नैसर्गिक आपत्तीपासूनचा धडा

सातत्याची चक्रीवादळे, त्सुनामीच्या बेफाम माऱ्याने फिलिपाइन्समधील शेतकऱ्‍यांना खूप काही शिकविले आहे. त्यांनी सर्वप्रथम डोंगर, टेकड्यांना वृक्ष लागवडीने बहरून टाकले. शेतांच्या बांधावर जोड उत्पन्न देणाऱ्‍या झुडूपवजा वृक्षांची लागवड केली. संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीने करून स्थानिक भाताच्या वाणाला प्राधान्य दिले. हे सर्व शासनाच्या मदतीने झाले, हे विशेष!
संपादकीय.
संपादकीय.

काही वेदनांमधून सुखद आनंदप्राप्ती होते, तर काही दु:ख निर्माण करतात. सोबत त्यांचे व्रण त्या भोगलेल्या दु:खाची आपणास आयुष्यभर आठवण करून देत असतात. मग वेदना आणि शोकांतिका यांचे नाते काय? एक अभ्यासू वक्ता म्हणतो, ‘‘हे दोघे भाकरीसारखे आहेत. वरचा पापुद्रा म्हणजे वेदना आणि त्या खालची जाड भाकरी म्हणजे शोकांतिका.’’  निसर्गाला ओरखडे ओढले, की वेदना निर्माण होते आणि त्यानंतर होणारा ऱ्हास ही शोकांतिका असते, याचा अनुभव आपण उत्तराखंडमधील केदारनाथला घेतला, केरळमध्येही अनुभवला. एवढेच काय; पण माळीणची शोकांतिका अजूनही आम्हाला विसरता येत नाही. निसर्गाने दिलेल्या वेदना आणि त्यामागे सावलीप्रमाणे मार्गक्रमण करणारी शोकांतिका जवळून पाहावयाची असेल तर आज महाराष्ट्रात कुठल्याही विभागाच्या जिल्ह्यात, तालुक्यात, लहान-मोठ्या गावांत जा, तेथे फक्त तुम्हाला फक्त वेदनांचा आक्रोशच ऐकावयास मिळेल. सर्वत्र पाणी, चिखल, गाळ, उभे पीक आडवे झालेले, त्यातील परिपक्व बियाण्यांचा पुन्हा धरतीच्या पोटी जन्म घेण्याचा केविलवाणा प्रयत्न, ही सर्व शोकांतिकाच नव्हे काय?

प्रत्येकी चार महिने पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे ऋतुचक्र लाभलेला आपला देश पृथ्वीतलावर एकमेव असावा. ही परिस्थिती हजारो वर्षांपासून अखंड सुरू होती. पण, गेल्या चार-पाच दशकांत हव्यासापोटी निसर्गालाच ओरबडले गेले, वातावरण बदल होऊ लागला आणि ऋतुचक्रच बदलले. दिवाळी संपून गेली तरी राज्यातील थंडी गायब अन् पाऊस सुरूच होता. देव दिवाळी आक्रोशातच गेली. वातावरण बदल होत आहे. शहरामधील लोक त्यावर चर्चा करतात. मात्र, पाण्यातून वाट काढत घरी सुखरूप पोचतात. पण, हातावर पोट असलेला शेतकरी आजही चिखलामध्ये सोयाबीन, कापसाचे मरण आपल्या भिजलेल्या डोळ्यांनी पाहत आहे. द्राक्ष, डाळिंबाची अवस्था पाहून कोसळत आहे. कोण, कुणाला, कसा आणि किती आधार देणार? या वर्षी पाऊस उशिरा आला. सुरुवातीला चिंता होती ती पिण्याच्या पाण्याची आणि नंतर शेतीची. ज्या मराठवाड्यात सप्टेंबरपर्यंत पाण्याअभावी शोकाकुल वातावरण होते तोच मराठवाडा आज या पावसाने उद्ध्वस्त झाला आहे. ११७ वर्षांत प्रथमच आम्ही चार चक्रीवादळे एकापाठोपाठ अनुभवली. अजूनही त्यांची भीती गेली नाही. वातावरण बदल, पावसाचा वेग ही या क्षणी आपत्ती नसून आम्हा शेतकरी बांधवांना भविष्यासाठी खरी चेतावणी आहे. आज यापासून आपण शिकणे गरजेचे आहे. 

शेतकऱ्यांचे, त्यांच्या पिकांचे एवढे नुकसान का झाले, याचा अभ्यास होणे आवश्यक आहे. शासनातर्फे मदत होईल, नुकसानभरपाई मिळेलही म्हणून या पावसाचा, चक्रीवादळांचा, वातावरण बदलाचा प्रश्न सुटणार आहे का? मुळीच नाही. माझ्या शालेय जीवनात ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांचे मी जवळून अवलोकन केले होते. प्रतिवर्षी सेंद्रिय खताने समृद्ध होणारी त्यांची जमीन खरीप, रब्बीमध्ये पाच-पन्नास पारंपरिक पिकांची श्रीमंती दाखवत असे. प्रत्येकाकडे गुरेढोरे आणि बांधावर कितीतरी वृक्ष होते, याची गणतीच नव्हती. गावाच्या बाहेर असणारी गायराने आणि त्यात चरणारी शेकडो जनावरे हे अवर्णनीय सौंदर्य होते. हे सर्व ओरबाडले गेले, वेदना झाल्या. पाण्याला अडविण्यासाठी, वाऱ्‍याला थांबविण्यासाठी आता काहीही उरले नाही. पंजाब हे भारताचे गव्हाचे कोठार. तेथे आज पाच टक्केसुद्धा जंगल उरलेले नाही. या वर्षी पावसाने पंजाबचेसुद्धा प्रचंड नुकसान केले आहे. तेथे भात उत्पादन ५० टक्केसुद्धा होईल का नाही, याची शंका आहे. 

या वर्षीच्या पावसाने महाराष्ट्रामधील जवळपास ७० लाख हेक्टरवरचे उभे पीक वाहून गेले, कुजले, रोगग्रस्त झाले. आश्चर्य म्हणजे, ज्या ठिकाणी सर्वांत जास्त मुसळधार पाऊस पडतो त्या कोकण भागात भातशेतीच्या हानीचा आकडा याच अतिवृष्टीमध्ये एक लाख हेक्टरच्या आतच आहे. हे साध्य झाले ते तेथील घनदाट वृक्षराजी आणि हरित डोंगर पट्ट्यांमुळे. वृक्षाचे महत्त्व तेथे अधोरेखित होते. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातही प्रचंड पाऊस झाला. पण, शेतकऱ्यांना तेथील जंगलाने वाचवले आहे. म्हणूनच, प्रत्येकाने वृक्ष लागवड व जंगल श्रीमंतीचे महत्त्व लक्षात घेणे आवश्यक आहे. बांधावरचे तसेच शेताच्या उताराच्या वरच्या भागावरची वृक्ष लागवड शेतात पाणी तर मुरवितेच त्याचबरोबर पिकाचेही रक्षण करते.

मी फिलिपाइन्समधील भातशेती जवळून पाहिली. वातावरण बदलाचा, त्सुनामीच्या लाटांचा तडाखा बसलेले हे छोटे राष्ट्र पावसाच्या, चक्रीवादळाच्या बेफाम माऱ्‍यामधून तेथील शेतकऱ्‍यांना खूप काही शिकवून गेले. डोंगर उताराच्या खाली असलेल्या भातशेतीला वातावरण बदल, पावसाचा मारा आणि वाऱ्‍याच्या वेगापासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम सर्व डोंगर, टेकड्यांना वृक्ष लागवडीने बहरून टाकले; नंतर शेतांचे बांध रुंद करून त्यावर जोड उत्पन्न देणाऱ्‍या झुडूपवजा वृक्षांची लागवड केली. संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीने करून स्थानिक भाताच्या वाणाला प्राधान्य दिले. हे सर्व शासनाच्या मदतीने झाले, हे विशेष! भुतान हा आशियामधील पहिला सेंद्रिय शेती करणारा देशसुद्धा वातावरण बदलास आज सक्षमपणे सामोरे जात आहे. पावसाचे पडणारे पाणी वाहून जाऊन पिकांचे नुकसान थांबविण्यासाठी सेंद्रिय शेतीबरोबरच त्यांनी जिवामृताचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू केला. जिवामृतामुळे जमिनीमधील स्थानिक गांडुळाच्या जाती पृष्ठभागावर येतात, जमीन सच्छिद्र होते आणि पाणी जमिनीमध्ये सहज मुरून भूगर्भात पाणीपातळी वाढते. आपल्याकडे सिक्कीम राज्यातसुद्धा सेंद्रिय शेतीत हे प्रयोग यशस्वी झाले आहेत.

डॉ. नागेश टेकाळे ः ९८६९६१२५३१ (लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com