agriculture news in marathi agrowon special article Monsoon arrival in Maharashtra | Agrowon

तो’ आला, ‘त्याने’ राज्यही व्यापले

डॉ. रंजन केळकर
मंगळवार, 15 जून 2021

या वर्षीच्या मॉन्सूनचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याला केरळवरून महाराष्ट्रात यायला फारसा वेळ लागला नाही. ८ जूनला म्हणजे मृग नक्षत्र सुरू झाले त्याच दिवशी, दक्षिण महाराष्ट्रात मॉन्सून पोहोचला आणि १० जूनपर्यंत त्याने संपूर्ण राज्य व्यापले. 

मागील वर्षी भारतीय हवामानशास्त्र विभागाने मॉन्सूनच्या आगमनाच्या आणि परतीच्या सरासरी तारखांचे एक नवीन वेळापत्रक जाहीर केले. अलीकडच्या काळातील हवामानाच्या नवीन नोंदी विचारात घेऊन आणि आधुनिक विश्लेषण पद्धतींचा अवलंब करून हे नवे वेळापत्रक तयार केले गेले होते. या सुधारित वेळापत्रकानुसार नैऋत्य मॉन्सूनच्या महाराष्ट्रातील आगमन आणि पुढील वाटचालीच्या सरासरी तारखा ८ जून कोल्हापूर, १० जून पुणे व बारामती, ११ जून मुंबई, १२ जून अहमदनगर, १३ जून औरंगाबाद व परभणी, १४ जून मालेगाव, १५ जून अकोला व अमरावती, १६ जून नागपूर, आणि १८ जून जळगाव अशा आहेत. 
केरळवरील मॉन्सूनच्या आगमनाची पारंपरिक तारीख १ जून होती आणि अजूनही तीच आहे. केरळवर दाखल झाल्यानंतर मॉन्सूनला महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पोहोचायला एक दोन आठवडे तरी लागतात, असे या तारखांवरून दिसते. अर्थात या सर्व तारखा सरासरी आहेत आणि प्रत्येक वर्षी याच तारखांना मॉन्सून येईल, अशी कोणीही खात्री देऊ शकत नाही किंवा तशी कोणी आशाही बाळगू नये. मॉन्सून हळूहळू उत्तरेकडे आगेकूच करतो आणि शेवटी पश्चिम राजस्थानला सामान्यपणे ८ जुलैला पोहचतो. पण मागील वर्षी मॉन्सून तेथे २६ जूनलाच म्हणजे तेरा दिवस आधीच दाखल झाला होता. 

यंदाच्या वर्षी नैऋत्य मॉन्सूनचे केरळवर आगमन १ जूनला म्हणजे त्याच्या सामान्य तारखेला होईल, असे आधी पूर्वानुमान केले होते. नंतर मॉन्सून एक दिवस आधी येईल, असे सांगितले गेले. मग तो लवकर येण्याऐवजी उशिरा येईल, असा अंदाज बदलला गेला आणि शेवटी ३ जूनला त्याचे आगमन झाल्याचे सांगितले गेले. या वर्षीच्या मॉन्सूनचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याला केरळवरून महाराष्ट्रात यायला फारसा वेळ लागला नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याची वाट बघायला लागली नाही. ८ जूनला, म्हणजे मृग नक्षत्र सुरू झाले त्याच दिवशी, दक्षिण महाराष्ट्रात मॉन्सून आला आणि १० तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र राज्य त्याने व्यापले. मे महिन्यात अरबी समुद्रावर तौक्ते नावाचे चक्रीवादळ उद्भवले होते, जे महाराष्ट्राच्या किनाऱ्याच्या जवळून आणि किनाऱ्याला समांतर अशा मार्गाने गुजरातकडे गेले. त्यामुळे यंदा आपल्याकडे कडक उन्हाळा असा भासला नाही आणि अनेकदा पावसाच्या सरी पडल्या. त्यामुळे जमिनीत ओलावा राहिला. आता त्याबरोबर मॉन्सूनही नेहमीपेक्षा लवकर आल्यामुळे सध्याची एकंदर परिस्थिती पेरणीच्या दृष्टीने अनुकूल आहे, असे म्हणता येईल. 

मॉन्सूनचे वेळापत्रक आणि ऋतुचक्र 
नैऋत्य मॉन्सूनचे केरळवर आगमन झाले की, त्याची पुढील प्रगती दोन शाखांद्वारे होते. एक शाखा अरबी समुद्रावरून तर दुसरी बंगालच्या उपसागरावरून मॉन्सूनला उत्तरेकडे घेऊन जाते. या दोन शाखा कधी बरोबर तर कधी मागेपुढे असतात. कधीकधी त्या एकमेकींशी स्पर्धा करतात. सध्या बंगालच्या उपसागरावरील शाखा सक्रिय असल्याने मॉन्सून उत्तर प्रदेश राज्याच्या दिशेने आगेकूच करत आहे. ही प्रगती अशीच होत राहिली तर मॉन्सून लवकरच संपूर्ण देश व्यापून टाकण्याची शक्यता आहे. आपण मॉन्सूनच्या सध्याच्या प्रगतीला त्याच्या सरासरी वेळापत्रकाशी पडताळून पाहिले तर ती वाटचाल वेळापत्रकानुसार होत नसल्याचे सहज लक्षात येते. मॉन्सूनचे वेळापत्रक हवामानशास्त्रज्ञ ठरवतात, पण मॉन्सूनवर ते बंधनकारक आहे, असे मात्र नाही. जेव्हा मॉन्सून सरासरी वेळापत्रक पाळत नाही तेव्हा काही विपरीत घडले आहे असेही नाही. आपण ठरवून दिलेल्या चाकोरीत निसर्गाने फिरले पाहिजे, हा एका अर्थी मानवाचा अट्टहास आहे. जूनचा महिना आला की, मॉन्सून आला पाहिजे आणि सप्टेंबरचा महिना संपला की, मॉन्सून संपला पाहिजे हा एक प्रकारचा दुराग्रह आहे. एखाद्या वर्षी मॉन्सून लवकर आला, किंवा दुसऱ्या एका वर्षी तो उशिरा आला, तर मॉन्सूनचे वेळापत्रक बदलले आहे, असा निष्कर्ष आपण लगेच काढू नये. तो भविष्यात दरवर्षी लवकर किंवा उशिराच येत राहील, असे मानायला काही आधार नाही. निसर्गाची आपली स्वतःची अशी एक शिस्त असते. नैसर्गिक घटना वेळच्यावेळी होत राहतात. पण ती लष्करी शिस्त नसते. निसर्गाला एक स्वातंत्र्य असते. मानवी नियम निसर्गावर लादण्याऐवजी निसर्गाचे नियम आपण ओळखायचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. मॉन्सूनचा पाऊस एखाद्या वर्षी रेंगाळतो किंवा कधी कधी तो नेहमीपेक्षा लवकर संपतो. यामुळे ऋतुचक्र बदलले आहे, असा निष्कर्ष काढला जाणेही चुकीचे आहे. पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते ज्यामुळे दिवस आणि रात्र निर्माण होतात. पृथ्वी सूर्याभोवतीची प्रदक्षिणा एका वर्षात पूर्ण करते, पण तिचा हा अक्ष झुकलेला असल्यामुळे ऋतू निर्माण होतात. म्हणून हवामानाचा आणि ऋतूच्या कालावधींचा संबंध जोडला जाऊ नये. 

पुढचे चार महिने 
यंदाचा मॉन्सून सामान्य असेल आणि त्याचे पर्जन्यमान सरासरीच्या १०१ टक्के राहील असे दीर्घ अवधी पूर्वानुमान भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवले आहे. हे पूर्वानुमान खरे ठरण्याची शक्यता सध्या तरी चांगली दिसत आहे. एल-निनो आणि ला-निना या प्रशांत महासागरावर पेरू देशाच्या किनाऱ्याजवळच्या घटना आहेत. समुद्री तापमान सरासरीहून वाढण्याला एल-निनो म्हटले जाते आणि ते सरासरीहून कमी होण्याला ला-निना हे नाव आहे. असा अनुभव आहे की, एल-निनो बनतो त्या वर्षी भारतावर दुष्काळ पडतो, पण नेहमीच असे होत नाही. अनुभव असाही आहे की, ला-निना बनतो तेव्हा भारतावर चांगला पाऊस पडतो. आता यंदाच्या वर्षी परिस्थिती अशी आहे की, प्रशांत महासागराचे तापमान सरासरीच्या आसपास आहे. म्हणजे या वर्षी एल-निनो आणि ला-निना दोन्ही तटस्थ आहेत. भारतावर मॉन्सून सामान्य राहण्याची शक्यता असण्यामागे आणि दुष्काळाचा धोका नसण्यामागे हे एक सबळ कारण आहे. अर्थात येथे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, १०१ टक्के हा एक सरासरी आकडा आहे. त्यात मॉन्सूनच्या चार महिन्यांचा काळ आणि संपूर्ण देशाचे क्षेत्रफळ लक्षात घेतले जाते. त्यात चार टक्के चूकभूलही होऊ शकते. म्हणजेच देशात सर्वत्र १०१ टक्के पाऊस पडेल असे नाही. तो दररोज समप्रमाणात पडत राहील, असेही नाही. प्रत्येक शेतावर एवढा पाऊस पडेल असे तर मुळीच नाही. सामान्य मॉन्सूनच्या दरम्यानही हवामान शेतीच्या दृष्टीने विपरीत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. या सगळ्याचे पूर्वानुमान फक्त काही दिवस आधीच करता येते. 

डॉ. रंजन केळकर  ९८५०१८३४७५ 

(लेखक ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ आहेत.) 


इतर संपादकीय
चंद्रपूर दारूबंदी निर्णयाच्या...महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या २७ मे रोजीच्या ...
पीकविम्यातील पापीगेल्या आठवड्यात कोसळलेल्या अस्मानी संकटातून...
काम सुरळीतपणे पार पाडण्याचे धोरणराज्याच्या कोणत्याही भागात कधीही गेलो तरी तेथील...
दिशा कार्यक्षम पूर व्यवस्थापनाची!महाराष्ट्र देशी सध्या अतिवृष्टी आणि ...
लपवाछपवीची कमाल!पेगॅसस प्रकरण नवे नाही. नोव्हेंबर-२०१९ मध्ये हे...
मानवनिर्मित आपत्ती!राज्यात बेफामपणे कोसळणाऱ्या पावसाने सगळीकडे एकच...
जल‘प्रलय’शेती हा पूर्वीपासूनच जोखीमयुक्त व्यवसाय आहे....
पृथ्वीवरील वातावरणाचा ढळतोय तोलसरकारकडून सामाजिक वनीकरणाच्या मोहिमेखाली...
युरोपच्या अग्निअस्त्रावर निसर्गाचं...गेल्या काही दिवसांत युरोपमधील पुराच्या बातम्या...
बैलांचा उठलेला बाजारमुळात शेतीच्या यांत्रिकीकरणाने शेतकऱ्यांकडील...
ग्राहक कल्याणात उत्पादकांचे मरण‘इंडिया पल्सेस ॲन्ड ग्रेन्स असोसिएशन’ आणि इंडिया...
मुदत वाढवा, सहभाग वाढेलवर्ष २०२१ च्या खरीप हंगामासाठी जुलैच्या...
स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांचे...आधुनिकीकरण, यांत्रिकीकरण, संगणक क्रांती, माहिती-...
अचूक नियोजन हाच निर्यातबंदीवर उपायकेंद्र सरकार नेहमीच कांद्याचे भाव वाढले, की ते...
संकट टळले, की वाढले?जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाच्या...
ही तर ‘नादुरुस्ती’ विधेयके। शेतीमाल खरेदी करण्यात बाजार समित्यांची मक्तेदारी...
फळबाग लागवडीतील अडचणींचा डोंगर यावर्षी राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
हुकमाचे पत्ते तीनच!मंत्रिमंडळ विस्तार व फेरबदलाबद्दल अनेक ...
भरवशाचा निर्यातदार हीच खरी ओळखडाळी, कांदा याबरोबरच इतरही शेतीमालाचे देशांतर्गत...
कृषी प्रक्रिया संचालनालय आव्हानात्मक...शेतीमाल प्रक्रियाक्षम आहे. म्हणजे त्याच्यावर...