दूध पिता है क्‍या इंडिया?

जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजवणाऱ्या भारतात दूध उपलब्धता असूनही त्याचे सेवन होत नाही, हे मोठे दुर्दैवच. ‘दूध प्या' म्हणण्याची गरज निर्माण व्हावी इतका मोठा हा विषय असून, विज्ञानयुगात दूध पिण्यापासून भारतीय दूर जात आहेत. दूध ग्राहक सदैव स्वस्त दुधाच्या शोधात असतो. आणि दूध खरेदी परवडत नाही म्हणून दूध पिण्याचा प्रश्‍न लाखो ग्राहकांच्या घरी भेडसावतो.
agrowon editorial article
agrowon editorial article

राज्यात दूध सहकार चळवळ सुरू होऊन ५० वर्ष झाली मात्र एकाही दूधसंघाकडून ‘दूध प्या' असा नारा दिला जात नाही. दूध उत्पन्न वाढ, व्यापार, पदार्थनिर्मिती हे विषय नेहमी चघळले जातात. नफा-तोटा मांडण्याचा आग्रही पुढाकार दूधसंघांना आवडीचा ठरतो. मात्र उत्पादक सदस्य आणि कार्यक्षेत्रातील सर्व भाग दूध पिण्यापासून दूर आहे; याबाबत दूधसंघ विचार करत नाहीत. स्थानिक दूध वितरण - विक्रीत अधिक फायदा असूनही दुधाचा वापर मानवी आहारात होत नाही. दूध उत्पादक खर्च-उत्पन्नाचा मेळ जमत नाही म्हणून सगळे दूध विक्रीच्या मागे असतो. शास्त्रीय पशुपालन, नैसर्गिक आपत्ती, दूध दर, दूध माफीया अशा जटील प्रश्‍नांतून मार्गच निघू शकत नाही, अशी भूमिका असलेला पशुपालक दूध पिण्यापासून स्वतः दूर असतो. फायदेशीर दूध उत्पादनाची वाट कधी सापडणार या शोधात असल्याने दूध पिण्याचे प्रमाण उत्पादकाच्या घरात अत्यल्प असल्याचे दिसून येते.

दूध ग्राहक सदैव स्वस्त दुधाच्या शोधात असतो. आणि दूध खरेदी परवडत नाही म्हणून दूध पिण्याचा प्रश्‍न लाखो ग्राहकांच्या घरी भेडसावतो. गाय का म्हैस, ए-१ का ए-२, निरसं का उकळून असा चर्चेचा विषय आवडीने लांबवणारेसुद्धा दूध पीत नाहीत. ग्रामीण वा शहरी, शिक्षित-अर्धशिक्षित, स्त्री-पुरुष असा घटक विचार घेता ‘दूध सेवन नाहीच' हेच सत्य दिसून येते. मुळात दूध पिण्याचा संस्कार भारतीय कुटुंबात घडतच नाही. दुग्धकुपोषण ही मोठी समस्या त्यामुळे निर्माण झाली असून, या विषयी सर्वांगीण चिंतनाची गरज आहे.

देशाचा विचार केला तर पंजाब, हरियाना, मध्य प्रदेश, गुजरात, राज्यस्थान आणि आंध्र प्रदेश अशा मोजक्‍या सहा राज्यांत मानवी दूधसेवनाचे प्रमाण समाधानकारक आहे. मात्र देशाचा चार पंचंमांश भाग दूध सेवनाबाबत अत्यल्प सेवनाच्या कक्षेत सरासरीने दिसून येतो. त्यातही डोंगराळ, दुर्गम, आदिवासी, नक्षलवादी, कोरडवाहू प्रदेश कायम दूध दुष्काळात दिसून येतात. दैनंदिन ३०० ग्रॅमपेक्षा कमी दूध म्हणजे ‘दुग्धकुपोषण' ठरते.

दूध पिण्याची सवय निर्माण करण्यासाठी भारतात विशेष प्रयत्नांची गरज आहे. शालेय स्तरावर अशाप्रकारचे शिक्षण अधिक प्रभावी ठरू शकते. प्रौढांसाठी प्रत्येक वैद्यक केंद्रात दूध शिफारस नियमितपणे करणे शक्‍य आहे. शिधा वाटपासह दूध वाटपाचा उपक्रम गोरगरीब स्तरासाठी उपयुक्त ठरू शकतो. बाजारपेठेत दुधाचे हजार चवींचे ब्रॅंड उपलब्ध केल्यास स्पर्धात्मक दूध सेवन वाढू शकेल. दूध पिण्याला समाजात प्रतिष्ठा उरली नाही; हे विस्तवासारखं वास्तव आहे. शिष्टाचारात दूध मागं पडलंय. यामुळेच दुग्धाहारी मंडळींची फौज निर्माण होणं गरजेचे आहे. दूधसंघांची फळी यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. ताज्या दुधाची विक्री, स्थानिक वितरणास प्राधान्य आणि लोकजागृती घडविण्यास डबघाईत आलेले दूधसंघ सावरू शकतील. दुग्धजन्य पदार्थ निर्मितीवर यंत्रसामग्री उभारण्यावर झालेल्या खर्चातून २५-२५ वर्षे नीट सावरता न आलेल्या सहकाराला ‘दूध प्या’ जनजागृती फलद्रूप ठरू शकेल.

भारतीय समाजात केवळ जाहिराती करुन दूध सेवनाचे मानवी प्रमाण कधीच वाढणार नाही. महत्त्व पटवून देण्याचा मार्ग कृतीतून सुरू होतो. दूध उत्पादक आणि दूध वितरक यांनी स्वतः आणि कुटुंबस्तरावर दूध सेवनाचे प्रमाण वाढवावं लागेल. अनुकरण हा मानवी स्वभाव आपोआप पसरत जावू शकेल. दूध उत्पादक आणि त्याचे कुटुबीय ‘आम्ही दूध पितो' असं सिद्ध करणार नाहीत, तोपर्यंत दूधउत्पादक आणि त्याचा व्यवसाय कुपोषीतच राहील. ‘दुधासाठी जीव कासावीस व्हावा' अशी सवय सर्वदूर पसरण्याची गरज आहे. त्यातूनच दूधव्यवसाय समृद्ध होत जाईल आणि सामाजिक स्वास्थ्य सुदृढ होऊ शकेल. दूध निर्भेळ नाही, दूध स्वच्छ नाही म्हणूनही जनसामान्य दूध पीत नाहीत. रसायनविरहीत, विषघटकरहीत, कुत्रिम नसणारे, भेसळ नसणारे आणि बाधित नसणारे दूध ग्राहकांना मिळाल्यास ‘दूध प्या' म्हणण्याची गरज भासणार नाही.

जगात होणाऱ्या दूधउत्पादनापैकी २२ टक्के दूध भारतात निर्माण होते. दरवर्षी ५ टक्के घसघशीत उत्पादन वाढ करत चालू वर्षात जवळपास २०० दशलक्ष मेट्रीक टन वार्षिक दूध उत्पादनाचा इतिहास निर्माण होतो. देशातील २६ राज्ये व केंद्रशासीत प्रदेश दूध दुष्काळात आहेत. पुरोगामी महाराष्ट्राचा नंबर दूध उत्पादनात पार घसरला असून, पंजाबात जवळपास पाचपट तर हरियानात चौपट अधिक दूध सेवन आपल्या राज्यापेक्षा होत आहे. ‘आम्ही दुग्धपदार्थ आवडीने खातो' म्हणणारे लोक ५०० कि.मी. पेक्षा अधिक अंतराहून राज्याबाहेरून येणारे ताक मात्र दूध खरेदीदराच्या दुप्पट भावात विकत घेण्यात धन्यता मानतात. ठराविक चार-पाच दुग्धजन्य पदार्थ सगळ्याच दूधसंघांनी बाजारात आणले असल्याने एकमेकांना बुडवण्याचा व्यवसाय जोरात सुरू आहे. भारतीय संस्कृतीला ज्ञात असणारे दुग्धजन्य पदार्थ बनवण्याची कुवत, कौशल्य आणि मानसिकता दूध संघांनी मातीत घातली आहे. "दूध पिता है इंडिया' मध्ये आम्ही नाहीत याची वर्षानुवर्षे जाणीव होत नाही, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. दूध पिण्याने प्रथिनांची गरज पूर्ण होते. रोगप्रतिकारक्षमता वाढते. प्रकृतीस्वास्थ्य सुधारते, स्थूलपणा कमी होतो. बुध्यांक वाढतो. मानसिकस्वास्थ्य उंचावते. आहार परिपूर्ण होतो, अशी मोठी यादी प्रत्येक भारतीयांच्या मनावर बिंबवली पाहिजे.

‘दूध प्या' मोहिमेबाबत संताप आणि तीव्र भावना हा मानवी स्वभाव असू शकतो, मात्र धुष्टपुष्ट शरीराची गरज म्हणून अशी मोहीम सुरू झाली तरच पशुपालक शेतकरी आणि दूधव्यवसाय तग धरू शकेल अन्यथा पाण्याची आवर्तने आणि भेसळीच्या लाटांनी दूधगंगा तोट्याची ठरेल. अॅग्रोवनच्या माध्यमातून प्रकाशित झालेल्या सगळ्या ‘दूधव्यवसायाच्या यशकथा' ज्या व्यावसायिक दूधउत्पादकांनी साकारल्या, त्यांचाच ‘दूध प्या' मोहिमेचा अजेंडा व्यापक स्वरुपात अपेक्षित आहे. ‘मी दूध पितो' असा स्वाभिमानी दूध उत्पादक चेहरा राज्याला गरजेचा आहे, हे मात्र निश्‍चित!

- डॉ. नितीन मार्कंडेय . - ८२३७६८२१४१ (लेखक पशुवैद्यक महाविद्यालय परभणी येथे सहयोगी अधिष्ठाता पदावर कार्यरत आहेत. ..............................

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com