कोरोना नंतरचा दुग्धव्यवसाय

कोरोना प्रादुर्भाव अन लॉकडाउनच्या काळात पशुपालक हा काम करत होता. त्यामुळे कुठेही दुधाची टंचाई जाणवली नाही. उलट दूध वाहतुकीवर संचारबंदीचा परिणाम निश्चित झाला, दुधाचा वापर कमी झाला, मिठाई दुकाने बंद, हॉटेल्स बंद होती, पण उत्पादन बंद नव्हते. राज्यातील सर्व शासकीय, खाजगी, दूध संस्था-संघांनी दुधाचे संकलन चालूच ठेवले होते. ही उमेद कायम ठेवून आपल्याला पुढील काळातही वाटचाल करावयाची आहे.
agrowon editorial article
agrowon editorial article

कोरोना विषाणूने जगाचे रूप पालटून टाकले आहे, अशा प्रकारचा बदल का अद्दल हा विषाणू घडवेल, असे कोणाच्याही ध्यानीमनी आले नसेल. आता सर्वच शास्त्रज्ञांच्या मते आपल्याला कोरोनासह राहायचे आहे याबाबत एकमत झाले आहे. तसे बदल आज आपण सर्व क्षेत्रात करत आहोत आणि पुढे जात आहोत. फक्त कोरोना विषाणूलाच आपल्या स्वतःमध्ये बदल करून कधी संहारक तर कधी सौम्य रूप धारण करता येते असे नाही, तर मानवालाही त्या पद्धतीने आपल्यामध्ये बदल करत पुढे जाता येते हे आता सिद्ध करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आणि आपण ते नक्की सिद्ध करू यात शंका नाही. आतापर्यंत अशा अनेक महामारींना आपण यशस्वीपणे तोंड दिले आहे. 

कोरोनाच्या काळात आपण सर्वांनी जर बारकाईने पाहिले असेल तर पूर्ण प्रभावीपणाने पशुपालक हा काम करत होता, राबत होता. त्यामुळे कुठेही दुधाची टंचाई जाणवली नाही. उलट दूध वाहतुकीवर संचारबंदीचा परिणाम निश्चित झाला, दुधाचा वापर कमी झाला, मिठाई दुकाने बंद, हॉटेल बंद, शहरातील दुधाचा वापर कमी पण उत्पादन बंद नव्हते ते नियमित चालू होते. राज्यातील सर्व शासकीय, खाजगी, दूध संस्था-संघांनी व गवळ्यांनी काही अपवाद वगळता दुधाचे संकलन चालू ठेवले होते. दूध संघांनी दूध पावडर तयार केली, काही संस्थांनी खव्यासारखे दुग्धजन्य पदार्थ तयार केले, कोल्ड स्टोरेजमध्ये साठवले पण हा व्यवसाय सुरू ठेवला. त्यासाठी आपल्या राज्यातील सर्व दूध उत्पादक पशुपालक यांना धन्यवाद दिले पाहिजेत. अशा या कष्टाळू पशुपालकामुळेच आपण दूध उत्पादनामध्ये जगात प्रथम क्रमांकावर आहोत. आणि ही उमेद कायम ठेवून आपल्याला पुढील वाटचाल करावयाची आहे. 

राज्यातील दूध उत्पादन हे ११६.५४ लाख मेट्रिक टन असून दरडोई प्रतिदिन दूधाची उपलब्धता ही २६६ ग्रॅम आहे. देशपातळीवर हीच उपलब्धता ३९४ ग्रॅम आहे. राज्याचा क्रमांक दूध उत्पादनामध्ये सातवा आहे आणि प्रतिदिन प्रति माणसी उपलब्धतेत आपण नवव्या क्रमांकावर आहोत. एकंदर याचा विचार केला तर प्रचंड संधी या दुग्ध व्यवसायात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहराकडे गेलेले तरुण-तरुणी, उच्चशिक्षित मंडळी इतर लोक हे गावाकडे आलेले आहेत. त्यांच्याकडे इतर कौशल्यासह व्यवहारिक दृष्टिकोन आणि वैचारिक भूमिका आहे. शेतीचे तुकडे झाले असले तरी काही प्रमाणात जमीन आहे. पुष्कळ मंडळींचा पारंपरिक व्यवसाय हा शेतीसह पशुसंवर्धन होता आणि आहे. त्यामुळे रोजचा ताजा पैसा, किमान दहा दिवसात पैसा मिळणारा असा हा व्यवसाय आहे, याची जाण या मंडळींना नक्कीच आहे. त्यामुळे हा व्यवसाय पारंपरिक पद्धतीने न करता त्याला व्यावसायिक स्वरूप देऊन केला जाईल.

व्यावसायिक स्वरूप आल्यामुळे गोठ्यात फक्त आणि फक्त उच्च प्रतीची जनावरे सांभाळली जातील. प्रति जनावर कमीत कमी १५ ते २० लिटर उत्पादन असणारी जनावरे गोठ्यात दिसतील. त्याचबरोबर त्यासाठी लागणाऱ्या उच्चप्रतीच्या लिंग वर्गीकृत रेतमात्रांचा वापर वाढेल. चांगल्या प्रकारच्या वैरणीसाठी आणि पशुखाद्यासाठी पशुपालक आग्रही राहतील. राज्यामध्ये एकूणच ४० टक्के हिरवा चारा व २० टक्के वाळलेल्या चाऱ्याची कमतरता आहे. वैरण, पशुखाद्य यावर होणारा ६५ ते ७० टक्के खर्च कमी करण्यासाठी चांगल्या वैरणीखालील क्षेत्रामध्ये वाढ होईल, नवनवीन वैरणीचे प्रकार लागवडीखाली येतील. त्याचबरोबर मुरघास निर्मिती, कडबा कुटी मशीन चा वापर यासह सेंद्रिय दूध उत्पादनासाठी चांगल्या प्रकारच्या घटकाचा वापर करून निर्माण केलेल्या पशुखाद्याचा वापरसुद्धा वाढणार आहे. कारण कोरोनामुळे एकंदरच आरोग्याच्या बाबतीमध्ये सर्वजण सजग झाल्यामुळे सेंद्रिय दूध निर्मिती आणि त्याची मागणी याकडे लक्ष द्यावे लागेल. स्वच्छ दूध निर्मिती ही एक चळवळ म्हणून उभी करावी लागणार आहे. 

पशुवैद्यकीय सेवेमध्ये सुद्धा अमुलाग्र बदल होतील. नोंदणीकृत पशुवैद्यकांना उपचार करताना मोठ्या प्रमाणात मार्गदर्शकाची भूमिका बजवावी लागेल. कारण सुशिक्षित तरुण ज्यावेळी हा व्यवसाय म्हणून करेल तेंव्हा उच्च प्रतीच्या व्यवस्थापनामुळे आजाराचे प्रमाण कमी होईल आणि एकूण गोठा, कळप यांचे उत्पादन वाढ, जमाखर्च आणि विषमुक्त उत्पादनासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत मार्गदर्शन करून त्यांचा आहे त्या साधन सामुग्रीत नफा कसा वाढेल, याबाबत मार्गदर्शन करावे लागेल. मिल्किंग मशिनचा वापर, मुक्त संचार गोठा तसेच जैविक सुरक्षा याबाबत पशुपालकांनी माहिती घेऊन त्याची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणामध्ये करावी लागेल. दुग्धजन्य पदार्थाच्या मूल्यवर्धनामध्ये ४० ते ४०० टक्के नफा आहे, आज त्यातील हिस्सा पशुपालकालापर्यंत पोचत नाही. त्यामुळे पशुपालक उत्पादन कंपन्यांच्या माध्यमातून तालुका, जिल्हा स्तरावर दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती सुरू होईल. त्यासाठी महिला बचत गट सुद्धा पुढाकार घेतील.

दुग्धजन्य पदार्थ निर्मितीमध्ये स्वच्छता आणि संबंधित सर्वांचे आरोग्य यासह यांत्रिकीकरणाचा वापर झाला तर उच्चप्रतीचे असे पदार्थ लोकांच्या पसंतीला उतरतील व जास्तीचा नफा थेट पशुपालकांना मिळेल. या व्यवसायात कमी मनुष्यबळाचा वापर होईल. त्याचबरोबर दूध वाहतूक, बर्फ निर्मिती, पशु खाद्य कारखाने, दुग्धजन्य पदार्थ विक्री दुकाने, थेट ग्राहकांपर्यंत माल पोचवण्यासाठी लागणारी शीत साखळी राखणारी वाहने, आणि त्याअनुषंगिक व्यवसायांमध्ये देखील वाढ होईल. सर्वासाठी मोठ्या प्रमाणात मार्गदर्शनाची गरज भासणार आहे. त्यासाठी प्रशिक्षण व विस्तार यासाठी पशुवैद्यकीय विद्यापीठ, सेवाभावी संस्था यासह पशुसंवर्धन विभागाला पुढाकार घ्यावा लागेल. प्रशिक्षणात नवनवीन विषय आपत्ती व्यवस्थापन, ज्यादा उत्पादित शेतीमालाचा वैरण पशुखाद्य म्हणून वापर, त्याचबरोबर अन्न सुरक्षा धोरण, भ्रुण प्रत्यारोपण तंत्रज्ञान, लिंग वर्गीकृत रेतमात्रा, सोनोग्राफी, एक्स-रे याची तोंडओळख असे विषय घेऊन पशुपालकांना प्रशिक्षित करावे लागेल. शरीरांतर राखून नियमित पशुपालकांचे मेळावे, अनुभवकथन यासह जाती संवर्धन संस्था स्थापन करून जास्तीत जास्त चांगल्या जनावरांचे संगोपन याकडे सुद्धा लक्ष द्यावे लागेल. परिणामस्वरूप कमीतकमी मनुष्यबळाचा वापर वाढल्याने हा व्यवसाय करता येईल आणि अधिक जोमाने आपल्याला दूध उत्पादन आणि वापर वाढवता येईल.

डॉ. व्यंकटराव घोरपडे   

- ९४२२०४२१९५  (लेखक सेवानिवृत्त पशुसंवर्धन सहायक आयुक्त आहेत.)   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com