`ज्ञानेश्‍वरी'त दडलंय कृषी विज्ञान

‘भगवत्‌गीता' हा ग्रंथ म्हणजे श्रीकृष्णाने अर्जुनास केलेला उपदेश आहे. हा उपदेश मानवी जीवनात उपयोगी पडणारा आहे. गीता संस्कृत भाषेत असल्याने ती सर्वांनाच समजेल असे नाही. माउली ज्ञानेश्‍वरांनी या उपदेशाचे अलौकिक वर्णन मराठी भाषेत करून ज्ञानेश्‍वरीची निर्मिती केली आहे. शेती, पिके, ऋतू, शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा, हवामान आदी घटकांचा सूक्ष्म अभ्यास ज्ञानेश्वरीत दिसून येतो.
agrowon editorial article
agrowon editorial article

कां सु क्षेत्री बीज घातले।  ते आपुलिया परी विस्तारले।  तैसे भारती सुरवाडले।।  नैसर्गिकरित्या जमीन सुपीक असेल तर अशा जमिनीतील पिकाची पेरणी केल्यानंतर त्याचा सहजच विस्तार होऊन अपेक्षित उत्पादन हाती येते. या ठिकाणी तुम्हाला अधिकचे कष्ट करावे लागत नाही. तसेच, जमिनीच्या प्रकारानुसार पीक पद्धती शेतीत राबविली तर निश्‍चित शेतकऱ्यांना उत्पादन येईल. यासाठी आपल्या जमिनीचा प्रकार आणि त्यानुसार पीकपद्धती घ्यावी. ज्यामुळे चांगले उत्पादन हाती लागेल. 

जैसे मूळसिंचनी सहजे। शाखा पल्लव संतोषती।  कोणतेही पीक पाने, फुले, फळे, धान्य हे आपल्या पदरात पडण्यासाठी पाणी मात्र झाडांच्या मुळाशी घातले पाहिजे. म्हणजे फांद्या व पाने आपोआप टवटवीत होतात. अशा सिंचनाने पाण्याचीही बचत होते. अर्थात ठिबक सिंचनाचे महत्त्व त्या काळी ज्ञानेश्वरांनी स्पष्ट केले होते. त्याचा उपयोग आज शेतकऱ्यांना होतोय. 

 जैसे क्षेत्री जे पेरिजे। ते वांचुनि आन न निपजे।  जसे शेतात तुम्ही ज्या पिकाची पेरणी करणार आहात तेच उगवणार आहे. त्यामुळे कोणते पीक अधिक फायदेशीर राहील याचा कालानुरूप अभ्यास करा आणि ते पीक घेण्याचा प्रयत्न करा. यासाठी पीकविज्ञानाची कास धरा. हे सर्व मी मराठीत लिहीत आहे खरे पण प्रतिज्ञापूर्वक सांगतो अमृतालाही पैजेने जिंकतील अशी रसाळ अक्षरे रचून मी सर्व सांगेन. शेतीविज्ञान हे इंग्रजी भाषेतील असलेले आमच्या खेड्यातील शेतकरी बांधवांना सर्वांनाच समजेल, उमजेल की नाही, हे सांगता येणार नाही. पण या शेती तंत्रज्ञानाचे वर्णन माउलींनी ज्या मराठी भाषेत केले, ते सर्वांना समजल्याशिवाय राहणार नाही. माउली म्हणतात हे विज्ञान समजणे अवघड वाटू देऊ नका. ते या बाबत आवडत्या फळाचे उदाहरण देतात. ते म्हणतात, तुम्हाला आवडणाऱ्या फळाला साल आणि आठोळी असेल तर तुम्ही ते फळ खाण्याचे सोडून देता का? नाही ना, ते अलग करून खाताच ना! तसेच विज्ञानाचे आहे. यात अडचण असेलही पण त्याचा स्वीकार आवडत्या फळासारखा करा.

जो हा भुतग्रामु आघवा। असे प्रकृती आधीन पांडवा।  जैसी बीजाचिया वेल पालवा। समर्थ भूमी।  या ठिकाणी माउली परत गीतेमधील तत्त्वज्ञानाला भूमीची उपमा देतात. हा सर्व प्राणिमात्रांचा समुदाय प्रकृतीच्या अधीन आहे. पण कसा? जशी बीजाला वेली, पाने, उत्पादन करण्यास भूमीच समर्थन आहे हे समजून घ्या. या शेती विज्ञानालाच माउलींनी गाय आणि वासरू यांची उपमा दिली. वासराला पाहताच गाय खडबडून प्रेमाने उभी राहते. मग वासरू पित असताना ती पान्हा चोरेल का? तसे हे शास्त्र एकदा का समजले तर ते तुम्हाला भरभरून दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे वासराने आपल्या आईची कास धरली तशी तुम्ही शेती विज्ञानाची कास धरा आणि तृप्त व्हा, असे तर माउली सांगतात ना! 

कां भूमीचे मार्दव। सांगे कोंभाची लवलव।  नाना आचार गौरव। सुकुलीनाचे।।  जमिनीत मृदुपणा आहे. हे कोंभांच्या सतेजपणावरून कळते. अथवा मनुष्याच्या श्रेष्ठ आचरणावरून त्याचे मोठेपण समजाला दिसते. हे जरी असले तरी जमिनीत असलेल्या झाडांच्या मुळांना पाण्याचा पुरवठा होत आहे हे त्या झाडांच्या फांद्यांच्या टवटवीवरून समजते. हे विज्ञान खरे असले तरी निसर्गाची कृपा नेहमी राहीलच हे सांगता येत नाही. सतत वेळेवर येणारा मॉन्सून जर लांबला तर वेळेवर पीक पेरता येत नाही. अशा वेळी अपेक्षित उत्पादन हाती येणार नाही. मग साहजिक शेतकरी कर्जबाजारी होईल. याचे वर्णन खालील ओवीत दिसते. 

कुळवाडी रिणे दाटली। कां वांकडिया ढोरे बैसली।  माउली म्हणतात कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांची अवस्था ही वाईटच आहे. कसी तर पावसाळ्यात पावसाने एकदा का गुरे खाली बसली तर ती पुन्हा उठत नाहीत. तशी शेतकऱ्यांची अवस्था कर्जाच्या ओझ्याने होते. कर्ज एकदा मानगुटी बसली की उतरतच नाही. पाऊस कसा पडतो या विषयी माउली लिहितात, 

सुवाये मेघू सांवरे। जैसा चंद्रे सिंधू भरे।  तैसा मातला रसु आदरे। श्रोतयांचेनि।।  अनुकूल वाऱ्याने मेघांचा वर्षाव होतो. चंद्रोदयाने सागराला भरती येते. याचप्रमाणे श्रोत्यांच्या आदराने वक्‍त्यालाही स्फुरण चढते. तसेच आषाढ महिन्यातील वारे हे आकाशातील ढग दूर नेतो त्याला आपण ‘बखाड'' पडलंय म्हणतोय. यासाठी माउलीची ओवी आहे. 

शरदागमींचा वारा। जैसा केरु फेडी अंबरा।  कां उदयला रवी अंधारा। घोटू भरी।  शरद ऋतू सुरू झाला म्हणजे जोरात वारे वाहू लागतात आणि मग हे वारे आकाशातील ढग दूर नेतात किंवा नाहीसे करतात. त्यामुळे साहजिकच पाऊस पडत नाही. या वाऱ्याला उपमा देताना माउली पुढे म्हणतात, सूर्योदय झाला म्हणजे अंधकार नाहीसा होतो तसे होते. त्यामुळे शेती विज्ञान माहीत नसेल तर काय होईल. याविषयी म्हणतात, अरे पोटात भूक, जवळ अन्नही आहे पण ते कसे जेवावे हे माहीत नसल्याने बालकाला जसा उपवास घडतो किंवा तेल, वात व अग्नी इत्यादी सामग्री असली तरी त्याचे एकत्रीकरण करण्याची पद्धती माहीत नसेल तर जशी प्रकाशाची प्राप्ती होत नाही. तशी अवस्था होते. जसे शेतात पेरल्याशिवाय गवत उगवते तसे भाताचे पीक उगवत नाही. त्याला राब करूनच पेरावे लागते. 

सुक्षेत्री आणि वोलटे। बीजही पेरले गोमटे  तरी आलोट फळे भेटी। परी वेळ की गा।   ओल असलेल्या चांगल्या जमिनीत उत्तम बीज पेरले तर अपार फळ मिळते. खरे तर त्यालाही योग्य काळ यावा लागतोच ना! 

लोह उभे खाय माती। ते परिसाचिये संगती।  सोने जालया पुढती। न शिविजे मळे।  लोखंड मातीत असले तरी ती (माती) त्याला खाऊन टाकते. पण तेच परिसाच्या स्पर्शाने सोने झाल्यावर पुन्हा मातीत ठेवले तर तिचा त्याला थोडा सुद्धा त्रास होत नाही. याप्रमाणे तुम्ही शेती विज्ञानाची कास धरा. तंत्रज्ञानाची संगती करा. डोळसपणे तंत्रज्ञानाचा वापर करा. लोखंडाचे जसे परिस स्पर्शाने सोने होते. तसे या विज्ञानामुळे तुमचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही. 

रामेश्‍वर ठोंबरे ः ९४२०४०६९०१ (लेखक औरंगाबाद येथील विभागीय कृषिविस्तार शिक्षण केंद्रात कार्यरत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com