agriculture news in marathi agrowon special article on loss of kharif by natural calamity | Page 2 ||| Agrowon

आपत्ती नव्हे चेतावणी

डॉ. अजित नवले
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

शेतकऱ्यांवरील संकटाच्या काळात सर्वांनीच त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे. राज्य सरकारने विशेष संवेदनशीलता दाखवीत भरीव मदत जाहीर केली पाहिजे. किमान संकटाच्या वेळी तरी अटी- शर्तींचे कावेबाज डावपेच दूर ठेवले पाहिजेत. केंद्र सरकारनेही राष्ट्रीय आपत्ती साहाय्यता निधीअंतर्गत ठोस मदत केली पाहिजे.
 

अवकाळी पावसाने घातलेल्या थैमानामुळे हातातोंडाशी आलेली शेतकऱ्यांची पिके अक्षरशः मातीमोल झाली. सोयाबीन, भुईमुगाच्या तयार शेंगा शेतातच सडल्या. बाजरी, मका, ज्वारीच्या कणसांत पाणी शिरल्याने कणसांना कोंब आले. बोंडांमध्ये पाणी शिरल्याने कापूस भिजून वाया गेला. सरकीला मोड आले. लाल कांदा वाफ्यांतच सडला. रांगड्या कांद्याची रोपे कुजली. झेंडू, शेवंती, गुलाबाच्या बागा उद्‍ध्वस्त झाल्या. द्राक्ष, डाळिंबाच्या फळबागांचेही अतोनात नुकसान झाले. सर्वत्र दिवाळीचा आनंदोत्सव सुरू असताना अन्नदाता बळिराजा आपल्या शेतात ही अवकळा उघड्या डोळ्यांनी पहात होता. कडू झालेला दिवाळीचा घास निमूटपणे गिळत होता. 

तातडीची मदत 
शेतकऱ्यांवरील या संकटाच्या काळात सर्वांनीच त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे. राज्य सरकारने विशेष संवेदनशीलता दाखवीत भरीव मदत जाहीर केली पाहिजे. किमान संकटाच्या वेळी तरी अटी शर्तींचे कावेबाज डावपेच दूर ठेवले पाहिजेत. केंद्र सरकारनेही राष्ट्रीय आपत्ती साहाय्यता निधी अंतर्गत ठोस मदत केली पाहिजे. राज्यात, आगामी मुख्यमंत्री कोण असेल, याचे डावपेच करण्यात मश्गुल असणाऱ्या सर्वांनीच आता यासाठी गांभीर्याने पुढे आले पाहिजे. 

विमा भरपाई 
सरकारी मदतीबरोबरच पीकविम्याचा वेगळा लाभही शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. शासन, प्रशासन व शेतकरी कार्यकर्त्यांनी यासाठी अत्यंत संवेदनशीलपणे पुढाकार घेतला पाहिजे. पीक कापणीचे प्रयोग अधिक पारदर्शक होतील याची खबरदारी घेतली पाहिजे. शिवाय, शेतात पाणी साठून पिकांच्या झालेल्या नुकसानीची विमा कंपन्यांकडून ‘आगाऊ भरपाई’ मिळविण्यासाठी स्वतंत्र क्लेम केले पाहिजेत. क्लेम फॉर्मसोबत विमा पावती, जमिनीचा उतारा, आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स व नुकसानीचा फोटो जोडणे आवश्यक आहे. फॉर्मसोबत जोडलेल्या फोटोच्या आधारे नुकसान निश्चिती होणार असल्याचे सांगितले जात आहे. फोटोवरून नुकसान निश्चितीचा हा प्रकार हास्यास्पद आहे. आधुनिक तंत्रज्ञान, रिमोट सेन्सिंग, ड्रोन व उपग्रहांचा वापर करून नुकसान ठरविण्याच्या वल्गना यामुळे पोकळ ठरल्या आहेत. अशा परिस्थितीत किमान विमा प्रतिनिधी, महसूल कर्मचारी, कृषी विभागाचे प्रतिनिधी व शेतकरी यांच्या उपस्थितीत ‘प्रत्यक्ष पंचनामे’ होतील यासाठी आग्रह धरला गेला पाहिजे. 

अपयशी पीकविमा योजना 
शेतकऱ्यांना दिलासा देण्यात सध्याची पीकविमा योजना सर्वार्थाने अपुरी, अविश्वासू व अपयशी सिद्ध झाली आहे. विमा योजनेत दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी, बेमोसमी पाऊस, वादळे, पूर, भूस्खलन, हवामानातील बदल, पिकांवरील कीड व रोगराई या आपत्तींमध्ये अंतिम भरपाई व्यतिरिक्त, ‘स्वतंत्र’ भरपाई दिली जाणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र तसे न करता, योजनेत केवळ अंतिम भरपाईमधील २५ टक्के रक्कम आपत्तीच्या वेळी ‘आगाऊ’ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. अंतिम भरपाईमधून ही ‘आगाऊ भरपाई’ पुन्हा वळती करून घेतली जाणार आहे. शेतजमिनीच्या नुकसानीला योजनेत कोणतेही संरक्षण देण्यात आलेले नाही. शेतकऱ्यांची ही क्रूर चेष्टा आहे. विमा योजनेतील या त्रुटी दूर करण्याची आवश्यकता आहे. शिवाय, उंबरठा पद्धतीतील त्रुटींचे निराकरण करावे, नुकसान निश्चितीसाठी आधुनिक तंत्राचा वापर करावा, जोखीमस्तर ९० टक्केपर्यंत वाढवावा, हवामान आधारित फळ पीकविमा योजनेत अधिक शास्त्रीय व अचूक परिमाणांचा वापर करावा, हवामान मापन यंत्रणा अधिक कार्यक्षम बनवावी, ‘परिमंडळा’ऐवजी ‘गाव’ एकक मानून योजना राबवाव्यात, शेतकऱ्यांच्या या मागण्याही गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.   

अचूक अंदाज 
हवामानातील प्रतिकूल बदलांमुळे आपल्याकडील पर्जन्यचक्रात कमालीची अस्थिरता व अनिश्चितता निर्माण झाली आहे. पर्जन्यचक्र विस्कळित झाल्यामुळे अतिवृष्टी, दुष्काळ, महापूर यांसारख्या आपत्तींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो आहे. या आपत्तींचा अचूक पूर्वअंदाज वर्तविणारी प्रगत यंत्रणा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना नुकसानीपासून वाचविणे अशक्य होऊन बसले आहे. आगामी काळात यासाठी प्रगत सेन्सिंग यंत्रणा, रडारचे देशव्यापी जाळे, प्रशिक्षित मनुष्यबळ व उपग्रहांचा परिणामकारक वापर करून हवामानाचे अचूक अंदाज वर्तविणारी यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. 

नुकसान प्रतिबंध 
आपली शहरे झपाट्याने आधुनिक दुनियेत परावर्तित होत आहेत. शेती मात्र हेतुतः मागासलेलीच ठेवण्यात आली आहे. आपले पीक काढणीपश्चात तंत्रज्ञान आणि साठवण व्यवस्था तर थेट ‘मध्ययुगीन’ मागासलेपणाचाच नमुना आहे. अकाली पावसापासून आपण आपल्या शेतकऱ्यांची तयार पिके वाचवू शकलो नाही, ही या मागासलेपणाचीच परिणती आहे. प्रगत देशांनी याबाबत मोठी मजल मारली आहे. आधुनिक यंत्र सामग्रीच्या मदतीने तयार पिकांची क्षणार्धात काढणी, मळणी, बांधणी व साठवण करणारी यंत्रणा या देशांनी विकसित केली आहे. पिकांच्या नुकसानीचा बचाव करणारी अशी यंत्रणा आपल्याकडे विकसित करण्याची आवश्यकता आहे. 

प्रतिकारक्षम वाण
अतिरिक्त पावसामुळे कांदा, जनावरांचा चारा, पालेभाज्या, फळभाज्यांचे कुजून मोठे नुकसान होते. अवकर्षण, अतिआर्द्रता, शुष्कता, शीतता व उष्णता यांचाही शेतीमालाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. वातावरणातील या बदलांचा यशस्वीपणे मुकाबला करू शकतील अशा पीक वाणांच्या संशोधनावर यासाठी अधिक जोर देण्याची अभूतपूर्व आवश्यकता निर्माण झाली आहे. 

हवामान बदलाचे परिणाम
हवामानात होत असलेल्या प्रतिकूल बदलांमुळे नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रामधील पूर, अतिवृष्टी, दुष्काळ आणि आता अवकाळी पावसाने उडविलेली दाणादाण ही याच बदलांची परिणती आहे. नफाकेन्द्री, शहरी औद्योगिक विकासाच्या अतिरेकी हव्यासामुळे बिघडत चाललेल्या नैसर्गिक समतोलाचा हा परिपाक आहे. वारेमाप वृक्षतोड, जंगलांवर व जैववैविध्यावर क्रूर हल्ले, कार्बनचे अमर्याद उत्सर्जन, प्रदूषण, नैसर्गिक खनिजांचा बेसुमार उपसा व वापर, तापमानात अभूतपूर्व वाढ यांसारख्या मानवी उपद्‍व्यापांची किंमत आज शेतकऱ्यांना मोजावी लागत आहे. उद्या अख्ख्या मानवजातीला याची किंमत मोजावी लागणार आहे. आजच्या या ‘आपत्ती’ म्हणजे खरेतर वेळीच सावध होण्यासाठी निसर्गाने आपल्याला दिलेल्या चेतावण्याच आहेत. सर्वांनीच या ‘चेतावण्या’ गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. निसर्गाचा विध्वंस रोखला पाहिजे.

डॉ. अजित नवले : ९८२२९९४८९१ 
(लेखक अखिल भारतीय किसान 
सभेचे  राज्य सरचिटणीस आहेत.)



इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर...नगर : ‘‘शेतकऱ्यांसाठी काम करणे याला आपण सर्वांनी...
मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
सहकाराच्या त्रिस्तरीय रचना मोडण्यास...पुणे : राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज;...पुणे : राज्यात अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हापासून...
`गोकुळ' ची ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया कोल्हापूर ः लॉकडाउनच्या काळात कोल्हापूर...
पीककर्जासाठी हेलपाटे, भ्रष्ट...संग्रामपूर, जि. बुलडाणा : वेळ सकाळी साधारण...
टोळधाडीमुळे अवघे ५० हेक्‍टरचे नुकसान :...नागपूर: टोळधाडीचा धोका अमरावती विभागात टळला असला...
राज्यात ४० हजार टन दूध पावडर पडूनपुणे : राज्यात ४० हजार टन दूध पावडर (भुकटी) पडून...
मागणीपेक्षाही एक लाख क्विंटल बियाणे...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असले...
दुग्धव्यवसायातून शेतीला दिला सक्षम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...
मॉन्सून मालदिवात दाखल; १ जूनलाच केरळात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारपर्यंत...
भारतीय किसान संघामार्फत शेतकऱ्यांनी...कोल्हापूर: भारतीय किसान संघाने लॉकडाउनच्या काळात...
लॉकाडाउनमध्येही शेतकऱ्यांकडून शेतमालाची...पुणे (प्रतिनिधी)ः कोरोना टाळेबंदी मध्ये शेतमालाची...
खानदेशात साठा वाढल्याने कापूस, सरकी...जळगाव : कापसाची शासकीय खरेदी खानदेशात मागील ६ मे...
राज्यातील २८० बाजार समित्या अडचणीत;...लातूर ः राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा...
उष्णतेच्या लाटेमुळे अकोल्यात केळीचे घड...अकोला  ः जिल्ह्यात या आठवड्यात वाढलेल्या...
विदर्भात टोळधाडीची दहशत कायम;...नागपूर ः अमरावती जिल्ह्यातील पुसला गावातून...
राजस्थानातील चुरूत ५० अंशांवर तापमान;...पुणे  : सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने...
मॉन्सून ४८ तासांमध्ये दक्षिण अरबी...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...