संथ वाहते कृष्णामाई...

२०१४ ते २०१९ पर्यंतच्या विविध अहवालांत कृष्णेचा प्रवाह, नदीकाठची गावे, पूररेषा, परिसरामधील कारखाने, औद्योगिक वसाहती, काठावर होणारी रासायनिक शेती, नदीपात्रात येणारा प्रचंड गाळ, सांडपाणी यांची सविस्तर चर्चा आहे. राष्ट्रीय नदी संरक्षण योजनेनुसार भारतामधील ४२ प्रदूषित नद्यांच्या यादीत महाराष्ट्रामधील पंचगंगा, कृष्णा, तापी आणि गोदावरी यांचा समावेश आहे.
संपादकीय.
संपादकीय.

संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुख-दुःखाची,  जाणीव तीजला नाही, नदी नव्हे ही निसर्ग नीती,  आत्मगतीने सदा वाहती, लाभहानीची लवही  कल्पना नाही तीज ठायी... सुमारे पाच दशकांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘संथ वाहते कृष्णामाई’ या मराठी चित्रपटामधील गदिमांनी लिहिलेले हे गीत सुधीर फडके यांनी त्यांच्या सुस्वरात अजरामर केले. कृष्णेच्या या इतिहासाकडून आजच्या भूगोलाकडे जाताना शांत असणारी ही माता आज का कोपली, असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. कृष्णा आणि पंचगंगा या दोन बहिणीची त्यांच्या १५-२० सख्याबरोबरची कोल्हापूर, सांगली परिसरामधील रासक्रीडा एक आठवड्यापूर्वी संपली आणि सर्व काही संपवूनसुद्धा गेली. या सर्व नद्यांना पुराने थैमान घातले, असे मी मुळीच म्हणणार नाही. पडणाऱ्या पावसाचे नद्यांनी केलेले ते स्वागतच होते. पावसाचे नदीबरोबरचे आनंदाचे नाते हे नेहमी ओसंडून वाहणाऱ्या‍ पुरामधूनच व्यक्त होते. पाण्याचा तो आनंद उत्सव होता; पण आपल्यासाठी मात्र ते जलसंकट ठरले आणि त्यास कारणीभूतसुद्धा आपणच आहोत. नदी ही निसर्ग नियमानेच वाहणार; पण आम्ही निसर्ग नियमांचे पालन करतो का? पश्चिम घाटात वाई तालुक्यात १३०० मीटर उंचीवरच्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये उगम पावणारी कृष्णा नदी अरबी समुद्रापासून जेमतेम ६५ किमी दूर आहे. म्हणूनच तिच्या उगमस्थानी ५००० मिलिमीटर पाऊस हा हमखास पडतोच. महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांमधून १४०० किमी प्रवास करणारी कृष्णामाई महाराष्ट्राच्या सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी वरदान आहे. महाराष्ट्रामधील तिचा प्रवास ३४२ किमी असला तरी त्यात सातारा, सांगलीचा वाटा तब्बल २९० किमीचा आहे. 

सेंट्रल वॉटर कमिशनने कृष्णेचा सविस्तर अभ्यास तिच्या उगमापासून ते समुद्रास मिळणाऱ्‍या शेवटच्या थेंबापर्यंत प्रत्येक दहा किमीच्या टप्प्यावर केला. त्यांनी गंगा, ब्रह्मपुत्रा या नद्यांना आक्रमक म्हणताना कृष्णेला मात्र शांत वाहणारी सुरक्षित नदी असे म्हटले आहे. त्याचबरोबर भविष्यात या नदीमधील प्रदूषणाची काळजी घेण्याचेही आवाहन केले होते. कृष्णा नदीच्या प्रदूषणावर, तिच्या प्रवाहावर आजपर्यंत अनेक अहवाल सादर झाले. यामध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचा वाटा फार मोठा आहे. जून २०१९ मधील महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचा कृष्णेच्या प्रदूषणाबद्दलचा अहवाल डोळ्यांत अंजन घालणारा आहे. २०१४ ते २०१९ पर्यंतच्या विविध अहवालांत कृष्णेचा प्रवाह, नदीकाठची गावे, पूररेषा, परिसरामधील कारखाने, औद्योगिक वसाहती, काठावर होणारी रासायनिक शेती, नदीपात्रात येणारा प्रचंड गाळ, सांडपाणी यांची सविस्तर चर्चा आहे. राष्ट्रीय नदी संरक्षण योजनेनुसार भारतामधील ४२ प्रदूषित नद्यांच्या यादीत महाराष्ट्रामधील पंचगंगा, कृष्णा, तापी आणि गोदावरी यांचा समावेश आहे. केंद्र शासनातर्फे प्रदूषण नियंत्रणासाठी प्रतिवर्षी हजारो कोटी रुपये खर्च होतात. पण लोकसहभागाचा अभाव असल्यामुळे हा सर्व पैसा वाया जातो आणि प्रदूषण मात्र वाढतच जाते. 

कृष्णेचे पाणी पाच विविध कारणांसाठी वापरले जाते. त्यामध्ये पिण्यासाठी, शेतीकरिता, घरगुती उपयोग, वीजनिर्मिती आणि कारखाने यांचा समावेश आहे. अहवाल सांगतो, की नदीकाठच्या शेकडो गावांमधील तसेच नगरपालिका, नगर परिषदा यांचे सांडपाणी सरळ नदीत प्रवेश करते. नदीकाठी रासायनिक शेती केली जाते, पाण्याचा मुबलक वापर आणि भरपूर पाऊस यामुळे ही कसदार माती सैल होऊन नदीपात्रात गाळ रूपाने साचत राहते. नदीकाठी जनावरांचे हजारो गोठे आहेत. त्यांचे मलमूत्रही नदीतच जाते. कारखान्यामधील सांडपाण्याबद्दल काय लिहणार? कृष्णेची अवस्था आज बिकट आहे ती याचमुळे. प्रदूषणाचे ओझे वाढू लागले की छोट्या नद्या, नाले, ओढे त्यांचे अस्तित्वच मिटवून टाकतात. पण मोठ्या नद्यांना तसे करणे अशक्य असते म्हणून अशा धुवाधार पावसात त्या त्यांच्या निद्रिस्त सख्यांना जागृत करून स्वतःला तळागाळापासून मुक्त करून घेतात.  कृष्णा नदीवरील विविध अहवालांत मानवी कल्याणासाठी तिने संथ आणि स्वच्छ वाहण्यासाठी अनेक उपाय सुचविले आहेत. त्यापैकी काही महत्त्वाचे म्हणजे नदीच्या दोन्हीही काठांवर पूररेषा ठरवून त्यास लागून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी. नदीकाठची रेतीयुक्त सुपीक माती म्हणजेच पोयट्याची जमीन बांधकामासाठी लागणाऱ्या विटांच्या निर्मितीसाठी वापरू नये अथवा त्यावर नियंत्रण असावे. नदीपात्रामधील वाळू उपसा त्वरित थांबवावा. नदीपात्रात सातत्याने होत असलेल्या आक्रमणामुळे, तसेच बांधकामामुळे पाण्याचा प्रवाह बदलतो, यावर बंदी असावी. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नदीपात्रात अनेक ठिकाणी कोल्हापूर टाइपचे बंधारे घालण्यात आले आहेत, त्यांचा परत एकदा शास्त्रोक्त अभ्यास करून त्यांची उपयुक्तता नदीच्या प्रवाहास अडथळा तर करत नाही ना, याची पाहणी करावी. हे बंधारे नदीतून वेगाने पाणी वहात असताना त्यावर नियंत्रण तर ठेवतातच, त्याचबरोबर पात्रात गाळही साचू देत नाहीत. कृष्णा नदीत आज मोठ्या प्रमाणावर गाळ साचत आहे. या गाळावरूनच नदीचे पाणी सैरभैर होत आहे. गाळावर नियंत्रण ठेवणे हे आपले काम नव्हे काय? 

लोकसहभागाशिवाय नद्यांना वाचविणे केवळ अशक्य आहे. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे, की कृष्णेचा उगम पश्चिम घाटात अतिशय उंचीवर अरबी समुद्राच्या छायेत असल्यामुळे, तसेच वातावरण बदलाचा पहिला परिणाम समुद्र किनाऱ्यापासूनच्या १०० किमी परिसरातच वेगाने जाणवणार असल्यामुळे कृष्णेच्या पुराची व्याप्ती (वेळीच योग्य उपाययोजना केल्या नाहीत तर) भविष्यातही अशीच राहणार आहे. केरळचा पश्चिम घाट मागील दोन वर्षांपासून हेच अनुभवतो आहे. आपल्या पश्चिम घाटाने कृष्णेच्या पुराच्या रूपाने आपल्याला या वर्षी संदेश दिलाच आहे, फक्त तो आपणास क्षणाचीही उसंत न ठेवता वाचता आला पाहिजे. नदीची मर्यादा आणि तिचा सन्मान राखून तिच्या पाणीरूपी अमृताने पिकविलेले धान्यमोती घरात आणताना आम्ही आनंदाने ‘गंगा आली रे अंगणी’ असे म्हणतो, हा आणि असाच सुदिन कृष्णेच्या भाग्यात असावा एवढीच इच्छा!

डॉ. नागेश टेकाळे  ः ९८६९६१२५३१ (लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com