रस्ते की मृत्यूचे सापळे

भारत देश हा रस्ते अपघातात अव्वलस्थानी आहे. अधिक धक्कादायक बाब म्हणजे देशात ग्रामीण भागात रस्ते अपघातात मृत होणाऱ्या व्यक्तींची संख्या ही शहरी भागापेक्षा जास्त आहे. ११ जानेवारी ते १७ जानेवारी संपूर्ण भारतात रस्ते सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या सप्ताहाचा आज शेवटचा दिवस असला तरी रस्ते अपघात टाळण्यासाठी सर्वांनीच कायमच सजग राहिले पाहिजे.
agrowon editorial article
agrowon editorial article

आपला देश संपूर्ण विश्वात रस्ते अपघातात अव्वल आहे आणि यात होणारी जीवितहानी ही जवळपास १.५ लाख आहे. अपघात हे राष्ट्रीय महामार्गापासून ते खेड्यापाड्यातील छोट्या रस्त्यावर होणारे आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनकच म्हणावी लागेल. दरवर्षी आणि वर्षोनुवर्षे शासनाकडूनही विविध स्तरावर रस्ते सुरक्षा मोहिमा राबविल्या जातात. काही अंशी अपघातांवर वचक बसतो पण पुन्हा तेच याप्रमाणे अपघात काही कमी होत नाहीत. या अपघातांचं शहरी आणि ग्रामीण भागातील अपघात असे वर्गीकरण केले तर येणारा निकाल हा अजूनच धक्कादायक आहे. यामागील कारण म्हणजे ग्रामीण भागात रस्ते अपघातात मृत होणाऱ्या व्यक्तींची संख्या ही शहरी भागापेक्षा जास्त आहे. याला वेळीच कुठेतरी आळा घालणे अत्यंत आवश्यक आहे.

आपल्या राष्ट्राचा विकास होत असताना आणि दळणवळणाची साधने उपलब्ध होत असताना ग्रामीण भागात रस्ते आणि महामार्गांचे जाळे हे वाढत आहे पण त्याचबरोबर अपघातही वाढत आहेत. या संबंधी वेळीच प्रचार प्रसार होऊन भूमिपुत्रांच्या जीवनाचा मार्ग सुकर व्हावा आणि रस्ते अपघात कमी व्हावे असेच वाटते.

रस्ते अपघातांच्या कारणांचा अभ्यास करताना खालील काही मुद्दे लक्षात येतात     ग्रामीण भागात आजही दुचाकीस्वार हेल्मेट वापरण्यास तयार नाहीत. त्याला अनेक कारणे सांगितली जातात. त्यापैकी ते वागवणे गैरसोयीचे आहे म्हणून आम्ही वापरत नाही. सकाळी डेअरीत दूध घालण्यापासून ते आपला शेतमाल बाजारपेठेत घेऊन जाण्यापर्यंत आमचे शेतकरी बांधव दुचाकी चालवतात. अनेक अपघात हे दुचाकी आणि अवजड वाहनांची झालेली दिसतात. ज्यात डोक्याला लागलेल्या माराचे उपचार लवकर आणि वेळीच होत नाही. आजही ग्रामीण भागात आरोग्य केंद्रे आणि प्राथमिक उपचार केंद्रे हवे तेवढे उपलब्ध नाहीत आणि तालुका स्थळाला पोचेपर्यंत अपघातातील व्यक्ती गंभीर होते आणि अनेकदा प्राणाला मुकते. आजही असे अनेक उदाहरणे आहेत जिथे हेल्मेट नसल्याने मेंदूला लागलेल्या माराचा उपचार करत असताना अपघाती व्यक्ती अंथरुणाला खिळून आहे. त्यामुळे ग्रामीण भागात हेल्मेट वापरास प्राधान्य दिले गेले पाहिजे म्हणजे त्यातून असे प्रकार थांबवता येतील.     अवजड वाहने शेतीमाल वाहताना क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतात. या प्रकारात आपल्याला महामार्गावर अनेक वाहने ओव्हरलोडेड होऊन कोसळली दिसतात. ज्यात गंभीर जखमी आणि व्यक्ती मृत होण्याचे प्रमाण अधिक बघावयास मिळते. क्षमतेपेक्षा जास्त माल भरला गेल्याने वाहनांचा अवघड वळणावर तोल बिघडून अपघात होणे शक्य आहे. त्यामुळे थोडी रक्कम वाचविण्यासाठी असे प्रकार खरच टाळले गेले पाहिजे. ज्यात साखर कारखान्यात जाणाऱ्या उसाचे ट्रॅक्टर आणि मागे चार ट्रॉली हे आपल्याकडे अतिशय साहजिक पण घातक प्रकार सर्रास केले जातात. त्याला वेळीच प्रतिबंध आवश्यक आहे.     बाजाराला, जत्रेला आणि प्रवासाला जातानाचे वढाप, प्रवासी वाहनांना घेऊन जाणारी जोखीम ही एकेवेळी अनेक मृत्यूला कारणीभूत ठरते. ज्यात वाहनात क्षमतेपेक्षा दुप्पट, तिप्पट प्रवासी बसवून अत्यंत वेगाने राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर धावतात. हा प्रवास क्षणार्थात अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरतो. याबाबत अनेकदा शासन कारवाई केली जाते पण परिस्थिती ‘जैसे थे’च राहते. वाहन एक यंत्र आहे आणि त्याला काही मर्यादा आहेत, ज्या आपण विसरतो आणि सर्रास गर्दी वाहतो.     ग्रामीण भागातील वाहने अनेकदा नादुरुस्त अवस्थेत वापरली जातात  ज्यामुळे होणारे अपघातांची संख्या महामार्गांवर अधिक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील वाहनांना वेळोवेळी लक्षपूर्वकरित्या तपासूनच वापरली गेली पाहिजेत.     आपल्याकडे मोटार वाहन कायदा कितीही कठोर असला तरी निरीक्षणे वेगळीच आहेत. आजही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर अल्पवयीन मुले ही सर्रास वाहने चालवताना दिसतात आणि तेही परवाना नसताना. ज्या चालकाला रस्ते आणि नियम हे अवगत नाही तो सर्रास वाहन चालवत असेल तर हे स्वतःहून अपघाताला आवाहन आहे. त्यात वेग, वळण, शिस्त आणि परिमाण व परिणाम काय याबाबत चालक ज्ञात नाही आणि तो स्वतः त्याचा आणि दुसऱ्याचा मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो.     अरुंद रस्ते आणि अपघाती जागा : आपण आजही बघतो की अजूनही ग्रामीण भागात चिंचोळे रस्ते, धोकादायक वळणे आणि अरुंद पूल, दिवे आणि प्रकाशाचा अभाव असे अनेक व्यत्यय आहेत. ज्याकडे गांभीर्याने कधीच बघितले जात नाही आणि अनेक अपघात हे घडत असतात.

उपाय     रस्ते सुरक्षा या विषयाला घेऊन शाळा, ग्रामपंचायत आणि शासकीय संस्थांनी वेळोवेळी प्रचार प्रसार करावा.     समाजाचा विविध घटकांना बरोबर घेऊन गावातील अनेक अपघाती स्थळे शोधून वेळीच उपाय योजना करावी.     गरज असेल तिथे बेशिस्त वाहनधारकांना दंडात्मक मोहीम राबवून सुरक्षित रस्ते प्रवास उपलब्ध व्हावा.     विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवून वाहतुकीचे नियम हे सर्व थरात माहिती करून द्यावे.     अपघात ठिकाणी प्रथमोपचार पेटी व तत्काळ मदत पोचविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांतील कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिले जावे.

चेतन नलावडे  ः ८३०८३९९१०० (लेखक पी. एन. रक्षक या राष्ट्रीय महामार्ग व रस्ते सुरक्षेसाठी बनविल्या गेलेल्या यंत्रमानवाचे निर्माते आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com