नदी संवर्धनाचा केरळचा आदर्श

काही दिवसांपूर्वी केरळच्या उत्तर भागाला भेट देण्याची संधी मिळाली. उत्तर केरळचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात आनंदात राहणारे शेतकरी आणि त्यांच्या आनंदास कारण ठरलेल्या तेथील अकरा नद्या. यातील काही नद्या मला जवळून पाहता आल्या आणि मराठवाड्यातील माझ्या आजोळी वाहत्या नदीकाठी गेलेले माझे रम्य बालपण आठवले.
agrowon editorial article
agrowon editorial article

केरळ हे भारताच्या दक्षिण टोकाचे एक राज्य. अरबी समुद्राचा स्वच्छ किनारा आणि जैवविविधतेने संपन्न असलेला पश्चिम घाट हे या राज्याचे वैशिष्ट्य. केरळचे मला वाटलेले अजून एक आकर्षण म्हणजे या निसर्गरम्य राज्यामध्ये वाहणाऱ्‍या ४४ नद्या आणि त्यामधील स्फटिकासारखे स्वच्छ पाणी. केरळचे भौगोलिकदृष्ट्या तीन मुख्य भाग पडतात. उत्तर, मध्य आणि दक्षिण केरळ. काही दिवसांपूर्वी केरळच्या उत्तर भागाला भेट देण्याची संधी मिळाली. उत्तर केरळचे मुख्य वैशिष्ट म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात आनंदात राहणारे शेतकरी आणि त्यांच्या आनंदास कारण ठरलेल्या तेथील अकरा नद्या. सर्वच नद्यांची पात्रे मोठी आणि विशाल आहेत. यातील काही नद्या मला जवळून पाहता आल्या आणि मराठवाड्यातील माझ्या आजोळी वाहत्या नदीकाठी गेलेले माझे रम्य बालपण आठवले. 

उत्तर केरळमधील या नद्यांचे उगम पश्चिम घाटामधून झालेले आहेत आणि बहुतेक सर्व नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. उगमापासून ते समुद्रापर्यंतचे अंतर ४०-५० किमीपेक्षा जास्त नाही. या सर्व नद्यांचे उगमापासून ते पुढील ८-१० किमीपर्यंतचे पाणी गोड असते. मात्र, पुढे त्याला समुद्राच्या पाण्याची चव येते, याचे मुख्य कारण म्हणजे समुद्राला येणारी भरती. हे पाणी आतमध्ये येते आणि ओहोटीला पुन्हा समुद्राच्या भेटीला जाते. केरळच्या या भागातील नद्या वर्षभर वाहत्या आणि त्याचबरोबर त्या सुरक्षित राहणे यास अरबी समुद्र कारणीभूत आहे. पाण्याला खारी चव असल्यामुळे शेतीला याचा वापर होत नाही म्हणून रासायनिक खते आणि जलपर्णी यांचा नदीशी फार संबंध येत नाही. पश्चिम घाटाचे जंगल नदीच्या दोन्हीही काठावर असले तरी वाहत्या किनाऱ्यांना खेटून नाही. दोन्हीही किनाऱ्यावरील जागा नारळांनी व्यापलेली आहे. नदीकाठच्या हजारो नारळ वृक्षांची गर्दी आणि स्फटिकासारखे वाहते पाणी पाहून आपण निसर्गाचे एक जिवंत कॅलेंडरच पाहत आहोत, असा भास होतो. केरळच्या या भागामधील नद्या स्वच्छ राहण्याचे मुख्य कारण म्हणजे या भागात कुठेही एमआयडीसी अथवा कारखाने नाहीत. तेव्हा त्यांच्या सांडपाण्याचा, रसायनांचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणूनच या भागामधील मी पाहिलेला पश्चिम घाट मला जास्त सुरक्षित आणि संवर्धन झालेला आढळला. 

नदी काठावर अनेक छोटी गावे आहेत. प्रत्येक गावाला नदीच्या काठापर्यंत जाण्यासाठी एक पूल असतो. त्या पुलावर सकाळी उभे राहून लोक नदीला हात जोडून नमस्कार करतात आणि नंतर कामाला जातात. घरातील स्वयंपाक, स्नानाचे पाणी नदीमध्ये येते पण वाहत्या पाण्यात लगेच दिसेनासे होते. प्रत्येक घराला स्वत:ची गोड्या पाण्याची विहीर आहे. तेथील हवे तेवढेच पाणी काढून वापरले जाते म्हणून गावामधील सांडपाण्याची समस्या तेवढी गंभीर दिसत नव्हती. नदीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्‍या किनाऱ्‍यावर जाण्यासाठी लहान बोटीचा वापर होतो. केरळच्या इतर भागात जेथे हॉटेल व्यवसाय, कारखाने आहेत तेथे नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जलपर्णी आढळते. मात्र, या भागात ती दिसत नव्हती. अनेक घरामध्ये वनस्पतिजन्य साबण आणि कपडे धुण्याची पावडर वापरली जात होती. नदी प्रदूषित करणारी रसायने दिसत नव्हती. नदीच्या पाण्यात मासे भरपूर आहेत. त्याचबरोबर भरतीबरोबर आत येणारे इतर समुद्री खाद्यसुद्धा. नद्या वाहत्या असल्यामुळे वाळू उपसा तेथे फारसा नसावा, अर्थात मला तरी तो कुठे आढळला नाही. 

केरळच्या या भागामधील वाहत्या स्वच्छ नद्या शेतकऱ्यांना नारळाचे उत्पन्न तर देतातच त्याचबरोबर मासेही देतात. क्वचित ठिकाणी मला भातशेती आणि केळीचे उत्पादन आढळले. पण, ते सेंद्रिय आणि नदीच्या पाण्याशी त्याचा तसा संबंध नव्हता. मॉन्सूनमध्ये या नद्यांना पूर येतो पण काठावरच्या घनदाट वृक्षराजीमुळे त्यावर कायम नियंत्रण राहते. उत्तर केरळमधील या अकरा भगिनीची तुलना जेव्हा मी आपल्या कोकणातील नद्यांबरोबर करतो तेव्हा लक्षात येण्याइतपत फरक जाणवतो. कोकणामधील नद्या मॉन्सूनमध्ये रौद्ररूप धारण करून अनेक गावे आणि लहान मोठी शहरे आपल्या कवेत घेतात. राजापूर, महाड, चिपळूण अशी कितीतरी उदाहरणे आहेत. शेती आणि स्थावर मालमत्तेचे येथे मोठे नुकसान होते. कोकणामधील प्रशस्त वाढती कारखानदारी, रसायने, सांडपाणी यांना समुद्राकडे जाण्याकरता नदीशिवाय पर्याय नाही. कोकणामधील समुद्र किनारे आणि वाळू रुपेरी असली तरी नद्या मात्र उपेक्षित आणि प्रदूषित आहेत. केरळमध्ये नदीच्या मार्गाने केवढे तरी पर्यटन होते ते त्यांनी नद्यांचा सन्मान केला आहे म्हणूनच आपल्याकडे समुद्र किनारे पर्यटनाचा भाग आहेत. मात्र, नद्या त्या अंगाने दुर्लक्षित आहेत.

महाराष्ट्रातील इतर नद्यांची अवस्था तर पाहवतच नाही अशी आहे. राजगुरुनगरला भीमा नदी पाहण्यास पुलावर उभा राहिलो तर खाली फक्त जलपर्णीच दिसत होती. धरणाचे पाणी सोडल्याशिवाय आमच्या नद्या जिवंत होत नाहीत, ही शोकांतिका आहे. पूर्वी गाव तेथे नदी होती, नदीचे असणे गावांच्या अस्तित्वासाठी आवश्यक होते. आता घरोघर नळाचे स्वच्छ पाणी येते. त्यामुळे नदी असली अथवा नसली तरी आम्हांला त्याचा काहीही फरक पडत नाही. माझ्या शालेय जीवनात नदीच्या पूर पाहण्यासाठी आम्ही तहान भूक हरवून तिच्या काठावर उभे राहत असू, पण आता ‘जगबुडी’ नदीच्या भीतीने माझा मित्र पावसाळ्यातच कोकण सोडून मुंबईत येतो. आमच्या मुंबापुरीच्या सर्व पाच नद्या आता नाल्यामध्ये रूपांतरित झाल्या आहेत. नाल्याची कसली भीती! नदीचा आनंद घ्यावयाचा असेल तर तिला उगमापासून वाहते करावयास हवे आणि तिची भीती दूर करावयाची असेल तर तिच्यामधील वाळूचे पूजन करून तिचा सन्मान करा, वृक्षापासून तिला वेगळे करू नका. उत्तर केरळमधील शेतकरी आणि तेथील नद्यांपासून आपण हेच तर शिकावयास हवे.          

डॉ. नागेश टेकाळे : ९८६९६१२५३१ (लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com