agriculture news in marathi agrowon special article on marathi rajbhasya din vishesh | Agrowon

मराठी भाषेला जिवंत ठेवणारा शेतकरी

भरतकुमार गायकवाड 
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

गेल्या अनेक पिढ्यांनी मराठी भाषेला जगवलंय पण पुढच्या पिढ्या मराठीला जगवतील का, हा खरा प्रश्न आहे. परभाषेला कमालीचे महत्त्व देऊन मातृभाषेला नाकारणारे राज्यातील असंख्य विद्वान मंडळीच मराठीचे मारेकरी आहेत. तरीही परभाषेच्या वादळात मायमराठीला वाऱ्यावर न सोडता घट्ट पकडून ठेवलंय ते इथल्या गोरगरीब कष्टकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनीच!
 

आज मराठी राजभाषा दिन. महाराष्ट्राची मातृभाषा मराठीच आहे, पण गेल्या काही वर्षांपासून अगदी ग्रामीण भागासह शहरात, महानगरात इंग्रजीचे वारेच नाही, तर वादळ निर्माण झालेले आहे. परभाषेच्या प्रेमात उच्चशिक्षित वाहूनच गेलेले दिसतात. त्यांची मुले दिमाखात चमकणाऱ्या मोठ्या इंग्रजी शाळेत शिकत आहेत. राज्यात अशा इंग्रजी शाळा बेसुमार वाढल्या आहेत. दुसऱ्या बाजूचा विचार केला, तर दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणारी आपली मायमराठी अजूनही उपेक्षितच आहे. नवीन मराठी शाळांच्या मान्यतेसाठी प्रचंड नियमावली लादण्यात आली आहे. विद्यार्थी संख्येअभावी आहेत त्या मराठी शाळाही बंद पडत आहेत. तरीही मराठी माणसांचा कोरडा अभिमान संपत नाही.

बहुसंख्य लोकांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेती आहे. हा व्यवसाय जोपासण्यासाठी शेतकरी जिवाचे रान करतात. खूप श्रीमंत होण्याच्या त्यांच्या नसतातच अपेक्षा. आपल्या किमान गरजा भागाव्यात हाच त्यांचा घाम गाळण्याचा प्रामाणिक हेतू असतो. मातीला खतपाणी घालून शेती फुलवावी तसे शेतकऱ्यांनी भाषेलाही खतपाणी घातलेले आहे. भाषेच्या समृद्धीसाठी शेतकऱ्यांनी असंख्य प्रयत्न केलेले आहेत. ग्रामजीवनातील शेतकरी वाघ्या-मुरळी होऊन जागरण घालतात, तर कधी ते गोंधळ घालतात. भविष्य सांगणारे कुडमुडे जोशी, पांगुळ हे शेतकरी कष्टकरीच आहेत. समाजमनाला आपल्या विनोदाच्या माध्यमातून निखळ आनंद देणारे बहुरूपी, पोतराज, वासुदेव, मसणजोगी तसेच तमाशात काम करणारे कलावंत ही सर्व मंडळी भाषावृद्धीची बलस्थाने आहेत. त्याचबरोबर दिवसभर शेतात काम करून थकले- भागलेले  शेतकरी विरंगुळा म्हणून भक्तिभावाने गावातील मारुतीच्या मंदिरावर मोठ्या संख्येने जमा होतात. परंपरेने चालत आलेली मराठी भजने गातात. कीर्तनाच्या माध्यमातूनही मराठी भाषेची अखंडपणे सेवा करणारा महत्त्वाचा घटक म्हणून शेतकऱ्यांकडे पाहिले जाते. अशा विविध माध्यमांद्वारे जशी शेतकऱ्यांकडून भाषेची सेवा घडते तशी सेवा सुशिक्षितांकडून होताना दिसत नाही.

ग्रामजीवनातील महिला कृषिकार्य करताना तसेच सण -उत्सवप्रसंगी विविध लोकगीते गातात. जात्यावरची गाणी, भुलई खेळतानाची गाणी, उखाणे यांच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांचेही भाषा संवर्धनासाठी मोलाचे योगदान आहे. ग्रामीण भागातील लहान मुले विविध बालगीते गातात. आजीपासून मिळालेल्या गोष्टींचा, गाण्यांचा वारसा ते पुढे जतन करण्याचा प्रयत्न करतात. अशाप्रकारे शेतकरी कुटुंबानेच पिढ्यानपिढ्या मराठी भाषा प्रवाहित ठेवण्याचे काम केलेले आहे आणि भविष्यातही ते टिकून राहील. 
मी आठवीत असतानाची गोष्ट. नुकताच खेड्यातून शहरातल्या शाळेत शिकायला गेलो. एका दिवशी सकाळपासूनच पाऊस सुरू झाला. मी वसतिगृहात राहत होतो. वसतिगृहात बहुसंख्य शेतकऱ्यांची मुलं. पावसातच एका रांगेत इमारतींचा आडोसा घेत आम्ही शाळेत पोचलो. वर्गातली बहुसंख्य मुलं कर्मचाऱ्यांची होती. कोणी रेनकोट घालून, कोणी ऑटो तर कोणी गाडीत बसून शाळेत येत होते. शाळा भरली पहिला तास सुरू झाला. भिजत आलेल्या मुलांच्या अंगात हुडहुडी भरली होती. वर्गशिक्षिका वर्गात आल्या. हजेरी घेतली आणि त्यांनी सर्वांना एक प्रश्न विचारला. ''पावसापासून स्वतःचे संरक्षण कसे कराल?'' एक -एक मुलगा उत्तर सांगू लागला. छत्री, रेनकोट, ऑटो, गाडी अशी तीच-तीच उत्तरे ऐकून मॅडमने प्रश्न बदलला. ''उन्हापासून स्वतःचे संरक्षण कसे कराल?'' आता आली वसतिगृहातल्या मुलांची बारी. एक मुलगा उभा टाकत म्हणाला, `कुंची पांघरून.’ तशी  वर्गातली काही मुलं हसू लागली. कुंची म्हणजे काय? हे त्यांना कळलंच नसावं. मॅडम मात्र संतापल्या होत्या. मुलाला पुढे बोलवत त्या म्हणाल्या, ‘
शाळेत असे गावंढळ शब्द वापरायचे नाहीत. चल काढ दहा उठबशा.’ बिचाऱ्याने उठबशा काढल्या अन् जागेवर येऊन बसला. 

बोली भाषांची जपवणूक करणाऱ्यांना जर समाजाकडून अशी अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर कशा टिकतील बोलीभाषा आणि कशी टिकेल मराठी? महाराष्ट्रात दर कोसावर बोली बदलत असल्याचे चित्र दिसते. जेवढी प्रमाण भाषा बोलली जाते त्यापेक्षा त्या- त्या परिसरात बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषांचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. अशा अनेक बोलीभाषांनी आपले स्वतःचे असे वेगळे वैभव जपून ठेवलेले आहे. उच्चभ्रू समाजाने अर्थात नोकरदार लोकांनी अशा बोलीभाषेला केव्हाच घटस्फोट दिलाय. काहींनी तर प्रमाणभाषेचाही त्याग केलाय, पण या अस्सल मराठी भाषेला जिवंत ठेवण्याचे काम केलंय ते कष्टकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनीच!
व्यवहारात, वापरात नसलेली वस्तू जशी कालांतराने नष्ट होते तोच नियम भाषेलाही लागू होतो. त्यामुळे मराठी भाषा जिवंत ठेवायची असेल तर प्रत्येकाने व्यवहारात मराठी भाषेचा वापर करणे अत्यावश्यक आहे. मग ती बोलीभाषा असो किंवा प्रमाणभाषा. खेड्यातले शेतकरी, वयस्कर मंडळी सोडली तर काही वर्षांनी बोलीभाषा नष्ट होतील की काय? अशी भीती निर्माण होत आहे. बोलीभाषेतील असंख्य शब्दांचा वापर आज थांबलेला आहे. बऱ्याच शब्दांचे अर्थही आजच्या पिढीला कळत नाहीत. उदा. माळवद, आसूड, कासरा, काणी, शिवार, दावण, कोप, जू, येसन, आटोळा, कुपाटी, घंगाळ, वाकळ, गोधडी, वसरी, ढाळज, आगळ, उखळ, मुसळ, रवी, कवाड, केर, दिवळी, येळणी, बिंदगं, रांजण, चलमा, खमीस, कोनाडा, पाणवठा असे अनेक शब्द आपल्या भाषिक व्यवहारातून नष्ट होत आहेत. पण आजही शेतकरी अशा शेकडो शब्दांना भाषेत वापर करून भाषेची श्रीमंती वाढवतात.
आज मराठी भाषेकडे गंभीरपणे पाहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. आपण एक समृद्ध भाषिक आहोत. या गोष्टीचा अभिमान प्रत्येक मराठी माणसाला असलाच पाहिजे. म्हणून शेतकऱ्यांसारखेच इतर क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी, व्यवसायिकांनी अर्थात समस्त उच्चभ्रू लोकांनी भाषा वृद्धीसाठी, भाषेच्या संवर्धनासाठी उगवते तारे व्हा! प्रत्येक मराठी माणूस भाषेबाबत जागृत झाला, तर लवकरात लवकर तिला अभिजात दर्जाही प्राप्त होईल. भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होणे ही मराठी माणसांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. म्हणून पुन्हा मराठीला वैभवसंपन्न भाषा बनवूयात. ''असंख्य पाहुणे जरी पोसते मराठी, खरंच आपुल्याच घरी हाल सोसते मराठी'' या कवितेच्या ओळीतील वास्तव भेदण्यासाठी सर्वांना मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

भरतकुमार गायकवाड  ः ९८८१४८५२८५
(लेखक मराठी भाषेचे अभ्यासक आहेत.)


इतर संपादकीय
वनक्षेत्रात वाढ ः खेळ आकड्यांचा३० डिसेंबर २०१९ रोजी केंद्रीय पर्यावरण मंत्रालय...
मधाचा गोडवागे ल्या पाच वर्षांत देशात मधाच्या उत्पादनात ५८...
निर्यातीला धक्का ‘कौन्‍सिल’चादेशात पिकत असलेल्या फळांच्या निर्यातीला...
पाण्याची उपलब्धता आणि पीकपद्धतीस्वातंत्र्यप्राप्तीपासून देशाच्या लोकसंख्येत...
महाराष्ट्राची चिंताजनक पिछाडीएका इंग्रजी साप्ताहिकाने अलीकडेच राज्यांच्या...
व्यवहार्य धोरणघरगुती ग्राहकांना विनाखंडित वीजपुरवठा करून...
दुप्पट उत्पन्नाच्या भूलथापाकेंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी २०२२...
जलसंकट दूर करण्यासाठी...भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. केवळ...
सर्वसमावेशक विकास हाच ध्यासभारताच्या कीर्तिवंत सुपुत्रांमध्ये यशवंतराव...
आता थांबवा संसर्ग!मागील डिसेंबरपासून जगभर (प्रामुख्याने चीनमध्ये)...
दावा अन् वास्तवदेशातील शेतकऱ्यांनी मृदा आरोग्यपत्रिकेनुसार...
शास्त्रशुद्ध पाणलोट विकासच शाश्वत पर्यायमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जलयुक्त शिवार योजना...
प्रस्तावाला हवे प्रोत्साहनन वीन वर्षाची पहाट मराठवाड्याच्या विकासासाठी...
कटुता, अहंकार आणि विसंवादसत्ताधारी पक्षाला ३०३ जागा मिळाल्याने आकाश ठेंगणे...
ग्राहकहिताचे असावे धोरणदेशात सर्वांत महाग वीज राज्यात असल्याबाबतच्या...
शेतकऱ्यांच्या आर्थिक लुटीचा इतिहासभारतात अन्नाची समस्या फारच तीव्र आहे. ‘फॅमिली...
योजना मूल्यवर्धन साखळी सक्षमीकरणाचीतळागाळातील शेतकरी आणि शेती उत्पादने एकत्रित...
गाय पाहावी विज्ञानातगोवंश, गोसंवर्धन अशा प्रकारची योजना युती...
पुन्हा अस्मानी घातमागील खरीप हंगामात अतिवृष्टी, महापुराने शेतीचे...
तूर खरेदीत सुधारणा कधी?राज्यात बहुतांश शेतकऱ्यांची तूर काढणी आता आटोपली...