agriculture news in marathi agrowon special article on loss of biodiversity part 1 | Agrowon

जैवविविधतेचे ऱ्हासपर्व

रमेश चिल्ले
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

जंगलातील झाडावर कीटकांचा अधिवास असतो तर हीच झाडे मृत झाल्यावर त्याला कुजवून नवीन वनस्पती व झाडांना खतनिर्मिती करण्याचे कार्य कीटकच करतात. हे सर्व सहजीवनाच्या धाग्याने एकमेकांशी घट्ट जोडले गेल्याने व परस्परपूरक असलेल्या या नात्यात मानवाने हस्तक्षेप करून आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला आहे. 
 

१९९२ मध्ये रिओ-दि-जानेरो येथे पर्यावरणासंबंधी आंतरराष्ट्रीय संमेलन झाले. त्यात जैवविविधता तिचे संगोपण व रक्षण याबाबत बहुदा पहिल्यांदा बोलले व लिहिले गेले असावे. स्वीडनची ७० टक्के जमीन जंगलाखाली आहे. म्हणजे ते जंगल वैविध्यपूर्ण आहे असे समजायचे काय? त्यात ५ ते ६ वृक्षजातीच भेटतात. पण, महाराष्ट्रातील खंडाळ्यात एक तास फिरल्यास १५ ते २० प्रकारची वृक्ष, झुडपे, गवत, वेली दिसतात. पृथ्वीवर अडीच लाखाच्यावर फुलझाडांच्या प्रजाती आहेत. त्यातल्या १८ हजार ८६ प्रजाती भारतात आहेत. बदलत्या परिस्थितीत स्वत:ला जुळवून घेण्याच्या क्रियेत नवीन प्रजाती निर्माण होतात. विषुववृत्तीय अमेरिका, आफ्रिका, भूमध्य समुद्रीक युरोप, आशियाचा चंद्राकार सुपीक पट्टा, भारतात हिमालयाचा पायथा, ईशान्येकडील राज्ये, पश्चिम व पूर्व घाट, अंदमान निकोबार बेटे हे वनस्पतीची जन्मस्थाने आहेत. इतके आपण श्रीमंत आहोत. या स्थळांना संरक्षण मिळाले तर वाढत्या मानव संख्येला अन्नशाश्वती मिळेल. २०५० पर्यंत जगाची लोकसंख्या १० अब्जापर्यंत पोचेल. या लोकसंख्येसाठी अन्नधान्य उत्पादन करताना एकूण पृथ्वीचा नैसर्गिक समतोल बिघडणार नाही, याची काळजी सर्वांनाच सतावते आहे.

आपली जीवसृष्टी विविधतेने नटलेली जरूर आहे. पर्यावरण स्थिरतेचा पायाच ही जैवविविधता आहे. निर्मितीच्या प्रक्रियेत पृथ्वीवर वेगवेगळे सजीव निर्माण झाले आहेत. उत्क्रांतीमुळे त्या सजीव सृष्टीत नियमन व त्यानुसार बदलही होत गेले. मागच्या शतकापर्यंत मानवासकट संपूर्ण सजीव सृष्टी सहजीवनाचा धागा धरून सुखासमाधानाने नांदत होती. पण, मानव प्राणी यात बराच पुढे निघून गेला. वनवासी, ग्रामवासी व नगरवासी अशी त्रिस्थरीय वस्ती व्यवस्था निर्माण झाली. यातच मानवप्राणी बुद्धीच्या जोरावर वेगवेगळे प्रयोग करू लागला. खेडी मात्र रोडावताहेत अनं शहरं फुगताहेत. निसर्गाचा अविभाज्य घटक असलेला मानव मात्र जंगल व जैवविविधतेपासून दुरावत गेला. ज्या संपन्न जैवविविधतेला धोका त्याचाच घटक असलेल्या मानवाकडून संभावतो आहे. जंगलातील अन्नसाखळी व अन्नजाळे कमालीची प्रभावित झाली. या दोघांच्या सहजीवनाचा प्रवास विनाशाच्या उंबरठ्याकडे होतो आहे. नैसर्गिक संसाधनाचा अतिवापर, दर्जाहीन अधिवास ही जैवविविधतेच्या ऱ्हासाची महत्त्वाची कारणे होत. त्याबरोबरच अधिवास नष्ट करून प्रदूषण वाढल्याने इथल्या जैवविविधतेवर घाला घातला हे नाकारून चालणार नाही. 

भारत जागतिक दहा देशातील जैवविविधतेत आठव्या क्रमांकावर असला तरी भारतात प्रतिवर्षी सरासरी १४ लाख हेक्टर जंगल नष्ट होते. २००५ ते २०११ या कालावधीत एकट्या महाराष्ट्रात ६६३७ हेक्टर वनक्षेत्र नष्ट झाले. जंगलातील लता-वेली, झाडे, झुडपे यावर जैवविविधता नांदत असते. तर वाघापासून-वाळवीपर्यंतची संपूर्ण जैवविविधता जंगलाचे जीवन जगविते. जंगलातील झाडावर कीटकांचा अधिवास असतो तर हीच झाडे मृत झाल्यावर त्याला कुजवून नवीन वनस्पती व झाडांना खतनिर्मिती करण्याचे कार्य कीटकच करतात. हे सर्व सहजीवनाच्या धाग्याने एकमेकांशी घट्ट जोडले गेल्याने व परस्परपूरक असलेल्या या नात्यात मानवाने हस्तक्षेप करून आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला आहे. मानवाला ऑक्सिजन व सावली देणारी झाडे, परागीभवनातून अन्न देणाऱ्या मधमाशा, फुलपाखरे व इतर कीटकसृष्टी हे सर्व जंगल जैवविविधतेचे मुख्य घटक आहेत. 

वेगवेगळ्या कारणासाठी जंगलतोड मोठ्या प्रमाणात होते आहे. मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या पायथ्याशी असलेले जंगल पूर्णपणे ओसाड झाल्याने, अनेक गावे आज ओस पडलीत. तिथल्या लोकांचे रोजी-रोटीसाठी मोठ्या प्रमाणावर शहराकडे स्थलांतर होते आहे. शहरात पुलाखाली, पाइपलाइन शेजारी, मोकळ्या जागेवर, नाल्या किनारी बकाल झोपड्या वाढल्या. तसेच आजकाल जंगलात वनवे लागण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे जगभरात लाखो हेक्टर जंगल भस्मसात होते आहे. त्यामुळे झाडे, वेली, वनस्पती तर जळून खाक होताहेतच, त्याचबरोबर सरपटणारे प्राणी, कीटक, सुक्ष्मजीव, पक्षी, त्यांची घरटी, पिल्लं, प्राणी, वनस्पती ज्यांचा म्हणून त्यावर अधिवास व उपजीविका आहे ते सर्व नामशेष होताना अतिव वेदना सहन कराव्या लागतात. जगभरात अशा घटना वारंवार घडताना लाखो हेक्टरवरील जैवविविधता धोक्यात येते आहे. ती पुन्हा स्थापित व्हायला अनेक वर्ष जावी लागतात. हे रोखण्याची व असे घडू न देण्याची जबाबदारी एक संवेदनशील नागरिक म्हणून आपली सर्वांचीच आहे. 

गेल्या आठ हजार वर्षांत पृथ्वीच्या मूळ जंगलाच्या ४५ टक्के भाग नाहीसा झालाय. यातील बहुतेक भाग गेल्या शतकात कमी झालाय. अन्न व कृषी संघटनेच्या अंदाजानुसार पिकांच्या कापणीमुळे दरवर्षी १३ दशलक्ष हेक्टर क्षेत्रफळ प्रभावित होते. २००१ ते २००५ दरम्यान वन क्षेत्राचे वार्षिक नुकसान १३ लाख हेक्टर आहे. हे क्षेत्र जंगल क्षेत्राच्या ०.१८ टक्के एवढे आहे. शेतीच्या अंगाने जैवविविधतेकडे पाहताना पीक वैविध्य हे सकसतेबरोबरच पर्यावरणाचा पायाही ठरते. ही अन्नव्यवस्था आजही मोठ्या जनसमुदायाच्या जगणाचा आधार आहे. औद्योगिक क्रांतीने निसर्गातील नाती बदलून गेली. एकजातीय लागवडीला प्राधान्य दिले गेल्याने, पोषणमूल्यात सरस असणारी नाचणीसारखी पिकेही नाकारली गेलीत. चिरस्थाई पर्यावरण संतुलनासाठी आवश्यक असणाऱ्या फेरपालट, मिश्रपिके व संमिश्र पिके नष्ट होऊ लागलीत. संकरित वाणाच्या दबावाखाली पारंपरिक सरळ वाणेही हरवून गेलीत. हे उघड सत्य आहे. वरण-भात, भाजी-भाकरी अशा पूर्वजांनी विचारपूर्वक ठरवलेल्या वैविध्यपूर्ण अन्नातून प्रथिने, कर्बोदके, मेद अशा विविध प्रकारच्या पोषणमूल्यांनी मानवाची भूक भागवली जायची. कडधान्ये, नाचणी, बाजरी, डाळी या जीवनसत्वाच्या प्राथमिक गरजा भागवतात. केवळ गहू, द्राक्ष, ऊस, सोयाबीन अशी एकेरी पिके घेऊन एकात्मिक शेती पद्धतीला तिलांजली दिली जातेय. आता तर जनुकीय बदल केलेली (जीएम) पिकांची वाणं येताहेत. जीएम खाद्य पिकांचा मानवी आरोग्य तसेच येथील जीवसृष्टीवर काय परिणाम होतो, याबाबतही देशात स्पष्टता नाही.  
रमेश चिल्ले  ः ९४२२६१०७७५
(लेखक शेती, पर्यावरणाचे अभ्यासक आहेत.)


इतर संपादकीय
दर्जानुसारच हवा दरराज्यातील जिरायती शेतीतील कापूस हे एकमेक नगदी पीक...
उपयुक्त मधुमक्षिकापालन दुर्लक्षितच! मधमाशी हा निसर्गाने निर्माण केलेला अत्यंत हुशार,...
दुष्काळ हटविण्याचा ‘जंगल मार्ग’ मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत कायम दुष्काळ असतो....
कृत्रिम रेतन हवे नियंत्रितचकृ त्रिम रेतनामध्ये उच्च प्रतीच्या वळूच्या...
श्रमसधन उद्योग उभारणीवर हवा भरआजच्या घडीला सरकार कृषी संशोधन आणि विकास...
माणुसकीलाच काळिमापशुवैद्यकीय महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची...
वणवा पेटतोयअखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे तिसरे...
कार्यक्षम खत व्यवस्थापनेतून साधूया...हरितक्रांतीच्या यशात अधिक उत्पादनक्षम गहू बियाणे...
घरात असावे एकमत‘शेतात खत, गावात पत अन् घरात एकमत असावे’ अशी एक...
काटेरी राजमुकुटमहाराष्ट्रात अवघ्या चार-सहा दिवसांत झालेल्या...
गोसमृद्धीची अग्निपरीक्षा तीन दिवस पुणे ‘गो'' रंगात सजणार आहे. गाय आणि...
योजना माझ्या हातीकृषी विभागाच्या अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचत...
दारिद्र्यनिर्मूलनासाठी हवा ठोस कार्यक्रमआज रोजी देशातील कोट्यधीशांची संख्या वाढत असताना...
आमदार बंधूभगिनींनो पत्रास कारण की...आमदार बंधूभगिनींनो नमस्कार,  आजघडीला...
अखेर फासे उलटलेच!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दुपारी...
गोवंशहत्याबंदी अव्यवहार्यच!महाराष्ट्र या (तथाकथित) पुरोगामी राज्यात...
फसवणूक थांबणार कधी?नाशिक जिल्ह्यात दोन व्यापाऱ्यांनी ४० टोमॅटो...
पाहणी-पंचनाम्यांचा फार्सराज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी...
दुतोंडीपणाचा कळस?राज्यसभेच्या २५०व्या सत्र किंवा अधिवेशनानिमित्त...
‘कोरडवाहू’चे वैचारिक सिंचनकोरडवाहू (जिरायती) शेती समस्यांबाबत दोन दिवसांचे...