पणन, प्रक्रिया आणि पतपुरवठा

कृषी अर्थव्यवस्थेत पणन, प्रक्रिया आणि पतपुरवठा यांची योग्य सांगड घातली गेल्यास शेतकरी निश्‍चितच अर्थक्षम होऊ शकेल. या यंत्रणेत प्रामुख्याने प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, सहकारी बॅंका, खरेदी विक्री सहकारी संस्था, प्रक्रिया संस्था, बाजार समित्या आणि विविध सहकारी यंत्रणांच्या मार्फत उभारण्यात आलेली गोदामे यांचा समावेश होतो.
agrowon editorial article
agrowon editorial article

अर्थक्षम शेती म्हणजे सतत नफ्यात चालणारी शेती होय. शेती अर्थक्षम होण्यासाठी तिच्यात केलेल्या आर्थिक गुंतवणुकीतून शेतीसाठी केलेल्या खर्चापेक्षा सतत अधिक उत्पन्न मिळणे आवश्‍यक असते. याकरिता शेतकऱ्यास आवश्‍यक असलेले भांडवल (पतपुरवठा) हंगामानुसार वेळेवर पुरेशा प्रमाणात आणि वाजवी व्याजदराने उपलब्ध झाले पाहिजे. त्याच्या उत्पादित शेतीमालाची प्रेरक दराने विक्री होऊन त्याला त्याने घेतलेल्या पतपुरवठ्याचे मुद्दल व्याजासह परत केल्यावर काही शिल्लक उत्पन्न राहिले पाहिजे. त्यामुळे वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांकडे त्याची पत विश्‍वासार्ह राहील. 

कृषी अर्थव्यवस्थेत पणन, प्रक्रिया आणि पतपुरवठा यांची योग्य सांगड घातली गेल्यास शेतकरी निश्‍चितच अर्थक्षम होऊ शकेल. या यंत्रणेत प्रामुख्याने प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका, खरेदी विक्री सहकारी संस्था, प्रक्रिया सहकारी संस्था, कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि शेतीमाल साठवणुकीसाठी विविध सहकारी यंत्रणांच्या मार्फत उभारण्यात आलेली गोदामे यांचा समावेश होतो. ही संपूर्ण यंत्रणा अर्थक्षम आणि कार्यक्षम करण्यासाठी यांच्यात सांगड घालणे अनिवार्य ठरते. सदर यंत्रणेच्या मजबुतीकरणास अग्रक्रम देण्याची आवश्‍यकता अनेकविध कारणांमुळे उत्पन्न होते. या यंत्रणांच्या माध्यमातून उत्पादकांना मालाची विक्री जास्तीत जास्त फायदेशीर भावाने करून त्यातून मिळालेला पैसा सुधारित उत्पादनाच्या वाढीस उपयोगात आणता येतो. मध्यस्थांकडून वाजवीपेक्षा जास्त कमिशन घेऊन होणारी पिळवणूक कमी करणे, तसेच साठेबाजीपणामुळे होणाऱ्या नफेबाजीस आळा घालणे व शेतकऱ्यास ग्राहकांकडून मिळणाऱ्या किंमतीचा योग्य हिस्सा उपलब्ध करून देणे शक्‍य होते.

दुसरे असे की केवळ खासगी व्यापाऱ्यांच्या साठेबाज प्रवृत्तीवरच सहकारी विपणन व्यवस्थेचे समर्थन अवलंबून नाही. शेतीमालाच्या सहकारी पद्धतीवरच खरेदी विक्री कार्यक्षमरितीने हाताळल्यास उत्पादक व ग्राहक किमतीतील फरक विपणन संस्थांमुळे कमी करता येईल. त्यायोगे उत्पादकास चांगले भाव मिळण्याची हमी मिळून ग्राहकाचे हित साधले जाईल. जरी शेती उत्पादकांनी त्यांचा माल एकत्र करणे, त्यांची निवड व प्रतवार साठा करणे, त्यावरची प्रक्रिया, त्यासाठी अर्थपुरवठा करणे, विमा उतरविणे, त्यांचे प्रमाणीकरण, वाहतूक करणे, नंतर स्थानिक विक्री अथवा निर्यात करणे, आयातीचे धोरण ठरविणे, आदी कामे उत्पादकांनी सहकारी तत्त्वावर हाताळली तर त्याचा निश्‍चितच आर्थिक फायदा होईल. तिसरे असे की, विपणन व्यवस्थेमुळे खासगी व्यापाऱ्यास योग्य वळण लागून एकाधिकार प्रवृत्तीही नाहीशी होऊ शकेल. सहकारी पणन, विपणन संस्था या शेतकऱ्यांनी प्रस्थापित केलेल्या त्यांच्या मालकीच्या व लोकशाही तत्त्वावर स्वतः जोपासलेल्या असल्याने समाजवादी समाजरचनेत अपेक्षित विपणनाच्या कार्यपद्धतीसही योग्य ठरतात. जर शेतीमालाची सहकारी खरेदी विक्री व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढीस लागली तर तिचा खासगी व्यापारावर योग्य तो परिणाम होऊन शेतीमाल किमती स्थिरावण्यास उपयोग होऊ शकेल. चौथे असे की सहकारी कर्जपुरवठ्याच्या वाढीसाठी सहकारी पणन यंत्रणा कर्जाच्या वसुलीस अत्यंत सहायभूत ठरतात. या सहकारी पणन, विपणन संस्थांच्या अनेकविध फायद्यामुळे सरकारने सहकारी संस्थांकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

शेतकऱ्याच्या मालकीच्या संस्था कॉर्पोरेट कंपन्यांकडे सोपविणे मग ते विमाक्षेत्र असो किंवा सहकारी क्षेत्रात उभारण्यात आलेल्या सहकारी साखर कारखान्याचे खासगीकरण असो, यातून शेतकऱ्याचे हित साध्य होईल याची सुतराम शक्‍यता नाही. ही निव्वळ धूळफेक आहे. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे किंवा शेतमालास दीडपट हमीभाव देण्याचे आश्‍वासन असो त्याची पूर्तता करणे अशक्‍य वाटते. यामुळे १९४५ साली सहकारी नियोजन समितीने सरकारला केलेल्या शिफारशीस आपण हरताळ फासतो की काय? याचा संभ्रम निर्माण होतो. १९४५ नंतर दहा वर्षांच्या कालावधीत खरेदी विक्रीसाठी उपलब्ध होणाऱ्या मालाच्या एकूण २५ टक्के शेतीमालाची विक्री सहकारी संस्थांमार्फत व्हावी व त्यासाठी सुमारे २०० खेड्यासाठी किमान एक असे खरेदी विक्री संघ स्थापन करावेत. त्यायोगे माल एकत्रित करणे, त्याची प्रतवारी करणे व आवश्‍यक त्या ठिकाणी उत्पादकाच्या हितासाठी प्रक्रिया करणे आणि उत्पादकास लाभदायक होईल, अशी शेतमालाची विक्री करणे ही सर्व कामे सदर संस्था स्वीकारू शकतील. या शिफारशीनुसार राज्यात अनेक खरेदी विक्री संघांची स्थापना करण्यात आली व त्याचा आकडा नंतर सतत वाढत गेला. आज आपण कितीही कॉर्पोरट शेती, करार शेती, गटशेती आदी पर्याय सुचवीत असलो तरी देशाची कृषी अर्थव्यवस्था लक्षात घेऊन प्राथमिक स्तरावर काम करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या पणन, प्रक्रिया, सेवा, सहकारी संस्थाच शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकतील यात शंका नाही. 

प्राथमिक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था २१,४८५, खरेदी विक्री सहकारी संस्था ३१५, साखर कारखाने २०२, सहकारी सूतगिरण्या १६६, यंत्रमाग सहकारी संस्था १५५१, हातमाग सहकारी संस्था ६७३, जिनिंग व प्रेसिंग सहकारी संस्था १६४ अशा एकूण दोन लाख १८ हजार ३२० संस्था महाराष्ट्रात आहेत. पणन विभागाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. हरियाना आणि पंजाब राज्यांतील पणन संघाची उलाढाल १० ते १२ हजार कोटींची आहे. तर महाराष्ट्रात पणन संघाची यंत्रणा मोठ्या प्रमाणावर असूनही उलाढाल मात्र ९५०० कोटी रुपयांची आहे. खरेदी विक्री सहकारी संस्था व प्राथमिक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांचे बळकटीकरण केल्याशिवाय शेतकऱ्यांचा आर्थिक विकास शक्‍य नाही. राज्यातील सर्व सातबाराधारक शेतकरी सेवा सहकारी संस्थेचे ‍सदस्य करण्याची आवश्‍यकता आहे. त्यांच्या कामकाजात सुधारणा करून आर्थिक उलाढाल वाढविण्यासाठी, जनजागृतीच्या माध्यमातून पणन, विपणन विकासासाठी एक चळवळ उभी राहावी, यासाठी सहकारी संस्थांच्या सभासदांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे.  शेती ही केवळ उत्पादनाशी निगडीत नसून तो एक व्यवसाय आहे. शासन, शेतकरी संघटना, सहकारी बॅंका, पणन-विपणन-प्रक्रिया संस्था यांनी शेतीव्यवसायाकडे केलेले दुर्लक्ष त्यामुळे शेतकरी हा घटक व्यवसायाभिमुख न होता तो केवळ उत्पादनाभिमुख बनला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी मूलभूत सुधारणा केल्या नाहीत तर पुढे अनेक प्रश्‍न निर्माण होऊ शकतात. त्यासाठी आताच सजग होण्याची आवश्‍यकता आहे.                          

प्रा. कृ. ल. फाले ः  ९८२२४६४०६४ (लेखक राष्ट्रीय सहकारिता विकास तथा ग्रामीण प्रबंधन संस्थेचे संचालक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com