शेती म्हणजे रोजगार हमी योजना आहे का?

शेतमालाचे उत्पादन घेताना बियाण्यापासून बाजारापर्यंत अडचणीच अडचणी आहेत. पेरणी, कापणीच्या हंगामात तर अवाजवी मोबदला देऊनही मजूर मिळत नाही. पीक विकून मिळालेले सर्व पैसे मजुरी देण्यातच जातात. मग आपण शेती कोणासाठी करतो? शेती म्हणजे काय रोजगार हमी योजना आहे का? इकडे मजूर पोसायचे अन् तिकडे शहरातल्यांना स्वस्त खाऊ घालायचे. शेतकऱ्यांनी एवढेच करायचे का?
agrowon editorial article
agrowon editorial article

खूप दिवसांनंतर एका कार्यकर्ता मित्राचा फोन आला. प्राथमिक बोलणे झाल्यानंतर विचारलं, काय काम काढलं? म्हणाला, मला बॅंक पीककर्ज देत नाही. मी म्हणालो थकबाकीत आहे का? तर, नाही म्हणाला. १० लाख रुपये गुऱ्हाळासाठी घेतले होते ते फेडलेत. फडणवीस सरकारच्या काळात एक लाख माफ झाले, वरचे चौदा हजार रोख भरले. ठाकरे सरकारच्या काळात पन्नास हजार माफ झाले. माझे खाते आज नील आहे. मग कर्ज का देत नाही? कर्जमाफीचा फॉर्म भरला होता का? मी विचारले तर नाही, म्हणाला. न मागताच कर्ज माफ झालं पण आता, "तुम्ही कर्जमाफीत बसला म्हणून तुम्हाला कर्ज देता येत नाही असा बॅंकेचा साहेब म्हणतोय. शेती करावी का नाही हेच कळना आता." दुसरा फोन एक मराठवाड्यातील संघटनेच्या नेत्याचा झाला. कर्ज वाटपाची माहिती घेण्यासाठी मीच विषय काढला अन् विचारलं काय परिस्थिती आहे? त्याने दिलेले उत्तर धक्कादायक होते. तो म्हणाला, आमच्या तालुक्यातील सत्तर शेतकऱ्यांना बॅंकेने कर्ज देण्यास नकार दिला म्हणून कार्यकर्त्यांसह बॅंकेत गेलो तर साहेब म्हणाले, " मला चौकात नेऊन जाळले तरी मी काहीच करू शकत नाही. चार कर्मचारी आहेत बॅंकेत. रोज साडेतीन हजारपेक्षा जास्त ट्रान्झेक्शन (व्यवहार) होतात. एका मिनिटाला एक म्हणाले तरी पहा किती वेळ लागतो ते. वरून काही स्पष्ट आदेश नाहीत, कर्जमाफीचे पैसे नाहीत आम्ही तरी काय करावं?"  अगोदरच दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, महापूर सारख्या नैसर्गिक आपत्तीने त्रस्त शेतकऱ्यांना पुन्हा कोरोना संकटाने ग्रासले. मागील हंगामात बरे पीक आले तर कोरोनामुळे फळे, भाजीपाला शेतातच फेकावा लागला. पुन्हा कधी बाजार सुरळीत होतील याचा अंदाज लावणे ही मुश्किल! मग साहजिकच मनात प्रश्न येतो शेती करावी की नाही? आज शेतकऱ्यांपुढे काय समस्या आहेत व शेती करावी की नाही याचा शेतकरी का विचार करू लागला आहे याची कारणे थोडक्यात पाहू.

कर्ज  शेती हा तोट्याचाच धंदा आहे हे आता सर्व मा‍न्य झाले आहे. केंद्र शासनाने शेतीसंबंधी खुलीकरणाचा अध्यादेश काढताना कबूल केले की शेतकरी गुलामीत होते. या आतबट्याच्या धंद्यामुळे शेतकरी व एकूण शेतीच कर्जबाजारी झाली. शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली व त्याचा उद्रेक होऊ नये म्हणून कर्जमाफीचे तुकडे फेकले गेले. शेतकरी ही त्यालाच नादावले. पण आता नवीन कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यात कोरोना‍मुळे बॅंकेत भरणा होत नाही. मग शेतीसाठी कर्ज कसे देणार? मग शेतकरी शेती कशी करणार? 

बाजारपेठ संपली गेल्या काही वर्षांत शेती मालाचे अतिरिक्त उत्पादन होत आहे. त्यास सरकार करत असलेल्या अनावश्यक आयाती. सर्व धान्य, कडधान्य, आधारभूत किमतीपेक्षा कमीदराने विकत आहेत. सरकारची खरेदी करण्याची ऐपत नाही मग पिकवून काय करायचे? आणखी खर्च करून तोट्यात जाण्यापेक्षा न पेरलेलं बरं अशी मानसिकता अनेक शेतकऱ्यांची होत आहे. केंद्र शासनाने कडधान्य आयातीसंबंधी केलेला करार २०२१ पर्यंत आहेच व देशाला तीन वर्ष पुरेल इतके धान्य गोदामात शिल्लक आहे असे राज्यकर्ते शेखी मिरवतात मग आणखी धान्य उत्पादन करून मातीमोल भावाने विकण्यापेक्षा नाही पिकवलेलेच बरे.

निकृष्ट बियाणे कर्ज मिळत नसताना शेतकऱ्यांनी घरातील शिल्लक किंवा घरच्या लक्ष्मीच्या अंगावरील किडुक मिडुक विकून पेरणी केली. बऱ्‍याच ठिकाणी बियाणे उगवलेच नाही. अनेक ठिकाणी दुबार - तिबार पेरणी करण्याची वेळ आली. किती वेळा खर्च करायचा?    अन् खर्च करून मिळणार काय याची काही शाश्वती नाही.

किडींचा प्रादुर्भाव पिकांवरील कीड हा विषय शेतकऱ्‍यांना नवीन नाही पण आता परिस्थिती वेगळी आहे. लष्करी अळी, टोळधाडी सारख्या किडी पूर्ण शेताच्या शेत फस्त करत आहेत. त्यात शासनाने अनेक प्रभावी कीटकनाशकांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. किडींना प्रतिका‍रक्षम जीएम बियाण्यांना बंदी आहे. मग पिकं पेरायचं ते किडींना खाण्यासाठीच का? सरकार सांगते तशी शेणमुत्राची शेती करून पोटापुरते पिकवलेले काय वाईट?

रासायनिक खते अधिक उत्पादनासाठी शेतकरी रासायनिक खतांचा वापर करत असतो. आता या खतांच्या किमती वारेमाप वाढल्या आहेत ते वापरणे परवडण्यात पलीकडे गेले आहे. बरे आपण शेतात टाकत असलेले खत खरच ‘खतं’च आहे का फक्त शाडूच्या गोळ्या आहेत हे समजण्याचे शेतकऱ्यांकडे काही साधन नसते. ते ही खत आज मिळत नाही. काळ्या बाजारात घ्या‍वे लागते आणि या रासायनिक खतांवरही बंदी घालण्याचा घाट घातला जात आहे मग शेती करावी कशी? 

मजूर तुटवडा शेतीत सध्या सर्वांत खर्चीक बाब कोणती असेल तर ती मजुरी. स्री असो वा पुरुष मजूर, वेळेवर शेतात कामाला मिळत नाही. पेरणी, कापणी वेचणीच्या हंगामात तर अवाजवी मोबदला देऊनही मजूर मिळत नाही. पीक विकून मिळालेले सर्व पैसे मजुरी देण्यातच जातात. मग आपण शेती कोणासाठी करतो? शेती म्हणजे काय रोजगार हमी योजना आहे का? इकडे मजूर पोसायचे, तिकडे शहरातल्यांना स्वस्त खाऊ घालायचे अन् शेतकऱ्यांनी कर्ज काढून फाशी घ्यायची म्हणजे शेती करणे आहे का?

अनिल घनवट ः ९९२३७०७६४६ (लेखक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com