agriculture news in marathi agrowon special article on honey bees for yield increase | Agrowon

उत्पादन आणि पोषणमूल्य वृद्धीसाठी मधमाश्या पाळा

डॉ. र. पु. फडके
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

जर्मन आणि अमेरिकन विद्यापीठांनी संयुक्तपणे राबविलेल्या प्रकल्पाच्या अहवालानुसार मधमाश्‍यांमुळे पिकांच्या हेक्‍टरी उत्पादनात वाढ तर होतेच, त्याचबरोबर पौष्टिक मूल्यातही वाढ होते. तेलबियांमध्ये तेलाचा उतारा जास्त मिळतो. आणि तेलात जीवनसत्त्वेही अधिक प्रमाणात असतात. फळांमध्ये गळ कमी, आकार मोठा आणि 
वजन जास्त मिळते

डॉ. नॉर्मन बोरलॉग आणि डॉ. स्वामिनाथन यांच्या प्रयत्नांमुळे १९८० च्या सुमारास तृणधान्यांचे हेक्‍टरी उत्पादनात भरघोस वाढ होऊन पहिली हरित क्रांती झाली. तृणधान्येही स्वपरागफलित सफल किंवा वाऱ्यामार्फत परपरागसिंचित सफल असल्याने पहिली हरितक्रांती लवकर यशस्वी झाली. तेलबियांच्या उत्पादनात मात्र हेक्‍टरी वाढ होत नसल्याने केंद्र शासनाने १९८५ मध्ये ‘तेलबिया मिशन’ सुरू केले. गेली ३५ वर्षे हे मिशन चालू आहे. परंतु तेलबियांचे हेक्‍टरी उत्पादन स्थिर आहे. किंवा काही पिकांमध्ये घटत आहे.आणि गेली ३० वर्षे खाद्यतेलाची आयात करावी लागत आहे. २०१६ पासून दरवर्षी सुमारे ७० हजार कोटी रुपयांची खाद्यतेलाची आयात आपण करीत आहोत. जे तंत्रज्ञान वापरून तृणधान्यांच्या बाबतीत पहिली हरितक्रांती झाली तेच तंत्रज्ञान तेलबियांच्या बाबतीत वापरून हेक्‍टरी उत्पादनात वाढ का होत नाही, या संदर्भात खालील गोष्टींची आठवण झाली. 

तेलबियांचे हेक्‍टरी उत्पादन वाढावे म्हणून १९८५ च्या सुमारास रशियाने भारतास सुधारित वाणाचे सूर्यफुलांचे बियाणे देऊ केले. रोगप्रतिबंधक, पाण्याचा ताण सहन करणारे, वर्षात कधीही घेता येण्यासारखे इत्यादी गुणांबरोबर या बियाण्यांपासून हेक्‍टरी १००० कि.ग्रॅ. पर्यंत उत्पादन मिळते असे सांगण्यात आले होते. या बियाण्यांची कृषी खात्यातर्फे भारतभर अनेक ठिकाणी पेरणी करण्यात आली होती. परंतु हेक्‍टरी उत्पादन केवळ २५० ते ३०० कि.ग्रॅ. एवढेच मिळाले. यासंबंधी रशियन शास्त्रज्ञ पाहणी करण्यास भारतात आले. त्यांनी सूर्यफुलांचे फुललेले प्लॉट पाहून मधमाश्‍यांच्या वसाहतींची विचारणा केली. प्लॉटमध्ये मधमाश्‍यांच्या वसाहती ठेवलेल्या नव्हत्या. सूर्यफूल हे स्वपरागसिंचित अफळ असून, परपराग सिंचनासाठी परागसिंचक कीटकांवर - मधमाश्‍यांवर अवलंबून असते, असे सांगून सूर्यफूल फुलोऱ्याच्या काळात शेतांमध्ये मधमाश्‍यांच्या वसाहती ठेवण्याचा सल्ला रशियन शास्त्रज्ञांनी दिला. 

यावर इंडियन कौन्सिल ऑफ अॅग्रीकल्चर रिसर्च (आयसीएआर) या संस्थेने सेंट्रल बी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (सीबीआरटीआय) पुणे या संस्थेकडे याबाबत प्रयोग करण्याची विचारणा केली आणि सीबीआरटीआय ला सूर्यफुलांचे बियाणे पुरविले. सीबीआरटीआय ने अहमदनगर, पुणे आणि सांगली या जिल्ह्यांतील पाच ठिकाणी या बियाण्यांची पेरणी केली. यात राहुरी कृषी विद्यापीठ आणि तालुका सीड फार्म, आष्टा जि. सांगली यांचाही समावेश होता. सूर्यफूल फुलोऱ्याच्या काळात दर हेक्‍टरी मधमाश्‍यांच्या पाच पेट्या ठेवल्या होत्या. मधमाश्‍या दिवसभर सूर्यफुलांवरून त्यांचे खाद्य गोळा करीत होत्या आणि त्यांच्यामार्फत परपरागीभवन होत होते. काढणीनंतर बियांचे सरासरी हेक्‍टरी उत्पादन ७५० कि.ग्रॅ. इतके मिळाले. उत्तम बियाणे, जलसिंचन, खते आणि पीक संरक्षण या चार पारंपरिक निविष्ठा वापरून परपरागसिंचित सफल पिके जेव्हा फुलांत येतात, तेव्हा परपरागसिंचनासाठी मधमाश्‍या या पाचव्या आणि महत्त्वाच्या निविष्ठेस पर्याय नाही. 

काही पिके (उदा. सोयाबीन, लिंबूवर्गीय फळे, तूर इत्यादी) स्वपरागसिंचित सफल असतात. त्यांच्यातील बीज/फल धारणेसाठी परागसिंचन कीटकांची, मधमाश्‍यांची गरज नसते. परंतु, अशा पिकांमध्येही फुलोऱ्याच्या काळात शेतात मधमाश्‍यांच्या वसाहती ठेवल्यास हेक्‍टरी उत्पादनात २० ते ३० टक्के वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. सोयाबीनच्या फुलोऱ्याच्या काळात शेतात मधमाश्‍यांच्या वसाहती ठेवल्या तर मधमाश्‍याविरहित प्लॉटमधील हेक्‍टरी उत्पादनापेक्षा २० ते ६० टक्के अधिक उत्पादन मिळत असल्याचे ब्राझीलमधील कृषिशास्त्रज्ञांचे संशोधन लेख आहेत. शेंगदाणा वगळता बाकी सर्व तेलबिया पिकांमध्ये मधमाश्‍यांतर्फे परागसिंचन गरजेचे असते. तसेच डाळी, फळे, फळभाज्या, चारा पिके, मसाल्याची पिके यामध्येही मधमाश्‍यांमुळे हेक्‍टरी उत्पादनात वाढ होते. जर्मन आणि अमेरिकन विद्यापीठाने संयुक्तपणे राबविलेल्या प्रकल्पाच्या अहवालानुसार मधमाश्‍यांमुळे पिकांच्या हेक्‍टरी उत्पादनात वाढ तर होतेच, त्याचबरोबर पिकांच्या पौष्टिक मूल्यातही वाढ होते. तेलबियांमध्ये तेलाचा उतारा जास्त मिळतो आणि तेलात जीवनसत्त्वेही अधिक प्रमाणात असतात. फळांमध्ये गळ कमी, आकार मोठा आणि वजन जास्त मिळते. 

आयसीएआरचे महासंचालकांनी एका बीजभाषणात परागसिंचनासाठी मधमाश्‍यांवर अवलंबून असणाऱ्या भारतातील १२ महत्त्वाच्या पिकांचे संपूर्ण परागसिंचन करण्यासाठी ७० लाख मधमाश्‍यांच्या वसाहतींची गरज असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात भारतात २० ते २५ लाख मधमाश्‍यांच्या वसाहती असल्याचा अंदाज आहे. याच पिकांसाठी महाराष्ट्राची गरज कमीत कमी दोन लाख वसाहतींची आहे. प्रत्यक्षात महाराष्ट्रात १५ ते २० हजार मधमाश्‍यांच्या वसाहती आहेत. चीनने गेल्या पाच दशकांत मधमाश्‍यांच्या वसाहतींची संख्या एक कोटीपर्यंत वाढविली आहे. ही संख्या तीन कोटींपर्यंत वाढविण्याच्या योजना चीनने कार्यान्वित केल्या आहेत. आज जगात चीन मध उत्पादन आणि निर्यात यात अव्वल स्थानावर आहे. चीनमधील अनेक पिकांचे हेक्‍टरी उत्पादन भारतातील हेक्‍टरी उत्पादनाच्या दुप्पट आहे. इस्राईलसारखा महाराष्ट्राच्या एक-दोन जिल्ह्याएवढा भूभाग असलेला वाळवंटी देश एक लाख मधमाश्‍यांच्या वसाहती पाळून दरवर्षी ३० ते ३५ लाख किलोग्रॅम मधाचे उत्पादन घेतो आणि सर्व वसाहती परागसिंचनासाठी वापरून अन्नधान्ये उत्पादनात स्वावलंबी झाला आहे. 

वाढती लोकसंख्या, अनेक विकास योजनांमुळे आक्रसणारे कृषिक्षेत्र आणि अनेक पिकांच्या हेक्‍टरी उत्पादनात स्थिरता किंवा घट ही चिंतेची बाब आहे. जलदगतीने मधमाश्‍यांच्या वसाहतींची संख्या वाढविणे आणि मधोत्पादनाशिवाय सर्व वसाहतींचा परागसिंचनासाठी उपयोग करून घेणे हे पीक उत्पादनवाढीसाठी, सर्व अन्नधान्यांचे उत्पादनात स्वावलंबी होण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या अभियानासाठी अनिवार्य आहे. याबाबतचा स्वखर्चाने १०० पानांचा मधमाश्‍यापालन व्यवसाय व वृद्धीसाठीचा कृती कार्यक्रमसहितचा अहवाल मी तयार करून महाराष्ट्र शासनास १५ ऑगस्ट २०१८ रोजी पाठविला आहे.
 

डॉ. र. पु. फडके : ९८८११२१०८८ 
(लेखक केंद्रीय मधुमक्षिका संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे निवृत्त संचालक आहेत.)



इतर अॅग्रो विशेष
स्पेनच्या राजकन्येचा कोरोनामुळे मृत्यू...माद्रीद : स्पेनच्या राजकन्या मारीया टेरेसा यांचा...
राज्यात १२ नवे कोरोना रुग्ण, बाधितांची...मुंबई: राज्यात १२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...
पुण्यात पोलिस बंदोबस्तात बाजार समिती...पुणे : कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन असतानाही...
पुणे बाजार समिती आजपासून सुरु; मात्र...पुणे : कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या...
देशातील वस्त्रोद्योगाला दोन लाख कोटींचा...जळगाव ः देशात शेतीनंतर रोजगाराचा व आर्थिक...
राज्यातील कोरोना रुग्णाची संख्या १८१;...मुंबई : राज्यात शनिवारी (ता.२९) आणखी २८ कोरोना...
फळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी राज्यभर...पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना फळे व...
नगर जिल्हा बॅंकेने दिले कर्जवसुलीचे...नगर ः कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी करण्यासाठी...
नगर, पुणे, सोलापूरात हजारवर वाहतूक...पुणे ः शहरांमध्ये भाजीपाला, फळे, दुध अशा...
राज्यात पुर्वमोसमी पावसाचा आजही अंदाज पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुर्वमोसमी...
वसंतदादा कारखान्याकडून सॅनिटायझरची...सांगली  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
जागतिक अर्थव्यवस्था भीषण मंदीच्या...वॉशिंग्टनः कोरोना महामारीमुळे जागतिक...
साखर उद्योगासमोर कच्च्या मालाची समस्या पुणे: देशातील साखर कारखान्यांकडे कच्चा माल नेणारी...
सॅनिटायझर्ससाठी ४५ साखर कारखाने,...कोल्हापूर: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने...
वाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे ...अमरावती  ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या...
राज्यातील कोरोना बाधितांची संख्या १५९ वरमुंबई: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची...
देशातील कोरोनाबाधीतांची संख्या ८७३ वरनवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीतांची संख्या...
भाजीपाला विक्रीसाठी पुणे जिल्ह्यात...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहरातील...
राज्यात १४७ कोरोनाबाधित रुग्ण मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत...
मासे, मत्स्यबीज, मत्स्यखाद्याच्या...मुंबई : केंद्र सरकारच्या मत्स्यपालन विभागाने मासे...