मैया मोरी मैं नही माखन खायो

दूध उपलब्ध असूनही आज शेतकऱ्यांच्या मुलांना मिळत नाही. ताटामधील एकही पदार्थ त्यांच्या शेतात पिकवलेला नाही, जे काही पिकते ते मथुरारुपी मंडीमध्ये जाते. फरक एवढाच की पूर्वी मथुरेत एकच कंस होता, येथे मात्र शेकडो कंसरुपी दलाल शेतकऱ्याने रक्त आटून पिकविलेल्या मालावर तुटून पडतात.
मैया मोरी मैं नही माखन खायो

साठच्या दशकात ‘गोकूळचा चोर’ हा स्व. सुधीर फडके यांचे संगीत असलेला एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये गायिका सुधा मल्होत्रा यांनी सुरदास यांचे ‘‘मैया मोरी मैं नही माखन खायो,’’ हे सुंदर अर्थपूर्ण भजन गायले होते. यशोदा बालकृष्णाला खांबाला बांधून ‘‘तू सवंगड्यांसह माखन चोरून का खातोस’’ असे विचारत असते तेव्हा तो छोटा कृष्ण मातेला म्हणतो, ‘‘मी लोणी खाईलच कसा? गोकूळात दूध, तूप, लोणी आहेच कुठे? ते तर सर्व मथुरेला कंसाकडे जाते, आम्हाला मिळते ते फक्त उरलेले ताक.’’ हे गीत ऐकताना दूधदुभत्याने समृद्ध असलेले अवघे गोकूळ समोर उभे राहते.  आपल्याकडील प्रत्येक गावाची अवस्था आज गोकूळासारखी झाली आहे, फरक फक्त हजारो वर्षांचा आहे. 

मध्यंतरी एका शेतकऱ्याकडे जेवण्याचा योग आला. कापूस, सोयाबीन, तूर, ऊस उत्पादक शेतकरी असल्यामुळे उत्सुकतेपोटी मी त्यांना ताटामधील प्रत्येक पदार्थाबद्दल आणि त्याच्या स्रोत्राबद्दल विचारले. उत्तर अर्थात बाजारातून आणले हेच होते. एकही अन्नपदार्थ त्यांच्या शेतात उत्पादित होत नव्हता. मला ६०-७० चा काळ आठवला. शेतीचे ते सुवर्णयुग होते. वाहत्या नदीचे पाणी, वृक्षराजीमध्ये लपलेले गाव, पडणारा पाऊस, भरलेल्या विहिरी, बारव, खरीप-रब्बी हंगामामधील १५-२० पिकांची शेती, रासायनिक खते, कीटकनाशकांचा नसलेला दर्प, गोठ्यामध्ये गायी, शेतात बैलजोडी, धान्याने भरलेल्या कणगी आणि जेवणाच्या ताटात फक्त मिठाचा अपवाद वगळता प्रत्येक अन्नपदार्थ हा शेताला जोडलेला असायचा. शेत हे शेतकऱ्यांचे दुसरे अंगणच होते, फक्त आकार मोठा होता. या सुगंध देणाऱ्या अंगणाशी शेतकरी आणि त्यांचे कुटुंब प्रात:कालापासून ते सूर्यास्तापर्यंत मनोभावे जोडलेले असत. आज हेच शेत शेतकऱ्यांसाठी ओझे झाले आहे, असे का झाले? शेती आपली नाही असे का वाटू लागले? याचा विचार करताना बांधावरील हरवलेली झाडे दिसू लागतात, आटलेल्या नद्या, विहिरी, लुप्त झालेले जंगल, उघडे डोंगर, खताच्या गोण्या, कीटकनाशकांचे डब्बे, फवारा यंत्रे आणि बियाणांच्या पिशव्या डोळ्यासमोर येतात. एका परदेशी शास्त्रज्ञाने तुमच्या देशात पावसाळा हा ऋतू असतानाही शेतकरी एवढा संकटात का? या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नव्हते. पावसाळा हा ऋतू नसतानाही जगामधील अनेक राष्ट्रे शेतीमधून संपन्न झाली आणि आम्ही मात्र पावसालाच दोष देतो. 

सकाळी गावाबाहेर फिरावयास गेलो असताना शेतात एक शेतकरी गायीची धार काढत होता. लहान वासरू गायीजवळ खुंट्याला बांधले होते. एक लहान पोर बापाकडे पहात होते. दररोज पाच लिटर दूध डेअरीला घालण्याशिवाय पर्याय नव्हता. वासराच्या डोळ्यातील पाणी आणि पोराचे सुकलेले डोळे त्यांना दूध मिळतच नाही याचे दर्शक होते. दुग्ध व्यवसाय किती नुकसानीत आहे हे तो मला पोटतिडकीने सांगत होता आणि मला ‘‘मैया मोरी मैं नही माखन खायो’’ आठवू लागले. दूध उपलब्ध असूनही असहाय्य परिस्थितीमुळे आज शेतकऱ्यांच्या मुलांना मिळत नाही. ताटामधील एकही पदार्थ त्यांच्या शेतात पिकवलेला नाही, जे काही पिकते ते मथुरारुपी मंडीमध्ये जाते. फरक एवढाच की पूर्वी मथुरेत एकच कंस होता, येथे मात्र शेकडो कंसरुपी दलाल शेतकऱ्याने रक्त आटून पिकविलेल्या मालावर तुटून पडतात. गेल्या दोन अडीच दशकापासून सुरू असलेल्या या विषचक्रात कुठेतरी चार थेंब अमृताचे पडणे गरजेचे आहे. हा अमृताचा कलश शासनाकडे आहे असे समजणे चुकीचे आहे, तो आपल्या घरात आहे, फक्त कुठे ठेवला हे समजत नाही. आज त्याच्या शोधाची गरज आहे. हा अमृताचा थेंबच शेतकऱ्यांना सकारात्मक विचारांची प्रेरणा देऊ शकतो, त्यांचे परावलंबित्व दूर करू शकतो, मात्र नैराश्य टाळावयास हवे. 

मध्यंतरी एका शेतकऱ्याचा संध्याकाळीच दूरध्वनी आला, ‘‘सर, चार दिवस शेतातच आहे, गावाला जातो असे घरी सांगितले आणि येथे वावरात बसलो आहे. तापलेले ऊन, सावलीला झाड नाही, जमिनीचा धुराळा झालाय, घरी लेकरं, बायको, आई आहे, जीव कालवत आहे.’’ त्यांचे शब्द ऐकून माझ्याच डोळ्यात अश्रू वाहू लागले. आज जवळपास सर्व अल्पभूधारक शेतकरी याच वाटेवरचे प्रवासी आहेत. जेव्हा एखादा मैलाच्या दगडाजवळ पोचतो तोच असा संवाद साधतो. पूर्वी शेतकरी एकटा शेती करत नसे तर त्याचे अवघे कुटुंब त्याच्या सोबत असे. आज तो एकटा संकट झेलत आहे. कुटुंबाला झळ लागू नये म्हणून धडपडत आहे. भारतीय शेतीमधील या शोकांतिकेवर कोणी चकार शब्द काढत नाही. ग्राहकांचा संबंध फक्त शेत उत्पादन या पुरताच मर्यादित आहे. त्यामागचे शेतकऱ्याचे कष्ट, अश्रू याची कुणालाही किंमत नाही. जोपर्यंत या अश्रूंना मोत्याची किंमत येणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे अश्रू इतरांसाठी खारवट पाणीच असणार आहेत. 

अदिवासी बालकांच्या कुपोषणावर संशोधन करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे शेतकऱ्यांची ही कोवळी पानगळ त्यांच्या पांरपरिक शेतीमधून मिळणाऱ्या नागली, उडीद या उत्पन्नाशी जोडलेली आहे. दुर्गम भागामधील शेतीमधील अल्प उत्पादन आदिवासी शेतकरी आपल्या घरच्या लेकराबाळांसाठीच वापरतो. जंगलाचा ऱ्हास आणि घरातील अपुरे अन्न हे आदिवासी शेतकऱ्यांच्या बालमृत्यूचे मुख्य कारण आहे. परंतू बिगर अदिवासी पट्ट्यांमधील शेतकऱ्यांच्या लहान मुलांमध्येसुद्धा वाढते कुपोषण हा चिंतेचा विषय आहे. शेतमाल खळ्यातूनच थेट बाजारपेठत हे चक्र लहान बाळांना आपल्याच शेतात पिकवलेल्या सकस अन्नापासून वंचित करत आहेत, हे मला गाईच्या दुधाकडे कोरड्या डोळ्याने पाहणाऱ्या त्या मुलाकडे पाहून वाटले. आज आमच्या शेतकऱ्यांची अवस्था यशोदेने खांबाला बांधलेल्या बाल कृष्णाप्रमाणे आहे. तो माखन चोर नाही, हे माहित असूनही शेतकऱ्याने पिकवलेल्या शेत उत्पादनाच्या लोण्यावर हात मारणारे चोर सन्मानाने फिरत आहेत. शेतकरी मात्र शिळे ताक पिऊन खंगत चालला आहे. खंत वाटते ती याचीच!

डॉ. नागेश टेकाळे ः ९८६९६१२५३१ (लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com