agriculture news in marathi agrowon special article on no first use of atomic weapons | Agrowon

अण्वस्त्रांविषयी वाचाळता कशासाठी?

अनंत बागाईतकर
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

अण्वस्त्रांचा 
 वापर करण्याच्या धोरणात बदल करण्याबाबत अनेक सूचक वक्‍तव्ये सत्ताधारी करीत आहेत. मात्र, यात त्यांची संहारकता, त्यांचा होणारा परिणाम, याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. अण्वस्त्रांबाबत सत्ताधाऱ्यांनी विवेकाची भूमिका घेणे अपेक्षित आहे. 
 

अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या (नो फर्स्ट यूज) 
 भारताच्या आण्विक धोरण-सिद्धांताचा फेरविचार करण्याबाबत वर्तमान राज्यकर्त्यांनी सूतोवाच करण्यास सुरवात केली आहे. पंतप्रधानांच्याच एका मुलाखतीचा संदर्भ द्यायचा झाल्यास त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत कोणतेही निर्णय अचानक न घेता ते पूर्ण विचाराने आणि लोकांना पूर्वसंकेत देत घेतल्याचे सांगत नोटाबंदी, जीएसटी किंवा इतरही काही निर्णयांचे संदर्भ दिले. ‘संभाव्य निर्णयांचे मी सूतोवाच करीत असतो; पण, माध्यमे किंवा अन्य मंडळी त्याकडे दुर्लक्ष करतात’, असे त्यांनी या मुलाखतीत स्पष्ट केले होते. त्यामुळेच काश्‍मीरला विशेष दर्जा देणाऱ्या घटनात्मक तरतुदी त्यांनी रद्द करण्याची कृती संसदेमार्फत करणे, हाही त्याच मालिकेतील एक निर्णय मानला जातो. या निर्णयापूर्वी न्यायालयात त्याबाबतची याचिका सादर झाली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उघडपणे यासंदर्भात भूमिका घेतली होती. भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार आल्यास काश्‍मीरचा विशेष दर्जा काढून टाकण्यात येईल, हा भारतीय जनसंघापासून ते भाजपपर्यंतच्या सर्व जाहीरनाम्यांमधील प्रमुख विषय होता. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या कारकिर्दीत ‘पोखरण-२’ अणुस्फोट करण्यात आल्या होता. त्यानंतर अमेरिकेने भारतावर निर्बंध जाहीर केले होते. प्रत्युत्तरादाखल पाकिस्ताननेही आण्विक चाचण्या करून तेही कमी नाहीत, हे दाखवून दिले होते.
परस्परांबद्दल कटुता बाळगणारे देश व चारवेळा युद्ध किंवा सशस्त्र संघर्ष झाल्याची पार्श्‍वभूमी असलेल्या या शेजारी देशांमधील आण्विक स्पर्धा धोकादायक असल्याचे लक्षात आल्यानंतर जागतिक समुदायाने दोन्ही देशांना सबुरीचा सल्ला दिला होता. यासाठी दबावही आणला होता. त्यानंतर वाजपेयी सरकारने ‘नो फर्स्ट यूज’ आण्विक धोरणाची घोषणा व अंगीकार केला. मनमोहनसिंग सरकारच्या काळातही याच सिद्धांतानुसार वाटचाल झाली. मात्र, मनमोहनसिंग यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असलेले शिवशंकर मेनन यांच्या काळात (२०१०) यामध्ये एक बदल करण्यात आला. या बदलानुसार ‘बिगर अण्वस्त्रधारी देशांविरुद्ध’ भारतातर्फे अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या धोरणाचा आणि अण्वस्त्रांचा वापर हा ‘किमान धाक’ एवढाच मर्यादित ठेवताना अण्वस्त्रमुक्तीच्या तत्त्वालाही पाठिंबा देण्याची भूमिका घेण्यात आली. या पार्श्‍वभूमीवरच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राजस्थानातील पोखरण येथे ‘आण्विक नीती-सिद्धांता’चा फेरविचार करण्याबाबत केलेले वक्तव्य सूचक आहे. त्यावर राजकीय वर्तुळात चर्चाही सुरू झाली आहे. वर्तमान राजवटीने इतिहास पुसून नवे पायंडे पाडण्याचे प्रकार सुरू केल्याने संभाव्य फेरबदल कोणते असतील, याबाबत विविध अंदाजही वर्तविले जाऊ लागले आहेत. सरकारतर्फे फेरबदल कोणते असू शकतात, याचे पुरेसे दिशादर्शन झालेले नसल्याने काही धक्कादायक गोष्टी होणार काय, हे कुतूहलही निर्माण झाले आहे.

या फेरबदलास पाठिंबा देणाऱ्या तज्ज्ञांच्या मते राजनाथसिंह यांचे वक्तव्य हे पाकिस्तानला उद्देशून होते. विशेषतः इम्रान खान यांनी अलीकडच्या काळात केलेली वक्तव्ये आणि त्यामध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्रसज्जतेचा केलेला उल्लेख लक्षात घेऊन हा इशारा असल्याचे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्याची अमेरिकेने केलेली तयारी आणि त्यासाठी त्यांनी पाकिस्तानकडे मागितलेली मदत, तालिबानबाबत घेतलेली मवाळ भूमिका आणि पाकिस्तानला त्यासाठी अमेरिकेने केलेली आर्थिक मदत, या बाबी लक्षात घेता पाकिस्तानला एकप्रकारे समज व इशारा देण्याच्या आवश्‍यकतेतून हे वक्तव्य करण्यात आल्याचे सांगण्यात येते. राजनाथसिंह यांच्याआधी साक्षात पंतप्रधानांनी २०१९ च्या निवडणूक प्रचार सभेत बाडमेर येथे ‘भारताकडील अण्वस्त्रे दिवाळीसाठी आहेत काय?’ असे वक्तव्य केले होते. त्यापूर्वी संरक्षणमंत्री असताना दिवंगत मनोहर पर्रीकर यांनीही अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याचा सिद्धांताचा फेरविचार केला जाऊ शकतो, असे म्हटले होते. नंतर त्यांनी हे त्यांचे व्यक्तिगत मत असल्याचा खुलासा केला होता. या पार्श्‍वभूमीवर उपस्थित होणाऱ्या प्रश्‍नांची उत्तरे सरकारला द्यावी लागतील. भारतीय आण्विक नीती-सिद्धांतात फेरबदलाचे संकेत देण्यासाठी निवडलेली वेळदेखील महत्त्वाची बाब आहे. आताच सरकारला या फेरबदलाची आठवण होण्याचे कारण काय, याचा खुलासा झालेला नाही. भारत-पाकिस्तानदरम्यानचे संबंध ताणलेले आहेत, हे निःसंशय असले तरी परस्परांवर अण्वस्त्रे डागण्याइतके ते टोकाला गेलेले नाहीत. किंबहुना, अनेक मुद्द्यांवर दोन्ही देशांदरम्यान संवाद प्रक्रियादेखील सुरू आहे. त्यामुळेच या फेरबदलाच्या वक्तव्याच्या वेळेचे औचित्य काय, ही बाब प्रश्‍नचिन्हांकित होते. दुसरी बाब दोन्ही देशांची भौगोलिक स्थाने ही निकटतम आहेत. एकाने दुसऱ्यावर अण्वस्त्रांचा वापर केल्यास नुकसान दोघांचे होणार आहे. त्यामुळे दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज असूनही त्यांचा वापर होण्याची बाब काहीशी अंधुक मानली जाते. अर्थात, तालिबानी प्रवृत्तीचे राज्यकर्ते असल्यास ती बाब अशक्‍यप्राय मानता येणार नाही. पाकिस्तानची आर्थिक स्थिती खालावलेली आहे. त्यामुळे आण्विक धमकीद्वारे त्यांचे मनाधैर्य अधिक खच्ची करण्याचा प्रकार म्हणूनही याकडे पाहिले जाऊ शकते. वर्तमान राजवटीने त्यांचे परराष्ट्र धोरण वाजवीपेक्षा अधिक प्रमाणात पाकिस्तानकेंद्रित केलेले आढळते. देशांतर्गत मुस्लिमविरोधी राजकारणाचा हा एक महत्त्वाचा पैलू मानला जातो व त्याचे राजकीय लाभ सत्तापक्षाला मिळत आहेत, हे कारणही यामागे असू शकते. त्याचबरोबर अति-राष्ट्रवादी, साहसवादी भूमिकेचा अंगीकार करून लोकांच्या भावनांना हात घालण्याचे उद्दिष्टही साध्य होते. या सगळ्या देशभक्तिमय वातावरणात आर्थिक संकटावरून जनसामान्यांचे लक्ष इतरत्र वळवून आपली सत्ता कायम राखण्याचा हेतूही यामागे असावा. 

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी २०१८मध्ये अमेरिकेला इशारा देताना त्यांच्या देशाचे अण्वस्त्रांचे बटन सतत त्यांच्याजवळच असते, असे म्हटले होते. त्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी त्यांच्या हातातही अमेरिकेच्या अण्वस्त्रसज्जतेचे बटन असतेच; पण उत्तर कोरियापेक्षा ते फार मोठे आहे आणि चालू आहे, असे प्रत्युत्तर देऊन त्यांची चेष्टा केली होती. उत्तर कोरिया आणि अमेरिकेदरम्यान हजारो मैलांचे अंतर आहे. भारत-पाकिस्तान हे एकमेकांना लागून असलेले देश आहेत. दिल्लीहून लाहोर फक्त ४०० किलोमीटर अंतर आहे. लाहोरवर अण्वस्त्रे डागल्यास तेथील सीमेला लागून असलेली भारतीय गावे वाचू शकणार नाहीत. म्हणूनच, राजकीय लाभापेक्षा राजकीय विवेकाची भूमिका अपेक्षित आहे.

(लेखक सकाळच्या दिल्ली न्यूज ब्यूरोचे प्रमुख आहेत.)



इतर अॅग्रो विशेष
सोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणीमुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत...
हमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...
राहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...
परतीचा मॉन्सून उद्या काही भागातून पुढे...पुणे: परतीच्या मार्गावर दोन दिवसापूर्वी निघालेला...
दूध वाहतुकीसाठी रेड्याचा वापर !...वाशीम: काळ बदलला...सोयी सुविधा निर्माण झाल्या......
ऊस तोडणी यंत्र अनुदानालाच खो; तीन...कोल्हापूर : संभाव्य मजूरटंचाईच्या पार्श्वभूमीवर...
नंदुरबारच्या मिरचीला अतिपावसाचा फटका;...नंदुरबार : जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या मिरची...
एकत्रित शेतीला यांत्रिकीकरणाची जोडअल्पभूधारकांप्रमाणे मोठ्या क्षेत्रावरील...
व्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा? चार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने...
आव्हानात्मक गळीत हंगाममहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन...
साखर कामगारांचा संपाचा इशारा  पुणे/कोल्हापूर  ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...
मॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...
मराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...
अकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन...
नगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...
खानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...
राज्यात पावसाची उघडीप; शेतीकामांना वेगपुणे ः पावसाने उघडीप दिल्याने ओढ्या- नाल्याच्या व...
गुणवत्तापूर्ण संत्रा वाण निर्मितीसाठी...अकोला/नागपूर ः आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी...
राहुरी विद्यापीठातील बदल्या अखेर रद्दपुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...