अनुदान नव्हे; योगदानच वाचवेल शेतीला

फ्रान्समधील द्राक्षाच्या बागा प्रतिवर्षी वातावरण बदलामध्ये सापडतात. तेथे प्रचंड गारपीट सुरू असते. हवामान खात्याचा अचूक अंदाज तेथील शेतकऱ्यां‍ना मिळतो. सर्व द्राक्ष बागा काही मिनिटांत स्वयंचलित आच्छादनाने झाकल्या जातात.
संपादकीय.
संपादकीय.

वातावरण बदल आणि कोसळणाऱ्या पाऊस धारा अथवा कडक उन्हाळा यांना सक्षम तोंड देण्यासाठी जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्ब वाढणे गरजेचे आहे. सेंद्रिय कर्ब म्हणजे उपयोगी जिवाणूचे आगारच. हेच जिवाणू आणि कर्ब जमिनीला सछिद्र करतात आणि पाणी आतमध्ये सहज मुरते. सेंद्रिय कर्बामुळे मुळांची वाढ पसरट तसेच खोलवर होते. जेवढी मुळे पसरट आणि खोल, तेवढी जास्त ताकद त्या पिकामध्ये उभे राहण्यासाठी मिळत असते. जास्त उत्पादन मिळावे म्हणून आपण रासायनिक खते वापरतो. परिणाम खोड ताठ उभे राहू शकत नाही आणि जोरदार पावसामुळे तसेच वाऱ्‍यामुळे ते लोळण घेते. यावर्षी भात पिकाचे जे प्रचंड नुकसान झाले आहे ते याचमुळे. अशा वालुकामय शेतामधील जमिनीत ओलावा टिकत नाही, मुळेही मातीला घट्ट पकडू शकत नाहीत.

आजही आमच्या शेतकऱ्याकडे धान्य साठवणुकीची सोय नाही आणि आर्थिक टंचाईमुळे त्यांना शक्यही नाही. शेतातून खळ्यावर आणि तेथून मंडीमध्ये अशा कचाट्यात शेतकरी आहे. काढणी पश्चात धान्य काही कालावधीपुरते शेतातच साठविण्याची कुठलीही सोय शेतकऱ्याकडे नाही आणि त्यांचा तसा प्रयत्नही नसतो. शेतामधून काढलेले कृषी उत्पादन एका ठिकाणी गोळा करून ते ताडपत्री अथवा तत्सम आवरणाखाली सहज झाकून ठेवता येऊ शकते. त्यामुळे अचानक आलेल्या वाऱ्यापावसापासून त्याचे रक्षण होते. शासन यासाठी शेतकऱ्यांना मदत करू शकते. शेतकरीसुद्धा ते खरेदी करू शकतात. यावर्षीच्या पावसाने सर्वांत जास्त नुकसान खळ्यावरच्या उत्पादनाचे झाले आहे, यामागे शेतकऱ्यांची फार मोठी मेहनत आणि भविष्यामधील आशा होत्या. शेतकरी खऱ्‍या अर्थाने येथे जास्त उद्‌ध्वस्त झाला आहे. 

फ्रान्समधील द्राक्षाच्या बागा प्रतिवर्षी वातावरण बदलामध्ये सापडतात. तेथे प्रचंड गारपीट सुरू असते. हवामान खात्याचा अचूक अंदाज तेथील शेतकऱ्यां‍ना मिळतो. सर्व द्राक्ष बागा काही मिनिटांत स्वयंचलित आच्छादनाने झाकल्या जातात. यावर्षी आपल्याकडे द्राक्ष बागा उद्‌ध्वस्त झाल्या. उत्पादकांचे लाखो रुपये पाण्यात गेले. या सर्वांनी भविष्यामध्ये स्वखर्चाने आच्छादनाला महत्त्व देणे गरजेचे आहे. अशी आच्छादने सहज काढता येतात आणि पुन्हा लावता येतात. द्राक्षाएवढेच नुकसान डाळिंब उत्पादकांचे झाले आहे. इस्त्राइल हा देश दर्जेदार फळ उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. फळांचा दर्जा, आकार, रंग, चकाकी कायम रहावी तसेच वातावरण बदलापासून त्याचे रक्षण व्हावे म्हणून फळे झाडावर लगडलेली असतानाच त्यांना आच्छादित केले जाते. डाळिंबाचे झाड पाऊस, वाऱ्‍याला तोंड देऊ शकते पण त्याची फळे या बदलास संवेदनशील असतात. यासाठी झाडाभोवती भरपूर आच्छादन आणि फळेही आच्छादित करणे हाच प्रभावी उपाय आहे. 

यावर्षीच्या लांबलेल्या पावसात सर्वांत जास्त नुकसान अल्पभूधारक शेतकऱ्‍यांचे झाले आहे. जेमतेम चार-पाच एकरवर त्या शेतकऱ्यांचे सर्व कुटुंब जगत असते. आज हा वर्ग संपूर्णपणे उद्‌ध्वस्त झाला आहे तो त्याच्या शेतातील सोयाबीन आणि कापूस या नगदी पिकामुळेच. शासनाने या शेतकऱ्यांकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. वास्तविक हे शेतकरी कर्ज काढून रासायनिक खते, कीटकनाशके वापरून या नगदी पिकांचे उत्पादन घेतात ते चार पैसे पदरात पडावे, कर्ज फेडून रब्बीचे नियोजन करावे म्हणून. आज याच शेतकऱ्यांची फार मोठी हानी झाली आहे. कर्ज कसे फेडणार, रब्बीचे नियोजन कसे करणार आणि या अस्मानी संकटात कुटुंब कसे पोसणार? शासनाच्या मदतीचा हात यांच्या बांधावर त्वरित पोचणे गरजेचे आहे. मला अनेकवेळा वाटते, की या सर्व अल्पभूधारकांना या दोन नगदी पिकांच्या कचाट्यातून बाहेर काढून सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून पारंपरिक शेतीकडे वळवावे. ज्या एक दोन स्थानिक पिकांचे ते उत्पादन घेतील त्यांना नगदी पिकापेक्षा जास्त हमीभाव द्यावा आणि ताणतणावामधून त्यांची मुक्तता करावी. राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यांमधील ३५८ तालुक्यांतून एक दोन तालुके प्रायोगिक तत्त्वावर निवडून असा नावीन्यपूर्ण प्रयोग करावा. बांधावरील वृक्ष लागवडीसाठी शेतकऱ्‍यांना अनुदान द्यावे. कोटीमधील वृक्ष लागवडीपेक्षा लाखामधील ही वृक्ष संख्या सुदृढ पर्यावरणासाठी जास्त शाश्वत असू शकते. एखाद्या गावामधील मोजक्या इच्छुक शेतकऱ्‍यांना अशा नावीन्यपूर्ण कृषी प्रयोगात समाविष्ट करण्यासाठी शासनापेक्षाही उद्योग समूहाने सामाजिक दायित्वाखाली पुढाकार घेतल्यास अनुकरणासाठी उत्तम यशोगाथा तयार होऊ शकते. खासदार, आमदार निधी अशा प्रयोगाकडे का वळवू नयेत?

आमचा शेतकरी खरा कृषी शास्त्रज्ञ आहे. निसर्गाला बरोबर घेऊन शेतीत त्याने केलेले शेकडो प्रयोग आजही कृषी विद्यापीठे आणि संशोधन संस्थांना मार्गदर्शक ठरतात. बांधालगत जवसाच्या दोन ओळी पेरणे, गुऱ्हाळात अंबाडीचा वापर, विहिरीलगत पाणी शुद्धीकरणासाठी शेवगा वृक्ष, खरिपात भुईमूग आणि रब्बीत त्याच ठिकाणी ज्वारी, आंतरपीक, जमीन पडीक ठेवणे, सेंद्रिय खतनिर्मिती, जैविक कीटकनाशके असे अनेक यशस्वी प्रयोग शेतकऱ्‍यांनी केले आहेत. आम्ही फक्त त्यांच्या या ज्ञानावर मोठमोठ्या प्रयोग शाळा निर्माण केल्या. पूर्वी ज्वारीच्या उंच ताटाला लागलेले मोठे कणीस परिपक्व झाल्यावर शेतकऱ्यांच्या घरी छताला लटकवलेले असे. ही त्याची बियाणाची बॅंक होती. आजच्या वातावरण बदलात आणि निसर्गाच्या प्रकोपात आम्हाला अशा प्रयोगांमधूनच उत्तर शोधावे लागणार आहे. हरित क्रांतीद्वारे आमची भूक मिटली पण जमिनीची रासायनिक खतांची भूक मात्र वाढली सोबत आमचा हव्यासही वाढला आहे. आम्हीच उत्पादित केलेल्या शेतमालावर शासनाचे नियंत्रण हे राहू-केतू आहेतच. शेत निर्मळ करून उत्पादन वाढावे म्हणून आम्ही तेथे तणाचे एक पानही शिल्लक ठेवत नाही. पिकाला स्पर्धा नसेल तर त्याची प्रतिकार शक्ती कशी वाढणार? सर्व खाण्यापिण्याच्या सुखसोयी प्राप्त झालेले असे पीक निसर्ग प्रकोपात लोळण का नाही घेणार? महापुरातही लव्हाळा पाण्याच्या प्रवाहापुढे वाकून नतमस्तक होतो आणि पूर ओसरला की पुन्हा ताठ उभा राहतो. निसर्गाने त्याला तशी शक्ती दिली आहे. अशी शक्ती प्रत्येक पिकात असते दुर्देवाने आपण तिला सुप्त अवस्थेतच ठेवतो. वातावरण बदल, मुसळधार पाऊस, चक्रीवादळे, समुद्राला उधान हे भविष्यात सहन करावयाचे असेल तर सर्वांनी निसर्ग संवर्धनाच्या वाटेवरून प्रवास करावयास हवा. यासाठीच प्रत्येकाने बदलावयास हवे. लाखो हातांनी एकत्र यावयास हवे. अनुदानापेक्षा योगदानच शेती आणि  शेतकऱ्यांना वाचवू शकते.

डॉ. नागेश टेकाळे ः ९८६९६१२५३१

(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com