agriculture news in marathi, agrowon special article on river | Agrowon

चला, जीवन वाहिन्या वाहत्या करूया...!
 डॉ. नागेश टेकाळे
मंगळवार, 1 जानेवारी 2019

पडलेल्या दुष्काळास जबाबदार कोण? असा प्रश्न जर मला कुणी विचारला तर माझे बोट गावपरिसरामधून एकेकाळी वाहणाऱ्या पण आता कोरड्या पडलेल्या नदीपात्राकडे जाते. दुष्काळाला हटवायचे असेल तर गावच्या नदीला वाहते करण्याचा संकल्प नववर्षांरंभी करायला हवा.  

महाराष्ट्रात विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यात यावर्षी पडलेल्या दुष्काळाची कारणमिमांसा शोधताना अनेकजण निसर्गाला, वातावरण बदलास, अपुऱ्या अवेळी झालेल्या पावसाला दोष देतात. दुष्काळ आणि जलव्यवस्थापन यांचा अतिशय जवळचा संबध आहे याकडे अजूनही हवे तेवढे लक्ष दिले जात नाही याची खंत वाटते. पडलेल्या दुष्काळास जबाबदार कोण? असा प्रश्न जर मला कुणी विचारला तर माझे बोट गावपरिसरामधून एकेकाळी वाहणाऱ्या पण आता कोरड्या पडलेल्या नदीपात्राकडे जाते. दुष्काळाच्या कथा आणि व्यथा सजवून रंगवून सांगितल्या जातात पण कोरड्या पडलेल्या नदीपात्राबद्दल कोणीही बोलण्यास तयार नाही. नदीला आपण आपली माय म्हणतो, या आईला शेतकऱ्यांच्या वेदना कळत नसतील का? कवयित्री शांता शेळके यांचे एक गीत आठवते ‘‘काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी!’’ आज नद्या आक्रंदून रडत आहेत आणि आम्ही मात्र दुष्काळास कवटाळून मदतीच्या आशेवर पुढच्या पावसाळ्याकडे डोळे लावून बसलो आहोत. 

नदी ही शेतकऱ्यांसह सर्वांचीच जीवन वाहिनी आहे. गावकुसात वाहणारी नदी असेल तर पंचक्रोशीमधील पिके आनंदाने डोलत असतात. फक्त समोर वाहणारे पाणी दिसले तरी पिकांची वाढ जोमात होते. गावाच्या सीमेला लागून नदी वाहत आहे हाच आनंद शेतकऱ्याला सुखावून टाकू शकतो. दुष्काळाची विंवचना मिटवू शकतो, पण यासाठी प्रथम आपणास नदीला समजून घेता आले पाहिजे, तिच्याशी बोलता आले पाहिजे, यालाच मी जलसंवाद म्हणतो.

आपल्या गावाची नदी पूर्वी कशी होती आणि आता कशी आहे, याचा अभ्यास या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गावामधील युवकांनी करावयास हवा. नदी स्वच्छता मोहीम आणि तिला पूर्वी सारखे वाहते करण्यासाठी उगमापासूनच सुरवात करावयास हवी. यासाठी आपणास आपल्या परिसरामधील सर्व लहान नद्यांचे उगम शोधणे गरजेचे आहे. त्याकरिता डोंगरमाथे, कपारी, घळीची चढउतारही हवीच. नदी जेंव्हा उगमालाच कोरडी असते अथवा व्याधीग्रस्त असते तेंव्हा तिला वाहती करण्यासाठी शास्त्रीय उपचारांची गरज असते. आपण एक लक्षात ठेवले पाहिजे की नदी वाहती करणे आणि स्वच्छ करणे हे दोन स्वतंत्र उपक्रम आहेत. नदी वाहती असेल तर ती आपोआपच स्वच्छ होते, ती थांबलेली असेल तर अस्वच्छ होऊन मृत होते. नाशिकच्या रामकुंड येथे गोदावरी स्वच्छता अभियान राबविले जाते, हजारो युवक प्रतिवर्षी त्यात सहभागी होतात. या मोहिमेत नदीमधील केरकचरा, प्लॅस्टिक, जलपर्णी आणि इतर घाण काढली जाते. मात्र, त्या वेळी नदी पात्र वाहतेच असते असे नव्हे, म्हणूनच पुन्हा नदीमध्ये कचऱ्याचे ढीगारे जमू लागतात. हे जर टाळावयाचे असेल तर तिला वाहते करणे गरजेचे आहे. 

गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वतावर होतो. तेथून प्रयत्न सुरू करणे आवश्यक आहे. नदी वाहती करण्यासाठी सर्व प्रथम तिला मिळणाऱ्या लहान नद्यांचा शोध गरजेचा आहे. अनेक लहान नद्या विविध टप्प्यावर मोठ्या नदीला मिळून तेथून नदीचे वाहणे सुरू होते. या अशा लहान नद्या लुप्त झाल्या तर मोठी नदी वाहूच शकणार नाही. गोदावरीची आजची बिकट अवस्था याचमुळे झाली आहे. लहान नद्यांचा शोध त्यांचे उगम पाहणे हे गावपातळीवरचे कार्य आहे. यामध्ये स्थानिक युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात हवा. या लहान नद्यांची लांबी जेमतेम १५ ते २० कि.मी. पर्यंतच मर्यादित असते. त्यांचे उगम शक्यतो परिसरामधील डोंगरमाथ्यावरच असतात. एकदा उगमस्थान मिळाले की त्याची स्वच्छता, खोली याकडे लक्ष देऊन त्याचा परिसर वृक्ष लागवडीने समृद्ध करावा. यामध्ये पर्जन्यजल धरुन ठेवणारे उंबरासारखे वृक्ष असावेत.  पावसाळ्यात उगमस्थानांकडून उताराकडे वाहणारे पाणी पायथ्यापर्यंत येईपर्यंत प्रवाहात रुपांतरित झालेले असते. या उताराच्या प्रवासात नदीचा मार्ग मोठे दगड धोंडे यापासून मुक्त असावा. दोन्ही बाजूस विपुल गवत असावे, सोबत मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड असावी. गवतामुळे डोंगराची धूप होत नाही, पाणी धरले जाते आणि उगमाचा स्त्रोत शाश्वत होतो. वृक्ष सावलीमुळे बाष्पीभवन कमी होते, पायथ्याशी आलेल्या नदीला वाहते करण्यासाठी तिच्या दोन्हीही काठावर ‘वाळा’ ही गवताच्या कुळामधील वनस्पती लावावी. त्यानंतर तिच्या दोन्हीही बाजूस भरपूर पर्णभार असणारे मध्यम उंचीचे वृक्ष लावावेत. नदीमध्ये वाळू निसर्ग नियमानुसार तयार होते. मात्र, तिला अस्थिर करू नये. परिसरामधील मुख्य नदीला मिळेपर्यंत या लहान उपनदीला स्थानिक युवक शास्त्रीय पद्धतीने सहज वाहते करू शकतात.

पुराणामधील एक कथा आठवते. कण्व ऋषींनी बारा वर्षे तपश्चर्येला जाण्यापूर्वी गंगेच्या पात्रात जाऊन नदीला प्रात:काळच्या वेळी ओजंळीने जल अर्पण केले आणि म्हणाले, ‘‘आई, अशीच शांत वाहत रहा आणि पात्रामधील जलचरांना अभय दे.’’ नदीमधील जलचरांचे विश्व ऋषीच्या पायाजवळ निशब्द थांबलेले होते. बारा वर्षांची तपधारणा संपल्यावर कण्व ऋषी पुन्हा गंगेच्या विशाल पात्रात उतरले. ऋषींनी पुन्हा ओंजळीत जल घेऊन ‘‘आई, माझे सर्वतप आज मी तुला अर्पण करत आहे, अशीच तू स्वच्छंदी खळाळत वाहत रहा!’’ असे म्हणून त्यांनी पाणी खाली सोडले. नदीमधील जलचरामध्ये जल्लोष झाला. आज आमच्या ग्रामीण भागामधील युवकांना अशाच तपश्चर्येची गरज आहे. मात्र ती नदी वाहती ठेवण्यासाठी कार्यरुपाने असावी. नदी एक वर्षात वाहणार नाही, तिचे दु:ख, आक्रंदन फार मोठे आहे, पण आज या दुष्काळाने तुम्हाला त्या निमित्ताने जलसंवादाची संधी दिलेली आहे. नवीन वर्षाची ही नवीन शाश्वत संकल्पना आपल्या शेतीचा उद्धार करणारी असणार आहे. सकारात्मक विचारांचा अवलंब केला तर आपल्या सोबतच परिसरातील वातावरणही सकारात्मक विचारांनी भरुन जाते. मनात सकारात्मक विचार येणे म्हणजेच अर्धी लढाई जिंकणे होय. गावामधील बारमाही वाहती नदी हे आपल्या शेतीचे सुरेख देखणे रूप आहे आणि हे डोळ्यात साठविण्यासाठी या नवीन वर्षी संकल्प करू या ‘‘चला, गावच्या नदीला वाहते करू या!’’

 डॉ. नागेश टेकाळे  ९८६९६१२५३१
(लेखक शेतीप्रश्नाचे अभ्यासक आहेत.)


इतर संपादकीय
कृषी परिवर्तनाची नांदीनरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या...
अण्वस्त्रांविषयी वाचाळता कशासाठी? अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या (नो फर्स्ट...
आर्थिक मंदीपेक्षा राष्ट्रवादाचा गोडवा! अर्थमंत्र्यांना नुकतेच उद्योगपतींचे एक शिष्टमंडळ...
अतिक्रमण अन् असमन्वयाचा ‘पूर’जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात सुरू झालेला...
नीट समजून घेऊया ‘पाण्याचे गणित’आजमितीला अवर्षण, पाणीटंचाई या देशासमोरील अव्वल...
विकासाबरोबर विषमताही वाढतेयभारताच्या लोकसंख्यात्मक लाभाची जगभर चर्चा होतेय....
इशारे ठीक; आता हवी कृतीशेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा मिळायला हव्यात,...