सावधान! ‘मॉन्सून ब्रेक’चे संकेत

कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील पश्चिमेकडील भाग वगळता बहुतेक उर्वरित जिल्ह्यांत पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमीच आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मॉन्सूनचा खंडित प्रवाह पुन्हा एकदा जोर पकडण्याची शक्यता आहे. त्यातून राज्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल, अशी आशा आहे.
संपादकीय
संपादकीय

नैऋ©त्य मॉन्सूनचा कालावधी सामान्यपणे १ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत गणला जातो. याचा अर्थ असा मुळीच नाही, की देशभरात सर्वत्र १ जूनला मॉन्सून हजर होतो आणि ३० सप्टेंबरला त्याचा पाऊस संपतो. या वर्षी तर मॉन्सूनला पश्चिम राजस्थानला पोचायला, म्हणजेच सबंध देश व्यापायला जुलै महिन्याची १९ तारीख उजाडली. देशाच्या विविध भागांत मॉन्सूनच्या आगमनाच्या तसेच परतीच्या तारखा वेगवेगळ्या असल्या; तरी हवामानशास्त्रज्ञ मॉन्सूनचा सर्वसाधारण कालावधी १ जून ते ३० सप्टेंबर असा मानतात. एका मॉन्सूनची दुसऱ्या वर्षीच्या मॉन्सूनशी तुलना करण्यासाठी आणि मॉन्सूनसंबंधी वेगवेगळ्या प्रकारची आकडेवारी तयार करण्यासाठी अशा निश्चित तारखा हवामानशास्त्रज्ञांना सोयीच्या असतात.

मॉन्सूनचा संथ प्रवास महाराष्ट्रात साधारणपणे जून महिन्यात पेरण्या केल्या असतात आणि सामान्य परिस्थितीत जुलै महिना संपत येतो तेव्हा पिके चांगली वाढलेली असतात. म्हणून जुलैच्या अखेरीस मॉन्सूनच्या चार महिन्यांपैकी पहिले दोन महिने प्रत्यक्षात कसे होऊन गेले आणि बाकीचे दोन महिने कसे राहण्याची शक्यता आहे, याचा एकंदर आढावा घेणे फायद्याचे असते. यंदाचा मॉन्सून केरळवर मुळातच एक आठवडा उशिराने आला. पण तसे पाहता, मॉन्सूनचे जोरदार असे आगमन यावर्षी झालेच नाही. तेथून पुढेही महाराष्ट्राच्या अनेक भागांत पोचायला त्याने आणखी उशीर केला. या वर्षी सबंध महाराष्ट्रात उन्हाळा अतिशय कडक आणि शुष्क राहिला होता. राज्यातील अनेक ठिकाणी तर या वर्षीचा पहिला पाऊस जुलै महिन्यात पडला. या सर्व कारणांमुळे महाराष्ट्रातील अनेक भागांत पेरण्या नेहमीच्या वेळी होऊ शकल्या नाहीत. 

मॉन्सून ट्रफ मॉन्सूनच्या एकंदर पावसाची तीव्रता अधूनमधून कमी-जास्त होत असते. बरेच दिवस चांगला पाऊस पडून गेल्यावर उघडीप होते. ही एक सामान्य बाब आहे. पिकांना सूर्यप्रकाशाची गरजदेखील असते. पण, कधीकधी वातावरणात अशी एक विशिष्ट परिस्थिती निर्माण होते जिच्यामुळे देशभरावरील पावसाचे प्रमाण खूप घटते. याचे कारण हे असते, की ज्याला ‘मॉन्सून ट्रफ’ म्हणतात. तो कमी दाबाचा पट्टा त्याच्या नेहमीच्या जागी, म्हणजे मध्य किंवा उत्तर भारतावर न राहता हिमालय पर्वतरांगांच्या पायथ्याशी जाऊन बसतो. या परिस्थितीला हवामानशास्त्रीय परिभाषेत मॉन्सूनमधील खंड किंवा ब्रेक असे नाव दिले जाते. मॉन्सूनचा प्रवाह खंडित होणे हीसुद्धा काही असामान्य घटना नसते. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत तसे अनेकदा होत असते. पण, जेव्हा अशा प्रकारच्या खंडाचा कालावधी बराच लांबतो, तेव्हा त्याचे काही ठळक परिणाम दिसू लागतात. एक तर, हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या प्रदेशावर मुसळधार सरी कोसळत राहतात. अर्थात, पावसाचे हे सगळे पाणी नद्यांतूनच वाहून जाणार असते. त्यामुळे बिहारमधील कोसी नदीला आणि आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीला महापूर येतो. लाखो लोकांना या पुराचा तडाका बसतो, त्यांची घरेदारे, पाण्याखाली जातात, शेतातील पिके नष्ट होतात. जेव्हा मॉन्सूनच्या प्रवाहात खंड पडतो तेव्हा त्याचे दुसरे लक्षण म्हणजे दक्षिणेकडील तमिळनाडू आणि केरळ राज्यात जास्त पाऊस पडतो. तिसरे लक्षण हे की, देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर चांगली पर्जन्यवृष्टी होते. यंदाच्या जुलै महिन्यात मॉन्सूनच्या प्रवाहात खंड पडल्याचे हे तिन्ही संकेत स्पष्ट दिसून आले. पूर्वोत्तर भारतात पूरपरिस्थिती, तमिळनाडूवर अनपेक्षित पाऊस, केरळवर अतिवृष्टी, कोकणात चांगला पाऊस आणि देशावर इतरत्र पावसाचा अभाव, अशी परिस्थिती जुलै महिन्यात पाहायला मिळाली.

१९ टक्के कमी पाऊस जुलै महिन्याच्या मध्यंतरी महाराष्ट्रावर जो काही पाऊस पडला तो बराचसा स्थानिक आणि वादळी स्वरूपाचा होता. मॉन्सूनने आणलेले बाष्प आणि काहीसे वाढीव तापमान, यामुळे वादळी मेघांच्या निर्मितीसाठी वातावरण पोषक होते. अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह आणि विजांच्या लखलखाटात जोरदार सरी कोसळल्या. त्यानंतर आकाश पुन्हा स्वच्छ झाले. उपग्रहाच्या चित्रांतून हे सर्व स्पष्टपणे दिसले होते. मॉन्सूनच्या पावसाचे स्वरूप निराळे असते. मॉन्सूनचा पाऊस शांत, हलका, रिमझिम आणि दीर्घकाळ पडत राहतो. संथ पावसाचे पाणी जमिनीत जिरते. अशा प्रकारचा पाऊस, जो शेतीसाठी योग्य असतो, यावेळी महाराष्ट्राला फारसा लाभला नाही. भारतावरील एकंदर पर्जन्यमानाची आकडेवारी सांगते की, १ जून ते २४ जुलै २०१९ पर्यंतच्या कालावधीत भारतावरील सरासरी पाऊस सामान्यापेक्षा १९ टक्के कमी पडला आहे. हा आकडा निराशाजनक आहे आणि चिंताजनकही. आता ऑगस्ट हा साधारणपणे भरपूर पावसाचा महिना गणला जात असला, तरी त्याच्या तुलनेत सप्टेंबरचा पाऊस कमीच राहतो. कारण, त्या वेळी मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालेला असतो. देशावरील पर्जन्यमानातील आतापर्यंतची १९ टक्के कमतरता भरून निघावी, अशी आपली अपेक्षा असेल तर मॉन्सूनच्या उर्वरित कालावधीत सरासरीहून १९ टक्के अधिक पाऊस पडला पाहिजे. हे समजायला एखादे मॉडेल बनवायची आवश्यकता नाही. ते साधे गणित आहे. पण, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत अशा प्रकारचा भरपूर पाऊस पडेल, असे भाकीत अजूनपर्यंत तरी कोणी वर्तवलेले नाही. म्हणून ही कमतरता भरून निघायची शक्यता सध्या तरी कमीच भासते. 

दिलासा मिळेल? देशाच्या सरासरी परिस्थितीपेक्षा महाराष्ट्राच्या किती तरी जिल्ह्यांची परिस्थिती खूप बिकट आहे. १ जून ते २४ जुलै २०१९ दरम्यानचे पर्जन्यमान यवतमाळ जिल्ह्यात सरासरीपेक्षा ५९ टक्के कमी होते, गोंदियात ५० टक्के, वाशिममध्ये ४९ टक्के, अमरावतीत ४६ टक्के आणि वर्धा, भंडारा व सोलापूरमध्ये ४४ टक्के कमी होते. फक्त कोकणात आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील भागात पाऊस चांगला झालेला आहे. राज्याच्या बहुतेक उर्वरित जिल्ह्यांत पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमीच आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मॉन्सूनचा खंडित प्रवाह पुन्हा एकदा जोर पकडण्याची शक्यता आहे. त्यातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल, अशी आशा आहे. तसे झाले तर परिस्थितीत काहीशी सुधारणा होऊ शकेल.  

डॉ. रंजन केळकर ः ९८५०१८३४७५ (लेखक भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी महासंचालक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com