कामाच्या दर्जात तडजोड न स्वीकारणारा अभियंता

भारतरत्न मोक्षगुंडम विश्‍वेश्‍वरय्या या जागतिक कीर्तीच्या महान अभियंत्याचा जन्म १५ सप्टेंबर १८६१ रोजी कर्नाटक राज्यात कोलार जिल्ह्यातील मुद्देनहळ्ली येथे झाला. त्यांचा जन्मदिवस हा भारतीय स्तरावर ’राष्ट्रीय अभियंता दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने त्यांच्या कार्याची ही आठवण...
संपादकीय.
संपादकीय.

सर विश्वेश्वरय्या यांच्या कामाची मुहूर्तमेढ धुळे जिल्ह्यातील साक्री येथे झाली, हे अनेकांना माहिती नसेल. साक्री तालुक्याच्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. १८८४ मध्ये इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर ते नोकरीला लागले. काही दिवस इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ‘एरिगेशन इंजिनिअरिंग’ या विषयावर त्यांनी अध्यापन केले. त्यानंतर नाशिक विभागात साक्री येथे असिस्टंट इंजिनिअर म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्यात यांची नेमणूक झाली. त्या वेळी साक्री तालुक्यातील नामांकित फड बागायतीचा सार्वत्रिक नावलौकिक होता. विश्वेश्वरय्या यांनी साक्रीच्या मुक्कामात तालुक्यातील पांझरा, कान, बुराई या नद्यांवरील फड बागायतीचा तपशीलवार व तांत्रिक अभ्यास केला आणि अशा प्रकारच्या सिंचन क्षेत्रातील आदर्श पद्धतीवर ते प्रभावित झाले. त्यांनी त्यावर खास प्रबंध लिहून आदर्श सिंचन पद्धतीची ओळख जगाला करून दिली. त्यांचा हा प्रबंध आजही दिल्लीतील एका म्युझियममध्ये सुरक्षित आहे. तो प्रबंध वाचून जागतिक बँकेने जपानच्या ‘इको जी सिको’ नावाच्या एका सिंचन तज्ज्ञाला फड बागायतीचे प्रत्यक्ष निरीक्षण करून रिपोर्ट करायला सांगितले होते. इको जी सिको हे प्रत्यक्ष साक्री तालुक्यात पाटबंधारे खात्याच्या साह्याने येऊन गेले व त्यांनी या फड बागायतीतील सिंचन व्यवस्थेबद्दल अत्यंत गौरवोद्गार काढले. त्यांच्या त्या दौऱ्यात मी स्वतः हजर होतो. ही आदर्श सिंचन व्यवस्था जगाने अवलंबली पाहिजे, अशी त्यांनी इच्छा प्रदर्शित केली होती. सर विश्वेश्वरय्या यांनी फड बागायती सिंचन पद्धतीच्या धरतीवर त्यात काही तांत्रिक सुधारणा करून ‘ब्लॉक सिस्टिम’ विकसित केलेली आहे. सिंचनातील ही सिस्टिम अजूनही त्यांच्याच नावाने ओळखली जाते. 

१९४८ मध्ये नाशिकजवळ गंगापूर हे पहिले मातीचे धरण बांधण्यात आले. त्याचे कार्यकारी अभियंता गो. नी. धानक होते. त्यासाठी विश्वेश्वरय्या यांच्या ज्ञानाचा त्यांना खूप उपयोग झाला. पुण्याजवळच्या खडकवासला धरणासाठी त्यांनी डिझाइन केलेले स्वयंचलित द्वार आजपावेतो उत्तमरीत्या कार्यरत आहेत. त्याला विश्वेश्वरय्या गेट म्हणून ओळखले जाते. म्हैसूर राज्यातील भद्रावती लोखंड कारखान्याची व्यवस्थित मार्गी लावून दुसऱ्या मोठ्या कामासाठी त्यांनी राजीनामा देऊन मोकळीक घेतली. भद्रावतीचे काम महात्मा गांधींनी राजगोपालाचारी यांचे समवेत बघितले. महात्मा गांधी यांनी १९२७ मध्ये त्यांच्या ‘यंग इंडिया’ या वृत्तपत्रात म्हटले आहे, की कृष्णराजसागर प्रमाणेच भद्रावती कारखाना उभा करताना विश्वेश्वरय्या यांनी सर्व योग्यता, ज्ञान, वेळ व शक्ती म्हैसूर राज्याच्या सेवेला दिली आहे. ही देशभक्ती स्थानिक रचनात्मक कार्यशैलीचा उत्तम नमुना आहे. वृंदावन गार्डन (१९३२) हा त्याचाच एक जागतिक कीर्तीचा वारसा आहे. कर्नाटकातील कृष्णा नदीवर कृष्णराज सागर हे धरण त्यांनी उभे केले आहे. त्या धरणाचा साठ किमी लांबीचा डावा कालवा ‘विश्वेश्वरय्या कालवा’ म्हणून ओळखला जातो. त्या कालव्याला १९६० फूट लांबीचा बोगदा आहे. तेथे विद्युतनिर्मितीही केली जाते.

प्रखर राष्ट्रवादाची शिकवण सर विश्वेश्वरय्या १९२६ मध्ये शिकागो येथे एका अभियंता परिषदेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करावयाला गेले होते. तेथे त्यांनी एका लेखकाला काही मुद्दे व टेक्निकल बाजू समजावून सांगितल्या. त्यावरून स्वतःसाठी एक शोधपेपर लिहून देण्याची विनंती केली. लेखकाने ते मान्य केल्यावर लेख लिहिण्याच्या मेहनताना म्हणून आठ डॉलर मोबदला ठरविण्यात आला. तसेच लेख एका दिवसात पूर्णपणे लिहून देण्याचे निश्चित ठरले. त्याप्रमाणे विश्वेश्वरय्या हे लेखकाच्या ऑफिसमध्ये पोचले. तेव्हा लेखक तेथे नव्हते, पण त्यांच्या चिटणिसांनी तयार केलेला लेख विश्वेश्वरय्या यांच्या हातात दिला. तो ठरलेल्या वेळेतच दिला होता. त्यांनी तो वाचला. अचूक आणि त्यांना हव्या तशा आशयाचा व परिपूर्ण असा लेख झाला होता. ते खूष झाले व त्यांनी ठरलेल्या आठ डॉलरऐवजी नऊ डॉलर मोबदला म्हणून चिटणिसाकडे दिला. दुसऱ्या दिवशी लेखक स्वतः त्यांच्याकडे पत्ता शोधत मुक्कामाच्या हॉटेलवर पोचले व त्यांनी विनम्रपणे एक डॉलर परत केला. विश्वेश्वरय्या म्हणाले, ‘‘लेखक महाशय मी तुमच्या कामावर खूष होऊन ही खुशाली दिली आहे.’’ लेखक म्हणाले, ‘‘माझ्या कामाच्या कौतुकाबद्दल आभारी आहे, तरी ठरलेल्या मोबदल्यापेक्षा जास्त रक्कम स्वीकारण्याचा मला अधिकार नाही. आम्ही इनामाकडे बघून काम करत नाहीत. जे काम स्वीकारले ते इमानेइतबारे पूर्ण करतो. असे इनाम स्वीकारले तर माझी मानसिक शांती नष्ट होईल. आमचे राष्ट्रीय चारित्र्य रसातळाला जाईल. राष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या प्रामाणिकपणावर व कर्तव्यनिष्ठतेवर राष्ट्र महान बनते.’’ हे सांगून ते लेखक निघून गेले. जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा व मेहनतीपेक्षा जास्त न घेण्याच्या या प्रवृत्तीमुळे विश्वेश्वरय्या प्रभावित झाले. त्यानंतर त्यांनी अनेक कार्यक्रमांत हा किस्सा आवर्जून सांगितला.

त्यांना १९५५ मध्ये केंद्र सरकारने त्यांना सर्वोच्च मानाचा भारतरत्न पुरस्कार दिला. तेव्हाही त्यांनी पुरस्कारासाठी शिफारस करणाऱ्यांना स्पष्टपणे बजावले होते की, ‘‘सरकारच्या चुकीच्या निर्णयाचे समर्थन करावे असे मनात ठेवून मला हा पुरस्कार प्रस्तावित करत असाल तर तशी अपेक्षा न ठेवता पुरस्काराबद्दल माझे कामाचे मूल्यमापन करून शिफारस करा. तत्त्वनिष्ठा कायम ठेवूनच मी तो पुरस्कार स्वीकारेन.’’ असे ठणकावून सांगणारा हा महान अभियंता होता. म्हैसूर सरकारने त्यांना मुख्य अभियंतापदी बढती दिली. तेव्हाही त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, ‘मी एरिगेशनबरोबरच परदेशातून स्थापत्य अभियांत्रिकी व कारखानेविषयक विशेष अभ्यास केला आहे. त्या क्षेत्रातही माझ्या ज्ञानाचा उपयोग व्हावा, अशी माझी इच्छा आहे.’ ही इच्छा सरकारने मान्य केल्यावरच त्यांनी बढती स्वीकारली. विश्वेश्वरय्या यांना इंग्रजांनी ‘सर’ ही मानाची पदवी दिली. मैसूर सरकारने त्यांना ‘दिवाण’ पद बहाल केले होते. त्यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही सन्मानाची पदवी अनेक विद्यापीठांनी दिली. असे थोर अभियंते वयाच्या सत्तराव्या वर्षी १४ एप्रिल १९६२ रोजी निधन पावले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १९६७ पासून महाराष्ट्र सरकारने उत्कृष्ट अभियंता पुरस्कार सुरू केले आहेत. त्या क्षेत्रातील उच्च सामाजिक नीतिमत्ता व कामातील योग्यता बघून अभियंत्यांना गौरविण्यात येते. त्यांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारणाऱ्यांनी त्या हिमालयाएवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा, त्यांनी केलेल्या कठोर परिश्रमाचा व कामाचा दर्जा याबाबत कुठलीही तडजोड न स्वीकारण्याचा आदर्श घेऊन भारत उभारणीचे काम पुढे चालवले, तर हेच त्यांच्या स्मृतींना खरेखुरे अभिवादन ठरेल. :

सुभाष काकुस्ते ः ९४२२७९८३५८ (लेखक शेतीप्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com