agriculture news in marathi agrowon special article on increasing natural calamities in Maharashtra | Agrowon

वाढत्या नैसर्गिक आपत्ती गांभीर्याने घ्या

रमेश चिल्ले
शनिवार, 28 ऑगस्ट 2021

राज्यातील जनतेला बहुविध आपत्तीची भेट देणाऱ्या धोरणकर्त्यांनी ‘वाढत्या नैसर्गिक आपत्तींचे गांभीर्य’ ओळखून जोखीम निवारण्यासाठी एकत्र येण्याचा विवेक दाखवावा, अशी जनतेची अपेक्षा आहे. 

पर्यावरणाच्या कडेलोटाच्या कुंठितावस्थेचं वर्णन ‘फेड्रीक नित्शे’ या पर्यावरण तज्ज्ञाने केवळ चारच शब्दांत केले ते असे, ‘‘परमेश्‍वराचा मृत्यू झाला आहे.’’ नित्शे यांनी परमेश्‍वर नसलेल्या जगाची जबाबदारी आता आपल्यावर येऊन ठेपली आहे, याची खरे तर जाणीव करून दिली आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर व रायगड या जिल्ह्यांत पाऊस संपूर्ण हंगामात सातत्याने न पडता; एखाद्या आठवड्यात ठरावीक कालावधीतच कोसळतो. त्यामुळे हंगामाअखेरीस पावसाची सरासरी नेहमीच्या वर्षाएवढी दिसत असली तरी पारंपरिक पावसापेक्षा अशा तडाखेबंद पावसाने केलेला विध्वंस कितीतरी पटीने अधिकचा दिसून येतो. अशा सध्याच्या हवामान बदलाची नानाविध रूपे अवघ्या जगभरात दिसत आहेत. भारतातील बहुतेक शहरात ४०, ४१, ४५ अंश सेल्सिअस अशी तापमाने वर्षभरातून काही दिवस जरूर अनुभवायला येतात. पण गेल्या दोन-तीन महिन्यांत संपूर्ण जगाला चक्रीवादळे, अरण्यकांड, उष्णतेच्या लाटा, अवर्षण, अतिवृष्टी, ढगफुटी, भूस्खलन अशा अनेक आपत्तीचे यातनाकांड निष्पाप जिवांना सहन करावे लागलेले आहे. २९ जून २०२१ रोजी उत्तर ध्रुवाजवळील कॅनडाला उष्णतेच्या लाटांनी हैराण केले. शीतकटिबंधीय कॅनडाचे तापमान ४९.६० सेल्सिअस, तर पाकिस्तानच्या जाकोदाबादमध्ये ते ५२ सेल्सिअसपर्यंत गेले. पुढे पाचच दिवसांत अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात पृथ्वीतलावरील सर्वोत्तम तापमानाचा विक्रम करीत पारा ५४.६० सेल्सिअसपर्यंत वर चढला.

जगातील जवळपास शंभर शास्त्रज्ञांनी फार मोलाचं संशोधन केलंय. पृथ्वीचं तापमान वाढण्याचा आणि त्याचा मानव जातीवर होणाऱ्या परिणामाचा लेखाजोखा अख्ख्या जगासमोर मांडला. आसपासच्या वातावरणात सोडलेल्या प्रचंड प्रमाणातील कार्बन डायऑक्साइड व मिथेन या वायूमुळे पृथ्वीचे तापमान सतत वाढत आहे. औद्योगिकीकरणाच्या वाढीमुळे व अनियमिततेने कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले आणि ते वार्षिक ०.४ टक्क्याने वाढत आहे. या बदलाचा फटका भारत, बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंकासारख्या अनेक दक्षिण आशियाई देशांना बसला असून, त्याचा परिणाम भोगावा लागतोय. ही विषुववृत्तीय राष्ट्रे जगात सर्वांत जास्त जैवविविधता धारण करून आहेत; तर याच देशात जास्त गरिबीही आहे हे विशेष! कार्बन डायऑक्साइड व तापमानवाढीचा काय संबंध असावा? तर सूर्यापासून प्रकाश किरणे पृथ्वीवर येतात आणि पृथ्वीला उष्णता प्रदान करतात. परंतु आलेली सर्वच सूर्यकिरणे पृथ्वीवर येत नाहीत, त्यांचा बराचसा भाग पृथ्वीच्या पृष्ठभागावरून परावर्तित होऊन परत अवकाशात जातो आणि पृथ्वीचे सरासरी तापमान पूर्वपदावर राखले जाते. परंतु कार्बन डायऑक्साइड पृथ्वीच्या वातावरणात पसरून राहिल्याने परत जाणाऱ्या प्रकाशकिरणांना ते शोषून घेतो आणि उष्ण किरणांच्या स्वरूपात परत पृथ्वीकडे परावर्तित करतो. परिणामतः पृथ्वीचे तापमान वाढते. त्यामुळे मॉन्सूनचे चक्र बिघडते, असे त्या क्षेत्रातील अभ्यासक मानतात. त्याची अनुभूती मागील काही वर्षांपासून येत आहे. 

पुणे येथील आयआयटीएम या हवामानविषयक संस्थेने यावर सायन्स जर्नलमध्ये एक शोध निबंध प्रकाशित केला होता. गेल्या ५० वर्षांत अतिवृष्टीचे प्रमाण १० टक्क्यांनी वाढले असल्याचा निष्कर्ष काढला. मॉन्सूनचे चक्र हे समुद्राच्या पृष्ठभागाच्या पाण्याच्या तापमानावर अवलंबून असते. गेल्या १०४ वर्षांतील उपलब्ध आकडेवारीनुसार समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सतत वाढत गेल्याचे दिसते, आणि त्याचवेळी अतिवृष्टीचेही प्रमाण वाढलेले दिसते. समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढत चालल्याने बाष्पीभवनाचा वेगही वाढलेला आहे. त्यामुळे तयार झालेली प्रचंड वाफ तापमान कमी होताच पाऊस बनून एकाच ठिकाणी कोसळते. त्यामुळे काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होते. चालू हंगामात भारतात बिहार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, ओडिशा व महाराष्ट्र अशा अनेक ठिकाणी तासाभरात कुठे १२५ मिमी, तर कुठे २४ तासांत ८९० मिमी विक्रमी पावसाने पुराच्या माध्यमातून हाहाकार माजवला. राज्यात जुलै २०२१ मध्ये २१ ते २४ जुलैला तीन-चार दिवसांत १०२ ठिकाणी ढगफुटी झाली. महापूर, भूस्खलनात ८७५ गावांची मोठी हानी झाली, तर २०० च्या वर जणांचे निष्पाप बळी गेले. सुमारे ३५०० जनावरे मृत्युमुखी पडली. दक्षिण महाराष्ट्रातील २४ पेक्षा अधिक नद्यांना महापूर आला. सुमारे अडीच लाख लोकांना महापुराचा फटका बसला. कित्येक गावं, शहरं, कोकणातील चिपळूण, महाडसारखी पाण्याखाली गेली. लाखो जणांची दैना उडाली व कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याने पुन्हा सर्वसामान्यांचेच हाल झालेले. या सर्व दुर्घटना आपल्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापनाबाबत अनेक प्रश्‍न उपस्थित करतात. त्याबाबत गांभीर्याने घेतले जात नाही हे दुर्दैव. 

कोल्हापूर, सांगलीला पंचगंगा, वारणा व कृष्णेचे पूर हे नित्याचेच झालेले. चिपळूण, महाड व समुद्रसपाटीजवळच्या कोकणातील तालुक्यांत अशी पूरपरिस्थिती ही वारंवार होणार. माळीणनंतर तळिये व इतर डोंगर उतारांवरील वाड्या, वस्त्यांतही अशी परिस्थिती घडणार. येथून पुढील काळात कुणीही कुठेही असे बेसावध राहणे धोक्याचे आहे. ही सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे हे समजून घ्यावे लागेल व त्या दृष्टीने सतर्क राहावे लागेल. यानंतर पुन्हा कधीही असा पूर येणार नाही असा निर्धार करून तो अमलात आणण्यासाठी आपल्यासह शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेऊन सहभागी व्हावे लागेल. इतरांना सजग करावे लागेल. पर्यावरण व आपत्ती साक्षरता थेट बालकांपर्यंत रुजवावी लागेल तरच असे निसर्गाचे अनर्थ पुढच्या काळात टळतील. सभोवतालच्या डोंगराकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल. बेसुमार वृक्षतोड झाल्याने बहुतांश ठिकाणी महापूर येत आहेत. जंगलाचा विनाश झाला की माती वाहून थेट नद्या, खाडीत जाऊन त्या गाळाने भरतात व पुन्हा नदीकाठच्या लोकांना, गावांना उथळ नद्यांमुळे नुकसानीला सामोरे जावे लागते. ‘

जंगले वाचवा - माती वाचवा - महापूर टाळा’ ही मोहीम गावागावात राबवावी लागेल. राज्यातील जनतेला बहुविध आपत्तीची भेट देणाऱ्या धोरणकर्त्यांनी ‘आपत्तींचे गांभीर्य’ ओळखून जोखीम निवारण्यासाठी एकत्र येण्याचा विवेक दाखवावा अशी जनतेची अपेक्षा आहे. अतिवृष्टी संकटाला सामोरे जाण्यासाठी प्रत्येक गावात पर्जन्यमापके बसवणे, पूररेषेची निश्‍चिती करणे, त्यातील बांधकामे काढणे, नवीन होऊ न देणे, आपत्ती प्रवण प्रदेशाचे नकाशे तयार करणे, प्रत्येक तालुक्यात डॉप्लर रडार तातडीने बसवून कार्यान्वित करणे, प्रत्येक नागरिकांना मोबाईलवर अंदाज नव्हे अक्षांश-रेखांश स्थानाच्या संदर्भानुसार अचूक पद्धतीने पूर्वसूचना देणे या गोष्टी कराव्या लागतील.

रमेश चिल्ले  ७५०७५५०१०२

(लेखक शेती व पर्यावरणाचे 
अभ्यासक आहेत.)


इतर संपादकीय
या देवी सर्वभूतेषु...देशभर सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे. आश्‍विन शुद्ध...
पाऊस वाढतोय, झटका घोंगडी! जमिनीत ५० टक्के हवा आणि ५० टक्के ओलावा असलेल्या...
धरणे भरली, आता सिंचनाचे बघा!नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) दोन...
अतिवृष्टीच्या धोक्यातून मुक्ती! गेल्या दोन-तीन वर्षांपासून अतिवृष्टीमुळे...
विज्ञान-तंत्रज्ञानाला घेऊ द्या मोकळा श्...आज दिनांक ७ ऑक्टोबर हा जागतिक कापूस दिवस म्हणून...
अर्थवाहिन्या सुरू कराकोरोना पहिल्या-दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर...
विचार कसा चिरडणार?शांततापूर्वक मार्गाने आंदोलने करून इंग्रजांना...
रक्तपातपूर्ण अट्टहास कुणासाठी?उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शांततामय...
महावितरणचा कारभार दिव्याखालीच अंधारकृषिपंपाच्या वीजवापर थकबाकीशिवाय सार्वजनिक...
कथनी से करनी भलीदेशातील शेतकऱ्यांची प्रत्येक छोटी-मोठी गरज ही...
शेतीपंप वीजवापर ः वस्तुस्थिती अन्...राज्य सरकारच्या ऊर्जा विभागाने वीज विषयक...
हा तर ओला दुष्काळच!सोलापूर जिल्ह्यात पावसाने झालेल्या नुकसानीच्या...
भारतातील मोटार गाड्यांसाठी इथेनॉल...पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचा कार्यक्रम...
सोयाबीन विक्री करा जरा जपूनचमागील दोन महिन्यांपासून सोयाबीन हे पीक देशभर...
खरे थकबाकीदार ‘सरकार’च  वीजबिलाची थकबाकी ७९ हजार कोटींच्या घरात पोहोचली...
देवगड ‘राम्बुतान’हापूस आंब्याच्या प्रदेशात चक्क परदेशी फळ ‘...
‘कृषी’चे धडे घेऊनच करावी लागेल शेतीदेशात तथा महाराष्ट्रात आजही सुमारे ६० ते ६५...
हतबलतेचा अंत नका पाहूसोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर...
दूध आणि ऊस उत्पादकांच्या लुटीचे रहस्यसाखर उद्योग व दुग्ध व्यवसायामध्ये कमालीचे...
शर्यतीतील बैलांवरील ताणतणाव नियोजनबैलगाडा शर्यतीसाठी अत्यंत पद्धतशीरपणे ...