agriculture news in marathi agrowon special article on nutri farming | Agrowon

सत्त्वयुक्त उत्पादनांची हवी कृषी व्यवस्था

 डॉ. वसंतराव जुगळे 
शुक्रवार, 10 जुलै 2020

आरोग्य आणि अन्न समस्या यातील सहसंबंध सध्या बिघडलेले आहेत. शेतमालाची हाताळणी अनेक ठिकाणी गलिच्छपणे केली जाते. अशावेळी पौष्टिक आणि सत्त्वयुक्त शेतमाल उत्पादनांची कृषी व्यवस्था निर्माण केल्यास जनमानसाचे आरोग्य सुधारेल. शासन काय करेल याची वाट न पाहता युवकांनी याचा पाठपुरावा करावा.
 

माणसाच्या उपभोगासाठी उपयुक्त असलेली जैवविविधता प्रचंड आहे; पण माणूस काही तृणधान्ये व कडधान्यांवरच अवलंबून आहे. अलीकडे रानभाज्या, रानफळे, वनफळे, औषधी वनस्पती या शेतमाल उत्पादनाला मागणी वाढू लागली आहे. उच्चमूल्य कृषी उत्पादनालाही मागणी वाढू लागली आहे. सेंद्रिय शेती, न्यूट्री फार्मिंग, झिरो बजेटची कृषी संरचना, मानवी प्रकृतीतील प्रतिकार क्षमता वाढविणारी कृषी-वनौषधी उत्पादनाला प्राधान्य देणारी कृषी व्यवस्था जन्माला आलेली आहे. जैवतंत्रज्ञान व नॅनो तंत्रज्ञानाचा शिरकाव कृषी व्यवस्थेत झालेला आहे. २०३० पर्यंत कृषी तंत्रक्रांती घडून येईल. कोरोनाच्या (कोविड १९) सांसर्गिक महामारीने तर कृषी आणि पणन व्यवस्थाच पार बदलून टाकली आहे. परिवर्तन व सुधारणांचा हा काळ आहे. 

कृषी क्षेत्रात काम करणाऱ्यांची सरासरी वयोमर्यादा ५०.१ वर्षांची आहे. विकसित देशांमध्ये ही वयोमर्यादा ६० वर्षांची आहे. २०११ च्या जनगणनेनुसार दररोज २००० शेतकरी शेती सोडून इतर क्षेत्रांत जात आहेत. बरेचसे कृषी पदवीधर इतर व्यवसायांकडे वळत आहेत. याला ''ग्रेट इंडियन ब्रेन-ड्रेन'' संबोधले जाते. २०५० पर्यंत भारतातील शेतकरी मध्यम उत्पन्न गटातले (दोन तृतीअंश) असणार आहेत. हवामान बदलाचा धोका, मागणीचा धोका, मध्यस्थांचे उपटसूंभ वर्तन, सरकारी व सामान्यांची कृषी असहिष्णूता या चिंता वाढविणाऱ्या घटना आहेत. मानवी शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या पौष्टिक अन्न आहाराच्या सेवनाची गरज निर्माण झाली आहे. एका बाजूला प्रत्ययास येणारा ''ग्रेट अॅग्रीकल्चर एक्‍सॉडॉस'' (शेती सोडून जाण्याचे प्रकार) आणि दुसऱ्या बाजूला सकस, सत्त्वयुक्त, पौष्टिक आणि आरोग्यदायी अन्न उत्पादनाच्या कृषी-व्यवस्थेची वाढती गरज, याचे गणित कसे सोडवायचे? याबाबतचे धोरण शासनाला आखावे लागणार आहे. ही भूमिका पूर्वीच्या राज्यकर्त्यांमध्ये प्रबळ होती. आता हे दुर्मीळ आहे. त्यामुळे भविष्यकाळ अंधूक बनला आहे. परिवर्तनाचे सामर्थ्य असलेली कृषी व्यवस्था जन्माला घालावी लागणार आहे. 

१९८९ मध्ये डॉ. स्टिफन डे फेलिस यांनी न्यूट्रिएंटअॅग्रीकल्चर फार्मास्युटिकल या दोन शब्दांच्या संयोगातून न्यूट्रॅसिटिकल अॅग्रीकल्चर ही संकल्पना जन्माला आणली आहे. अशा स्वरूपाच्या शेती व्यवस्थेमध्ये हर्बल उत्पादने, खनिजे, जीवनसत्त्वे, डायट्री यांच्यापासून सुसज्ज अशी कृषी व्यवस्था जन्माला घालण्याची नामी संधी आहे. 

२०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य (मिल्लेट) वर्ष म्हणून साजरे होणार आहे. भरडधान्यांमध्ये राळ, नाचणी, बाजरी, वरी, तांदूळ, बाजरा, पर्ल मिल्लेट, फॉक्‍सटेल मिल्लेट, सोरघुम, बार्ली, प्रोसो मिल्लेट, ओट्‌स, बल्गर (गव्हाचा एक प्रकार) अशा सत्त्वयुक्त कृषिमालांचा समावेश होतो. दुष्काळी प्रदेशात याची लागवड शक्‍य आहे. बिनपाण्याचा गहू, शाळू व इतर धान्ये सकस असतात म्हणून लोक त्याला जादा किंमत देऊन खरेदी करतात. भरडधान्यांमुळे बरीच प्रतिकार क्षमता निर्माण होते; पण हे पदार्थ सध्या निकृष्ट आणि गरिबांचे खाद्य म्हणून ओळखले जाते. जंकफूड पदार्थ खाणे म्हणजे श्रीमंतीचा बडेजावपणा आणि महागड्या वस्तू उपभोगण्याची उपरती व्यक्त करणारी अनेक मध्यमवर्गीय कुटुंबे पाहायला मिळतात; पण हे लोक शेतकऱ्याला चार पैसे जास्त देण्यासाठी खाली-वर पाहतात. ही एक प्रकारची विकृती समाजामध्ये पाहायला मिळते. 

आरोग्य आणि अन्न समस्या यातील सहसंबंध सध्या बिघडलेले आहेत. शेतमालाची हाताळणी गलिच्छपणे केली जाते. त्यावर कसलेही निर्बंध नाहीत. जगण्यासाठी अन्नसुरक्षितता जोपासली जाते. पण आज सुरक्षित अन्नव्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. आरोग्यासंबंधीची जागरूकता निर्माण झाल्याशिवाय न्यूट्री फार्मिंगचे महत्त्व कळणार नाही. डाळिंबाचा रस, गाजराचा रस, मोसंबी-संत्र्याचा रस, व्हिटॅमिन डी-३ व ‘अ'' जीवनसत्त्वासाठी कॉडलिव्हर तेल, करक्‍युमिन, मिरी, बीट यांसारखे अनेक शेतमाल औषधी आहेत. त्यादृष्टीने सत्त्व, नत्र आणि औषधी पिकांची लागवड व संवर्धन होणे गरजेचे आहे. २०२० हे वर्ष ‘इंटरनॅशनल प्लॅंट हेल्थ’ म्हणून युनोने घोषित केले आहे. 

आयुर्वेद, युनानी, सिद्ध, होमिओपथी आदी प्रकारच्या औषधी ट्रिटमेंटसाठी असंख्य शेतमालाची उपयुक्तता दर्शविली आहे. माणसाच्या शरीरातील झिंक, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि आयोडिन हे चार महत्त्वाचे प्रतिकारशक्ती निर्माण करणारे घटक आहेत. सुमारे ७९ टक्के लोकांमध्ये झिंक व मॅग्नेशियमची कमतरता आहे. विशेषतः ज्याच्या आहारामध्ये सातत्याने तृणधान्याचे सेवन होत असेल तर शरीरातील झिंकचे प्रमाण कमी होते. ते प्रमाण ५० टक्‍क्‍यांपेक्षा कमी झाल्यास न्युमोनिया होतोच. त्यासाठी फुफ्फुसाला बळकटी देणारी अनेक औषधी द्रव्ये वरील वैद्यकीयशास्त्रात आहेत. स्ट्रेस रिलीज करण्यासाठी मॅग्नेशियमची गरज असते. ते वृद्धिंगत होण्यासाठी आहार, विहार आणि व्यायामाची गरज असते. सेलेनियम पिकाऊ जमिनीत असते. भारताच्या भूमीमध्ये हे प्रमाण खूप कमी आहे. आयोडिनचे महत्त्व आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. थायरॉइड ग्रंथीची बळकटी आयोडिनमुळे वाढते. राष्ट्रीय वनौषधी संस्थेमार्फत अनेक कार्यक्रम राबविले जातात. त्याअंतर्गत अनेक सवलती दिल्या जातात. त्याचा लाभ घेण्याच्या दृष्टीने युवकांनी विशेष दक्ष राहणे हिताचे आहे. 

कापूस वगळता इतर जीएम पिकांना भारतात परवानगी नाही. पण जीएम अंश असलेले अनेक जंकफूड भारतामध्ये पोचले आहेत. शिवाय अनधिकृतरीत्या काही जीएम पिकांची लागवडदेखील केली जात आहे. परदेश दौरे करणारे अनेक भारतीय जीएम अन्न पिकांचे सेवन करतात. यासंबंधी सीएसई दिल्ली या संस्थेने बरेच संशोधन केले आहे. अॅग्री एंटरप्राइज डेव्हलपमेंट अॅण्ड मॅनेजमेंट अॅण्ड यूथ रिसर्च सेंटर यासारख्या संस्था स्थापन करून युवाशक्तीला कृषी ज्ञान द्यावे. कृषी व ग्रामीण रोजगार सेवा केंद्रे स्थापन करून कृषी क्षेत्राला कामगार व सेवा पुरविण्याची सोय करता येते. यूथ अॅग्री फेस्ट, यूथ अॅग्री ट्रेडर्स क्‍लब, फ्रेंड-टू-फ्रेंड क्‍लब अशा अनेक योजना बनवून शेतमालाचे पणन आणि उत्पादन सहज शक्‍य होते. ग्रुप मार्केटिंग करता येते. शेतमाल विकणारे व विकत घेणाऱ्याच्या संयुक्तिक अॅग्रेगेटर कंपन्या स्थापन केल्यास मध्यस्थांच्या साखळीतून शेतकऱ्यांची सुटका होऊ शकते. ग्राहकांनीदेखील शेतकऱ्यांना चार पैसे थेट पद्धतीने देण्यास मागे-पुढे बघू नये. पौष्टिक आणि सत्त्वयुक्त शेतमाल उत्पादनाची कृषी-व्यवस्था निर्माण केल्यास शेती आणि जनमानसाचे आरोग्य सुधारेल. कृषी व्यवस्था या दृष्टीने सुसंघटित होणे गरजेचे आहे. शासन काय करेल याची वाट न पाहता युवकांनी याचा पाठपुरावा करावा.               

 डॉ. वसंतराव जुगळे   : ९४२२०४०६८४
(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)


इतर अॅग्रो विशेष
नाशिक विभागात चाळीस लाख टन कापसाची खरेदीनगर ः नाशिक विभागात यंदा १ लाख ३७ हजार ३४५...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कोरोनास्थितीमुळे पोल्ट्री उद्योगाची...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिकनबाबत...
राज्यातील रेशीम कोष उत्पादकांना मिळणार...पुणे ः बदलत्या हवामानामुळे अडचणीत येत...
मका उत्पादकांचे लक्ष शासनाच्या...औरंगाबाद: हमीभाव खरेदी केंद्रांवरील खरेदी बंद...
लाल भेंडीसाठी शेतकऱ्याला केंद्राचे...सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील आडेली (ता.वेंगुर्ला)...
‘भीमाघोड’ने उभारली सर्वांत मोठी कांदा...पुणे: भीमाघोड शेतकरी उत्पादक कंपनीने महाओनियन...
पावसाचा जोर आजपासून वाढणारपुणे ः उत्तर महाराष्ट्र ते अरबी समुद्रातील पूर्व...
कापसाचे ६१४ कोटी थकीतनागपूर : राज्यात खरेदी करण्यात आलेल्या कापसाची...
वैद्यांनी जपला यांत्रिकीकरणाचा वारसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
प्रतिकूल हवामानात घडवली बीबीएफ’...जालना कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी-जालना (केव्हीके...
बदलत्या व्यापार समिकरणांचा अन्वयार्थशेती क्षेत्रात नुकत्याच आम्ही काही सुधारणा केल्या...
शरद जोशींचे शिक्षण स्वातंत्र्यशरद जोशींचे तत्वज्ञान एका शब्दात सांगायचे म्हटले...
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...
`पोकरा`मधून शेतमजुरांना प्रशिक्षण द्याऔरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
ऑगस्टमध्ये प्रथमच भरले सीना धरण नगर: दुष्काळी कर्जत, श्रीगोंदा आणि आष्टी...
कोल्हापूर : जनावरे बाजारातील...कोल्हापूर: `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
साखर निर्यातवाढीसाठी केंद्राची ‘रॅपिड अ...कोल्हापूर: देशातून जास्तीत जास्त साखर निर्यात...
परभणीत सोळा हजार शेतकऱ्यांचे आधार...परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...