agriculture news in marathi agrowon special article on group farming of tribal farmers from nasik district | Agrowon

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर त्यांनीच शोधली उत्तरे

अश्‍विनी कुलकर्णी
शुक्रवार, 1 जानेवारी 2021

देशभरातील शेतकऱ्यांची एक सामाईक ओळख असली, तरी प्रत्येक ठिकाणच्या शेतकऱ्यांमध्ये खूप भिन्नता आहे. शेतीशी निगडित प्रश्‍नांना अनेक पैलू आहेत. त्या प्रश्‍नांची उकल करताना, उपाय शोधताना ती उत्तरे वैविध्यपूर्ण असणार हे ओघाने आलेच. अशा प्रश्‍नांची व त्यावर आदिवासी शेतकऱ्यांनीच शोधलेल्या उत्तरांची ही कहाणी!
 

भारतातील शेतकऱ्यांचे अनेकविध स्तर आहेत. संगणकाच्या मदतीने काटेकोरपणे शेती करणारे शेतकरी जसे आहेत, तसेच बैलजोडी  वापरणारे   शेतकरीपण आहेत. दर्जेदार द्राक्षे  पिकवून त्याची वाइन करून आंतरराष्ट्रीय बाजारात विकून आत्मविश्‍वासाने व्यवहार करणारे शेतकरी आहेत. तसेच तृणधान्य पिकवत त्याची वर्षानुवर्षे कमी होत जाणारी उत्पादकता अनुभवणारे शेतकरीपण आहेत. आपल्या शेतीत मालक म्हणून वावरणारा आणि आपल्या शेतीत इतर मजुरांसारखे राबणारा शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. आपण आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या, प्रगतिशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा सातत्याने वाचत असतो. पण या यशोगाथा सर्वदूर पटापट पोचल्या आणि त्यातून खूप शेतकऱ्यांना लाभ झाला असे मोठ्या प्रमाणात घडताना दिसत नाही. याचे एक कारण असे दिसते, की देशभरातील शेतकऱ्यांची एक सामाईक ओळख असली,  तरी प्रत्येक ठिकाणच्या शेतकऱ्यांमध्ये खूप भिन्नता आहे. शेतीशी निगडित प्रश्‍नांना अनेक पैलू आहेत. त्या प्रश्‍नांचे उपाय शोधताना ती उत्तरे वैविध्यपूर्ण असणार आहेत.

कोरडवाहू शेतकरी, छोटे व सीमांत शेती असलेले शेतकरी, छोट्या छोट्या तुकड्यात विखुरलेली शेती असलेले शेतकरी, सर्व कुटुंब शेतीत कामाला असतात असे शेतकरी, असा एक मोठा शेतकरी वर्ग आपल्या देशात आहे.  या स्तरातील शेतकरी हे सरकारी योजना, संशोधन आणि गुंतवणूक यांचा फारसा लाभ न मिळालेले आहेत. उदाहरणार्थ तांदूळ, गहू, मका, उस, आंबा, डाळिंब, कांदा, बटाटा या विषयांतील शासनाचे काम आणि नागली किंवा वरई या पिकांना शासनाकडून मिळालेले महत्त्व यांची तुलना करता तफावत स्पष्ट दिसते. या कोरडवाहू, छोट्या शेतकऱ्यांचे अन्नधान्य, डाळी, तेलबिया अशा पिकांच्या उत्पादनातील वाटा मोठा आहे तरीही हे शेतकरी दुर्लक्षित राहिलेले आहेत. या स्तरातील शेतकऱ्यांची उत्पादकता वाढण्यासाठी विविधांगी, छोट्या मोठ्या प्रयत्नांची गरज आहे. बियाणे, लागवडीच्या पद्धती, मातीची सुपीकता अशा तंत्रज्ञानाची गरज आहेच त्याचबराबर शेतीचे यांत्रिकीकरणाची गरज आहे जेणेकरून उत्पादकता वाढेल. शेतीची बाजारातील उपलब्ध असलेली यंत्र आपल्यासारख्या शेतकऱ्यांसाठी नाहीत, हे या शेतकऱ्यांना अनुभवाने माहीत आहे. भारतातील बहुसंख्य शेतकरी असे आहेत. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील जवळ जवळ सर्वच शेतकरी या पद्धतीची शेती पिढ्यान् पिढ्या करीत आहेत. नागली हे त्यांचे प्रमुख पीक. या शेतकऱ्यांबरोबर नागलीच्या  उत्पादकतेत  वाढ करण्यासाठी  काम करत असताना अनेक  समस्या लक्षात आल्या.

नागलीच्या मळणीची पद्धत म्हणजे हाताने झोडपणे किंवा कापलेल्या पिकावरून  ट्रॅक्टर  फिरवणे, या दोन्ही पद्धती अकार्यक्षम आहेत. कारण यात धान्याची नासाडी खूप होते. याचप्रमाणे शेतीतील विविध कामांसाठी बाजारात अवजारे उपलब्ध असली तरी ती या छोट्या कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी ती उपयोगी ठरत नाहीत आणि बहुतेक वेळेला परवडतही नाही. या समस्येवर मात करण्यासाठी  त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एक गट तयार केला. या गटाने अशी अवजारे एकत्रित घेऊन वापरायची ठरवली आहेत. या उपक्रमाचे वैशिष्ट्य असेही आहे, की ही अवजारे एका गटाच्या मालकीचे असणार आहे. या शेतकऱ्यांना यापैकी कोणतेही यंत्र स्वतः विकत घेणे शक्य नाही पण एकत्रित असल्याने हे शक्य आहे. शेतकऱ्यांचा हा गट सामुदायिक पद्धतीने हे सिंगल फेजवर चालणारे  नागली मळणी यंत्र वापरत आहेत. त्याचबरोबर स्प्रे-पंप, सायकल विडर अशी अवजारेही या गटाने पाळीपाळीने वापरलेली आहेत.  ही यंत्रे वापरण्याची गटाची  पद्धत  अशी आहे, की  यंत्राचे  भाडे  शेतकऱ्यांनी गटाला द्यायचे. ज्यामधून त्या वस्तूंची देखरेख व दुरुस्ती खर्च करता येतो. या गटाला शेती अवजारे भाडेतत्त्वावर मिळणारे केंद्र असे स्वरूप दिलेले आहे.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने या शेतकऱ्यांच्या समस्या नेमकेपणाने ओळखल्या आहेत. अशा शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनेक यंत्रे-अवजारे विकसित केली आहेत. या भागात विजेचा प्रश्‍न गंभीर आहे. त्यामुळे बाजारात असलेली थ्री फेजवरील यंत्रे इथे  उपयोगी ठरत नाहीत. त्यात, रोपणी यंत्र, निंदणी यंत्र, काढणी यंत्र, मळणी यंत्र, प्रतवारी यंत्र, पीठ करण्यासाठीचे यंत्र असे प्रकार आहेत. या यंत्रांचे वैशिष्‍ट्य असे, की ही यंत्रे लहान शेतातही वापरता येतात. या यंत्रांमुळे मजुरांची कार्यक्षमता तर वाढतेच, वेळही वाचतो, पिकांचे नुकसान खूप कमी होते म्हणजेच शेतीची उत्पादकताही वाढते. सध्या सिंगल फेजवर चालणारी यंत्रे अधिक उपयोगी आहेत.  या गटाने पुढे जाऊन आता शेतकऱ्यांनी सिंचनाच्या  संदर्भात असा विचार केला आहे  की  खरिपात  पावसाने  दडी  मारली तर पीक वाचविण्याकरिता  सिंचनासाठी एक  मोटार पंप आणि पाइप विकत घेऊन ते आळीपाळीने  भाड्याने वापरायचे ठरविले आहेत.  

आदिवासी भागातून तरी तरुण शेतकरी शेती करताना दिसतात, त्यांना नवीन काही पद्धत समजावून सांगितली तर ते उत्साहाने प्रयत्न  करतात, असा अनुभव आहे. त्यांना नावीन्याची इतकी आस आहे  की वेळप्रसंगी ते आई-वडिलांशी वाद घालून नवीन पद्धतीने शेती करायचे धाडस दाखवतात.  या तरुण आदिवासी शेतकऱ्यांनी हा एक साधा आणि व्यावहारिक मार्ग शोधून पारंपरिक शेतीला चालना देण्याचे कौतुकास्पद काम केले आहे. यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील इतर गावातूनच नाही तर पेठ, सुरगाणा तालुक्यातून अशा प्रकारचे शेतकरी गट तयार होत आहेत.  शेतकरी शब्द उच्चारला, की आपल्या डोळ्यासमोर कधीही  आदिवासी शेतकरी येत नाही. पण हा देखील शेतकरीच आहे, प्रगतीची आस असणारा आणि नवीन प्रयोग करण्याची उमेद बाळगणारा शेतकरीच! 

अश्‍विनी कुलकर्णी
 ९८२३२८१२४६

 

(लेखिका प्रगती अभियानाच्या संचालिका आहेत.)


इतर संपादकीय
अद्ययावत ‘मंडी’चे स्वप्न!दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस...
एकत्र या अन् ठरवा भावसातारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला कोबीला...
शिस्त पाळा लॉकडाउन टाळाराज्यात मागील तीन महिन्यांपासून कोरोना...
५० वर्षांच्या वृक्षाचे पर्यावरणीय मूल्य...साधारणतः आपण कुठल्याही वस्तूचे मूल्यमापन विविध...
चळवळ चॉकीची!मराठवाड्यापाठोपाठ आता विदर्भात देखील रेशीम...
प्रगतिशील शेतीची खरी ‘वाट’कोरडवाहू जमिनी ओलिताखाली यायला लागल्या पासून...
लोककल्याणकारी राजाहिंदवी स्वराज्यांची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या ...
अपेक्षांवर ‘पाणी’शेतकऱ्यांचा शेतीमाल घरात येऊन पडेपर्यंत काही खरे...
सद्‍गुणांचे साक्षात प्रतीक ‘‘छ त्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच...
पशुपक्षी लशीकरणासाठी हवी स्वतंत्र...राज्यात कुठे ना कुठे संसर्गजन्य रोगाचा...
न्याय्य हक्क मिळावाराज्यातील कृषी विद्यापीठांच्या तृतीय व चतुर्थ...
खारपाणपट्ट्याकडे दुर्लक्ष नकोविदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा या तीन...
वसंत पंचमी म्हणजे आनंदोत्सववसंत पंचमी म्हणजे शेतकऱ्यांसाठी आनंद उत्सवाची...
‘कट’ कारस्थान थांबवासध्या राज्यात रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात आहे. गहू...
औषधी वनस्पतींतील मक्तेदारी थांबवाकोरोना काळात आरोग्य विभागाचे (आयुष) महत्त्व...
विदेशी वृक्षाने जैवविविधता धोक्यातआपल्या देशात तसेच राज्यात महामार्गांच्या...
जगातील आनंदमयी स्वर्गाचा निरोप घेताना स्वच्छ हवा, समृद्ध निसर्ग यांचा मुक्त आस्वाद घेत...
झळा वणव्याच्या! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील...
वृक्ष संपन्न देशात विदेशी वृक्ष का?आज आपल्यासमोर सर्वांत गंभीर संकट उभे आहे, ते...
निसर्ग देवतांचा आदर करायला हवाडेहराडूनपासून २९५ किलोमीटर अंतरावर असलेल्या...