agriculture news in marathi agrowon special article on honey bees for yield increase | Page 2 ||| Agrowon

उत्पादन आणि पोषणमूल्य वृद्धीसाठी मधमाश्या पाळा

डॉ. र. पु. फडके
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

जर्मन आणि अमेरिकन विद्यापीठांनी संयुक्तपणे राबविलेल्या प्रकल्पाच्या अहवालानुसार मधमाश्‍यांमुळे पिकांच्या हेक्‍टरी उत्पादनात वाढ तर होतेच, त्याचबरोबर पौष्टिक मूल्यातही वाढ होते. तेलबियांमध्ये तेलाचा उतारा जास्त मिळतो. आणि तेलात जीवनसत्त्वेही अधिक प्रमाणात असतात. फळांमध्ये गळ कमी, आकार मोठा आणि 
वजन जास्त मिळते

डॉ. नॉर्मन बोरलॉग आणि डॉ. स्वामिनाथन यांच्या प्रयत्नांमुळे १९८० च्या सुमारास तृणधान्यांचे हेक्‍टरी उत्पादनात भरघोस वाढ होऊन पहिली हरित क्रांती झाली. तृणधान्येही स्वपरागफलित सफल किंवा वाऱ्यामार्फत परपरागसिंचित सफल असल्याने पहिली हरितक्रांती लवकर यशस्वी झाली. तेलबियांच्या उत्पादनात मात्र हेक्‍टरी वाढ होत नसल्याने केंद्र शासनाने १९८५ मध्ये ‘तेलबिया मिशन’ सुरू केले. गेली ३५ वर्षे हे मिशन चालू आहे. परंतु तेलबियांचे हेक्‍टरी उत्पादन स्थिर आहे. किंवा काही पिकांमध्ये घटत आहे.आणि गेली ३० वर्षे खाद्यतेलाची आयात करावी लागत आहे. २०१६ पासून दरवर्षी सुमारे ७० हजार कोटी रुपयांची खाद्यतेलाची आयात आपण करीत आहोत. जे तंत्रज्ञान वापरून तृणधान्यांच्या बाबतीत पहिली हरितक्रांती झाली तेच तंत्रज्ञान तेलबियांच्या बाबतीत वापरून हेक्‍टरी उत्पादनात वाढ का होत नाही, या संदर्भात खालील गोष्टींची आठवण झाली. 

तेलबियांचे हेक्‍टरी उत्पादन वाढावे म्हणून १९८५ च्या सुमारास रशियाने भारतास सुधारित वाणाचे सूर्यफुलांचे बियाणे देऊ केले. रोगप्रतिबंधक, पाण्याचा ताण सहन करणारे, वर्षात कधीही घेता येण्यासारखे इत्यादी गुणांबरोबर या बियाण्यांपासून हेक्‍टरी १००० कि.ग्रॅ. पर्यंत उत्पादन मिळते असे सांगण्यात आले होते. या बियाण्यांची कृषी खात्यातर्फे भारतभर अनेक ठिकाणी पेरणी करण्यात आली होती. परंतु हेक्‍टरी उत्पादन केवळ २५० ते ३०० कि.ग्रॅ. एवढेच मिळाले. यासंबंधी रशियन शास्त्रज्ञ पाहणी करण्यास भारतात आले. त्यांनी सूर्यफुलांचे फुललेले प्लॉट पाहून मधमाश्‍यांच्या वसाहतींची विचारणा केली. प्लॉटमध्ये मधमाश्‍यांच्या वसाहती ठेवलेल्या नव्हत्या. सूर्यफूल हे स्वपरागसिंचित अफळ असून, परपराग सिंचनासाठी परागसिंचक कीटकांवर - मधमाश्‍यांवर अवलंबून असते, असे सांगून सूर्यफूल फुलोऱ्याच्या काळात शेतांमध्ये मधमाश्‍यांच्या वसाहती ठेवण्याचा सल्ला रशियन शास्त्रज्ञांनी दिला. 

यावर इंडियन कौन्सिल ऑफ अॅग्रीकल्चर रिसर्च (आयसीएआर) या संस्थेने सेंट्रल बी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (सीबीआरटीआय) पुणे या संस्थेकडे याबाबत प्रयोग करण्याची विचारणा केली आणि सीबीआरटीआय ला सूर्यफुलांचे बियाणे पुरविले. सीबीआरटीआय ने अहमदनगर, पुणे आणि सांगली या जिल्ह्यांतील पाच ठिकाणी या बियाण्यांची पेरणी केली. यात राहुरी कृषी विद्यापीठ आणि तालुका सीड फार्म, आष्टा जि. सांगली यांचाही समावेश होता. सूर्यफूल फुलोऱ्याच्या काळात दर हेक्‍टरी मधमाश्‍यांच्या पाच पेट्या ठेवल्या होत्या. मधमाश्‍या दिवसभर सूर्यफुलांवरून त्यांचे खाद्य गोळा करीत होत्या आणि त्यांच्यामार्फत परपरागीभवन होत होते. काढणीनंतर बियांचे सरासरी हेक्‍टरी उत्पादन ७५० कि.ग्रॅ. इतके मिळाले. उत्तम बियाणे, जलसिंचन, खते आणि पीक संरक्षण या चार पारंपरिक निविष्ठा वापरून परपरागसिंचित सफल पिके जेव्हा फुलांत येतात, तेव्हा परपरागसिंचनासाठी मधमाश्‍या या पाचव्या आणि महत्त्वाच्या निविष्ठेस पर्याय नाही. 

काही पिके (उदा. सोयाबीन, लिंबूवर्गीय फळे, तूर इत्यादी) स्वपरागसिंचित सफल असतात. त्यांच्यातील बीज/फल धारणेसाठी परागसिंचन कीटकांची, मधमाश्‍यांची गरज नसते. परंतु, अशा पिकांमध्येही फुलोऱ्याच्या काळात शेतात मधमाश्‍यांच्या वसाहती ठेवल्यास हेक्‍टरी उत्पादनात २० ते ३० टक्के वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. सोयाबीनच्या फुलोऱ्याच्या काळात शेतात मधमाश्‍यांच्या वसाहती ठेवल्या तर मधमाश्‍याविरहित प्लॉटमधील हेक्‍टरी उत्पादनापेक्षा २० ते ६० टक्के अधिक उत्पादन मिळत असल्याचे ब्राझीलमधील कृषिशास्त्रज्ञांचे संशोधन लेख आहेत. शेंगदाणा वगळता बाकी सर्व तेलबिया पिकांमध्ये मधमाश्‍यांतर्फे परागसिंचन गरजेचे असते. तसेच डाळी, फळे, फळभाज्या, चारा पिके, मसाल्याची पिके यामध्येही मधमाश्‍यांमुळे हेक्‍टरी उत्पादनात वाढ होते. जर्मन आणि अमेरिकन विद्यापीठाने संयुक्तपणे राबविलेल्या प्रकल्पाच्या अहवालानुसार मधमाश्‍यांमुळे पिकांच्या हेक्‍टरी उत्पादनात वाढ तर होतेच, त्याचबरोबर पिकांच्या पौष्टिक मूल्यातही वाढ होते. तेलबियांमध्ये तेलाचा उतारा जास्त मिळतो आणि तेलात जीवनसत्त्वेही अधिक प्रमाणात असतात. फळांमध्ये गळ कमी, आकार मोठा आणि वजन जास्त मिळते. 

आयसीएआरचे महासंचालकांनी एका बीजभाषणात परागसिंचनासाठी मधमाश्‍यांवर अवलंबून असणाऱ्या भारतातील १२ महत्त्वाच्या पिकांचे संपूर्ण परागसिंचन करण्यासाठी ७० लाख मधमाश्‍यांच्या वसाहतींची गरज असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात भारतात २० ते २५ लाख मधमाश्‍यांच्या वसाहती असल्याचा अंदाज आहे. याच पिकांसाठी महाराष्ट्राची गरज कमीत कमी दोन लाख वसाहतींची आहे. प्रत्यक्षात महाराष्ट्रात १५ ते २० हजार मधमाश्‍यांच्या वसाहती आहेत. चीनने गेल्या पाच दशकांत मधमाश्‍यांच्या वसाहतींची संख्या एक कोटीपर्यंत वाढविली आहे. ही संख्या तीन कोटींपर्यंत वाढविण्याच्या योजना चीनने कार्यान्वित केल्या आहेत. आज जगात चीन मध उत्पादन आणि निर्यात यात अव्वल स्थानावर आहे. चीनमधील अनेक पिकांचे हेक्‍टरी उत्पादन भारतातील हेक्‍टरी उत्पादनाच्या दुप्पट आहे. इस्राईलसारखा महाराष्ट्राच्या एक-दोन जिल्ह्याएवढा भूभाग असलेला वाळवंटी देश एक लाख मधमाश्‍यांच्या वसाहती पाळून दरवर्षी ३० ते ३५ लाख किलोग्रॅम मधाचे उत्पादन घेतो आणि सर्व वसाहती परागसिंचनासाठी वापरून अन्नधान्ये उत्पादनात स्वावलंबी झाला आहे. 

वाढती लोकसंख्या, अनेक विकास योजनांमुळे आक्रसणारे कृषिक्षेत्र आणि अनेक पिकांच्या हेक्‍टरी उत्पादनात स्थिरता किंवा घट ही चिंतेची बाब आहे. जलदगतीने मधमाश्‍यांच्या वसाहतींची संख्या वाढविणे आणि मधोत्पादनाशिवाय सर्व वसाहतींचा परागसिंचनासाठी उपयोग करून घेणे हे पीक उत्पादनवाढीसाठी, सर्व अन्नधान्यांचे उत्पादनात स्वावलंबी होण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या अभियानासाठी अनिवार्य आहे. याबाबतचा स्वखर्चाने १०० पानांचा मधमाश्‍यापालन व्यवसाय व वृद्धीसाठीचा कृती कार्यक्रमसहितचा अहवाल मी तयार करून महाराष्ट्र शासनास १५ ऑगस्ट २०१८ रोजी पाठविला आहे.
 

डॉ. र. पु. फडके : ९८८११२१०८८ 
(लेखक केंद्रीय मधुमक्षिका संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे निवृत्त संचालक आहेत.)



इतर संपादकीय
ऊर्ध्व शेतीचे प्रयोग वाढले पाहिजेतएकविसाव्या शतकाच्या आरंभापासूनच शेती व्यवहार...
कापूस विकासाची खीळ काढावाढलेला उत्पादन खर्च आणि कमी दरामुळे मागील अनेक...
दिलासादायक नवनीत   दूध दर पडले, यावर आंदोलन भडकले की...
कोरोना नंतरचे शेळी-मेंढी-कुक्कुटपालन  फक्त कोरोना विषाणूलाच आपल्या स्वतःमध्ये बदल...
इथेनॉल उद्दिष्टपूर्तीसाठी...  पुढील वर्षातील संभाव्य साखर उत्पादन पाहता...
इंधनाच्या भडक्यात  होरपळतोय शेतकरी राज्यात डिझेलचे दर प्रतिलिटर ८० तर पेट्रोलचे दर...
कोरोना नंतरचा दुग्धव्यवसाय कोरोना विषाणूने जगाचे रूप पालटून टाकले आहे, अशा...
दरवाढाचा फायदा साठेबाजांनाच!  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या...
लॉकडाउनचा निर्णय विचारपूर्वकच हवा लॉकडाउन शिथील केल्यानंतर गेल्या काही दिवसांत वाढत...
विक्री साखळी सक्षमीकरणाची सुवर्णसंधी शेतमालाचे उत्पादन घेणे हे काम फारच खर्चिक आणि...
कृषी व्यवसायासाठी 'स्मार्ट' संजीवनी  या पुढे वैयक्तिक शेती उत्पादने ही कालबाह्य...
उथळ निर्णय की सखोल अभ्यासकेंद्र सरकारने ग्लायफोसेटचा वापर देशभर केवळ कीड...
लसीला लागण राजकारणाची ?‘कोरोना’ग्रस्ततेत अमेरिकेचा प्रथम क्रमांक आहे....
गरज सरो, वैद्य मरोअतिक्रमण निर्मूलनाचा मुद्दा उपस्थित करत पुणे...
रुतलेले अर्थचक्राने विकासालाही ‘ब्रेक’''मूडी'' या पतमानांकन संस्थेने अलीकडेच आपला अहवाल...
अजून एक `लातूर पॅटर्न’कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर एप्रिल, मे, जून...
सत्त्वयुक्त उत्पादनांची हवी कृषी...माणसाच्या उपभोगासाठी उपयुक्त असलेली जैवविविधता...
‘सरफेसी' कायदा आहे तरी काय? दिवसेंदिवस बॅंकांच्या थकीत रकमेत वाढ दिसून येत...
लष्करी’ हल्लाखरीप हंगामाच्या सुरवातीलाच राज्यात मका पिकावर...
वाद-प्रतिवादांचा खेळ अन् हतबल शेतकरीनिकृष्ट बियाण्यांमुळे सोयाबीन न उगवल्याच्या...