खाद्यतेलात स्वावलंबनासाठी मधमाश्या पाळा

भूकमुक्त भारत, कुपोषणमुक्त महाराष्ट्र, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे या अभियानांत ‘परागीभवनासाठी मधमाश्‍या’’ या महत्त्वाच्या निविष्ठेकडे गांभीर्याने लक्ष द्यावयास हवे. सर्व जातीच्या मधमाश्‍या आणि इतर परागसिंचक कीटक यांची संख्या वेगाने वाढविणे यासाठी ठोस कार्यक्रम त्वरित राबविला पाहिजे.
agrowon editorial article
agrowon editorial article

फुलणाऱ्या वनस्पतींमध्ये फुलांतील पूं-बीज (परागकण) आणि स्त्रीबीज यांचे मिलन झाल्यावरच बीजधारणा/फलधारणा होते. या प्रक्रियेस परागसिंचन म्हटले जाते. निसर्गात हे परागीभवन वारा, पाणी, पक्षी, कीटक यांच्या माध्यमातून होत असते. या सर्व माध्यमांमध्ये परागसिंचक कीटक महत्त्वाची भूमिका बजावतात आणि या परागसिंचन प्रक्रियेत मधमाश्‍यांचे ७५ ते ८० टक्के योगदान असते. मधमाश्‍यांव्यतिरिक्त इतर परागसिंचक कीटक (भुंगे, फुलपाखरे, गांधीलमाश्‍या) एकांडे जीवन जगणारे असतात. त्यांच्या एका वसाहतीत २५-५० माश्‍या असतात. या माश्‍यांच्या अळ्यांच्या जरूरीइतकेच खाद्य (पुष्परस आणि पराग) गोळा केले जाते. या कीटकांच्या अंगावर तुरळक केस असतात. काही कीटकांचे अंग केसविरहीत असते. त्यामुळे त्यांची परागवहन क्षमता मर्यादित असते. या कीटकांत सुप्तावस्था असल्याने परागीभवनासाठी वर्षातील काही महिन्यांतच त्या उपलब्ध असतात. मधमाश्‍या मात्र सामूहिक जीवन जगणाऱ्या आहेत. त्यांच्यात उच्च प्रकारचे शारीरिक अवयव आणि वर्तणुकीतील बारकावे उत्क्रांत झाले आहेत. त्यामुळे मधमाश्‍या या कार्यक्षम परागसिंचक समजल्या जातात. 

पाळीव मधमाश्‍यांच्या एका वसाहतीत १५ ते २० हजार, आग्या मधमाश्‍यांच्या वसाहतीत १० ते १५ हजार, फुलोरी आणि घुगुरटी मधमाश्‍यांच्या वसाहतीत ३ ते ५ हजार मधमाश्‍या असतात.

फुलांवरून आपले खाद्य (पुष्परस आणि पराग) गोळा करताना मधमाश्‍यांच्या अंगभर असलेल्या असंख्य केसांत परागकण अडकतात आणि ते सहजच दुसऱ्या फुलांतील मादी अवयवांवर पोचविले जातात. 

एक मधमाशी फुलोऱ्याच्या हंगामात रोज ५०० ते ७०० फुलांवरून आपले खाद्य गोळा करते आणि जवळजवळ तितक्‍याच फुलांमध्ये पर-परागीभवन होऊन फुलांचे रुपांतर जनुकीय विविधता असलेल्या, अधिक पौष्टिक मूल्य असलेल्या, भरपूर बियांत/फळांत होते. 

मधमाश्‍या एकदा एखादे पीक निवडून त्यापासून खाद्य गोळा करू लागल्या, की त्या पिकाचा फुलोरा संपेपर्यंत त्याच पिकावरून एकनिष्टपणे खाद्य गोळा करतात. या त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांमुळे परागीभवन हमखास होते.  पुष्परस आणि पराग जितका मिळेल तितका गोळा करून तो साठविण्याच्या स्वभावामुळे मधमाश्‍या दिवसभर कार्यरत असतात. त्यामुळे परागीभवन खात्रीशीरपणे होते. 

आधुनिक मधमाशीपालनात वसाहतींची विशिष्ट देखभाल करून मधमाश्‍यांची वसाहतीतील संख्या २० ते २५ हजारांपर्यंत वाढविता येते. तसेच एका वसाहतीपासून २-३ वसाहती निर्माण करता येतात. जितकी मधमाश्‍यांची संख्या जास्त, तितके परागीभवन जास्त आणि तितके हेक्‍टरी पीक उत्पादन जास्त.

परागीभवन आणि उत्पादनवाढ  जगभरात घेतल्या जाणाऱ्या अनेक पिकांपैकी ७५ ते ८० टक्के पिके परागीभवनासाठी परागसिंचक कीटकांवर अवलंबून असतात. आणि या परागीभवन प्रक्रियेत मधमाश्‍यांचे ७५ ते ८० टक्के योगदान असते. जागतिक आकडेवारीनुसार जगातील ७२ टक्के खाद्यतेलाचे उत्पादन मधमाश्‍यांमुळे झालेल्या परागीभवनामुळे होते आणि अन्नधान्यांच्या एकूण उत्पादनाच्या एक तृतीअंश उत्पादन मधमाश्‍या आणि इतर परागसिंचक कीटकांमार्फत होणाऱ्या परागीभवनामुळे होते.  ६०-७० वर्षांपूर्वी भारतातील पिकांचे क्षेत्र आणि त्या क्षेत्रातील मधमाश्‍या आणि परागसिंचक कीटक यांची संख्या यामध्ये समतोल निर्माण होऊन त्याचा तालमेळ बसला होता. परंतु प्रदूषण, एक वनस्पती लागवड, बांधांवरील वृक्षांची तोड, खोल नांगरट आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कीटकनाशकांचा स्वैर वापर यामुळे मधमाश्‍या आणि उपयुक्त कीटकांची संख्या घटत आहे. जगातील पर्यावरणतज्ज्ञ इशारा देत आहेत, की अशीच परिस्थिती चालू राहिली तर येत्या एक-दोन दशकांत जागतिक अन्नधान्याचे उत्पादन एक तृतीअंशाने घटेल आणि त्याचे दुष्परिणाम विकसनशील देशांतील ५० टक्के लोकांना भोगावे लागतील. भारतात आत्ताच त्याचा परिणाम दिसू लागला आहे. भारतातील पाच वर्षांच्या आतील ५२ टक्के मुले कुपोषित, कमी वजनाची, लोह कमतरता असलेली आहेत. जागतिक उपासमार निर्देशांकात भारताची घसरण होत आहे. 

दुसरी हरितक्रांती   डाळी आणि खाद्यतेल यांची आयात दरवर्षी वाढत आहे. २०१६ पासून आपण दरवर्षी सुमारे ७५ हजार कोटी रुपयांचे खाद्यतेल आणि २५ हजार कोटी रुपयांच्या डाळी आयात करीत आहोत. खाद्यतेलाच्या आयातींपैकी ७५ टक्के खाद्यतेल (पाम ऑइल) आपण इंडोनेशिया आणि मलेशिया या दोन राष्ट्रांकडून घेतो. या दोन राष्ट्रांचे भारताशी फारसे मैत्रीपूर्ण संबंध नाहीत. (इंडोनेशिया, मलेशिया, पाकिस्तान, तुर्कस्तान यांची जवळीक वाढत चालली आहे.) अशा परिस्थितीत सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या खाद्यतेल आणि डाळी यांत लवकरात लवकर स्वावलंबी होणे अत्यंत गरजेचे आहे. तेलबिया पिके आणि डाळी परागीभवनासाठी परागसिंचक कीटकांवर अवलंबून असतात. शेतातील या पिकांच्या फुलांच्या संख्येनुसार पर्याप्त संख्येने परागसिंचक कीटक/मधमाश्‍या उपलब्ध नसतील तर सर्वच्या सर्व फुलांत परागीभवन न झाल्याने काही फुले बीजधारणेशिवाय सुकून जातात. भारतातील या पिकांचे हेक्‍टरी उत्पादन, जागतिक हेक्‍टरी उत्पादनाच्या केवळ ४० ते ५० टक्केच आहे. परागसिंचक कीटकांची कमतरता आणि त्यामुळे कमी परागीभवन हे कमी उत्पादकतेचे एक महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे तेलबिया आणि डाळींचे उत्पादन वाढवायचे असेल तर मधमाश्यांची संख्या वाढवावीच लागेल. १९८० च्या दशकात दुसऱ्या हरितक्रांतीसाठी तेलबिया मिशन, डाळी मिशन इ. प्रकल्प सुरू झाले. या प्रकल्पांवर आजवर लाखो कोटी रुपये खर्च झाले आहेत. परंतु खाद्यतेल आणि डाळी यांचे हेक्‍टरी उत्पादन वाढत नाही आणि आयात वाढत्या प्रमाणात होत आहे. 

सारांश ः  भूकमुक्त भारत, कुपोषणमुक्त महाराष्ट्र, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे या अभियानांत ‘परागीभवनासाठी मधमाश्‍या’’ या महत्त्वाच्या निविष्ठेकडे गांभीर्याने लक्ष द्यावयास हवे. सर्व जातीच्या मधमाश्‍या आणि इतर परागसिंचक कीटक यांची संख्या वेगाने वाढविण्यासाठी ठोस कार्यक्रम राबविला पाहिजे. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, कृषी-वन- जलसिंचन विभाग, कृषी विद्यापीठे आणि कृषी विज्ञान केंद्रे यांच्या प्रयत्नांतूनच या व्यवसायाची वेगाने वाढ होईल आणि दुसरी हरितक्रांती साध्य होईल.  

डॉ. र. पु. फडके  : ९८८११२१०८८ (लेखक केंद्रीय मधुमक्षिका संशोधन संस्थेचे निवृत्त संचालक आहेत.) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com