नदी वाहती ठेवणे हा खरा जल आशीर्वाद

क्षार, गाळ आणि रेती यामुळे नदीपात्रांचे सिमेंटीकरण होत आहे. त्यात पुन्हा वाळूच्या अभावामुळे पावसाचे पाणी नदीपात्रातून वाहून जाते आणि पावसाळ्यानंतर लगेच नद्या कोरड्या पडत आहेत. नदीत नांगर घालण्यापेक्षा त्यात गाळ न येता ती बारमाही कशी वाहती राहील यावर विचार व्हायला हवा.
संपादकीय
संपादकीय

‘नांगरणे’ हा शब्द शेतीशी जोडलेला आहे. उन्हाळ्यात शेत नांगरून वर आलेल्या मोठमोठ्या ढेकळांना फोडून माती मोकळी केली जाते. या वेळेस त्यात शेणखत मिसळून पावसामुळे जमिनीत योग्य, शाश्वत ओलावा निर्माण झाला की, शेतकरी पेरणी करतात. पूर्वी शेतकरी आपल्या जमिनीचा एक तुकडा वर्षभर पडीक ठेवत. लागवडीपूर्वी तो नांगरला जात असे. जमिनीची एक-दीड फुटापर्यंत उलथापालथ करून त्यामध्ये उपयोगी जिवाणूसाठी प्राणवायू खेळता ठेवून सेंद्रिय कर्ब सर्वत्र एकसारखे पसरणे म्हणजेच ‘नांगरणे’. हा शब्द मला फक्त शेतीपुरताच माहित होता. मात्र, काही दिवसांपूर्वी पाणी मुरण्यासाठी नदीच नांगरली, या बातमीने धक्काही बसला आणि क्षणभर मनोरंजनही झाले. नदी नांगरण्याचा विदर्भातील प्रयोग पाहून मला शेतकरी आणि वैद्याची गोष्ट आठवली. एका शेतकऱ्याला पायाला जखम झाली आणि तो वैद्याकडे गेला. वैद्याने जखम व्यवस्थित पाहून तिच्या सर्व बाजूस औषधी वनस्पतींचा गरम लेप लावला. त्यावर झाडपाला बांधून त्याला घरी आराम करण्यास सांगितले. रुग्णाने वैद्याला विचारले, ‘‘जखमेवर लेप देण्याऐवजी तुम्ही तिच्या बाजूलाच जास्त औषधपाणी करत होतात, असे का?’’ वैद्याने त्याला चार दिवसानी बोलावले. शेतकरी आला. वैद्याने जखम पाहिली, ती आता कोरडी झाली होती. ‘‘मुख्य जखम पूर्ण बरी होण्यासाठी तिच्या आजूबाजूचा भाग स्वच्छ, जंतुविरहित हवा, तरच मूळ जखम लवकर बरी होते.’’ वैद्याच्या या उत्तराने त्या रुग्णाचे समाधान झाले.  नदी कोरडी पडणे ही निसर्गाची भळभळ वाहणारी जखम आहे आणि यास आपणच जबाबदार आहोत. तिच्यावर नांगर फिरविणे म्हणजे जखमेचे पूर्ण विच्छेदन करणे. नदी कोरडी का पडली? यावर कोणीही मंथन करण्यास तयार नाही.

प्रत्येक नदी अथवा तिच्यामधील जलप्रवाह हा निसर्गनिर्मित असतो. नदीचा उगम डोंगर, पर्वतराजी अथवा घळीमध्ये होऊन ती वेगाने उताराकडे धावत असते. मार्गात तिला कितीतरी प्रवाह सतत मिळत असतात. पृष्ठभागावर आल्यावरसुद्धा तिचा प्रवास ज्या दिशेला उतार आहे त्या दिशेनेच सुरू असतो. अंतिम ध्येय एकच कोणत्या तरी मार्गाने समुद्राला जाऊन मिळणे. पूर्वी डोंगर, पर्वतराजी घनदाट जंगलाने व्यापलेली होती. मनुष्य तेथे जाऊसुद्धा शकत नव्हता. म्हणूनच उगमापासूनच नदीचा प्रवाह हा शाश्वत असे. तिच्या दुतर्फा गर्द झाडी, पात्रात फक्त रुपेरी वाळू हे तिचे सौंदर्य आणि सौभाग्य अलंकार होते. आज एकाही नदीला सौंदर्यही नाही आणि सौभाग्य लेणेही नाही हे दुर्दैव आहे. 

डोंगरावरील उगमस्थानाजवळची उद्ध्वस्त वनराई, नदीच्या दोन्हीही तिरावरील नष्ट झालेली वृक्षराजी, तिच्यामधील वाळूचा अमाप उपसा, तिच्या दोन्हीही काठालगत सुरू असलेली रासायनिक शेती यामुळे नदीपात्रात आज मोठा गाळ तयार झाला आहे. मग पाणी मुरणार कसे? धो धो पावसामुळे अशा नद्यांमध्ये पाणी मुरण्याऐवजी ते प्रचंड वेगाने वाहून जाते. म्हणूनच हिवाळ्यात जेथे नद्या वाहाव्यात अशी अपेक्षा असते, तेथे त्या कोरड्या पडतात. नदीच्या वाळूमध्ये पावसाचे पाणी मुरले तरच पावसाळा संपल्यावर ते भूगर्भाच्या वरच्या थराला येऊन वाहू लागते. नद्यांना नांगरून तेथे पावसाचे पाणी जिरवण्यापेक्षा डोंगर, दऱ्या हरित करून तिच्या उगमस्रोतापासून पाण्याचा शाश्वत प्रवाह सुरू करणे गरजेचे आहे. त्याकरिता नदीच्या उगम भागातच उंबर, नागकेशर कुळामधील पाणी धरून ठेवणारे हजारो देशी वृक्ष लावावयास हवेत. नदी उगमस्थानापासून पृष्ठभागापर्यंत दुतर्फा वृक्ष तर असावेतच, पण ती पृष्ठ भागावरून उताराच्या दिशेने वाहत असताना तिच्या दोन्हीही किनाऱ्यांवर देशीवृक्षाची घनदाट श्रीमंती ही असावयास हवी. नदी किनारा ते काठावरची वृक्षसीमा यामधील पट्ट्यामध्ये वाळ्यासारखे घनदाट तंतुमय मुळांची जाळी असलेले गवत लावावयास हवे. जेणेकरून नदीपात्रात पावसामुळे मातीचे सूक्ष्म कण न येता फक्त वाळूच पाण्यात येईल. जोपर्यंत नदीमध्ये वाळू तयार होणार नाही तोपर्यंत नदी कधीही शाश्वत पद्धतीने वाहू शकत नाही. नदीला जिंवत करावयाचे असेल तर तिच्या दोन्हीही तीराच्या वृक्ष सीमेबाहेर फक्त जैविक सेंद्रिय शेतीलाच परवानगी हवी. ज्यामुळे नदीमध्ये मातीचा गाळ येणार नाही. 

नदीची निर्मिती, तिच्यामधील पाणी, त्याचा प्रवाह हे निसर्ग ठरवितो. वृक्ष आणि वरुणराजाची त्याला साथ असते. नदीचे असणे, तिचे वाहणे ही मानवाच्या कल्याणासाठी आहे, म्हणूनच आपण तिला वाहते ठेवावयास हवे. तिच्या प्रवाहात हस्तक्षेप तर मुळीच नको. वाळू उपसा करून कोरड्या नद्यांना नांगरून पात्रात पावसाचे पाणी जिरवण्यापेक्षा नद्यांना नैसर्गिक पद्धतीने मानवी हस्तक्षेप न करता शाश्वत वाहते करण्याकरिता प्रयत्न व्हायला हवेत. क्षार, गाळ आणि रेती यामुळे नदीपात्रांचे सिमेंटीकरण होत आहे. त्यात पुन्हा वाळूचा अभाव, यामुळे पावसाचे पाणी नदीपात्रातून वाहून जाते. नदीत नांगर घालण्यापेक्षा नदीत गाळ न येता ती बारमाही कशी वाहत राहील यावर विचार व्हायला हवा आणि तोही लोकसहभागातून. गंगा वाराणशीला स्वच्छ झाली म्हणजे पूर्ण नदी स्वच्छ झाली असे नव्हे.

आजही आपण वाराणशीच्या पुढे गंगासागरपर्यंतच्या प्रवासात पाच मिनिटेसुद्धा नदीकाठावर थांबू शकत नाही. नदी नांगरून तिची खोली वाढवणे हा उपाय पूर नियंत्रणासाठी असला तरी जोपर्यंत आपण उगम स्थानावर वृक्षलागवडीबरोबरच इतर साधनांनी पर्जन्य वृष्टीमधून भूजल पातळी वाढवत नाही आणि वाळू उपसा बंद करत नाही तोपर्यंत नदी वाहणे अशक्य आहे. म्हणूनच शासनाने वैद्याच्या भूमिकेत जाऊन सरळ जखमेवर उपचार करण्यापेक्षा तिच्या परिसरास वृक्षराजीचा लेप लावून, नदी काठापासून दूर सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देऊन नदीपात्रात येणारा गाळ थांबवावा. नदीमधील गाळाचे विच्छेदन करण्यापेक्षा गाळ आणि क्षारांना नदीपात्रात येण्यापासून रोखणे हा खरा जल आशीर्वाद आहे.  

डॉ. नागेश टेकाळे ः ९८६९६१२५३१ (लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com