agriculture news in marathi agrowon special article on loss of kharif by natural calamity | Agrowon

आपत्ती नव्हे चेतावणी
डॉ. अजित नवले
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

शेतकऱ्यांवरील संकटाच्या काळात सर्वांनीच त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे. राज्य सरकारने विशेष संवेदनशीलता दाखवीत भरीव मदत जाहीर केली पाहिजे. किमान संकटाच्या वेळी तरी अटी- शर्तींचे कावेबाज डावपेच दूर ठेवले पाहिजेत. केंद्र सरकारनेही राष्ट्रीय आपत्ती साहाय्यता निधीअंतर्गत ठोस मदत केली पाहिजे.
 

अवकाळी पावसाने घातलेल्या थैमानामुळे हातातोंडाशी आलेली शेतकऱ्यांची पिके अक्षरशः मातीमोल झाली. सोयाबीन, भुईमुगाच्या तयार शेंगा शेतातच सडल्या. बाजरी, मका, ज्वारीच्या कणसांत पाणी शिरल्याने कणसांना कोंब आले. बोंडांमध्ये पाणी शिरल्याने कापूस भिजून वाया गेला. सरकीला मोड आले. लाल कांदा वाफ्यांतच सडला. रांगड्या कांद्याची रोपे कुजली. झेंडू, शेवंती, गुलाबाच्या बागा उद्‍ध्वस्त झाल्या. द्राक्ष, डाळिंबाच्या फळबागांचेही अतोनात नुकसान झाले. सर्वत्र दिवाळीचा आनंदोत्सव सुरू असताना अन्नदाता बळिराजा आपल्या शेतात ही अवकळा उघड्या डोळ्यांनी पहात होता. कडू झालेला दिवाळीचा घास निमूटपणे गिळत होता. 

तातडीची मदत 
शेतकऱ्यांवरील या संकटाच्या काळात सर्वांनीच त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे. राज्य सरकारने विशेष संवेदनशीलता दाखवीत भरीव मदत जाहीर केली पाहिजे. किमान संकटाच्या वेळी तरी अटी शर्तींचे कावेबाज डावपेच दूर ठेवले पाहिजेत. केंद्र सरकारनेही राष्ट्रीय आपत्ती साहाय्यता निधी अंतर्गत ठोस मदत केली पाहिजे. राज्यात, आगामी मुख्यमंत्री कोण असेल, याचे डावपेच करण्यात मश्गुल असणाऱ्या सर्वांनीच आता यासाठी गांभीर्याने पुढे आले पाहिजे. 

विमा भरपाई 
सरकारी मदतीबरोबरच पीकविम्याचा वेगळा लाभही शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. शासन, प्रशासन व शेतकरी कार्यकर्त्यांनी यासाठी अत्यंत संवेदनशीलपणे पुढाकार घेतला पाहिजे. पीक कापणीचे प्रयोग अधिक पारदर्शक होतील याची खबरदारी घेतली पाहिजे. शिवाय, शेतात पाणी साठून पिकांच्या झालेल्या नुकसानीची विमा कंपन्यांकडून ‘आगाऊ भरपाई’ मिळविण्यासाठी स्वतंत्र क्लेम केले पाहिजेत. क्लेम फॉर्मसोबत विमा पावती, जमिनीचा उतारा, आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स व नुकसानीचा फोटो जोडणे आवश्यक आहे. फॉर्मसोबत जोडलेल्या फोटोच्या आधारे नुकसान निश्चिती होणार असल्याचे सांगितले जात आहे. फोटोवरून नुकसान निश्चितीचा हा प्रकार हास्यास्पद आहे. आधुनिक तंत्रज्ञान, रिमोट सेन्सिंग, ड्रोन व उपग्रहांचा वापर करून नुकसान ठरविण्याच्या वल्गना यामुळे पोकळ ठरल्या आहेत. अशा परिस्थितीत किमान विमा प्रतिनिधी, महसूल कर्मचारी, कृषी विभागाचे प्रतिनिधी व शेतकरी यांच्या उपस्थितीत ‘प्रत्यक्ष पंचनामे’ होतील यासाठी आग्रह धरला गेला पाहिजे. 

अपयशी पीकविमा योजना 
शेतकऱ्यांना दिलासा देण्यात सध्याची पीकविमा योजना सर्वार्थाने अपुरी, अविश्वासू व अपयशी सिद्ध झाली आहे. विमा योजनेत दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी, बेमोसमी पाऊस, वादळे, पूर, भूस्खलन, हवामानातील बदल, पिकांवरील कीड व रोगराई या आपत्तींमध्ये अंतिम भरपाई व्यतिरिक्त, ‘स्वतंत्र’ भरपाई दिली जाणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र तसे न करता, योजनेत केवळ अंतिम भरपाईमधील २५ टक्के रक्कम आपत्तीच्या वेळी ‘आगाऊ’ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. अंतिम भरपाईमधून ही ‘आगाऊ भरपाई’ पुन्हा वळती करून घेतली जाणार आहे. शेतजमिनीच्या नुकसानीला योजनेत कोणतेही संरक्षण देण्यात आलेले नाही. शेतकऱ्यांची ही क्रूर चेष्टा आहे. विमा योजनेतील या त्रुटी दूर करण्याची आवश्यकता आहे. शिवाय, उंबरठा पद्धतीतील त्रुटींचे निराकरण करावे, नुकसान निश्चितीसाठी आधुनिक तंत्राचा वापर करावा, जोखीमस्तर ९० टक्केपर्यंत वाढवावा, हवामान आधारित फळ पीकविमा योजनेत अधिक शास्त्रीय व अचूक परिमाणांचा वापर करावा, हवामान मापन यंत्रणा अधिक कार्यक्षम बनवावी, ‘परिमंडळा’ऐवजी ‘गाव’ एकक मानून योजना राबवाव्यात, शेतकऱ्यांच्या या मागण्याही गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.   

अचूक अंदाज 
हवामानातील प्रतिकूल बदलांमुळे आपल्याकडील पर्जन्यचक्रात कमालीची अस्थिरता व अनिश्चितता निर्माण झाली आहे. पर्जन्यचक्र विस्कळित झाल्यामुळे अतिवृष्टी, दुष्काळ, महापूर यांसारख्या आपत्तींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो आहे. या आपत्तींचा अचूक पूर्वअंदाज वर्तविणारी प्रगत यंत्रणा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना नुकसानीपासून वाचविणे अशक्य होऊन बसले आहे. आगामी काळात यासाठी प्रगत सेन्सिंग यंत्रणा, रडारचे देशव्यापी जाळे, प्रशिक्षित मनुष्यबळ व उपग्रहांचा परिणामकारक वापर करून हवामानाचे अचूक अंदाज वर्तविणारी यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. 

नुकसान प्रतिबंध 
आपली शहरे झपाट्याने आधुनिक दुनियेत परावर्तित होत आहेत. शेती मात्र हेतुतः मागासलेलीच ठेवण्यात आली आहे. आपले पीक काढणीपश्चात तंत्रज्ञान आणि साठवण व्यवस्था तर थेट ‘मध्ययुगीन’ मागासलेपणाचाच नमुना आहे. अकाली पावसापासून आपण आपल्या शेतकऱ्यांची तयार पिके वाचवू शकलो नाही, ही या मागासलेपणाचीच परिणती आहे. प्रगत देशांनी याबाबत मोठी मजल मारली आहे. आधुनिक यंत्र सामग्रीच्या मदतीने तयार पिकांची क्षणार्धात काढणी, मळणी, बांधणी व साठवण करणारी यंत्रणा या देशांनी विकसित केली आहे. पिकांच्या नुकसानीचा बचाव करणारी अशी यंत्रणा आपल्याकडे विकसित करण्याची आवश्यकता आहे. 

प्रतिकारक्षम वाण
अतिरिक्त पावसामुळे कांदा, जनावरांचा चारा, पालेभाज्या, फळभाज्यांचे कुजून मोठे नुकसान होते. अवकर्षण, अतिआर्द्रता, शुष्कता, शीतता व उष्णता यांचाही शेतीमालाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. वातावरणातील या बदलांचा यशस्वीपणे मुकाबला करू शकतील अशा पीक वाणांच्या संशोधनावर यासाठी अधिक जोर देण्याची अभूतपूर्व आवश्यकता निर्माण झाली आहे. 

हवामान बदलाचे परिणाम
हवामानात होत असलेल्या प्रतिकूल बदलांमुळे नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रामधील पूर, अतिवृष्टी, दुष्काळ आणि आता अवकाळी पावसाने उडविलेली दाणादाण ही याच बदलांची परिणती आहे. नफाकेन्द्री, शहरी औद्योगिक विकासाच्या अतिरेकी हव्यासामुळे बिघडत चाललेल्या नैसर्गिक समतोलाचा हा परिपाक आहे. वारेमाप वृक्षतोड, जंगलांवर व जैववैविध्यावर क्रूर हल्ले, कार्बनचे अमर्याद उत्सर्जन, प्रदूषण, नैसर्गिक खनिजांचा बेसुमार उपसा व वापर, तापमानात अभूतपूर्व वाढ यांसारख्या मानवी उपद्‍व्यापांची किंमत आज शेतकऱ्यांना मोजावी लागत आहे. उद्या अख्ख्या मानवजातीला याची किंमत मोजावी लागणार आहे. आजच्या या ‘आपत्ती’ म्हणजे खरेतर वेळीच सावध होण्यासाठी निसर्गाने आपल्याला दिलेल्या चेतावण्याच आहेत. सर्वांनीच या ‘चेतावण्या’ गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. निसर्गाचा विध्वंस रोखला पाहिजे.

डॉ. अजित नवले : ९८२२९९४८९१ 
(लेखक अखिल भारतीय किसान 
सभेचे  राज्य सरचिटणीस आहेत.)


इतर संपादकीय
जुने ते सुधारा; नवे ते स्वीकाराकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी...
सत्ता अन् जीवन संघर्षराज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून २२ दिवस...
साखर निर्यातीची सुवर्णसंधीपावसाळी स्थितीमुळे निर्यात न होऊ शकलेल्या साखर...
अनुदान नव्हे; योगदानच वाचवेल शेतीलावातावरण बदल आणि कोसळणाऱ्या पाऊस धारा अथवा कडक...
नैसर्गिक आपत्तीपासूनचा धडा काही वेदनांमधून सुखद आनंदप्राप्ती होते, तर काही...
पर्यायाविना निर्णय घातकच! ऑ नलाइन राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) अधिक...
मिशन ‘जल व्यवस्थापन’सर्वसाधारणपणे चांगल्या पाऊसमान काळात शासन...
ग्रेटाचा सवाल : तुमची हिंमत तरी कशी...गत वर्ष दीड वर्षाच्या अल्प काळात स्वीडनच्या...
शेळी-मेंढी विकासात ‘नारी’च अग्रेसरउपासनी समितीस आढळून आले, की ऑक्टोबर २०००   ...
आता मदार रब्बीवरबऱ्याच दिवसांनंतर हवामान विभागाकडून एक सुखद अंदाज...
‘अस्थमा’ची राजधानीदरवर्षीच दिवाळीनंतर दिल्लीतील प्रदूषणाचा विषय...
शेळ्या-मेंढ्यांच्या उत्पादनवाढीचा...‘काटक माडग्याळ मेंढीचे होणार संवर्धन - सांगली...
मनस्ताप की दिलासाएका पाठोपाठ एक निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाने...
आपत्ती नव्हे चेतावणीअवकाळी पावसाने घातलेल्या थैमानामुळे हातातोंडाशी...
विजेचे भयजुलैअखेरपासून राज्यात सुरू झालेला पाऊस नोव्हेंबर...
भातपीक नुकसानीचा पंचनामा कोराचजुलै-ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टी, पूर परिस्थिती,...
जनजागृतीतूनच होईल पर्यावरण संवर्धनरासायनिक कीडनाशके व खताचा बेसुमार वापर...
वसुलीचा फतवाiग्रामीण भागात शेतकऱ्यांना पतपुरवठ्याचे उद्दिष्ट...
लाटेविरुद्धचा यशस्वी प्रवासमागील अडीच ते तीन दशकांच्या शेतीवर दृष्टिक्षेप...
पर्यावरणीय समस्यांकडे कमालीचे दुर्लक्षराज्यातील नैसर्गिक वनांनी समृद्ध पर्वत रांगा,...