मालावी हापूसवर तेथील कुपोषितांचाच हक्क

एफएओ आणि डब्ल्यूएचओ या दोन जागतिक संघटनांच्या पुढाकारातून मालावी या राष्ट्रातील शेतीत जीवनसत्त्व ‘अ’चा भरपूर स्रोत असणाऱ्या भारतीय ‘अल्फान्सो’ (हापूस) आंब्याला येथील शेतीमध्ये फळबागाच्या माध्यमातून स्थान देण्याची कल्पना पुढे आली. तेथील शेतकऱ्यांना तंबाखू आणि भागांच्या शेतीला एक चांगला पर्याय देण्याबरोबर तेथील कुपोषणही दूर व्हावे हा त्यामागील मुख्य उद्देश होता.
agrowon editorial
agrowon editorial

कोकणच्या हापूस सारखाच असलेला दक्षिण आफ्रिकेतील ‘मालावी हापूस’ मुंबईमध्ये १२ नोव्हेंबरला पोचला तेव्हा मला मुळीच आश्‍चर्य वाटले नाही. मालावी हे आफ्रिका खंडामधील एक गरिब राष्ट्र. झांबिया, टांझानिया आणि मोझंबिक या राष्ट्रांच्या सीमा असलेल्या मालावीचा एक तृतीयांश भाग हा मालावी सरोवराने व्यापलेला आहे. चार वर्षांपूर्वी या देशाला भेट देण्याची संधी मला मिळाली होती. भयंकर कुपोषणाचा शाप असलेला हा छोटा देश घनदाट जंगल आणि आदिवासींच्या विविध जाती जमातीने समृद्ध आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय. ऊस, बटाटा आणि मका ही तेथील मुख्य पिके असली त्या राष्ट्रात तंबाखू आणि भांग ही पिकेही मोठ्या प्रमाणात घेतली जातात. येथील तरुणामध्ये असलेली तंबाखू आणि चरसची व्यसनाधीनता, वाढती भूक आणि कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू या समस्यांपासून तसेच शेतकऱ्यांना तंबाखू आणि भांगेच्या शेतीपासून दूर ठेवण्यासाठी ‘जागतिक अन्न व शेती संघटना’ (एफएओ) तसेच ‘जागतिक आरोग्य संघटना’ (डब्ल्यूएचओ) यांनी पुढाकार घेऊन जीवनसत्व ‘अ’चा भरपूर स्तोत्र असणाऱ्या भारतीय ‘अल्फान्सो’ (हापूस) आंब्याला येथील शेतीमध्ये फळबागाच्या माध्यमातून स्थान देण्याची कल्पना पुढे आली. त्यानुसार शासनाच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना शिक्षित करण्यात आले. 

भारतामधून आयात केलेली हापूसची रोपे येथे यशस्वीपणे जगवून वाढवण्यात आली. हापूसच्या रोपवाटिका तयार झाल्या आणि मालावी मधील शेतकऱ्यांना तंबाखू आणि भांग शेतीला पर्याय म्हणून ही रोपे मोफत वाटण्यात आली, सोबत आर्थिक मदत आणि निर्यातीची हमीही देण्यात आली. कुपोषण निर्मूलनासाठी असलेला हा उत्तम पर्याय सोबत आर्थिक उत्पन्न यामुळे मालावी या देशातील तंबाखू आणि भांगेची शेती झपाट्याने कमी होऊ लागली. त्या जागी मालावी हापूसच्या बागा आंब्याने लगडू लागल्या. २०१४ पासून सुरू झालेल्या या प्रयत्नाला चार, पाच वर्षांतच उत्तम यश आले आणि परिणाम म्हणून आपणच भेट दिलेला कोकणचा हापूस पुन्हा आपल्याकडेच मालावी हापूस म्हणून २००० रुपये डझन या भावाने एक महिन्यापूर्वी परत आला तो या हमीवर, की आपल्या हापूसच्या हंगामावर याचा काहीही परिणाम होणार नाही. कारण मालावी हापूसचा हंगाम ऑक्टोबरला सुरू होऊन जानेवारीला संपतो. हापूससाठी हवा असलेला दमटपणा, आर्द्रता, जमिनीचा प्रकार जो कोकणात उपलब्ध आहे, तसाच या राष्ट्रात असल्याने हा प्रयोग जास्त यशस्वी झाला. ‘आणले कलम आणि लावले’ या पद्धतीने मालावी हापूस निर्माण झालेला नाही. यासाठी येथील कृषी शास्त्रज्ञांनी हापूसच्या भारतामधील जन्मापासून ते त्याच्या उत्कृष्ट बहरापर्यंतचा अभ्यास केला. यामध्ये इस्राईलच्या कृषी शास्त्रज्ञांची त्यांना खूप मदत झाली. आपल्याकडच्या पंजाबी शेतकऱ्यांनी हरितगृहातून फूलनिर्मिती बरोबरच मोठ्या प्रमाणावर फळबांगाची निर्मितीही येथे केली आहे. आज अनेक मराठी कृषी पदवीधर येथे काम करतात.पंधराव्या शतकात पोर्तुगीज गोव्यात आले आणि तेथे स्थायिक झाले. त्या वेळी त्यांना स्थानिक रायवळ आंबे खूप आवडले. त्याच्या पेट्या त्यांनी पोर्तुगालमध्ये पाठवल्या; पण चोखून खाणारे फळ असल्यामुळे लोकांना त्याची चव आवडूनसुद्धा ते पसंद पडत नव्हते. गोव्यामधील एका धर्मगुरूने त्याच्या चर्चच्या आवारात स्थानिक आंब्याच्या जातीवर विविध कलमांचे प्रयोग करून हापूस ही कापून फोडी करून खाता येणाऱ्या आंब्याची नवीन प्रजाती तयार केली. तो १५५० ते १५७५ चा काळ होता. अल्फान्सो हा गोव्याचा पहिला पोर्तुगीज गव्हर्नर म्हणून त्याच्या सन्मार्थात हे नामकरण झाले. 

मुंबईच्या फळ बाजारात मालावी येथून ५५०० किमी प्रवास करून आलेला हा आंबा आजही तेवढ्याच जोमात विक्रीसाठी उपलब्ध आहे. हापूससारखाच सुवासिक आणि तेवढेच स्वादिष्ट असलेले हे फळ सध्यातरी उच्चभ्रूच्या वस्तीला आहे. फळांचे आहारामधील महत्त्व मी चीन आणि जपानमध्ये पाहिले. २००८च्या ऑलिंपिकला येणाऱ्या हजारो खेळाडूंना ताज्या फळांचा पुरवठा व्हावा म्हणून चिनी शासनाने २००५ पासूनच शेतकऱ्यांना फळे उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि लोकांच्या दैनंदिन आहाराचा तो एक भागही बनविला. कुठलेही बालक आणि विद्यार्थी कुपोषित राहू नये याची काळजी घेतली गेली. जपानमध्ये सुद्धा विविध फळांना मिळणारा सन्मान पाहून मी थक्क झालो. कितीही किंमत असली तरी तेथील लोक त्यांच्या आहारात विविध फळांचा समावेश करतातच. दोन महिन्यांपूर्वी जपानच्या दोन वरिष्ठ मंत्र्यांना फळांच्या पेट्या लाच म्हणून स्वीकारल्याबद्दल राजीनामा द्यावा लागला, यात आंब्याची सुद्धा एक पेटी होती हे विशेष! पैशापेक्षाही फळांना जास्त महत्त्व देणारा हा देश जगा वेगळाच म्हणून १०० रुपयांचे एक केळे आणि संत्री खाताना मला जराही वाईट वाटले नाही. ज्या वेळी आपण अशा राष्ट्रांमध्ये फळांचे आहारामधील महत्त्व पाहतो तेव्हा आपल्या देशातील फळ उत्पादन आणि त्याची गरिबांना न होणारी उपलब्धता पाहून मन निराश होते. नागपूरची संत्री चीनला निर्यात होणार त्याचप्रमाणे कोकणामधील हापूसचेही तसेच. मुंबईला १६० रुपये किलो दराने सीताफळ कोण गरीब खरेदी करणार? गरिबांनी फक्त केळेच खावे का? 

केंद्र सरकारचे पोषण अभियान उपक्रम १८ डिंसेबर २०१७ पासून तीन वर्षांसाठी राबविण्यात येत आहे. यासाठी तब्बल ९०७६ कोटी बजेट राखीव आहे. हा उपक्रम म्हणजे फक्त शिजवलेल्या डाळ-भाताचे वाटप नव्हे, तर प्रत्येक बालक, गरोदर आणि स्तनदा माता यांना यांच्या आहारात सहा पोष्टिक घटकांचा दररोज दोन वेळा समावेश असावा आणि त्यामध्ये फळे आणि हिरव्या भाज्या विपूल असाव्यात यासाठी आहे. या उपक्रमामधून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त फळे आणि भाज्यांचे उत्पादन घेऊन ते शासनाच्या माध्यमातून गरिबांच्या ताटात जावे ही सुद्धा अपेक्षा आहे, पण असे होत नाही. मालावीचा हापूससुद्धा त्या गरीब आफ्रिकन राष्ट्राच्या लाखो कुपोषित बालकांच्या मुखात प्रथम जाऊन नंतर त्यातून शेतकऱ्यांना दोन पैसे मिळावे या उद्देशाने झाडावर लगडला पण तेथील गरिबांच्या मुखात जाण्याऐवजी आज आम्ही त्याचा आस्वाद घेत आहोत. त्यामुळेच मालावीचा हापूस हातात घेताना माझ्याकडे हजारो कुपोषित आफ्रिकन मुले पाहत आहेत, असा काहीतरी भास मला होत होता.

डॉ. नागेश टेकाळे  : ९८६९६१२५३१ (लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com