agriculture news in marathi agrowon special article on good monsson this year then what | Agrowon

पाऊस चांगला पडणार, पुढे काय?

डॉ. नागेश टेकाळे
शुक्रवार, 15 मे 2020

जोपर्यंत पावसाचे जल साठवून भूपृष्ठावर तसेच भुजलामध्ये जल संधारणाच्या माध्यमातून आपण वाढ करत नाही, तो पर्यंत जल संसाधन आणि जल संरक्षणास काहीच अर्थ उरत नाही. म्हणूनच यावर्षीच्या चांगल्या मॉन्सूनच्या अंदाजास शेतकऱ्यांनी विशेष महत्व दिले पाहिजे. पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब कसा आडेल, जमिनीत मुरेल, हे पाहीले पाहिजे.
 

भारताच्या १३७ कोटी लोकसंख्येपैकी ६८ टक्के जनता ही ६० लाखाच्या वर लहान मोठ्या खेड्यामध्ये विभागलेली आहे. यामध्ये शेती व्यवसायाशी निगडीत लोकांची संख्या ९० टक्के पेक्षाही जास्त आहे. स्वातंत्रप्राप्तीपूर्वी आपला देश कृषिप्रधान होता आणि स्वातंत्रप्राप्तीच्या ७४ व्या वर्षा मध्येही विज्ञानाने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती करूनही आपण आजही कृषिप्रधानच आहोत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारतीय हवामान खात्यातर्फे शुभसंकेत मिळाला की ‘यावर्षी देशात पाऊस वेळेवर येणार आणि त्याची सरासरी गाठणार. १४ एप्रिलला सॅसकॉफ (साऊथ एशियन क्लायमेट आऊटलूक फोरम) या आंतरराष्ट्रीय संस्थेने सुद्धा भारतामधील मॉन्सूनच्या सुखामय प्रवासाचा अंदाज जाहीर करून शेतकऱ्यांचा हुरूप वाढवला आहे. त्यांचा अंदाज सांगतो की दक्षिण भारतात यावर्षी मॉन्सून सरासरी पेक्षा जास्त असेल मात्र ईशान्य पूर्व भागात तो कमी असेल. देशात तो सरासरीचा टप्पा निश्चितच गाठेल.

पाच-सहा दशकांपूर्वी असे हवामानाचे अंदाज त्या खात्याच्या रेकॉर्डला असले तरी शेतकऱ्यांना अथवा शासनकर्त्याना त्याचे फारसे महत्त्व नव्हते. त्याला कारण म्हणजे नियमित पडणारा भरपूर पाऊस. आता मात्र चित्र वेगळे आहे. म्हणूनच अशा अंदाजाला एक वेगळेच महत्त्व प्राप्त होते. देशाची अर्थनीती, पिकांचे होणारे उत्पादन आणि त्यांचे शासन नियंत्रित बाजारभाव या अंदाजावर प्रभावित होत असतात. पूर्वी पडणाऱ्या पावसास अनुसरुन शेतकरी त्यांचा शेतीचे आणि पिकांचे नियोजन करत असत. आता मात्र शेतीचे नियोजन पावसाशी जोडण्यापेक्षा पावसाचे पाणी साठवून त्या शाश्वत पाण्यापासून पिकांचे नियोजन कसे करता येईल, याकडे अभ्यासू शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. हा सुद्धा भविष्यासाठी एक शुभसंकेतच म्हणावा लागेल. १९६०-७० पर्यंत 'जल' हा शब्द 'पूजा' या विशेषणाला जोडलेला होता. जलपूजनास देवतेचे स्थान होते. पाऊस पडणार, नदी वाहणार, विहिरी काठोकाठ भरणार, आडांना भरपूर पाणी येणार, हे जलश्रीमंतीचे एक वेगळेच रूप त्या वेळी होते. नेमके हेच दशक भारतामधील हरितक्रांतीचेही होते. याच काळात पावसापेक्षाही भूगर्भामधील पाण्याचा उपसा करून शेतीखालील क्षेत्र वाढवले गेले, रासायनिक खते आणि संकरित बियाणांचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला. पिकांची तहान भागेना, पावसाचे पाणीही कमी पडू लागले. त्यामुळे तहानलेल्या संकरित पिकांना पाणी देण्यासाठी भूगर्भामधून वेगाने जलउपसा होऊ लागला. ५० वर्षात कडक कायदे करूनही आज तो अनियंत्रित उपसा थांबलेला नाही. शेतीचे क्षेत्र वाढवण्यासाठी अनेक ठिकाणी जंगलाचाही बळी देण्यात आला, यामुळे धान्य उत्पादन वाढले. मात्र, ५० फुटावर लागणारे पाणी आज ५०० फूट जमिनीच्या पोटात गेले तरी फक्त धुरळाच वर येत आहे. जलपूजन या शब्दांमधील 'पूजन' जाऊन त्याजागी उपसा हा शब्द जोडला गेला आहे. कायम तहानलेल्या या पाच अक्षरी शब्दाला शांत ठेवण्यासाठी जल तज्ज्ञांनी गेल्या दोन दशकामध्ये तीन नवीन शब्दांची निर्मिती केली, ती म्हणजे जल संसाधन, जलसंधारण आणि जल संरक्षण. हे तिन्हीही शब्द शासन दरबारी सर्व विभागात परवलीचे शब्द म्हणून फिरत असतात. तेथून ते ग्रामीण भागात झिरपतात आणि मोजक्या याचकापर्यंत पोचून त्यांची तेथे लगेच वाफ होऊन जाते.

वास्तविक पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याला त्याचे जलसंसाधन शेतीमधील विहिर, ओढा, परिसरामधील नदी, घरामधील आड, पंचक्रोशीतील बारव या माध्यमांमधून माहीत होते. जल संसाधन स्त्रोत शाश्वत असल्यामुळे आणि त्याचबरोबर संपूर्ण शेती सेंद्रिय सोबत बांधावर वृक्ष श्रीमंती असल्यामुळे शेतकऱ्यांनी जलसंधारणास कधीच महत्त्व दिले नाही. त्यामुळे जल संरक्षणाचा प्रश्नच उद्भवत नव्हता. गावांची शहरांच्या दिशेने वाटचाल, शेतीचे यांत्रिकीकरण, गोधनास ओहोटी, संकरीत बियाणामधून पारंपरिक पीक पद्धतीचे श्राध्द, रासायनिक खतांचा महापूर आणि शेतकऱ्यांना चुचकारण्यासाठी शासकीय अनुदानाचा नैवेद्य यामुळे हजारो वर्षांची परंपरा असलेल्या जलसंसाधनास ओहोटी लागली. जंगल कमी होऊन सिमेंटीकरणं सुरू झाल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरणे कमी झाले. हिरवे डोंगर उजाड झाले, नद्या कोरड्या पडल्या आणि शासनाने जनताजनार्दनासाठी गावाबाहेर पंचक्रोशीत तळी निर्माण करून गावासाठी नळ योजना सुरू केली. प्रत्येकाच्या घरामधील शुद्ध मधूर जल तेही पोहऱ्यामधून मोजून मापून देणाऱ्या आडांच्या कचराकुंड्या झाल्या. प्राचीन काळापासून उपलब्ध असणारे 'बारव' सारखे जलस्रोत, तीर्थक्षेत्रावरील कुंड, कल्लोळ कोरडे पडले आणि जलसंसाधन शब्दाचे महत्त्व नकारात्मक पद्धतीने अधोरेखित झाले. जलसंसाधनावर काम करावयाचे म्हणजे जल संधारण हवे आणि साठवलेले पाणी राखून त्याचा जपून वापर करावयाचा म्हंटले की जल संरक्षण आलेच. जोपर्यंत पावसाचे जल साठवून भूपृष्ठावर तसेच भुजलामध्ये जल संधारणाच्या माध्यमातून आपण वाढ करत नाही, तो पर्यंत जल संसाधन आणि जल संरक्षणास काहीच अर्थ उरत नाही. म्हणूनच यावर्षीच्या १०० टक्के मॉन्सूनच्या अंदाजास शेतकऱ्यांनी विशेष महत्व दिले पाहिजे. पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब कसा आडेल, जमिनीत मुरेल, हे पाहीले पाहिजे.
 

डॉ, नागेश टेकाळे 
(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत,)


इतर संपादकीय
आता संकल्प फेरमांडणीचा : मोहम्मद युनूस"कोरोना'ने आपल्याला नव्याने सर्व काही सुरू...