बांधावरच्या तरुणाईला गरज स्व-संवादाची!

देशात गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा मोठा गंभीर आणि चिंतेचा विषय आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, यासाठी शासन व सर्व स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. तरी अजूनही काही ठिकाणी बळिराजा आपले जीवन संपविण्याचा टोकाचा निर्णय घेताना दिसतो. या दुर्दैवी घटनांना रोखणे शक्य आहे, या विचारावर आपली समज पक्की असायला हवी.
agrowon editorial article
agrowon editorial article

अभिनेता सुशांतसिंह राजपूतने नुकताच टोकाचा निर्णय घेऊन जगाचा निरोप घेतला. सुशांतसिंह सिलेब्रिटी (कीर्तिवान) होता. लाखो तरुणाईच्या गळ्यातला ताईत होता. लोकप्रियतेवर स्वार झालेल्या या अभिनेत्याकडे प्रचंड पैसा, दीपवून टाकणारी संपत्ती, मत्सर करावी अशी लोकप्रियता असं सगळं असताना लाखो ''दिलो की धडकन'' अचानक करोडो चाहत्यांना, कुटुंबीयांना मागे टाकून निघून गेला. तरुणाईला फक्त एवढंच कळलं, की अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केली. सुशांतसिंहच्या आत्महत्येबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त झाली. आत्महत्या करणारा व्यक्ती ख्यातनाम असो वा सामान्य, त्या प्रत्येकाच्या मनातलं आंदोलन वेळीच सावरता आलं तर आज सुशांतही असता आणि आत्महत्या केलेले हजारो शेतकरी बांधवही असते.

आत्महत्या या शेवटच्या निर्णयाप्रत माणूस सहजासहजी येत नाही. देशात गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा मोठा गंभीर आणि चिंतेचा विषय आहे. शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा ''माणुसकीची माती'' झालेली असते. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, यासाठी शासन व सर्वस्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. तरीही अजूनही काही ठिकाणी बळिराजा आपले जीवन संपविण्याचा टोकाचा निर्णय घेताना दिसतो. या दुर्दैवी घटनांना रोखणे शक्य आहे. या विचारावर आपली समज पक्की असायला हवी.

शेतकरी आत्महत्या करतो, तेव्हा या चराचरातला एक जीव आपला जीवनप्रवास संपविण्याचा कठोर निर्णय घेत असतो. आत्महत्येसारखा टोकाचा, अतिशय दु:खद निर्णय टाळता येणार नाही काय? असा प्रश्न आत्महत्येच्या घटनेनंतर अनेकांच्या मनात येत असतो. लॉकडाउनच्या कठीण परिस्थितीत शेतकरी राजाने जो संघर्ष केला त्याची जगात तोड नाही. विपरीत परिस्थितीतही अनेक शेतकरी बांधवांनी शेतमाल थेट ग्राहकांच्या दारात जाऊन विकला. शेतकऱ्यांनी शहरी ग्राहकांच्या घराला आपल्या व्यवसाय कौशल्याचे तोरण बांधले. मुंबई, पुणे, नाशिक येथील कॉलनीमध्ये शेतमालाची थेट शेतकऱ्यांकडून विक्री झाली. या नव्या मॉडेलमधून खूप आशादायी वातावरण तयार झालेले आहे. अलीकडे केंद्र सरकारने शेतकरी हिताचे तीन अध्यादेश काढलेत. शेतीला ग्लॅमर प्राप्त होईल, अशा दिशेकडे शेतीचा प्रवास सुरू झाल्याचे दिसत आहे. मानवी जीवनाच्या संघर्ष इतिहासात ‘अन्नयोद्धा'' ठरलेल्या बळिराजाला विविध संकटांमुळे एक नैराश्य आले आहे. कोविड-१९ अर्थात कोरोनाच्या आपत्तीत शहरी उद्योगधंद्यात राब-राब राबणारा भूमिपुत्र गावाकडे परतला. मात्र ''घरवापसी'' झालेल्या तरुणाईला शेती व्यवस्थेतील आर्थिक स्थैर्याबाबत मनात प्रचंड चिंता आहे. अशा परिस्थितीत बांधावरचा रोजगार पक्का करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. तसेच त्याला व्यावसायिक शेतीचे प्रशिक्षण देणे गरजेचे झाले आहे. तरीही काही घटनांमधून शेतकरी राजा टोकाचा निर्णय घेतच आहे. दुर्दैवाने होणाऱ्या आत्महत्या टाळता येतात. शेतीत रोजगारासाठी पोचलेल्या तरुण शेतकरी बांधवांसाठी सकारात्मक स्व-संवाद (पॉझिटिव्ह अफरमेशन्स) हे प्रभावतंत्र आहे.

अफरमेशन्स म्हणजे स्व-संवाद! स्वतः स्वतःला सकारात्मक सूचना देणे. प्रचंड शक्तिशाली असलेल्या आपल्या अंतर्मनावर आपण निश्चित केलेली ध्येय कोरणे. भविष्यकाळात मी काय करणार आहे याची प्रत्येक टप्प्यावरील निश्चित कृती स्वमताला सांगणे, स्वयंसूचना करणे. उदाहरणार्थ ः येत्या पाच वर्षांत, येत्या एका वर्षात, पुढील सहा महिन्यांत, पुढच्या महिन्यात, अगदी या आठवड्यात तसेच आज दिवसभरात मी काय करणार याची मनाला स्वसूचना देणे. अशी सूचना आपण आपल्या मनाला दिली आहे याची उजळणी करणे. अशा सूचनांमुळे हळूहळू कल्पना खोल अंतर्मनात झिरपत जातात आणि अनपेक्षितरीत्या सत्यातही उतरतात. अंतर्मनाची विलक्षण शक्ती असल्याने मनात रुजलेला प्रत्येक विचार खराच होतो. तुम्ही जसा विचार कराल तशी तुमची कृती आपोआप घडत जाते. एखादी गोष्ट वारंवार बोलत गेल्याने अंतर्मनात त्या गोष्टीचे प्रक्षेपण होते. वाईट विचारांना रोखून चांगल्या विचाराला पाठविल्यास आत्मघातकी विचारांपासून मानव कायमचा दूर जाऊ शकतो.

मनात केवळ वाईट विचार येऊ नये, असे म्हटले तरी विचार येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. चांगल्या कल्पनांनी मन भरलेलं असेल तर वाईट कल्पनांना मनात थारा असणार नाही. यासाठी ''व्हिज्वलायजेशन'' करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. चांगल्या कल्पना मनात चित्रित करणे यालाच ''व्हिज्वलायजेशन'' असे म्हणता येईल. मनातली चांगली तीव्र इच्छा पूर्ण झाली आहे, अशी मनोमनी कल्पना करणे, ती पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करणे आणि मनःपटलावर त्या इच्छेला लहान-मोठ्या स्वरूपात साकारणे या तंत्रातून कल्पनाशक्तीला वाव मिळतो. कल्पनाशक्तीचा योग्य वापर केल्यास साधारण माणसाचेही यशस्वी व प्रभावशाली व्यक्तिमत्त्वात रूपांतर झालेले दिसून येते. दररोज आपली ध्येय पूर्ण झाली आहेत ही गोष्ट वारंवार मनात कोरली पाहिजे. व्हिज्वलायजेशन करणाऱ्या यशस्वी व्यक्तीला यश दोनदा मिळतं, एकदा मनात आणि दुसऱ्यांदा वास्तवात! 

यासोबत व्यायाम, वाचन, लिहिणे आणि छंद जोपासणे या सकारात्मक सवयींचा आपल्या दैनंदिन जीवनशैलीत आग्रहपूर्वक समावेश केला तर प्रत्येकाला ''हे जग सुंदर आहे'' याचा प्रत्यय येऊ शकतो. डॉ. प्रीती सवाईराम ः ९८८१३७२५८५ (लेखिका यशदामध्ये सहायक प्राध्यापिका आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com