मर्जीचा मालक मॉन्सून

वर्ष २०१९ च्या मॉन्सूनचं प्रमुख वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ते म्हणजे पावसाचं अतिशय विषम असं वितरण. मॉन्सूनचे चार महिने सोडून बाकीच्या महिन्यांत अचानक पडलेल्या पावसाला अवकाळी पाऊस असं नाव दिलं जातं. पण आताच संपलेल्या मॉन्सूनवर दृष्टिक्षेप टाकला तर त्याचा सगळाच पाऊस अवकाळी होता असं मला म्हणावंसं वाटतं.
संपादकीय.
संपादकीय.

नैर्ऋत्य मॉन्सूनच्या एकंदर सरासरी पावसाचं दीर्घ अवधी पूर्वानुमान भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून दोन टप्प्यांत दिलं जातं. यंदाच्या वर्षीचं पहिलं दीर्घ अवधी पूर्वानुमान १७ एप्रिल २०१९ रोजी जारी केलं गेलं. त्यात २०१९च्या मॉन्सूनचा पाऊस सामान्याच्या ९६ टक्के पडण्याची शक्यता वर्तवली गेली होती. त्यात असंही म्हटलं होतं, की यंदाचा मॉन्सून ‘जवळजवळ सामान्य’ राहील. दुसरं दीर्घ अवधी पूर्वानुमान ३१ मे २०१९ रोजी दिलं गेलं होतं. मध्यंतरीच्या दीड महिन्यात वातावरणीय आणि सागरी परिस्थितीत ज्या काही नवीन हालचाली दिसून आल्या होत्या त्या लक्षात घेऊन आधी दिलेल्या ९६ टक्के आकड्यावरच हवामान खात्यानं शिक्कामोर्तब केला. पण, त्याशिवाय दुसऱ्या पूर्वानुमानात मॉन्सून ‘सामान्य’ राहील असं म्हटलं गेलं. अर्थात पहिल्या पूर्वानुमानापेक्षा दुसरं पूर्वानुमान अधिक आशादायक होतं. 

सामान्य मॉन्सूनच्या भाकिताच्या जोडीला असाही अंदाज वर्तवला गेला होता, की यंदाचा मॉन्सून केरळवर काहीसा उशिरा येण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात मात्र महाराष्ट्रावर सामान्यपणे १० जूनला येणारा मॉन्सून या वर्षी जून महिन्याच्या शेवटी कसाबसा पोचला. त्याचा प्रवाहसुद्धा दुर्बळ होता आणि कोकण वगळता महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पेरणीसाठी योग्य असा पाऊस पडलाच नाही. जून व जुलै या दोन महिन्यांत मॉन्सून सामान्य असल्याची लक्षणं दिसली नाहीत आणि मॉन्सूनचं भवितव्य धोक्यात असल्यासारखं वाटत होतं. जुलैच्या शेवटीशेवटी मॉन्सूननं थोडीशी उभारी धरली आणि पावसाळ्याच्या उत्तरार्धात देशभरात भरपूर पाऊस पडला. १ जून ते ३० सप्टेंबर २०१९ दरम्यानच्या देशभरच्या पावसाचं सरासरी पर्जन्यमान सामान्याच्या ११० टक्के भरलं. 

पावसाचं विषम वितरण वर्ष २०१९ च्या मॉन्सूनचं प्रमुख वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ते म्हणजे त्याच्या पावसाचं अतिशय विषम असं वितरण. मॉन्सूनचे चार महिने सोडून बाकीच्या महिन्यांत अचानक पडलेल्या पावसाला अवकाळी पाऊस असं नाव दिलं जातं. वैयक्तिकपणे अवकाळी या शब्दावर माझा आक्षेप आहे. पण, आताच संपलेल्या मॉन्सूनवर दृष्टिक्षेप टाकला तर त्याचा सगळाच पाऊस अवकाळी होता असं मला म्हणावंसं वाटतं. मुळातच मॉन्सूननं यायला उशीर केला आणि आता तो परत जायला तयार नाही. देशात अनेक ठिकाणी अनेक वेळा अतिवृष्टीमुळं जनजीवन विस्कळित झालं. उलट काही ठिकाणी आकाश दिवसानुदिवस निरभ्र राहिलं. कुठं दुष्काळ पडला तर कुठं महापूर आला. लोकांना अशा काही परिस्थितीचा सामना करावा लागेल याचा कसलाही संकेत त्यांना आधी मिळालेला नव्हता. अर्थात राज्यातील बहुतेक धरणं आता काठोकाठ भरलेली आहेत आणि त्यांच्यांत आता वर्षभर पुरेल एवढा पाण्याचा साठा उपलब्ध आहे, ही एक जमेची बाजू आहे.

परतीचा पाऊस सामान्यपणे सप्टेंबरच्या सुरवातीस राजस्थानपासून मॉन्सूनची माघार सुरू होते आणि क्रमाक्रमाने देशाच्या इतर भागांचा तो निराप घेतो. ऑक्टोबरच्या मध्यावर मॉन्सूनच्या वाऱ्यांची दिशा पूर्णपणे पलटते आणि दक्षिण भारतावर ईशान्य मॉन्सूनचं आगमन होतं. तिथं त्याचा कालावधी अडीच महिन्यांचा असतो. तमिळनाडू राज्याला मिळणारा बहुतेक पाऊस ईशान्य मॉन्सून देत असतो. त्याव्यतिरिक्त दक्षिणेकडील इतर राज्यांतही ईशान्य मॉन्सूनच्या पावसाचा लाभ होतो. महाराष्ट्रापर्यंत मात्र ईशान्य मॉन्सूनचे वारे वाहून येत नाहीत. नैर्ऋत्य मॉन्सून आणि ईशान्य मॉन्सूनच्या प्रवाहांत ज्या वेळी संक्रमण होतं त्या वेळी पडलेल्या पावसाला राज्यात परतीचा पाऊस असं म्हटलं जातं. याच परतीच्या पावसावर ज्वारी-बाजरीसारखी रब्बी पिकं काढायची शेतकऱ्यांची परंपरा आहे. त्यांचा हा प्रयत्न  बहुदा यशस्वी होतो कारण सप्टेंबरच्या अखेरीपासून ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत महाराष्ट्रावर पाऊस पडतो तो भरवशाचा असतो. 

मॉन्सूनचं अंतरंग  यंदाच्या मॉन्सूननं पुणे व मुंबई महानगरात पर्जन्यमानाचे अनेक नवीन उच्चांक प्रस्थापित केले. यंदाच्या पावसाळ्यातील अतिवृष्टीच्या विविध घटनांत ३५० लोक दगावल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अर्थात अशा घटनांचा संबंध सरळ पावसाशी लावता येत नाही. डोंगरांच्या कड्यांवर बांधकाम करणं, कच्च्या इमारती बांधणं, कच्च्या भिंती उभारणं, कच्चे रस्ते बनवणं, अशी विविध कारणं त्यामागं असू शकतात. यंदाच्या मॉन्सूननं माघार घ्यायला जितका उशीर लावला आहे तेवढा उशीर मागील ५८ वर्षांत लागला नव्हता असंही म्हटलं गेलं आहे. पण, हे सगळे आकडे किंवा या सगळ्या घटना मॉन्सूनचं केवळ बाह्यरूप दर्शवतात. त्यातून मॉन्सूनचं अंतरंग उमगत नाही. १६८६ मध्ये एक इंग्रज खगोलशास्त्रज्ञ सर एडमंड हॅली यांनी मॉन्सूनची निर्मिती कशी होते याविषयी एक प्रबंध प्रसिद्ध केला होता. मॉन्सून ही एक जागतिक स्तरावरील प्रक्रिया आहे हे त्यांचं प्रतिपादन होतं. तेव्हापासूनच्या मागील तीन शतकांत भारतीय आणि विदेशी शास्त्रज्ञांनी मॉन्सूनविषयीचं संशोधन सुरू ठेवलेलं आहे. त्यांनी मॉन्सूनच्या अनेक पैलूंचा उलगडा केलेला आहे. मॉन्सूनविषयीचे विविध स्तरांवरील अंदाज देण्यात त्यांना पहिल्यापेक्षा अधिक यशही मिळालं आहे. पण अजून पुढं पुष्कळ काही करायची गरज आहे. मागील काही वर्षांत शास्त्रज्ञांनी एल निनोवर वाजवीपेक्षा अधिक भर दिला आहे. आपला मॉन्सून हा प्रशांत महासागरावर अधूनमधून उद्भवणाऱ्या एल निनोचा जणू काही गुलाम आहे  अशी एक विचारसरणी पसरली जात आहे. पण,  प्रत्यक्षात मात्र भारतीय मॉन्सून हा कोणाचाही गुलाम नसून तो स्वतःच्या मर्जीचा मालक आहे, हे त्यानं या वर्षी स्पष्टपणे दाखवून दिलं आहे. मॉन्सूनचं अंतरंग शोधायचा आणि त्याचे पूर्वसंकेत ओळखायचा नव्यानं प्रयत्न करायला हवा.  

डॉ. रंजन केळकर ः ९८५०१८३४७५ (लेखक ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com