निसर्गाचा सहवास अन् गोमातेचा आशीर्वाद

मागील आठवड्यात केरळमधील काही गावांना भेट देण्याचा योग आला. उद्देश होता तेथील स्थानिक शेतकऱ्यांची शेती पाहणे. पण, या भागात शेती कुठेही दिसली नाही. डोंगराळ भागातील शेतकरी शेती न करता दूध उत्पादनाचा व्यवसाय करतात. जेमतेम दोन देशी गाई पाळणारा येथील शेतकरी मात्र कर्जमुक्त आहे.
agrowon editorial article
agrowon editorial article

मागील आठवड्यात उत्तर केरळमधील ‘पेय्यानूर’ या कन्नूर जिल्ह्यामधील एका शहराला भेट देण्याची संधी मिळाली. तसा हा पश्चिम घाटाच्या वृक्षसंपत्तीमध्ये पूर्ण झाकलेला एक तालुकाच. या शहराच्या परिसरात अनेक गावे आहेत. सर्व पक्क्या रस्त्यांनी एकमेकांस जोडलेली मात्र डोंगरदऱ्‍या आणि घनदाट जंगलात लपलेली. रिक्षात अथवा बसमधून जाताना जवळ येईपर्यंत गाव कोठे आहे, हे लक्षातसुद्धा येत नाही. या जंगल परिसरामधील लहान गावांना मुद्दाम भेट देण्याचा उद्देश होता तो तेथील स्थानिक शेतकऱ्यांची शेती पाहणे, पण शेती कुठे दिसलीच नाही आणि दिसणारही नव्हती कारण तो होता, सर्व डोंगराळ उताराचा, वृक्षांनी झाकलेला भाग. जिथे मी अनेक शेतकऱ्यांची उत्कृष्ट बांधलेली घरे आणि बंगले पाहिले व चकीत झालो. या भागामधील शेतकरी शेती न करता दूध उत्पादनाचा व्यवसाय करतात. प्रत्येक शेतकऱ्याकडे निदान दोन देशी गाई तरी होत्या. त्यांच्यासाठी बांधलेला हवेशीर जांभा दगडाचा गोठा आणि आत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती. गोठ्याबाहेर गोमूत्र व शेण वेगळे संकलित करण्याची यंत्रणा, त्यापासून उत्कृष्ट पद्धतीचे तयार झालेले शेणखत पाहून आश्चर्य वाटले.  

गाईचा चारा जवळच्या जंगलामधूनच मिळतो. सायंकाळी गोठ्यात मात्र तांदळाची कणी खुराक म्हणून दिली जाते. एक गाय सकाळी आणि दुपारी मिळून अंदाजे १२ लिटर दूध देते. त्यापैकी सकाळचे आठ लिटर जवळच्या मोठ्या गावात असलेल्या सहकारी डेअरीवर पोचविले जाते, तर दुपारचे सहा लिटर आजूबाजूच्या बंगल्यामध्ये रतीब म्हणून वाटप होते. दुधाचा भाव डेअरीला ३७ रुपये तर रतीबाचा ४० रुपये प्रतिलिटर. एका गाईच्या दुधाचे हे अर्थकारण मला तेथील ८/१० शेतकऱ्यांना भेटून समजले. ज्या वेळी एक गाय दूध देत असते तेव्हा दुसरी गाभण असते, थोडक्यात त्या दूध उत्पादक शेतकऱ्याचे दररोजचे १०-१२ लिटर दुधाचे उत्पादन कायम असते तेही वासराला योग्य प्रमाणात पाजून. कालवडीची पुढील दूध उत्पादनासाठी जोपासना होते, गोऱ्हा मात्र योग्य वाढीनंतर ३० हजार रुपयांच्या पुढे सहज विकला जातो. गायीचे वेत पूर्ण झाल्यावर तिचीही योग्य किंमतीत विक्री होते. दोन्ही गाई ठरावीक तासांच्या अंतराने जंगलात चरावयास जातात. त्यामुळे एक गाय कायम गोठ्यात वासराजवळ असते. 

येथे गायीच्या कृत्रिम गर्भधारणेवर भर दिला जातो. गाई जंगल परिसरातच ताजा नैसर्गिक गवताचा मुबलक चारा घेत असल्यामुळे दुधाचा उतारा उत्तम त्याचबरोबर शेणाचा उत्कृष्ट दर्जा असल्यामुळे मिथेन वायुचा कुठेही वास नव्हता. त्यामुळे गाय आजारीसुद्धा पडत नाही, हे शेतकरी आवर्जून सांगत होते. एकूण दूध उत्पादनापैकी एक लिटर दूध घरी ठेवलेच जाते. सहकारी दूध डेअरीमधून प्रत्येक दूध उत्पादक शेतकऱ्यांना दर १० दिवसांनी हातात रोख पैसे मिळतात. कुठल्याही शेतकऱ्यावर कसलेही कर्ज नव्हते. दुधाचे उत्पन्न महिन्याला प्रति गाय अंदाजे १५ हजार रुपये मिळते, खुराकाचा खर्च जेमतेम २००० रुपये आणि चाऱ्याचा खर्च तर अजिबात नाही. भरपूर पाऊस, थंड निवारा, वासराचा सहवास आणि सभोवतीचा समृद्ध जंगल परिसर म्हणून या देशी गाईकडून शेतकऱ्यांना नेहमीच शाश्वत दूध उत्पादन मिळते. पश्चिम घाटामधील कन्नुर आणि कासारगौड या दोन जिल्ह्यांमधील हजारो शेतकरी आज हा शाश्वत दूध व्यवसाय करत आहेत तेही जंगलाशी मैत्री करूनच. येथे कुठलाही चारा लावला जात नाही की वृक्ष लागवड नाही, जे सर्व काही आहे ते निसर्गाचेच. एकही विदेशी वृक्ष तुम्हाला या भागात दिसणार नाही. 

पश्चिम घाटासंबंधी केंद्र सरकारला अहवाल देताना गाडगीळ समितीने गोवा, कर्नाटक आणि केरळ मधील उदध्वस्त जंगले, दगडाच्या खाणी, खाणकाम, हॉटेल व्यवसाय, रासायनिक शेती याकडे लक्ष वेधताना निसर्गाशी मैत्री करून पारंपरिक शेती करणाऱ्या गरिब शेतकऱ्‍यांचे त्यांनी विशेष कौतुक केले होते. या अहवालावर केरळने खूपच टीका केली होती. मी अहवाल्याच्या चष्म्यामधूनच त्या जंगल श्रीमंतीकडे आणि तिचे संरक्षण आणि संवर्धन करणाऱ्‍या माझ्या या शेतकऱ्‍याकडे पहात होतो. सर्वत्र वृक्षराजी, मुबलक पाणी आणि स्वच्छ वाहत्या नद्याच दिसत होत्या अपवाद होता तो गावागावांना जोडणाऱ्या पक्क्या रस्त्यांचा आणि ठरावीक अंतरावर असलेल्या बंगल्यांचा. जंगलाला कुठेही ओरखडा नव्हता, म्हणूनच की काय वन्य प्राण्यांचासुद्धा शेतकऱ्‍यांना कसलाही धोका आढळत नव्हता. प्रत्येक शेतकऱ्याच्या घराभोवतालची फळ वृक्षांची बाग ही त्याची श्रीमंती होती.  जगामधील सर्वात जास्त गोवंश आपल्या देशात आहे. मात्र, त्यातील कितीतरी गायी बंदिस्त गोठ्यातच आहेत. सर्वात जास्त मिथेन येथेच तयार होतो जो आज हरितगृह वायू म्हणून वातावरणामधील उष्णता वाढवत आहे. पूर्वी प्रत्येक लहान मोठ्या गावाला स्वत:चे गायरान होते. घरोघरच्या गाई तेथे सकाळीच गुराख्याबरोबरच चरावयास जात आणि सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी परत येत. सुदृढ पर्यावरणाचा तो सुवर्ण काळ होता. आज ही वजाबाकी पाहताना विकास आणि मिथेन यांचा गुणाकार सुदृढ पर्यावरणाची होळी करत आहे. 

आपल्याकडील अल्प भूधारक शेतकरी मुख्य शेतीला जोडून दुग्ध व्यवसाय करतो. केरळमध्ये मात्र शेतकऱ्‍यांना स्वत:ची अशी शेत जमीन नसल्यामुळे दुग्ध उत्पादन हाच मुख्य व्यवसाय ठरून शेणखत विकणे हा त्यांचा जोड व्यवसाय झाला आहे. एका गाईच्या शेणखत विक्रीतून अंदाजे ५००० रुपये मिळतात. स्वत:च्या फळबागेबरोबरच परिसरामधील इतरांच्या नारळाच्या बागा, सुपारी, केळी, आंबा, पालेभाज्या, फळभाज्या यांना ते विकले जाते. अशाच एका शेतकऱ्याच्या घरातील शहाळे आणि पेला भरून देशी गायीचे धारोष्ण दूध मला कलशामधील अमृतासारखे वाटले. पश्चिम घाटाच्या हरित पंखाखाली शाश्वत दुग्ध उत्पादन घेऊन कर्जाचे कसलेही ओझे डोक्यावर न घेता आनंदाने जगणारा हा शेतकरी मला गोकुळामधील नंदा सारखा वाटला. त्याच्या घराच्या चारही बाजूला असणारी नारळ, आंबा, सुपारी, फणस, केळी, मिरीची शेती दुग्ध उत्पादनाबरोबर त्यांच्या इतर उत्पन्नात भरच टाकत होती. निसर्गाच्या सहवासात देशी वृक्ष आणि गोमातेचा हा त्यांना आशीर्वादच नव्हे काय?  

डॉ. नागेश टेकाळे ः ९८६९६१२५३१ (लेखक शेतीप्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com