ग्रेटाचा सवाल : तुमची हिंमत तरी कशी होते?

एक १६ वर्षीय मुलगी जगाच्या सत्ताधिशांना (मोदी असो की ट्रम्प) विश्र्वास व धैर्याने खडे बोल सुनवते. ‘निर्भय बना, सत्तेला सत्य सांगण्याचे कर्तव्य निभवा’ हा गांधीचा मार्ग ग्रेटाने निश्चयाने स्वीकारला आहे. अर्थात या सर्वात आक्रस्ताळेपणा नाही, तर भविष्याविषयी गंभीर चिंता व चिंतन साक्षात जाणवते.
संपादकीय.
संपादकीय.

गत वर्ष दीड वर्षाच्या अल्प काळात स्वीडनच्या ग्रेटा थनबर्ग नावाच्या एका किशोरवयीन मुलीनं संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलंय. तापमानवाढ व त्यामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास या प्रश्नांमुळे ती शाळेत अस्वस्थ असायची. हे थांबविण्यासाठी कृती करण्याचे तिने ठरविले. अनेकांशी ती याबाबत बोलली. मात्र, कुणी सुरवात करायला धजेना तेंव्हा तिने ‘पर्यावरण रक्षणासाठी शाळा संप’ फलक घेऊन स्वीडनच्या संसदेसमोर धरणे धरले. काही दिवस एकटीच बसून राहिली. काही कालावधीनंतर माध्यमांनी तिची दखल घेतली. धीरगंभीरपणे दर शुक्रवारी पृथ्वी व पर्यावरण वाचवा, यासाठी मेळावे घेऊ लागली. आता ‘फ्रायडे फॉर फ्युचर’ ही चळवळ जगभर पोचली असून शंभरहून अधिक देशात शुक्रवारी कुठे न कुठे ‘वसुंधरा मेळावे’ होतात. केवळ एका वर्षात तिचा आवाज वेगाने जगभर पसरला आहे. 

हे सर्व कसे घडले? प्रथम तिने आपल्या स्वत:च्या कुटुंबापासून सुरवात केली. आईवडिलांना शाकाहारी केले, विमान प्रवास कमी करायला, टाळायला प्रवृत्त केलं. युरोपीय समुदाय, डावोसची अर्थपरिषद, ब्रिटिश संसद ते नुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या हवामान कृती शिखर परिषदेतील ग्रेटाचा सहभाग जगाला अचंबित करणारा आहे. मुख्य म्हणजे पर्यावरण स्नेही जीवनशैलीचा जाणीवपूर्वक अवलंब करत तिने आपल्या पर्यावरणीय पदचिन्हांना (इकॉलॉजिकल फूट प्रिंट) मर्यादित करण्यास सुरवात केली. ताजी घटना म्हणजे संयुक्त राष्ट परिषदेला जाण्यासाठी तिने इंग्लंडच्या प्लॉयमाऊथ पासून न्यूयार्कपर्यंतचा प्रवास सौर ऊर्जेवर चालणाऱ्या बोटीने केला. होय, त्यासाठी दोन आठवडे लागले. सर्वच परिषदांमधील ग्रेटाची भाषणे मर्मावर बोट ठेवणारी असतात. २३ सप्टेंबर २०१९ ला संयुक्त राष्ट्र संघाच्या परिषदेत बोलताना ती अत्यंत परखड शब्दात म्हणाली, ‘‘आम्ही तुमच्याकडे पाहत आहोत, तुमच्यावर लक्ष ठेवून आहोत, जे घडतंय ते चुकीचं आहे. मी खरं तर इथं असायला नको आहे. सागराच्या त्यापल्याड असलेल्या शाळेत मी असायला हवी होते; पण तरी तुम्ही आम्हा तरुण पिढीकडे आशेनं पाहताय. हाऊ डेयर यू म्हणजेच तुमची हिंमत तरी कशी होते? तुमच्या पोकळ शब्दांनी तुम्ही माझं बालपण हिरावून घेतलंय; माझ्या स्वप्नांचा चुराडा केला आहे आणि तरीही मी काही भाग्यवंतांपैकी एक आहे. लोक दु:खात आहेत, त्यांना वेदना होताहेत. ते मरताहेत. पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, संपूर्ण भवताल डळमळू लागलंय. जनसमुदाय नामशेष होण्याच्या टोकावर आपण येऊन पोचलोय. त्याची सुरुवात होऊ लागली आहे; आणि तरी आपण फक्त पैशांबद्दल बोलतोय, बाह्य आर्थिक विकासाचे गुणगान गातोय. त्याच्या परिकथांमध्ये रमतोय. तुमची हिंमत कशी होते? ’’  

विशेष म्हणजे ती ठामपणे म्हणाली तुम्ही माझे ऐकू नका; पण विज्ञान व वैज्ञानिकांचे तरी ऐकणार आहात की नाही? आणि ती म्हणते, ‘‘३० वर्षांहून अधिक काळापासून विज्ञान अतिशय सुस्पष्ट आहे. त्याकडे तुम्ही पाठ फिरवलीय. पर्यावरणाच्या प्रश्नावर नेमके उत्तर आणि त्यासाठीची राजनीती दृष्टिपथातही नाही. तरीही खूप काही केल्याच्या आविर्भावात तुम्ही इथे येताय; तुमची हिंमत तरी कशी होते?’’ खरोखरीच फार अंतर्मुख करणारे हे ग्रेटाचे अंतरीचे बोल आहेत. स्मार्ट फोन व इंटरनेट पिढीला तीचं हे भाषणं यू-ट्यूबवर ऐकता येईल. सोबतच विकीपिडिया वर आजघडीला असलेली २६ पाने व त्यातील शंभराहून अधिक संदर्भ नीट बघितल्यास हे कळेल की जाणीवपूर्वक विचार व कृति केल्यास काय किमया होते. 

थोडक्यात, एक १६ वर्षीय मुलगी जगाच्या सत्ताधिशांना (मोदी असो की ट्रम्प) विश्र्वास व धैर्याने खडे बोल सुनवते. ‘निर्भय बना, सत्तेला सत्य सांगण्याचे कर्तव्य निभवा’ हा गांधीचा मार्ग ग्रेटाने निश्चयाने स्वीकारला आहे, याबाबत तीळमात्र शंका नाही. अर्थात या सर्वात आक्रस्ताळेपणा नाही, तर भविष्याविषयी गंभीर चिंता व चिंतन साक्षात जाणवते. म्हणून तर ब्रिटिश संसद असो की संयुक्त राष्ट्र संघाची सभा यांना तीचे म्हणजे ऐकून घ्यावे लागले. ब्रिटिश संसदेने तर क्लायमेंट एमर्जन्सी म्हणजेच हवामान आणीबाणी घोषित केली. लक्षात घ्या संकल्प असेल तर काय प्रभाव पडतो. ‘करके देखो’ या गांधी तंत्र व तत्त्वज्ञानाचा हा आहे ठोस प्रत्यय आहे. लहान मोठे नेते, विकासवाले (?) तमाम महाभाग विद्यार्थ्यांना अभ्यास करा, असा शहाजोग सल्ला देतात व ते मात्र आमच्या भविष्याची वाट लावत आहेत. मस्तवालपणे पर्यावरणाच वाटोळे करत आहेत, असे जगभरच्या सत्ताधीशांना ग्रेटा ठणकावून सांगते. तुम्ही आजवर खूप वाटोळे केले आहे; आता नाही चालणार हे. लोक जागे होत आहेत, संघटित होत आहेत. त्यांची दमछाक करू नका, अंत पाहू नका. कर्ब व अन्य विषारी वायूच्या उत्सर्जनाचे प्रमाण सत्त्वर कमी करा, असे आवाहन ग्रेटा करते. तीची ही आर्त हाक विकास व तंत्रज्ञानाचा कैफ चढवलेले तमाम अभिजन महाजन केव्हा ऐकणार?  आनंदाची बाब म्हणजे उत्तराखंडमध्ये राहणाऱ्या ११ वर्षाच्या रिद्विमा पांडे हिने तो ऐकला व ती ग्रेटाची सक्रिय सहकारी बनली आहे.

आम्हा भारतीयांसाठी वसुंधरा बचाव चळवळ ही गांधीच्या विचार, तत्त्वज्ञान व जीवनशैलीशी थेट जुळणारी आहे. सत्य, अहिंसा व शांततेच्या मार्गाने गांधीजींच्या निर्सगकेंद्री जीवनशैलीचा अवलंब करून मोटारवाहने, प्लॅस्टिक व घातक रसायनांना सोडचिठ्ठी दिली पाहिजे. उण्यापुऱ्या चारशे दिवसांच्या अल्पावधीत जगभरच्या पर्यावरणवाद्यांना, विशेषत: तरुणाईला ग्रेटाने मोठे प्रोत्साहन व बळ दिले आहे. २० सप्टेंबर २०१९ च्या शुक्रवारी १६८ देशांतील लहान मोठ्या शहरात ४० लाख लोकांनी ‘वसुंधरा बचाव’ निदर्शनात भाग घेतला. न्यूयार्क शहरात ग्रेटाच्या उपस्थितीत अडीच लाख लोकांनी यात भाग घेतला. ‘अच्छे दिन’चा काही अर्थ असेल तर हा, अन्यथा येत्या पाच वर्षांत पाच ट्रिलियन डॉलरचा विकासमामला पर्यावरणाची बिनधास्त बरबादी करत राहील.

२१ व्या शतकात जगाला पर्यावरणीय (परिस्थितीकीय) संस्कृतीची (इकॉलॉजिकल सिव्हिलाझेशन) नितांत गरज आहे. जागतिक हरित चळवळ (ग्लोबल ग्रीन मूव्हमेंट) ज्याचा आवाज ग्रेटा व जगभरचे किशोरवयीन तरुण तरुणी बुलंद करत आहे, तो जगाच्या भविष्याच्या दृष्टीने आशेचा किरण आहे. खरं तर ग्रेटाच्या भाषणांचा व कृतीचा संदेशच मुळी तरुणाईने धैर्याने ठोस कृती करण्याचा आहे. शाळेतील अभ्यासाचे कोरडे धडे नव्हे, तर त्यावर हुकूम कृती करणे ही आजची गरज आहे. प्रचलित विदारक वास्तव बदलण्यास कुणीही फार लहान नाही (नो वन इज टू स्माल टू मेक ए डिफरन्स) हा ग्रेटाचा संदेश आहे. त्याचा इत्यर्थ ध्यानी घेऊन कार्बन उत्सर्जन शून्यावर आणणारी जीवनशैली, विकासप्रणाली जाणीवपूर्वक अवलंब करू या.

प्रा. एच. एम. देसरडा : ९४२१८८१६९५ (लेखक राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com