नवी बाजार व्यवस्था नवी आव्हाने

सध्याच्या बाजार व्यवस्थेत अनेक कारणांनी विकृती आली आहे. त्यामुळेच खुल्या बाजाराचा हा नवा पर्याय आपल्याला निवडावा व स्विकारावा लागला आहे. यातही काही चूका झाल्या व परत त्याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली तर शेतकऱ्यांनी कुणाच्या तोंडाकडे पहायचे अशी वेळ येणार आहे. शेतकऱ्यांनीही आता वस्तुनिष्ठ व व्यवहारवादी होत ही नवी आव्हाने स्विकारत या नव्या संधीचे सोने करावे हीच एक अपेक्षा!
agrowon editorial article
agrowon editorial article

सध्यातरी बाजार समितीचा कर नाही म्हणून व्यापारी आणि बाजार समिती आवारात नेण्याचा वाहतूक खर्च वाचला म्हणून शेतकरी, यांना दिलासा मिळाला असे म्हणता येईल. देशातील शेतमाल व्यापार व शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष संबंध यायला बराच वेळ आहे. सारे शेतकरी देश पातळीवरच्या बाजारात सहभागी होऊ शकतील असेही नाही. व्यापार हा एक जोखमीचा उद्योग आहे. सारेच व्यापारी नफेखोर वा साठेबाज नसतात. मात्र, त्यांच्याकडे असलेला अनुभव व ज्ञानाचा ठेवा मोलाचा ठरतो. शेतमालाची नेमकी गरज कुठल्या भागात किती आहे व ती कशी पुरवली पाहिजे याचा दांडगा अभ्यास त्यांच्याकडे असतो. आजही कुठल्या पिकाची लागवड किती क्षेत्रात आहे व पाऊसमानानुसार त्याचे किती उत्पादन येऊ शकेल याची अद्ययावत माहिती सरकारकडे नसली तरी व्यापाऱ्यांकडे असते व बाजार निर्णय प्रक्रियेत त्याचा महत्वाचा वाटा असतो. 

दुसरी महत्वाची बाब म्हणजे संसाधने व त्यांच्या उपलब्धतेचा. व्यापार करणे म्हणजे हाताळणी, साठवणूक व वाहतूक अशा महत्वाच्या बाबींचा अंतर्भाव असतो. नियमित व्यापार करणाऱ्यांकडे स्वतःची हाताळणी, प्रतवारी व पॅकिंग करणारे मनुष्यबळ असते. कायम स्वरुपी काम असल्याने किफायतशीर दरात व कौशल्यपूर्णता ही या मनुष्यबळाची वैशिष्ठे असतात. साठवणुकीसाठी स्वतःची गोदामे असतात. ती कायम वापरात असल्याने त्यांचावरचा खर्च अनेक शेतमालांच्या हंगामात विभागला जातो. एवढेच नव्हे तर त्यांच्याकडे स्वतःचे ट्रक असणारी वाहतूक व्यवस्था असते. इकडून जातांना काय माल न्यायचा व तिकडून परततांना काय माल आणायचा यात त्यांची आर्थिक बचत होत नफ्याची बेगमी होत असते. शिवाय परराज्यात वा प्रक्रिया उद्योगांना माल पाठवतांना तो रोखीतच असतो असे नाही. घेणाऱ्यांची आर्थिक क्षमता व त्यावर व्यापाऱ्याने घ्यावयाची जोखीम ही त्याच्या व्यापाराची एक कौशल्यपूर्वक महत्वाची बाब असते. कायम व्यापार करण्याच्या मानसिकतेतून किती जोखीम घ्यायची यात ते पारंगत असतात.

याउलट परिस्थिती आपल्या शेतकऱ्यांची असते. केवळ परवानगी मिळाली म्हणून ते खुला बाजार करू शकतील असे मानणे चूकीचे ठरेल. सध्याचा शेतमालाची कोंडी करणारा एकाधिकार संपून खऱ्या अर्थाने बाजार व्यवस्थेला न्याय देणारे व्यापारी या स्पर्धेतून निर्माण होत नाहीत तोवर त्याला वाट बघावी लागेल. तो जर अशा स्वतंत्र व्यापारासाठी सक्षम ठरला तरच त्याला देश वा आंतरराष्ट्रीय पातळावरच्या बाजार परिस्थितीचा फायदा घेत रास्त दर मिळण्याची संधी उपलब्ध होऊ शकेल. त्यासाठी त्याला केवळ पुरवठादार म्हणून न रहाता व्यापारासाठी लागणारी संसाधने, अभ्यास व कौशल्य प्राप्त करावे लागेल. आज आपण बाजार खुला झाल्याच्या आनंदात असलो तरी त्याला त्याच्या परिसरात उपलब्ध असलेल्या व्यापार व्यवस्थेवरच अवलंबून रहावे लागेल. या व्यापारी व्यवस्थेत तो केवळ पुरवठादार आहे म्हणून नफ्यात सहभागीदारी मिळेलच असेही नाही.

दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे भांडवलाचा व आर्थिक व्यवहाराच्या सुरक्षिततेचा. आज शेतीतील भांडवलाची परिस्थिती बघता शेतीकडून शेतमाल बाजारात काही भांडवल येऊ शकेल, हे संभवत नाही. शेतकऱ्यांची तगून रहाण्याची क्षमता अशा खुल्या बाजारात वाढेल असेही नाही. फक्त त्याला आज खुलेपणात आपला माल विकण्याची एक पर्यायी संधी असे याचे स्वरुप असले तरी भाव मिळण्याच्या शक्यता फार धूसर वाटतात. बाजार समितीतून वाचलेली सेसची रक्कम व त्याला द्यावे लागणारे वाहतुकीचे भाडे यातून त्याला जो काही दिलासा मिळेल हे त्याचे आजचे समाधान मानावे लागेल. शेतकऱ्यांच्या बाजूने लाभदायक ठरणारा मुद्दा म्हणजे सध्या जोरात असलेल्या ऑनलाइन व्यापाराचा ठरु शकेल. जर शेतकऱ्यांनी वा शेतकऱ्यांकडून सरळ खरेदी करून ग्राहकांना शेतमाल पोचवता आला तर हा सारा बाजार एका संस्थात्मक अवस्थेत येत शेतमालाच्या भावाची निश्चिती करता येते. थोडक्यात त्यातली तेजीमंदी टाळत शेतमाल बाजारात एक निश्चिंतता आणता येते. गरज व मागणी पुरवठ्याचे गणित ठरल्याने शेतकऱ्यांना भाव व पीक नियोजनाच्या दृष्टीने त्याचा उपयोग होऊ शकतो. मात्र, या व्यापाराचे खर्च व द्यावी लागणारी किंमत अवाढव्य असल्याने नफ्याचा मोठा भाग ते खाऊ शकतात. मोठ्या शहरातून कार्यरत असणारे मॉल्स वा सुपर मार्केट यांना पुरवठा करूनही परिसरातले शेतकरी भाव मिळवू शकतील. अशा लहान सहान बाबींतून व्यक्त होणारा हा शेतमाल बाजार देश पातळीवर बघू जाता एक महाकाय आर्थिक उलाढालीचा व्यवहार प्रतीत होतो. त्याला व्यक्तिगत व्यापारापेक्षा संस्थात्मक स्वरुप येणे आवश्यक आहे. त्यात कार्पोरेट वा मल्टिनॅशनल शिरकाव करून त्यांची देशभर संकलन केंद्रे स्थापन होण्याच्या दृष्टीने या खुल्या बाजाराचे महत्व आहे.

आज या साऱ्या प्रयोगात सारे म्हणजे सरकार, व्यापारी व शेतकरी नवखे भासत असल्याने यात येणाऱ्या अडीअडचणींचा विचार साकल्याने होणे महत्वाचे आहे. एका त्रासदायक अवस्थेतून बाहेर पडण्याच्या आनंदाबरोबर नव्या आव्हानांचे दडपणही जाणवते आहे. कारणे काही का असेनात आजवर सातत्याने शेतकरी विरोधात निर्णय झाल्याने सध्याच्या बाजार व्यवस्थेत विकृती आली आहे. त्यामुळेच खुल्या बाजाराचा हा नवा पर्याय आपल्याला निवडावा व स्विकारावा लागला आहे. यातही काही चूका झाल्या व परत त्याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली तर शेतकऱ्यांनी कुणाच्या तोंडाकडे पहायचे अशी वेळ येणार आहे. शेतकऱ्यांनीही आता वस्तुनिष्ठ व व्यवहारवादी होत ही नवी आव्हाने स्विकारत या नव्या संधीचे सोने करावे हीच एक अपेक्षा!

डॉ. गिरधर पाटील  ः  ९४२२२६३६८९ (लेखक शेतमाल बाजाराचे  अभ्यासक आहेत.) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com