agriculture news in marathi agrowon special article on piece process in between India and Pakistan, India and China | Agrowon

स्वागतार्ह संघर्षविराम; शेजारी बदलतोय?

- अनंत बागाईतकर
सोमवार, 1 मार्च 2021

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षविराम स्वागतार्ह आहे. त्याने उभयतांमध्ये सौहार्द वाढल्याने सीमेवर शांतता नांदायला मदत होईल. 

संरक्षण मंत्रालयाचे २५ फेब्रुवारीला एक पत्रक जारी झाले. या पत्रकात भारत आणि पाकिस्तानने २४ व २५ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून संघर्षविराम पाळण्याचे संयुक्तपणे जाहीर केले. संघर्ष उत्पन्न झाल्यास ध्वज बैठका आणि हॉटलाइन संपर्काद्वारे तो टाळण्याबाबत बांधिलकीही मान्य केली. भारत आणि चीन यांच्यात लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा परिसरातील पॅन्गोंग सरोवराच्या भागातून उभय देशांनी सैन्य माघारी व तणाव दूर करण्यासाठी पावले उचलली आणि देपसांगसह अन्य संघर्षबिंदूंच्या परिसरातूनही सैन्यमाघारीबाबत वाटाघाटी सुरू करण्याच्या सकारात्मक घटनेपाठोपाठ आलेले हे संयुक्त निवेदन दिलासादायक आहे. 
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘शेजारी बदलता येत नाहीत’ असे म्हटले होते. त्याचा पुनरुच्चार त्यांच्यानंतर पंतप्रधान झालेल्या मनमोहनसिंग यांनीही अनेकदा केला होता. त्यामुळेच शक्‍यतोवर संघर्ष टाळून उभय देशांतील सीमाभाग किंवा सीमा परिसर अधिकाधिक शांततापूर्ण कसा राहील यावर उभयतांचा भर असला पाहिजे ही भूमिका या दोन्ही पंतप्रधानांनी घेतली होती. वाजपेयी यांनी ऐतिहासिक ‘लाहोर बस-यात्रा’ करून भारत-पाकिस्तान संबंधांना नवे परिमाण दिले होते. दुर्दैवाने त्यानंतर ‘आयएसआय’ पुरस्कृत पाकिस्तानी सैन्याने तेथील लोकनियुक्त सरकारच्या या प्रयत्नांवर पाणी फिरवले होते. मनमोहनसिंग यांनीही वाजपेयींच्या धोरणाचा पुरस्कार करून उभय देशांतील तणाव कमी करण्यासाठी पावले उचलली. परंतु मुंबईवर हल्ला करून पाकिस्तानातील जिहादी शक्तींनी या संबंध सुधारणेची विधूळवाट लावली. नंतरच्या मोदी सरकारने शेजारी देशांबरोबरच्या संबंध सुधारणेची सुरुवात उत्तम केली होती. परंतु त्याचा ज्या पद्धतीने पाठपुरावा करावा लागतो, तो न झाल्याने शेजारी देशांबरोबरचे संबंध बिघडत गेले. 

दिलासादायक पावले
मध्यंतरीच्या काळात दक्षिण आशियात देशावर एकाकी पडण्याची वेळ आली होती. लडाख परिसरातील चीनची आक्रमकता, नेपाळमधील भारतविरोधी शक्तींना खतपाणी, भूतान, बांगला देश, म्यानमार आणि श्रीलंका या देशांशी पैशाच्या मदतीच्या जोरावर वाढती जवळीक करुन भारताला एकाकी पाडण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु त्यात चीनला यश आले नाही. लडाखमध्ये आक्रमण करुन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेची यथास्थिती बदलण्याचा चीनने प्रयत्न केला. परंतु तो तणाव फारकाळ टिकविणे हिताचे नाही हे लक्षात आल्यानंतर चिनी नेतृत्वाने पवित्रा बदलला. त्यामागे जागतिक चित्रात अलीकडच्या काळात झालेले बदल व विशेषतः अमेरिकेतील संघर्षशील डोनाल्ड ट्रम्प युग संपुष्टात येणे हा भागही निर्णायक ठरला. या पार्श्‍वभूमीवरच भारत व पाकिस्तानतर्फे संयुक्तपणे जारी निवेदन निश्‍चितच दिलासादायक आहे. 

हे संयुक्त निवेदन जारी होणे हा केवळ हिमनगाच्या टोकाचा दृश्‍य भाग झाला. त्याआधी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षाविषयक धोरण व नियोजनविषयक सल्लागार मोईद युसूफ यांनी चर्चेच्या अनेक गोपनीय फेऱ्या केल्या होत्या. या चर्चांमध्ये प्रथम उद्दिष्ट निश्‍चिती करण्यात आली व त्याचे तपशील ठरविण्याची जबाबदारी उभय देशांच्या सेनांच्या लष्करी मोहिमविषयक संचालकांकडे दिली. त्यानुसार भारताचे डीजीएमओ (डायरेक्‍टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स) लेफ्टनंट जनरल परमजितसिंग सांगा आणि पाकिस्तानचे मेजर जनरल नौमान झकारिया यांच्या दरम्यान वाटाघाटींच्या फेऱ्या होऊन उभय देशांदरम्यान काश्‍मीर विभागातील नियंत्रण रेषा परिसरात संघर्षविरामाची स्थिती मान्य करण्यात आली. उभय देशांदरम्यानचे संवेदनशील मुद्दे विचारात घेण्याचे मान्य करतानाच नियंत्रण रेषा परिसरात शांतता राखण्यावर तसेच त्यासंदर्भात झालेल्या द्विपक्षीय करार, तह, समेट व अन्य उपाययोजनांचे काटेकोर पालन करण्यावर एकमत झाले आहे. 

संघर्षविरामासाठी वातावरणनिर्मिती
येथे आणखी उल्लेख आवश्‍यक आहे आणि तो पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल कमार बाजवा यांचा भारताबाबतचा बदललेला स्वर हा आहे. एका हवाईदल अकादमीत भाषण करताना त्यांनी शांततापूर्ण सहजीवन आणि परस्परांविषयी सन्मानाच्या मुद्यावर भर देताना, (भारत-पाकिस्तान दरम्यान) ‘आता सर्व दिशांनी व सर्व पातळ्यांवर शांततेचा हात पुढे करण्याची वेळ आली आहे,’ असे म्हटले. त्याचबरोबर त्यांनी काश्‍मीरचा मुद्दा शांततामय मार्गाने आणि योग्य तो मान राखूनच सुटला पाहिजे, असेही म्हटले. एवढेच नव्हे तर कोरोना साथीसंदर्भात भारताच्या पंतप्रधानांनी आयोजलेल्या ‘सार्क’च्या प्रतिनिधींबरोबरच्या आभासी परिषदेत पाकिस्तानच्या प्रतिनिधीने दरवेळेप्रमाणे काश्‍मीरचा मुद्दा न काढता केवळ कोरोनाबद्दलच्या सहकार्यावरच भर दिला. या सर्व घडामोडीतून संघर्षविरामासाठीची वातावरण निर्मिती झाली. विशेष म्हणजे या वाटाघाटी लष्कराच्या स्तरावर करण्यात आल्या. ज्याप्रमाणे भारत-चीन दरम्यान लडाख परिसरातील संघर्ष व तणाव निवळण्याबाबत उभय देशांनी लष्कर आणि त्यांच्या मदतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी यांच्यामार्फत वाटाघाटी केल्या तोच प्रकार पाकिस्तानबरोबरही अमलात आणला गेला. हे बदल स्वागतार्ह म्हणावे लागतील. यापूर्वीही जेव्हा कधी भारत व पाकिस्तान दरम्यान संघर्षाची परिस्थिती उद्भवली त्यावेळी उभयतांच्या लष्करांच्या पातळीवरील वाटाघाटी व चर्चेची कल्पना मांडलेली होती. एवढेच नव्हे तर भारतातील राजकीय नेतृत्वानेही थेट पाकिस्तानी लष्कराशी संवादाची कल्पनाही मांडली होती. परंतु भारतातल्या नेतृत्वाने ती स्वीकारली नव्हती. अमेरिकेचे राजकीय नेते म्हणजेच त्यांचे परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री हे पाकिस्तानी लष्कराशी थेट संवाद साधतात. यामागे कारण एवढेच की, पाकिस्तानातील खरी सत्ता आणि अधिकार हे आयएसआय आणि सेनादलांकडे असतात. धोरणनिर्मितीमध्येही त्यांची भूमिका निर्णायक राहते, हा इतिहास आहे. ती बाब लक्षात घेऊनच ठोस फलनिष्पत्तीसाठी थेट लष्कराशीच बोलण्यांचा मार्ग अवलंबावा असा या सूचनेमागील हेतू होता. परंतु भारतातील राजकीय किंवा लोकनियुक्त नेतृत्वाने पाकिस्तानी लोकनियुक्त नेतृत्वाशीच बोलणी केली पाहिजेत, या परंपरागत तत्वानुसार भारताने ही कल्पना स्वीकारली नव्हती. आता चीनपाठोपाठ पाकिस्तानबरोबर या मार्गाचा केलेला अवलंब स्वागतार्हच आहे. 

ज्याप्रमाणे शेजारी बदलता येत नाहीत त्याचप्रमाणे या शेजारी देशांबरोबर सतत संघर्षाची स्थितीही हिताची नसते. त्यामुळेच साहसवाद आणि सतत मिशीला तूप लावण्याऐवजी पोक्तपणाची भूमिका घेऊन दक्षिण आशियात शांतता राहणे हे सर्वांच्याच हिताचे आहे. म्यानमारमधल्या घडामोडी आणि विशेषतः लष्कराने सत्ता संपादण्याची बाब चिंताजनक आहे. कारण तेथील लष्करशहा नेहमी चीनधार्जिणे राहिले आहेत. तुलनेने नेपाळच्या स्थितीत सुधारणा आहे. श्रीलंकेतील राजवटही अनुकूल अशीच आहे. या पार्श्‍वभूमीवर या घडामोडींचे स्वागत करावे लागेल.

- अनंत बागाईतकर

(लेखक ‘सकाळ’च्या दिल्ली  
न्यूज ब्यूरोचे प्रमुख आहेत.)


इतर संपादकीय
जैवइंधन निर्मिती-वापरासाठी  हवेत...देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग वाढविण्यासाठी इंधन...
जैव उत्तेजक समिती हवी व्यापक शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जैव उत्तेजकांना (...
बाबासाहेबांच्या सत्याग्रहाचे शास्त्रडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला प्रत्येक लढा...
‘गोल्डनबीन’ला झळाळीविदर्भातील अकोला, वाशीमसह मराठवाड्यातील लातूर...
सहकार्य अन् समन्वयातून सुरू ठेवा बाजार...कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात या विषाणूचा...
कांद्याचा रास्त भाव काय?केंद्र शासनाने नवीन कृषी कायदे लागू केले...
श्रीलंकेचा आदर्श आपण कधी घेणार?श्रीलंका सरकारने पाम तेलाच्या आयातीवर बंदी घातली...
महाराष्ट्रातील मधुक्रांतीची दिशामार्च महिन्यामध्ये ‘मन की बात’मध्ये...
बाजारपेठेचा सन्मान करूयागोरगरिबांना स्वस्तात धान्य उपलब्ध करून...
सालगडी पाहिजेत!काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक जाहिरात फिरत...
आर्थिक प्रश्नचिन्हे कायमचआर्थिक वर्ष २०२१-२२ सुरू झाले आहे. २०२०-२१ हे...
हंगाम गोड, पण साखर कडूचखरे तर २०२०-२१ च्या गळीत हंगामापुढे अनेक आव्हाने...
पुन्हा कोरोना, पुन्हा लॉकडाउनकोरोना संकटाशी दोन हात करण्यासाठी महाराष्ट्रासह...
अस्तित्व टिकविण्यासाठीचा जागतिक संघर्षभारतातच नाही तर इतर अनेक देशांतही शेतकरी आपल्या...
आता पाया करा मजबूतराज्य-राष्ट्राचा कारभार असो की एखाद्या संस्थेचा,...
तंत्र शून्य मशागतीचे, अनंत फायद्याचेसन २०१० च्या दशकातील शेती व्यवसायात जमिनीतील...
दूरचे महासागर आणि आपले हवामानभारतीय शेती मोठ्या प्रमाणात हवामानावर अवलंबून आहे...
कारभारवाडीचा आदर्शलहानमोठ्या धरण लाभक्षेत्रातील तसेच नदी काठच्या...
मूळ प्रश्‍नाला सोईस्कर बगल !जागतिक भूक निर्देशांकातील आकडेवारीनुसार १०७...
संकट अस्मानी आणि सुलतानीहीयावर्षाच्या खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही...