बहुआयामी कर्मयोगी 

भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे नुकतेच निधन झाले. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील कल्याणकारी राजकीय अर्थकारण, नव्वदीच्या दशकापासूनचे आर्थिक सुधारणा स्वरुपातील राजकीय अर्थकारण आणि एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकातील आर्थिक सुधारणा अर्थकारण या सर्व प्रकारच्या राजकीय अर्थकारणाची त्यांना उत्तम जाण होती. अनेक पदे, जबाबदराऱ्यांमध्ये स्वतःला बुडवून घेऊन काम करण्याची त्यांची पद्धत होती.
agrowon editorial article
agrowon editorial article

  प्रणव मुखर्जी यांचा सार्वजनिक जीवनातील प्रवास स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरु झाला होता (जन्म ११ डिसेंबर, १९३५). स्वातंत्र्यपूर्व काळातील अर्थकारण, स्वातंत्र्योत्तर काळातील कल्याणकारी राजकीय अर्थकारण, सत्तरीच्या-ऐंशीच्या दशकातील राजकीय अर्थकारणातील फेरबदल, नव्वदीच्या दशकापासूनचे आर्थिक सुधारणा स्वरुपातील राजकीय अर्थकारण आणि एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकातील आर्थिक सुधारणा अर्थकारणाचा दुसरा टप्पा (२०१४ - २०२०) या सर्व प्रकारच्या राजकीय अर्थकारणाची त्यांना उत्तम जाण होती. त्यांना या विविध प्रकारच्या राजकीय अर्थकारणाच्या ताकदीची आणि मर्यादाची सुस्पष्ट कल्पना होती. स्वातंत्र्यपूर्व काळातील अर्थ राजकीय मूल्यव्यवस्थेबद्दल त्यांना आदर होता. काळाची गरज म्हणून नव्वदीच्या नंतर त्यांनी आर्थिक सुधारणा स्वरुपातील राजकीय अर्थकारणाचे जरी समर्थन केले तरी त्यांचा प्रयत्न हा समन्वय पद्धतीचा राहिला. त्यांचा विचार मागील अर्थकारणापासून एकदम अलिप्त होणारा दिसला नाही. त्यामुळे गेल्या सत्तर वर्षांतील राजकीय अर्थकारणातील अंतप्रवाह त्यांच्या विचारात दिसतो. कारण प्रणव मुखर्जीनी १९८६ मध्ये कॉंग्रेस सोडला व त्यांनी १९८७ मध्ये नवीन पक्षाची स्थापना केली. तेव्हा त्यांनी समाजवादी भूमिका अर्थकारण विषयक घेतली होती. तसेच त्यांनी राजीव गांधीशी पुढे जुळवून घेतले. तेव्हा त्यांनी नवीन राजकीय अर्थकारणाशी जुळवून घेतले होते. या प्रक्रियेमध्ये केवळ राजकीय समझोता नव्हता. तर एक कॉंग्रेस व्यवस्था आणि कॉंग्रेसची मूल्यव्यवस्था यांच्या बद्दलचा विचार होता. 

प्रणव मुखर्जी यांचे विचार कॉंग्रेस मूल्यव्यवस्थेशी संबंधी घडले. त्यामुळे त्यांचे विचार कॉंग्रेस मूल्यव्यवस्थेशी संवादी होते. याचे कारण त्यांच्याकडे दीर्घकाळची कॉंग्रेस परंपरा होती. त्यांचे वडील कामदा किंकर मुखर्जी हे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेले नेते होते. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे दीर्घ काळ सदस्य होते. ब्रिटीश राजवटी विरोधीच्या कारवायांमुळे त्यांच्या वडिलांनी अनेक वर्षे तुरुंगात घालविली होती. या चळवळीचा खोलवर प्रभाव त्यांच्या वडिलावर होता. तो वारसा प्रणव मुखर्जी यांचा होता. त्यामुळे प्रणव मुखर्जी कॉंग्रेस मूल्यव्यवस्थेबद्दल उत्तम जाण असलेले एक अति महत्वाचे नेते होते. एकविसाव्या शतकामध्ये कॉंग्रेसच्या मूल्यव्यवस्थेच्या जाणीवेचा ऱ्हास झाला. तेव्हा प्रणव मुखर्जी यांच्याकडे आधुनिक भारताच्या आणि कॉंग्रेसच्या मूल्यव्यवस्थेचा एक वैचारिक खजिना होता. विशेष राज्याच्या राजकारणापासून संसदीय राजकारणापर्यंत त्यांची वाटचाल आधुनिक भारताच्या मूल्यव्यवस्थेच्या चौकटीत झाली. त्यामुळे आधुनिक भारताच्या मूल्यव्यवस्थेपासून कॉंग्रेस जसजसी वेगळी होत गेली. तस तसे प्रणव मुखर्जी आणि कॉंग्रेस यांच्यामध्ये एक अंतर पडत गेले. कॉंग्रेस पक्षाच्या बाहेर कॉंग्रेसच्या मूल्यव्यवस्थेची व आधुनिक भारताच्या मूल्यव्यवस्थेची जाणीव असलेल्या नेतृत्वाशी त्यांचा संवाद होत गेला. राजकीय मतभिन्नता वगळता कॉंग्रेसची मूल्यव्यवस्था व आधुनिक भारताच्या मूल्यव्यवस्था समान असलेल्या शरद पवारांशी त्यांचे वैचारिक संबंध उत्तम होते. म्हणून तर त्यांनी शरद पवारांच्या कृषी क्षेत्रातील कामगिरीचे विश्‍लेषण ‘कृषिक्रांती’ असे केले होते. शरद पवार यांनी संगमा यांच्या विरोधी जाऊन प्रणव मुखर्जी यांच्या राष्ट्रपतीसाठीच्या निवडणूकीला पाठिंबा दिला होता. ही सांधेजोड केवळ पक्षीय आघाडीची नव्हती, तर ती मूल्यव्यवस्थेच्या एकोप्याची होती. 

सर्व जग यशवंतराव चव्हाण यांना पुस्तकांवर प्रेम करणारा नेता म्हणून ओळखते. तशीच अवस्था प्रणव मुखर्जी यांची होती. राजकारणाचे क्षेत्र अविद्याक्षेत्रीय झाले होते. तेव्हा प्रणव मुखर्जी हे विद्याक्षेत्राशी संबंधित सार्वजनिक जीवन जगणारे नेते होते. हा संस्कार त्यांना विद्याक्षेत्रातून मिळालेला होता. कारण प्रणव मुखर्जी यांनी इतिहास, राज्यशास्त्र व कायद्याची पदवी विद्यापीठातून घेतली होती. एका छोट्या महाविद्यालयात अध्यापनाचे काम त्यांनी केले होते. विशेष म्हणजे ते बंगाली भाषेच्या मासिक नियतकालिकेचे संपादकही होते. नंतर त्यांनी साप्ताहिक प्रकाशनासाठी काम केले. या गोष्टीमध्ये उच्च दर्जांची विद्याक्षेत्रीय बांधिलकी दिसते. म्हणून त्यांनी कॉंग्रेस मूल्यव्यवस्था वौचारिक पातळीवर स्वीकारली होती. त्यांनी केवळ सत्तासंघर्ष म्हणून कॉंग्रेस व्यवस्थेचा विचार केला नव्हता. त्यांनी प्रथम बंगाल कॉंग्रेसचे सदस्य म्हणून कार्य सुरु केले. राष्ट्रीय राजकारणात त्यांनी राज्यसभेवर सुरुवातीस काम केले. लोकसभेमध्ये त्यांनी कार्य केले. त्यांच्या राजकारणाची राष्ट्रीय सुरुवात सत्तरीच्या दशकात झाली. तेव्हा संसद हा राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून कमी झाला होता. परंतु प्रणव मुखर्जी यांनी संसद हा राजकारणाचा मध्यवर्ती घटक असावा, अशी भूमिका घेतली होती. ही प्रणव मुखर्जी यांची भूमिका पंडित नेहरु आणि लालबाहादूर शास्त्री यांच्या राजकारणाशी मिळती जुळती होती. 

प्रणव मुखर्जी यांनी इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात काम केले. परंतु इंदिरा गांधीपेक्षा त्यांचा राजकीय प्रक्रियेबद्दलचा विचार वेगळा होता. कारण त्यांचा राजकीय प्रक्रियेबद्दलचा विचार नेहरु-शास्त्रीशी संवादी होता. मनमोहन सिंग यांनी मुखर्जी यांच्याकडे मंत्रिमंडळात बहुतेक मुख्य पोर्टफोलिओ ठेवले होते. उदा. वाणिज्य, परराष्ट्र व्यवहार, संरक्षण आणि वित्त आदी. यांचे मुख्य कारण मुखर्जी यांना कॉंग्रेसच्या मूल्यव्यवस्थेची आणि राजकीय अर्थकारणाची जाण होती. भारतातील आपल्या सरकारी कामाच्या शिवाय मुखर्जी अनेक नामांकित आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये सामील झाले होते. विशेष म्हणजे आफ्रिकन डेव्हलपमेंट बॅंक, एशियन डेव्हलपमेंट बॅंक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बॅंकेच्या गव्हर्नरांच्या बोर्डांवर अशी त्यांनी राजकीय अर्थकारणात जागतिक पातळीवर देखील उठावदार कामगिरी केली. अर्थमंत्री असताना जून २०१२ मध्ये कॉंग्रेस पक्षाने मुखर्जी यांना भारतीय राष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून निवडले. निवडणूक त्यांनी सहज जिंकली आणि त्यांनी पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती पदाकडे मोठ्या प्रमाणात औपचारिक पद म्हणून पाहिले जाते. तथापि, निरीक्षकांनी नमूद केले की मुखर्जी, सरकार आणि राजकारणातील अनेक दशकांचा अनुभव असलेले त्यांच्या पूर्ववर्तींपेक्षा अधिक कारभारात व्यस्त होते. २०१७ मध्ये मुखर्जी यांचे अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला. मुखर्जी हे अनेक पुस्तकाचे लेखक आहेत. ती पुस्तके मूल्यव्यवस्था आणि राजकीय अर्थकारण या क्षेत्रातील मैलाचा दगड ठरणारी आहेत. 

प्रकाश पवार

(लेखक राजकीय अभ्यासक आहेत.)   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com