agriculture news in marathi agrowon special article on Maharashtra din regarding co-operative movement. | Agrowon

सहकारी चळवळीच्या शुद्धीकरणाची आवश्यकता

राजू शेट्टी
शनिवार, 1 मे 2021

अदानी, अंबानींसारखे भांडवलदार आमच्या शेतीला आणि शेती व्यवसायाला गिळंकृत करतील म्हणून रडत बसण्याऐवजी, त्यांच्याशी स्पर्धा करू शकतील अशा सहकारी संस्था उभ्या करून, शेतकऱ्यांची ताकद एकत्रित करून त्यांना तोंड देणे सहज शक्य आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त सहकार क्षेत्राचा घेतलेला हा धांडोळा...  

सहकारी चळवळीने सारे विश्वच व्यापून टाकले आहे. ‘एकमेकां साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ...’, या उक्तीने सहकारी चळवळीला एक मूर्त स्वरूप आणले. महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य आहे. ज्या भागामध्ये सहकार चळवळ रुजली त्या भागाची लक्षणीय प्रगती झाली. त्याचं कारण आधीच भारतीय शेती तोट्याची आहे. अशावेळी वर्षानुवर्षे या शेतीत चिवटपणे टिकून राहिलेल्या शेतकऱ्‍यांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्‍या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी सहकाराचा आधार घेतला. स्वातंत्र्यपूर्व काळात शेतीला खासगी सावकारीने बरबटलेले होते. त्यातून शेतकऱ्‍यांना बाहेर काढण्यासाठी पतपुरवठ्याचे जाळे निर्माण करणे आवश्यक होते. ती गरज विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांनी पूर्ण केली. आज अनेक गावांमध्ये १२५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या सेवा सोसायट्या दिमाखाने उभ्या राहिलेल्या दिसतात.

अशा उभ्या राहिल्या संस्था
बाजार समित्या याच उद्देशाने विकसित केल्या गेल्या. व्यापाऱ्‍यांच्या कचाट्यातून शेतकऱ्यांना सोडवण्यासाठी बाजार समित्यांची निर्मिती झाली. शेतकरी आपला शेतमाल बाजारामध्ये हक्काने विकू लागला. त्याचा शेतमाल खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा लागली. त्यांच्यातील स्पर्धेमुळे शेतकऱ्याला चांगला भाव मिळून खऱ्याअर्थाने न्याय मिळू लागला. याच क्रमाने पाणी पुरवठा संस्था, सूतगिरण्या, साखर कारखाने सहकारी तत्त्वावर उभे राहिले.

सहकारी संस्था राजकारणाच्या गर्तेत 
पाणी, वीज, यांत्रिकी अवजारे, शेतीमाल प्रक्रिया उद्योग, पतपुरवठा, विपणन व बाजार व्यवस्था या मूलभूत सुविधांची जोड दिल्यामुळेच तोट्याची शेती काही अंशी नफ्यात येऊ लागली आणि सर्व सुविधा सहकारी संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेती इतर विभागापेक्षा तुलनेने समृद्ध झालेली दिसते. शेती बागायती झाली की आपोआप गोठ्यामध्ये जनावरांची संख्या वाढते. सहकारी तत्त्वावर दूध प्रक्रिया व विक्री करणाऱ्या संस्था उभ्या राहिल्या. सुरुवातीच्या काळामध्ये सहकार जोमाने वाढला, पण हळूहळू त्याच्यामध्ये अपप्रवृती शिरू लागल्या. राजकारण्यांना सहकारातला पैसा खुणावू लागला आणि बघता-बघता सहकारी संस्था या राजकारणाच्या गर्तेत अडकल्या. साखर कारखाने, सूतगिरण्या, जिल्हा मध्यवर्ती बँका राजकारणाचे अड्डे बनले. आणि त्यांच्या प्रगतीला ब्रेक लागला. जिल्हा कार्यक्षेत्र असणाऱ्या २९ भूविकास बँका होत्या. १२ लाखांहून अधिक शेतकरी सभासद होते या बँकेची एकूण संपत्ती १२०० कोटी होती. आज त्याचे सांगाडे उभे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी बँकाच्या दारात कर्जासाठी हेलपाटे घालावे लागतात. महाराष्ट्रात दोन लाख १८ हजार ३२० सहकारी संस्थांमध्ये सहा कोटी सभासद आहेत. म्हणजेच ५० टक्के जनता कोणत्या ना कोणत्या सहकारी संस्थेची सभासद आहे. असे असले तरीसुद्धा राज्यातील १०६ बँका अवसायनात निघालेल्या आहेत. १० बँकावरती प्रशासक आहे. त्यामुळेच कर्जासाठी शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागते. तीच अवस्था दूध संघांची आहे. राज्यात एकूण ३१३४५ दूध संस्था आहेत. यातील १६७७९ दूध संस्था तोट्यात आहेत. ही स्थिती सुधारण्यासाठी सहकारामध्ये शुद्धीकरणाची आवश्यकता आहे. 

 कठोर कायद्यांची आवश्यकता
सहकारी संस्था स्थापन करणारी पहिली व दुसरी पिढी ही विश्वस्ताप्रमाणे वागत होती. पण, यानंतरच्या पिढ्या सहकारी संस्था म्हणजे आपल्या बापजाद्यांची मालमत्ता असे समजून कारभार करू लागली. म्हणून ही अवस्था निर्माण झाली. विश्वस्त जर का मालकाप्रमाणे वागू लागले, तर त्यांच्या मुसक्या वेळीच आवळल्या पाहिजेत, असे कठोर कायदे करण्याची आवश्यकता आहे. सहकारी संस्था म्हणजे कार्यकर्ते निर्माण करणारे व पोसणारी खाण अशा नजरेने बघण्याचा दृष्टिकोन राजकीय पक्षांनी बदलला पाहिजे. सहकारी संस्थांवर बौद्धिक क्षमता असणारे संचालक मंडळ निवडून त्यांच्यावर ही जबाबदारी टाकली तर निश्चितच आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी सहकारी संस्थेच्या सभासदांनी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. भविष्यामध्ये भांडवलदारांचे मोठ्या प्रमाणामध्ये शेतीवर होणारे आक्रमण थांबवून त्यांना तोडीस तोड व्यवस्था निर्माण करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची क्षमता सहकारामध्ये निश्चितच आहे. त्याचा उपयोग करून घेणे गरजेचे आहे.

एकत्रित शेतीच्या नियोजनाची गरज
शेतीचे होणारे लहान-लहान तुकडे ही आपल्या समोरची सगळ्यात मोठी समस्या आहे. जेवढा शेतीचा आकार लहान, तेवढा व्यवस्थापन खर्च जास्त हे गणित आहे. तेव्हा हे तुकडे एकत्रित करून जमिनीचा आकार मोठा करून व्यवस्थापन खर्च कमी करता येणे शक्य आहे. त्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी विचारविनिमय करून एकावेळी एकाचप्रकारचे पीक घेतले तर मशागत, खते, औषधे, अवजारे, यांत्रिकीकरण, लागण, तोडणी, मळणी एकत्रित केले तर हा खर्च निम्म्यापर्यंत आणणे शक्य आहे. यासाठी सामूहिक शेतीची गरज नाही तर एकत्रित शेतीच्या नियोजनाची गरज आहे. सहकाराच्या माध्यमातून हे सहज शक्य आहे.

अद्ययावत संस्थांची गरज 
ज्या वेळी देशांतर्गत बाजारपेठेच्या मागणीपेक्षा उत्पादन वाढते, तेव्हा निर्यातक्षम उत्पादने निर्यात करणे हाच उपाय राहतो. त्यासाठी पॅकिंग, ग्रेडिंगची व्यवस्था, साठवणूक व्यवस्था, शीतगृहे यांची साखळी निर्माण झाली तर शेतकरी व्यापारावर अवलंबून न राहता स्वतः निर्यातदार होऊ शकतो. त्यासाठी वरील सुविधा पुरवणाऱ्या अद्ययावत सहकारी संस्था तयार होणे गरजेचे आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणायचे, ‘‘कच्चा माल मातीचे भावे, पक्का होताची चौपटीने घ्यावे.’’ शेतकऱ्यांनी नुसताच कच्चा माल पिकवण्यापेक्षा सहकाराच्या माध्यमातून त्याच्यावर प्रकिया करून पक्का केला आणि तो विकला तर शेतकऱ्यांना जादा फायदा होईल. 

जगाची बाजारपेठ काबीज करा
आज गुजरातच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दूध घेऊन त्याच्यावर प्रक्रिया करून त्याची उत्पादने ‘अमूल’ जगभरात विक्रीस पाठवते. त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये उत्पादन होणारे दूध, फळे, भाजीपाला, मासे, अंडी यावर प्रक्रिया करून जगाची बाजारपेठ काबीज करणे अशक्य आहे, अशातला भाग नाही. सहकारातून हे शक्य आहे. महाराष्ट्र जेव्हा पंच्याहत्तरीचा होईल, तेव्हा अशा संस्था आणि शेतकरी कंपन्या दिमाखाने उभ्या असतील. हेच स्वप्न प्रत्येक मराठी माणसाने बघितले 
पाहिजे.

राजू शेट्टी

(लेखक स्वाभिमानी 
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत.)


इतर संपादकीय
भारतातील मोटार गाड्यांसाठी इथेनॉल...पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचा कार्यक्रम...
सोयाबीन विक्री करा जरा जपूनचमागील दोन महिन्यांपासून सोयाबीन हे पीक देशभर...
खरे थकबाकीदार ‘सरकार’च  वीजबिलाची थकबाकी ७९ हजार कोटींच्या घरात पोहोचली...
देवगड ‘राम्बुतान’हापूस आंब्याच्या प्रदेशात चक्क परदेशी फळ ‘...
‘कृषी’चे धडे घेऊनच करावी लागेल शेतीदेशात तथा महाराष्ट्रात आजही सुमारे ६० ते ६५...
हतबलतेचा अंत नका पाहूसोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर...
दूध आणि ऊस उत्पादकांच्या लुटीचे रहस्यसाखर उद्योग व दुग्ध व्यवसायामध्ये कमालीचे...
शर्यतीतील बैलांवरील ताणतणाव नियोजनबैलगाडा शर्यतीसाठी अत्यंत पद्धतशीरपणे ...
रीतसर नफ्याचा घोटाळाशेती हा असा व्यवसाय आहे, की ज्यामध्ये शेतकरी...
व्रतस्थ कर्मयोगीप्रसिद्ध ऊसतज्ज्ञ डॉ. ज्ञानदेव गंगाराम हापसे...
शुभस्य शीघ्रम्शालेय अभ्यासक्रमात कृषीचा समावेश करण्याच्या...
वाढत्या नैसर्गिक आपत्ती गांभीर्याने...पर्यावरणाच्या कडेलोटाच्या कुंठितावस्थेचं ...
शुद्ध खाद्यतेलासाठी हेतूही हवा शुद्धपामची लागवड आणि तेलनिर्मिती वाढविण्यास केंद्र...
कात टाकून कामाला लागानागपूर येथील `केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन...
घातक पायंडाजनुकीय बदल केलेल्या (जीएम) सोयापेंड आयातीला...
ऊस रसापासून थेट इथेनॉल निर्मितीचे हवे...जागतिक पातळीवर उसाच्या थेट रसापासून ३२ टक्के व...
‘गोल्डनबीन’ची झळाळी टिकवून ठेवा मागील दशकभरापासून राज्यात सोयाबीन (गोल्डनबीन)...
दिलासादायक दरवाढ खरे तर यंदाच्या साखर हंगामात साखरेच्या किमान...
अन्नप्रक्रिया योजना ठरताहेत मृगजळ भारतात उत्पादित शेतीमालापैकी ४० टक्के माल सडून...
शेतकऱ्यांच्या जिवांशी खेळ थांबवा सुमारे चार वर्षांपूर्वी २०१७ च्या खरीप हंगामात...