताने हिमालयाचे निसर्ग सौदर्य, हिमकडे, हिमनद्या, वाहत्या नद्या, जैवविविधता याची एक सुंदर चित्र प्रदर्शनी सुद्धा तेथे होती. हे सर्व पाहताना स्वप्नवत वाटत होते. सहभागी शास्त्रज्ञांना हे सर्व पाहण्यासाठी सहलीला सुद्धा नेण्यात आले होते. 

धौली गंगा, अलकनंदा यांचे रूप खरेच विलोभनीय होते. धौली गंगा म्हणजे स्फटिकासारखे पांढरे शुभ्र चकाकते पाणी. तिचे पाणी ओंजळीत घेऊन कितीतरी वेळा मी तो आनंद लुटला. आज तीच धोली गंगा हिमकडा कोसळल्यामुळे गाळ, दगडगोटे, माती घेऊन वाहत आहे. चार दशकांपूर्वी हाच उत्तराखंडचा भाग (पूर्वीचा उत्तर प्रदेश) फक्त बद्रीनाथ, केदारनाथचा रस्ता आणि त्या मार्गावरील इतर पर्यटन स्थळे सोडली, तर तसा अस्पर्श होता. तेथे फक्त निसर्गाचीच श्रीमंती होती. कुठे एखादी जेसीपी मशिन दिसली तर तिच्या आवाजाने स्थानिक लोक घाबरत, मुले दूर पळून जात. आज हेच उत्तराखंड हजारो जेसीपी मशिनची श्रीमंती दाखवत आहे. हिमालयाच्या या भागात नद्यांवर जलविद्युत प्रकल्प राबवू नका, असे शास्त्रज्ञांनी अनेक वेळा शासनास कळवले, लिहून पाठवले. कारण प्रत्येक नदीचा मुख्य जलस्रोत हे तेथील हिमकडे आहेत. पण शासनाने दुर्लक्ष केले. आज उत्तराखंडमध्ये तब्बल ८५ लहान मोठे जलविद्युत प्रकल्प आहेत. काही पूर्ण झाले, कुठे काम सुरू आहे, तर काही परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत.

  सध्याचा ९०० किलोमीटर लांबीचा चारधाम महामार्ग ज्यामध्ये सर्व तीर्थक्षेत्रे एकमेकांस जोडली जाणार. याचा सर्वांत जास्त परिणाम तेथील निसर्गावर होणार आहे. २०१६ मध्ये हा प्रकल्प सुरू झाला. यासाठी आतापर्यंत हजारो झाडांची कत्तल झाली आहे, अनेक ठिकाणी रस्ते, बोगदे बांधण्यासाठी सुरुंग स्फोट करण्यात येत आहेत, पर्वत तोडणे चालू आहे, रस्ता बांधणीसाठी तयार झालेला सिमेंट, डांबर, दगडांचा राडा तेथील शुभ्र, स्वच्छ फेसाळ नद्यांमध्ये ढकलला जात आहे. मंदाकिनीचा प्रवाह अनेक वेळा थांबला आणि तिची ही अवस्था पाहून अलकनंदासुद्धा थांबली होती. पर्वतांच्या कुशीमधून उताराच्या दिशेने वेगाने वाहणाऱ्‍या नद्यांना अशा पद्धतीने थांबवणे चुकीचे आहे. पण आम्ही ते करत आहोत. 

हिमकडे, हिमनद्या आणि हिम सरोवरे हे हिमालयाचे खरे धवल सौंदर्य. पण वातावरण बदलामुळे या सौंदर्याला आज दृष्ट लागत आहे. हजारो वर्षांपासून सुप्त अवस्थेत असलेल्या हिमनद्या आता वितळू लागल्या आहेत. त्यांच्यामधील बर्फ वेगाने कमी होत आहे आणि याचा परिणाम हिमालयामधून भूपृष्ठाकडे धावणाऱ्या गंगा, सिंधू आणि यांगत्सी या तीन मुख्य नद्यांवर होणार आहे. जगामधील एक चतुर्थांस लोकसंख्या या नद्यांच्या खोऱ्‍यामध्ये राहते. येथील शेतीचे २१ व्या शतकाच्या मध्यावरचे भविष्य अंधकारमय असणार आहे. उत्तराखंडमध्ये गंगोत्री, जोशीमठ, बद्रीनाथ, केदारनाथ या महामार्गांवर प्रतिदिन हजारो वाहने धूर ओकत प्रवास करत असतात. केवढे तरी जीवाष्म इंधनाचे दररोज ज्वलन होते, कार्बनचे कितीतरी सूक्ष्म कण वातावरणात पसरले जातात. हिमकडे, हिमनद्यांवर या कणांचा पातळ काळपट थर आजही पाहावयास मिळतो. असे हिमकडे, हिमनद्या सूर्यप्रकाश शोषून घेतात आणि बर्फ वितळणे सुरू होते. आज हिमालयामधील अनेक हिमकडे पुढे सरकले आहेत. त्यामुळे त्यांच्या मूळ जागेवर बर्फ वितळून सरोवरे तयार झाली आहेत. यामध्ये अजून जास्त पाणी जमा झाले, की ही सरोवरे फुटतात आणि नद्यांना पूर येतो.

पर्यावरणासाठी ही चांगली घटना नाही. आज हिमालयामधील अनेक हिमकड्यांच्या टोकावर आणि पोटामध्ये सुद्धा लहान- मोठी सरोवरे तयार झाली आहेत, हे सर्व बर्फ वितळल्यामुळेच! हिमकड्यांचा आकार २५ एकरांपासून शेकडो एकरांपर्यंत असतो. यावरून त्याच्या पोटात दडलेल्या पाण्याचा अंदाज यावा. वास्तविक हे पाणी तेथे नसावयास हवे. पण दुर्दैवाने ते तयार झालेले आहे. अशी सरोवरे केव्हाही फुटू शकतात.

उत्तराखंडमध्ये जसजसे आपण बद्रीनाथ, केदारनाथकडे जाऊ लागतो, तसे शेतीचे प्रमाण नगण्य होत जाते. थोडा भाजीपाला, मका, रताळी तेथे पाहावयास मिळतात, तेही पर्वत उतरणीवरच. वातावरण बदलाचा फार मोठा फटका येथील शेतीला बसला आहे. त्यामुळे बराचसा शेतीमाल डेहराडून, हरिद्वार या हिमालयाच्या पायथ्यापासून वर शेतकऱ्यांकडे पाठवला जातो. म्हणजे शेतकरीच शेतकऱ्‍यांना पोसत आहेत, असे काहीसे वेगळे चित्र या भागात पाहावयास मिळते. थोडक्यात, हिमालय बदलत आहे म्हणण्यापेक्षा, तो आपल्यावर रागवत आहे, एवढा जरी बोध आपण चमोली घटनेमधून घेतला, तर बरेच काही साध्य होईल. हिमालय असो अथवा सह्याद्री, विंध्य असो अथवा सातपुडा निसर्ग देवतेची ही रूपे आहेत. आपण यांचा आदर आणि सन्मान हा ठेवावयास हवाच. 

डॉ. नागेश टेकाळे   ९८६९६१२५३१

(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com